Monday, August 14, 2017

द्वारका

कृष्णाने गोकुळ द्वारकेस हलविले आणि द्वारका सोन्याची केली हे आपणास परिचित आहे. कृष्णाचे जन्मस्थान मथुरा. तो वाढला गोकुळात. मथुरा/गोकुळ हे यमुनेच्या काठी उत्तर भारतात. कृष्णाने कंसाला ठार मारले. कंस हा बलाढ्य मगध साम्राज्याचा सेनापती होता आणि यादवांच्या राज्याचा राजा होता. कंसाला मारल्याने कंसाचा सासरा मगध सम्राट जरासंध याने त्याच्यावर हल्ले सुरु केले. जयद्रथ  सिंधू प्रदेशाचा राजा होता. कंसानंतर तो मगधेचा सेनापती झाला. जरासंघ याने मथुरेवर हल्ले सुरु केले. यावेळी झालेल्या आठ युद्धात कृष्णाला प्रत्येक वेळी काही प्रदेश गमवावा लागला. त्यात यवन प्रदेशातून (वायव्य भारत) काल-यवन आपली बलाढ्य सेना घेऊन मथूरेवर चालून आला. त्याच वेळी जरासंघानेही हल्ल्याची तयारी केली. यामुळे कृष्णाने यादवांना मथुरेहून हलवून द्वारकेला आणले. (कालयवनाचा सामना कृष्णाने कसा केला हे ही युद्धशास्त्राच्या दृष्टीने रंजक आहे. पण ते विषयांतर होईल). द्वारकानगरी भव्य तटांनी वेढलेली होती आणि त्यात प्रवेश करण्यासाठी अनेक द्वारे होती. म्हणून अनेक द्वारांच्या या नगरीला द्वारका असे नाव मिळाले. मात्र संशोधनातून दिसते की द्वारकानागरी श्रीकृष्णाच्या आधी काही हजार वर्षे अस्तित्वात होती. श्रीकृष्णाने या नगरीचे 'सोन्याच्या' समृद्ध नगरीत रुपांतर केले.
द्वारका हे अरबी समुद्राकाठचे छोटे बेट होते. येथून त्याकाळच्या समृद्ध प्राचीन रोमन साम्राज्यांशी जलमार्गे व्यापार करणे सुलभ होते. भारतीयाना प्राचीन काळापासून नौकानायानाचे ज्ञान होते. मोहेंजोदारो काळातील लोथाल हे Dry Dock द्वारकेपासून जवळच होते. कृष्णाची मित्र साम्राज्ये येथून जवळच होती. त्यामुळे कृष्णाने येथे यादवांना वसविले. आता यादव दुधाचा व्यापार न करता परदेशांशी (प्राचीन रोमन साम्राज्ये) व्यापार करू लागले आणि अल्प काळातच द्वारका समृद्ध झाली...सोन्याची द्वारका म्हणून ओळखली जाऊ लागली. (त्या काळी समृद्ध नगरींना 'सोन्याची' म्हणून ओळखले जात होते. उदा. 'सोन्याची लंका'). कृष्ण हा शूर योद्धा, डावपेच आखण्यात प्रवीण होताच पण त्याने तो 'विकासपुरुष' असल्याचेही सिद्ध केले. झपाट्याने श्रीमंत झालेल्या यादवांमध्ये श्रीमंती दोषही तेवढ्याच वेगात शिरले. दारूच्या आहारी जाऊन त्यांनी स्वत:चा नाश ओढवून घेतला.
काळ पुढे सरकत होता. महाभारतातील महाविनाशानंतर भारतवर्ष कित्येक शतके मागे फेकले गेले. अज्ञानाच्या अंध:कारात बुडाले. प्राचीन ज्ञानसम्पदेकडे दुर्लक्ष झाले. प्राचीन ग्रंथांचा विपरीत अर्थ लावला जावू लागला. ज्ञान अनुभवातून- स्व-अनुभूतीतून शोधण्याऐवजी पुस्तकातून शोधण्याची परंपरा सुरु झाली. अंधश्रद्धांच्या कर्दमात भारतवर्ष रुतले.
जागतिक हवामानातही बदल घडत होते. समुद्राची पातळी वाढत होती. महाभारतापासून आजपर्यंत सुमारे दहा मीटरने समुद्राची पातळी वाढल्याचे आजचे शास्त्र सांगते. (गेल्या दहा हजार वर्षात समुद्राच्या पातळीतील वाढ सुमारे ६० मीटर्स आहे). अतिसमृद्ध द्वारका - सोन्याची द्वारका समुद्राने गिळली. पण येथील जनसमूहाच्या स्मृतीत द्वारकेची जागा बसली होती. म्हणूनच आजच्या द्वारकेला जाणारे यात्रिक या द्वारका बेटापाशी (बुडालेले द्वारका बेट समुद्रात आजच्या द्वारकेपासून साथ मैल दूर आहे) बोटीने जावून दक्षिणा वहात आहेत. द्वारकेच्या काठावर समुद्र नारायणाचे मंदिर आहे. यात्रिक समुद्रात जाऊन समुद्रनारायणाला दक्षिणा अर्पण करीत असत. या जागांवर अधिक लक्ष देण्याचे ठरविले गेले. समुद्राखाली जेथे काही बांधकामाचे अवशेष पाणबुड्यांना मिळाले त्या जागा निश्चित करण्यात आल्या.
