Wednesday, September 23, 2015

घरटे


कालच्या पावसात एक घटना घडली.

झाडावरचं एक घरटं वा-याने अचानक पडलं.
दोघं जणं शब्दं संपल्यासारखे बसून होते.
त्याने तिला पंखानी जवळ घेतलं.
थरथरत्या पंखानी ती ही कुशीत शिरली.
'सकाळी बोलूयात', तो म्हणाला.
'हो', ती म्हणाली.
रात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले.

सकाळी स्वच्छ प्रकाश पडला.
तो उत्साहानी म्हणाला,
'निघूयात? नव्यानी काड्या आणू'.
तिच्या डोळ्यात पाणी आलं.
'अग वेडे, "पाडणं" त्याच्या हातात आहे तर "बांधणं" आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत!
चल निघूयात".

आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली...

तो

दिवाणखान्यात बसून
चारचौघांच्या संगतीत
मी जेव्हा तुझे अस्तित्व नाकारतो
तेव्हा आकाशाचे एक दार
किलकिले करून
तू पाहतोस माझ्याकडे कौतुकाने
कुतुहलानेही,

आणि सगळे निघून गेल्यावर
ताऱ्यांच्या अंधुक प्रकाशात
तू उतरतोस माझ्या एकांतात
आणि समोरच्य़ा खुर्चीत बसून
म्हणतोस - अभिनंदन
तुझे विवेचन छानच होते

इतके की मलाही शंका आली
माझ्या अस्तित्वाची -
पण तरीही मला माहीत आहे
मला मानणाऱ्यांमध्ये
तू अग्रेसर आहेस
फक्त तुझा दिवाणखाना
तुझ्या काळजापासून
फार दूर आहे, ईतकेच.

-कुसुमाग्रज (मुक्तायन, पान ४५)

