Sunday, October 28, 2018

मांडुक्य उपनिषद १

उपनिषदे हे भारतीय प्राचीन ज्ञानाचे अत्युच्च शिखर समजले जाते. तसेच जगातील अत्यंत प्राचीन साहित्यापैकी एक समजले जाते. उपनिषदे हे वेदांचे एक अविभाज्य अंग आहे. वेदांचे सार त्यात सामावले आहे, म्हणून त्याला वेदांत म्हटले जाते. ('अंत' या शब्दाचा एक अर्थ 'शेवट' असा आहे तर दुसरा अर्थ 'शिखर' असाही आहे. उदा. 'सिद्धांत'). बहुसंख्य उपनिषदे वेदांच्या शेवटी येत असली तरी काही उपनिषदे वेदांच्या मध्येही येतात. म्हणून 'वेदांत' शब्दाचा 'वेदांचे सार'अर्थ योग्य वाटतो.

उपनिषदे अनेक आहेत. 'मुक्तीकोपानिषद ' या उपनिषदात १०८ उपनिषदांची नावे सांगितली आहेत. असे असले तरी दहा (अथवा अकरा) उपनिषदे महत्वाची समजली जातात. याचे कारण या उपनिषदांवर आद्य शंकराचार्यांनी भाष्ये लिहिली आहेत. (अकराव्या उपनिषदावरील भाष्य आद्य शंकराचार्यांचे आहे काय याबद्दल काहींच्या मनात शंका आहे). 'वेदांत (उत्तर मीमांसा) दर्शन' याच शंकरभाष्यावर आधारलेले आहे. आद्य शंकराचार्य अद्वैत मताचे पुरस्कर्ते असल्याने त्यांनी प्रतिपादिलेले दर्शन 'अद्वैत वेदांत' म्हणून ओळखले जाते. आपण मांडुक्य उपनिषदाची ओळख या अद्वैत वेदांताच्या परिभाषेत करून घेणार आहोत.

मांडुक्य उपनिषद हे सर्वात महत्वाचे आणि कठीण समजले जाते. मुक्ती मिळविण्यासाठी हे एकच उपनिषद समजून घेतले तरी पुरेसे आहे असेही काहीजण मानतात. आद्य शंकराचार्य त्यांच्या भाष्यात म्हणतात की या उपनिषदात वेदांताचे सारे सार सामावलेले आहे. यात  केवळ १२ श्लोक आहेत. हे उपनिषद अथर्ववेदाचा भाग आहे. यातील सातवा श्लोक या संपूर्ण उपनिषदाची मध्यवर्ती कल्पना आहे.; या उपनिषदात इतर अनेक उपनिषदाप्रमाणे गुरु-शिष्य संवाद अथवा कथा नाही.
मांडुक्य उपनिषदावरील गौडपादाचार्यांचे भाष्यही (मांडुक्यकारिका या नावाने) प्रसिद्ध आहे. गौडपादाचार्य हे आद्य शंकराचार्यांचे आजेगुरू. गोविंदपादाचार्य हे गौडपादाचार्य यांचे शिष्य. आद्य शंकराचार्य हे गोविंदपादाचार्य यांचे शिष्य. आद्य शंकराचार्यांनी मूळ मांडुक्य उपनिषद तसेच गौडपादाचार्य यांनी लिहिलेल्या कारिकेवरही भाष्य लिहिले आहे. या दृष्टीनेही मांडुक्य उपनिषदाचे महत्व आहे. १२ श्लोकांच्या मांडुक्य उपनिषदावर गौडपदाचार्य यांनी २१५ कारिका लिहिल्या आहेत. शंकराचार्यांच्या भाष्यावरही अनेकांनी टीका लिहिल्या आहेत. यामुळे या उपनिषादावर भरपूर साहित्य उपलब्ध आहे.

गौडपादाचार्यांच्या मांडुक्यकारिकेत चार प्रकरणे आहेत. पहिले प्रकरण मूळ मांडुक्य उपनिषदातील श्लोक पूर्वपक्ष म्हणून आले आहेत. दुसऱ्या प्रकरणात हे जग कसे मायावी (मिथ्या) आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तिसऱ्या प्रकरणात अद्वैतवादाचा पुरस्कार आहे. चौथ्या प्रकरणात यावर असलेल्या अन्य मतांचा परामर्श घेतलेला आहे.

मांडुक्य उपनिषद 'मी कोण आहे' याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. अन्य सर्व उपनिषदांप्रमाणे हे उपनिषदही 'आपण प्रत्येक जण ब्रह्म असल्याचे' प्रतिपादन करते. 'अयम् आत्मा ब्रह्म|' हे मांडुक्य उपनिषादातले ब्रह्मवाक्य आहे.परमेश्वर शोधण्यासाठी अन्य कोठेही जाण्याची गरज नाही. तो या क्षणी येथेच , तुमच्यातच आहे हे सर्वच उपनिषदे आग्रहाने सांगतात. तुम्हाला परमेश्वर बघायचा असेल तर तो काही विशेष रूपाने, चमत्कार घडून, अवकाशातून येणार नाही तर तो येथेच तुमच्यातच उपस्थित आहे असे हे सांगणे आहे. वेदांतानुसार परमेश्वर (ब्रह्म) अन्य कोणत्या जगात, स्वर्गात नाही तर तो सर्वव्यापी आहे. तसेच परमेश्वर (ब्रह्म)  सदा सर्वकाळ सर्व ठिकाणी  उपलब्ध आहे.  प्रश्न तुम्हाला त्याची अनुभूती येण्याचा आहे.म्हणजेच अध्यात्माचा प्रवास हा space आणि time मधून नाही तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे आहे. प्रत्येक उपनिषदाचा सांगण्याचा दृष्टीकोन (Approach) वेगवेगळा आहे. पण अंतिमत: सर्व उपनिषदे या एकाच गोष्टीचा पुरस्कार करतात. मांडुक्य उपनिषदाचा दृष्टीकोन या विषयाला सरळ भिडण्याचा आहे. म्हणूनच केवळ १२ श्लोकांत हे उपनिषद जे काही सांगायचे आहे ते सांगून टाकते.

हे उपनिषद दोन भागात विभागलेले आहे. पहिले सात श्लोक 'आत्मविचार' म्हणून ओळखले जातात. ते आत्म्याच्या स्वरूपाची माहिती देतात. नंतरचे श्लोक 'ओमकार विचार' म्हणून ओळखले जाते. यात ओमकाराचा उपयोग करून आपले ब्रह्मस्वरूप आपल्याला कसे ओळखता येते याचे विवेचन आहे.



3 comments:

  1. धन्यवाद सर... हे मी खूप दिवसापासून शोधत होतो ते आपल्याकसून मिळालें. पुनःश्च धन्यवाद

    ReplyDelete
  2. संतोष जी !!!
    उपनिषदाबद्दलचा अभ्यास तुमच्यामुळे सुरु झाला...
    खूप खूप आभारी आहे.

    ReplyDelete