१९६३ साली पुणे विद्यापीठाच्या एका संशोधनात द्वारका बेटाचे काही पुरावे मिळाले होते. पण त्यानंतर त्यावर फारसे संशोधन झाले नाही. काही वर्षांपूर्वी प्रा. एस. आर. राव यांनी परत यावर संशोधन सुरु केले. त्यांना महाभारतकालीन (ख्रिस्तपूर्व १५०० वर्षे) अनेक वस्तू, भांडी, बांगड्या प्रभास क्षेत्री मिळाल्या. मूळ द्वारका आजच्या द्वारकेपासून सुमारे ३० किलोमीटर दूर समुद्रात आहे. हे द्वारका बेट त्या काळी मुख्य भूमीला जोडलेले होते. द्वारका बेताला 'शंखोधारा' या नावानेही ओळखले जात होते.  येथे अनेक प्रकारचे शंख मिळत असत. या शंखांची आभूषणे बनत असत. या द्वारकेच्या बाजूने मोठमोठाल्या चिऱ्याच्या दगडांनी बांधलेली संरक्षक भिंत होती. ही भिंत काळाच्या ओघात जमिनीखाली गाडली गेली होती.  या सर्व गोष्टी प्रा रावांना आपल्या संशोधनात मिळाल्या.
पाण्याखाली केलेल्या संशोधनात पाणबुड्यांना तेथील बांधकामावर जमलेल्या समुद्री वनस्पतींचे जंगल हटवावे लागले. हे काम अत्यंत काळजीपूर्वक करावे लागले. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ते शक्य झाले. बांधकामात मोठाल्या दगडी कमानी मिळाल्या.
पाण्याखाली पाणबुड्यांच्या सहाय्याने सहाय्याने केलेल्या संशोधनात मातीची प्राचीन भांडी मिळाली. यात भोके असलेले मोहेंजोदारोच्या शेवटच्या काळात वापरले जाणारे भोके असलेले पात्रही (Perforated Jar) होते. काही भांड्यांवर मोहेंजोदारो काळातील लिपीत लिहिलेले आहे.
शोभा राज्याच्या शाल्वराजाने द्वारकेवर हल्ला केला. कृष्णाने असा प्रकार परत होऊ नये म्हणून काही उपाययोजना केल्या. त्यासाठी त्याने तीन प्राण्यांचे चित्र असलेली शंखांपासून बनविलेली मुद्रा प्रत्येक नागरिकाला दिली. ही मुद्रा जवळ बाळगणे आणि कधीही विचारणा केल्यास दाखविणे प्रत्येक नागरिकास बंधनकारक होते. या समुद्राखालील संशोधनात ही मुद्राही मिळाली. ही शंखापासून बनविलेली आहे. १८X२० मिलीमीटर आकाराची ही मुद्रा आहे. यावर बैल, एकश्रुंगी घोडा आणि बकरा या तीन प्राण्यांच्या तीन प्राण्यांच्या मुद्रा आहेत. अशाच मुद्रा बहारीन येथे मिळाल्या आहेत. (द्वाराकेतील नागरिक तेथे गेले असता त्यांनी या मुद्रा आपल्याबरोबर नेल्या असाव्यात).
द्वारकेजवळ मोठी भोके असलेले बोटींचे दगडी नांगर सापडले. असेच नांगर  सायप्रस आणि सिरीयाजवळ सापडले आहेत. लाकडाचे ओंडके यात खुपसून बोट समुद्रात नांगरली जात असे. सायप्रस आणि सिरीयाशी भारताचा व्यापार इ.स.पूर्व २००० वर्षांपासून चालत असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत. द्वारका परदेशांशी व्यापार करूनच भरभराटीला आली होती.
द्वारकेत एक मोठाला नक्षीकाम केलेला दगडी खांब (Pillar) सापडला. एखाद्या महालाचा हा खांब असावा. या संशोधनात अनेक पितळी वस्तू सापडल्या. यात पितळी घंटांचा ही समावेश आहे. द्वारकेत सापडलेले एक काष्ठ शिल्प त्याचे carbon dating केल्यावर ख्रिस्त पूर्व साडेसात हजार वर्षे प्राचीन असल्याचे निष्पन्न झाले. हे carbon Dating भारतातील तसेच अमेरिकेतील प्रयोगशाळांत केले गेले. म्हणजेच Ice Age नंतर लगेचच भारतात शहरे वसविली गेली होती. या काळी फक्त भटक्या जमाती होत्या असा आजपर्यंत समज होता.
आजही येथील किनाऱ्यावर प्राचीन वस्तूंचे अवशेष वाहात येतात.
१९८७ मध्ये प्रथम भारतीय सामुद्री पुराणवस्तू संशोधन परिषद भरली होती यात देशोदेशींचे शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. यात या द्वाराकेवरील प्रा. रावांच्या संशोधनाचे खूप कौतुक झाले.
महाभारत ही केवळ एक पौराणिक कथा नाही तर त्याला इतिहासाचा ही आधार आहे हेच यावरून स्पष्ट होते.
आज हे संशोधन काही अनाकलनीय कारणाने थांबविण्यात आले आहे. या प्रोजेक्टवर काम करण्यात शास्त्रज्ञांना आता रस नाही असे सांगण्यात येते. S R Rao यांच्यानंतर ज्या शास्त्रज्ञाकडे या प्रोजेक्टची सूत्रे आली तो अचानक गायब झाला. यात या संशोधकांना कोणी धमकाविले तर नाही ना?
शास्त्रज्ञ S R Rao यांनी या बुडालेल्या द्वारकेतील पुराणवस्तूंच्या जतनासाठी काही निधीची मागणी केली होती. ती पण मान्य झाली नाही. निश्चितपणे काही राजकारणी लोकांच्या हितसंबंधांना बाधा येणार असल्यानेच हे झाले असावे. सध्याचे सरकार यात लक्ष घालणार काय?

https://www.youtube.com/watch?v=NVIsjx5X3QM
https://www.youtube.com/watch?v=nQZFS9Hij0M

No comments:

Post a Comment