Saturday, September 19, 2015

एका संन्याशाच्या लंगोटीची गोष्ट

एक संन्याशी होता. संसारी जगाला व त्यातल्या कट्कटींना कंटाळून त्याने संन्यास घेतला होता. गाववस्तीपासून दुर रानात एकटाच जीवन कंठत होता. कसला संसार नाही, की कसल्या दगदगी नाहीत. थंडीवार्‍यापासून बचाव करणारी एक पर्णकुटी बांधून तिथेच वास्तव्य करीत होता. त्या रानात मिळतील ती फ़ळे कंदमुळे खाऊन गुजराण करत होता. जवळच्या एका तळ्यात अंघोळ करायची व तिथेच जाऊन पाणी प्यायचे. बाकी त्याला कशाची गरज नव्हती. जीवनावश्यक वस्तूही नव्हत्या त्याच्यापाशी. संसार म्हणायचा तर अवघ्या दोन लंगोट्य़ा. त्यातली एक अंगावर असे तर दुसरी अंघोळीनंतर धुवून वाळत घातलेली असे. तळ्यावर जाई तेव्हा त्याला संसारात गांजलेले लोक दिसत व त्यांची त्याला खुप दया येत असे. पण तेवढाच त्याला जनसंपर्क होता. जनसंपर्क म्हणजे संसारी जगाशी तेवढाच संबंध. त्या गावातल्या भोळ्याभाबड्या लोकांना इतके कष्टप्रद जीवन जगणार्‍या संन्याशाविषयी भितीयुक्त आदर होता. तो सिद्धपुरूष आहे की नुसताच गोसावडा आहे, अशी चर्चा दबल्या आवाजात चालत असे. पण कोणी त्याला तो कुठून त्या रानात आला किंवा कधीपासून संन्यास घेतला; असे पश्न विचारण्याचे धाडस केले नाही. कधी एखादी देवभोळी महिला किंवा पुरूष आडरानात जाऊन सणासुदीला घरच्या पक्वान्नाचे जेवणाचे ताट त्या संन्याशाला भक्तीभावाने देत असत. तेवढाच त्याचा संसारी जगाशी संबंध येत असे. संन्यास किती सोयीचा असतो ना? कसल्या म्हणून कटकटी नाहीत. असे गावातल्या संसारी लोकांना वाटत असे. पण म्हणून खरेच त्या संन्यासाला कुठलीच समस्या नव्हती का?
 त्याचे जीवन असे विनासायास चालु असताना एक बारीकशी समस्या त्याला भेडसावू लागली. गावातून कधीतरी येणारे पक्वान्नाचे जेवण खाऊन जे खरकटे तो संन्याशी जवळच फ़ेकून देत होता, त्याचा एक उकिरडा तिथे तयार होत गेला आणि त्यातल्या नासल्या कुजल्या अन्नाची विल्हेवाट लावण्याचे काम निसर्गाला करायची वेळ आली. अर्थात निसर्गाचे काम कुठला कायदा वा घटनेनुसार चालत नसते. त्याने सर्वच शक्यता व शंकांचे उपाय खुप आधीपासून काढून ठेवलेले असल्याने संन्याशाच्या समस्येचा उपाय आपोआप कार्यरत झाला. त्याने आपल्या पर्णकुटीच्या जवळपास जो उकिरडा निर्माण केला होता त्याची विल्हेवाट लावायला तिथे एका उंदराची नेमणूक झाली. म्हणजे तिथे वास काढत एक उंदिर येऊन थडकला. तिथेच एक बिळ जमीनीत पोखरून वास्तव्य करू लागला. आता  पोटपाण्याची सोय लागली आणि बिळाच्या रुपाने वास्तव्याला घर मिळाल्यावर त्या उंदराच्या जीवनात स्थैर्य आले होते. मग त्याने सुखी संसाराची स्वप्ने बघितली तर नवल कुठले? कारण त्याने संन्यास वगैरे घेतला नव्हता. संसार, संन्यास अशा मानवी संकल्पनांची बाधा त्याला झालेली नव्हती. त्यानेही एक सहचरी शोधून आणली आणि संन्याश्याच्या पर्णकुटीजवळच्या बिळात आपला संसार थाटला. लौकरच त्याच्या संसारात बहार आली आणि त्याचा त्रास बिचार्‍या संन्याशाला सुरू झाला.
   उंदराची पिल्ले बिळाच्या बाहेर पडून खेळूबागडू लागली. एकेदिवशी त्यांना एका नव्याच खेळण्याचा शोध लागला. त्यांना आसपासच्या रानातल्या नैसर्गिक वातावरणात न शोभणारी कापडी वस्तु दिसली आणि ती एका झुडूपावर लटकत होती, वार्‍याने उडत फ़डफ़डत होती. उंदराच्या पोरांसाठी ती नवीच वस्तू म्हणजे खेळणेच होते ना? त्यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला आणि मग खेळून दमल्यावर असेल तिथेच ते कापड सोडुन बिळात विश्रांतीसा्ठी निघून गेली. हा ने्हमीचा प्रकार झाला. पण त्याचा त्या बिचार्‍या संन्याशाला मनस्ताप होऊ लागला. कारण रोज सकाळी आंघोळ केल्यावर वाळत घातलेली लंगोटी त्याला दुसर्‍या दिवशी सकाळी जागच्या जागी सापडेना. त्याने शेवटी दबा धरून शोध घेतला, तेव्हा त्याला जवळच उंदराने बिळ केल्याची व उंदिरच ही उचापत करीत असल्याचा शोध लागला. त्याचा बंदोबस्त कसा करावा ही त्याच्यासाठी समस्या तयार झाली. दिवसेदिवस त्या उंदरांच्या टोळीने उच्छादच मांडला आणि त्यांचा बंदोबस्त आवश्यक असल्याचे संन्याशाला जाणवले. त्याने गावातल्या जा्णकारांशी प्रथमच संपर्क साधून सल्ला घेतला तर त्याला खुप आश्चर्य वाटले. उपाय खुपच सोपा होता आणि आपल्यासारख्या तपस्व्याला तो का सुचला नाही, याचे त्या संन्याशाला वैषम्य वाटले.Image result for cat
   गावातल्या जाणत्यांनी त्याला एक मांजर पाळण्याचा सल्ला दिला. तेवढेच नाही तर त्याला एक मांजराचे पिल्लूसुद्धा भेट दिले. पण एकदोन दिवसापेक्षा अधिक काळ तिथे पर्णकुटीच्या परिसरात ते मांजर टिकेच ना. एकदोन दिवस झाले की मांजर गावात पळून जायचे. मग त्याला शोधत फ़िरायची वेळ संन्याशावर यायची. त्याचा तपोभंग होऊ लागला. पण जेवढा वेळ मांजर तिथे असायचे, तेवढा काळ उंदरांचा बंदोबस्त चांगला होत असे. पण हे मांजर टिकवायचे कसे? तेव्हा गावकर्‍यांनी सल्ला दिला, की मांजराच्या दूधाची व्यवस्था करायला हवी. त्यासाठी संन्याशाने म्हैस पाळणे आवश्यक होते. जागच्या जागी दूध मिळू लागले तर मांजर कशाला पर्णकुटी सोडून जाईल? संन्याशाला ती आयडीया पटली आणि गावकर्‍यांनीच त्याला एक चांगली दुभती म्हैस भेट देऊन टाकली. पण मांजराच्या दूधाची समस्या सुटली तरी म्हैस बांधायची Image result for buffaloकुठे आणि तिला चारायचे कधी; ही समस्या दोनच दिवसात समोर आली. तेव्हा पुन्हा संन्याशाला बुजूर्ग गावकर्‍यांचा सल्ला घ्यायची वेळ आली. त्यांनी त्यासाठी छान उपाय सुचवला आणि त्यातून सर्वच समस्या सुटून गेल्या. म्हशीचा संभाळ व दूध काढण्याचे काम करायला एक परित्यक्ता संन्याशाच्या वस्तीवर येऊन राहिल आणि त्या दोघांसाठी छोटीशी झोपडी गावकरी बांधून देतील असा तो उपाय होता. आठवड्याभरात तेही काम मार्गी लागले आणि उंदरांचा कायमचा बंदोबस्त होऊन गेला. आता संन्याशाची लंगोटी जागच्या जागी राहू लागली. उंदराची वर्दळ संपली. फ़ार कशाला संन्याशाला पाण्यासाठी तळ्याकडेही फ़िरकण्याची गरज उरली नाही. ती म्हशीचा संभा्ळ करण्यासाठी आलेली महिला पाणी भरत होती, स्वत:सा्ठी स्वयंपाक करताना संन्याशालाही दोन घास घालत होती. त्याच्या अंघोळीचे पाणी गरम करून देत होती. संन्याशाचे जीवन सुखात व्यतीत होऊ लागले होते. इतक्या आपुलकीने आपली सेवा करणार्‍या त्या महिलेबद्दल त्याच्या मनात स्नेहभाव निर्माण झाला नसता तरच नवल. आणि त्या स्नेहभावानेच तो संन्याशी कधी संसारी पुरूष होऊन गेला त्याचा त्याला किंवा गावकर्‍यांना पत्ता लागला नाही.
   एका पर्णकुटिच्या जागी चांगले शाकारलेले संसारी घर तिथे तयार झाले आणि तिथल्या अंगणातही मुले बागडू लागली. गावातल्या कुठल्याही घरात जशी भांडणे होतात व धिंगाणा होतो, तसाच तिथेही सुरू झाला आणि त्यात नवराबायकोच्या विसंवादाचाही भाग होताच. तपश्चर्या आणि संन्यास बाजूला पडला आणि कुठल्याही संसारी पुरूषाप्रमाणे तो संन्याशी गृहस्थ होऊन गेला होता. रोजच्या जीवनातील कटकटींना विटून गेला होता. ज्या महिलेविषयी स्नेहभावातून हे सर्व घडून आले, तिचा त्याला तिटकारा येऊ लागला. मग एकेदिवशी मोठेच भांडण जुंपले आणि ते ऐका्यला अवघा गाव गोळा झाला. तेव्हा संताप अनावर झालेला तो गृहस्थ आपल्या पत्नीला धमकी देत म्हणाला, "हे सर्व सोडून निघून जाईन, संन्यास घेईन." तेव्हा मात्र तिचा उसळलेला राग कुठल्या कुठे गायब झाला आणि मनसोक्त हसत ती उत्तरली, "मग हा संसार कशातून उभा राहिला? त्या तुमच्या संन्यासातूनच तयार झाला ना? साधी लंगोटी संभाळता येत नाही आणि संन्यासाच्या गप्पा कुणाला सांगता?" आपल्या सहचारिणीचे हे बोल ऐकल्यावर त्या गृहस्थाचे सर्व अवसान गळाले. हे वेगळे सांगायची गरज आहे काय? सुरूवात कुठून झाली होती? एका लंगोटीपासून ना? एका लंगोटीला उंदरांच्या तावडीतून वाचवताना तो संन्यासी कधी संसारी पुरूष होऊन गेला, त्यालाच काय पण गावकर्‍यांनाही कळले नव्हते. आणि एवढे झाल्यावर त्याने त्यातून सुटण्याचा उपाय कोणता काढला, तर पुन्हा लंगोटी नेसून संन्यास घेण्याचा. एक इवली लंगोटी सुद्धा कशी मोहाच्या जाळ्यात ओढत जाते त्याचा हा किस्सा.

Sunday, September 6, 2015

श्रीकृष्ण राण्या

श्रीकृष्णाविषयी असे म्हटले जाते की, त्यांच्या सोळा हजार एकशे आठ भार्या (पत्नी)होत्या. यामागचे कारण असे आहे की, नरकासुराच्या कारागृहात बंदी असलेल्या हजारो राजकुमारीकांना भगवान श्रीकृष्णाने मुक्त केल्यानंतर या सर्व राजकुमारीकांनी श्रीकृष्णाला पती मानले आणि श्रीकृष्णानेसुद्धा यांचा पत्नी रुपात स्वीकार केला. यामुळे यांच्या पत्नींची संख्या हजारांमध्ये आहे. परंतु भगवान श्रीकृष्णाच्या मुख्य 9 राण्या होत्या, ज्या पट्टराणी म्हणून प्रसिद्ध झाल्या. या सर्व राण्यांची एक रोचक कथा आहे.

राधा भगवान श्रीकृष्णाची प्रेयसी बनून राहिली परंतु श्रीकृष्णाच्या प्रमुख पट्टराणी रुपात सर्वात पहिले रुक्मिणी चे नाव घेतले जाते. या विदर्भ देशाच्या राजकुमारी होत्या आणि यांनी श्रीकृष्णाला आपले पती मानले होते. परंतु यांचा भाऊ रुक्मीला यांचे लग्न चेदी नरेश शिशुपालशी करण्याची इच्छा होती. यामुळे रुक्मिणीचे प्रेमपत्र वाचून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण करून त्यांच्याशी लग्न केले.

श्रीकृष्णाची दुसरी पट्टराणी देवी कालिंदी मानल्या जातात. या भगवान सूर्यदेवाच्या पुत्री आहेत. यांनी श्रीकृष्णाला पती रुपात प्राप्त करण्याची कठोर तपश्चर्या केली होती. यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने सूर्यदेवाकडे कालिंदीचा हात मागितला.

श्रीकृष्णाची तिसरी पट्टराणी मित्रवृंदा आहेत. या उज्जैनच्या राजकुमारी होत्या. भगवान श्रीकृष्णाने स्वयंवरात सहभागी होऊन मित्रवृंदाला आपली पत्नी बनवले होते.

श्रीकृष्णाच्या चौथ्या पट्टराणीचे नाव सत्या आहे. काशीचे नरेश नग्नज‌ित् यांच्या मुलीच्या लग्नासाठी एक विचित्र अट होती. त्या अटीनुसार जो व्यक्ती सात बैलांना एकाचवेळी वेसण घालेले तो सत्याशी लग्न करेल. श्रीकृष्णाने ही अट पूर्ण करून सत्याशी लग्न केले.

ऋक्षराज जांबुवंतची मुलगी जांबवंती श्रीकृष्णाची पाचवी पट्टराणी होती. स्यमंतक मण्यासाठी जेव्हा श्रीकृष्ण आणि जांबुवंत यांच्यामध्ये युद्ध झाले तेव्हा जांबुवंताच्या लक्षात आले की, श्रीकृष्णच त्यांचे आराध्य श्रीराम आहेत. त्यानंतर जांबुवंताने जांबवंतीचे लग्न श्रीकृष्णाशी केले.

श्रीकृष्णाच्या सहाव्या पट्टराणीचे नाव रोहिणी होते. रोहिणी गय देशाचे राजा ऋतुसुकृत यांची मुलगी होती. रोहिणीने स्वयंवरामध्ये श्रीकृष्णाला स्वतः पती रुपात स्वीकार केले होते.

श्रीकृष्णाची सातवी पट्टराणी होती सत्यभामा. ही सत्राजितची मुलगी होती. सत्राजितने प्रसेनची हत्या केल्याचा आणि स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप श्रीकृष्णावर लावला होता. श्रीकृष्णाने हे दोन्ही आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध केले आणि स्यमंतक मणी सत्राजितला परत दिला. त्यानंतर सत्राजितने सत्यभामा आणि श्रीकृष्णाचे लग्न लावून दिले.

श्रीकृष्णाच्या आठव्या पट्टराणीचे नाव लक्ष्मणा होते. स्वयंवरमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यात वरमाला घालून लक्ष्मणाने पती रुपात श्रीकृष्णाचा स्वीकार केला.

श्रीकृष्णाच्या नवव्या पट्टराणीचे नाव आहे शैव्या. राजा शैव्यची मुलगी असल्यामुळे तिला शैव्या म्हटले जाते.

आर्यांच्या मूर्तीपूजेचा उद्गाता कृष्ण

माझे महाभारतील अत्यंत आवडते व्यक्तिमत्व म्हणजे कृष्ण. तो खरा 'विकासपुरुष' होता. जरासंधाचे मगध राज्य
मथुरेच्या शेजारी होते. जरासंध लोभी आणि आक्रमक होता. त्याचे राज्य मथुरेपेक्षाअनेक पटींनी सामर्थ्यवान होते. त्यामुळे कृष्णाने वेळीच धोका ओळखून द्वारकेला यादवांचे स्थलांतर केले. आता मध्ये सामर्थ्यशाली आणि कृष्णाचे मित्र असे कुरु राज्य असल्याने जरासंधाचा धोका नव्हता. द्वारका हे एक उत्तम बंदर होते. मथुरेत गोपालक असणारे यादव आता व्यापारी बनले. परदेशांशी व्यापार करून द्वारका अल्पावधीतच सोन्याची झाली.........परंतु अल्पावधीत आलेली श्रीमंती नेहमीच धोकादायक असते. यादव या अल्पावधीत आलेल्या श्रीमंतीने दारू आणि अन्य व्यसनांत बुडाले आणि त्यांनी कृष्णाच्या समोरच आपला नाश ओढवून घेतला.
कृष्ण उत्तम राजानितीज्ञ होता. पश्चिमेपासून दूर पुर्वेपर्यंत त्याने स्वत: आणि पांडवांची लग्नसंबंध जुळवून सर्व राज्यांशी उत्तम संबंध जोडले. युद्धात प्रसंगी नीतिमत्तेशी तडजोड करून (उदा. धर्मराजाला द्वयार्थी बोलण्यास उद्युक्त करणे) पांडवांना युद्ध जिंकून दिले.
 मानसशास्त्र युद्धात किती महत्वाचे असते याची त्याला जाणीव होती. द्रोणाचार्यांना मानसिकदृष्ट्या खचविणे तर मानसिकदृष्ट्या खचलेल्या अर्जुनाला युद्धात उभे करणे यातून हे स्पष्ट होते. कर्णाला युद्धाच्या पूर्वी त्याचे जन्मरहस्य सांगून त्याला मानसिकदृष्ट्या खच्ची केले.
अत्यंत प्रबळ अशा यवन (राजा : कालयवन) आणि मगध (राजा : जरासंध) राज्यांनी एकाच वेळी मथुरेवर हल्ला केला. (यवन : उत्तरेकडून, मगध : दक्षिणेकडून) त्यावेळी त्याने वापरलेले युद्धतंत्र अप्रतिम होते.
सर्व यादवांना मथुरेहून सुरक्षित अशा द्वारकेला हलविणे आणि आपल्या सेनेसह युद्धाला सज्ज होणे.
जवळच्या डोंगरात मुचुकुंद राजा झोपला असल्याची आणि 'त्याला जो कोणी उठवेल तो भस्म होईल' असा वर इंद्राकडून मिळाल्याची आवई उठविणे, 
कालयवनला एकट्याने युद्ध करण्यास येण्याचे आव्हान देणे.
स्वत: घाबरून पळाल्याची बतावणी करत कालयवनाला आपल्या मागे त्या डोंगरात नेणे, 
आधीच पेरलेल्या स्फोटकांच्या (भू-सुरुंग?) सहाय्याने कालयवनाला उडवून देणे,
 मुचुकुंद राजाला उठविल्यामुळे कालयवन भस्मसात झाला झाले असे सांगणे
इंद्राच्या शापाने आपला राजा भस्मसात झाला हे कळल्यावर कोणती सेना युद्ध करण्यास तयार होईल?
          अति बलाढ्य शत्रूविरुद्ध लढताना यापेक्षा उत्तम रणनीती कोणती असू शकेल?

*कृष्ण महान तत्वज्ञानी होता. गीतेत सांगितलेले तत्वज्ञान कृष्ण मुक्तावास्थेला पोचलेला पुरुष होता याचीच साक्ष देते.

* कौरवांकडून पांडवांना मिळालेल्या खांडववनात बलिष्ठ नाग जमात राहत होती. तेथे राज्याची राजधानी वसावयाची तर नागांशी संघर्ष अटळ होता. म्हणून कृष्णाने नाग वंशाचाच संहार करायचे ठरविले. मात्र तो त्यात अपयशी ठरला. नाग-पांडव संघर्ष नंतर चार पिढ्या (अर्जुन, अभिमन्यू, परीक्षित आणि जनमेजय) चालला. खांडववनातील नागांचा संहार करताना कृष्णाने नागांचा सर्वोत्तम अभियंता मयासुराला अभय देऊन पांडवांसाठी राजवाडा बांधून घेण्याची समयसूचकता दाखविली.

* कृष्ण हा 'पूर्णावतार' होता. त्याने जे काही केले ते पूर्ण झोकून देऊन केले. त्यासाठी त्याने जनमताची लाज बाळगली नाही की देवांची भीती बाळगली नाही. आर्य निसर्गदेवता मानणारे होते. कृष्णाने प्रथमच 'गोवर्धन पर्वत' म्हणजे ऐहिक (Physical Objects) देवता मानण्यास सुरुवात केली. या दृष्टीने तो 'आर्यांमधील मूर्तीपूजेचा उद्गाता होता' असे म्हणता येईल.