Saturday, March 2, 2019

अद्वैत वेदांत

वेदान्त नामम् उपनिषदम् प्रमाणम् |
वेदांत हे दर्शन उपनिषदांवर, त्यातील ज्ञानावर आधारलेले आहे. उपनिषदे ही वेदांचा भाग आहेत. वेद हे जगातील सर्वात प्राचीन वाङ्मय समजले जाते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद आहेत. वेदातील बराचसा भाग हा यज्ञविधींसंबंधी आहे. वेदांच्या शेवटी (कधीकधी मध्यभागीही) वेदांची अध्यात्मिक भूमिका स्पष्ट करणारे विभाग येतात. तेच 'उपनिषदे' होत. उपनिषदे बहुतेकवेळा वेदांच्या शेवटचा भाग असल्याने त्याला 'वेदांत' म्हणत असावेत. किंवा वेदांतील उच्चतम तत्व सांगणारे असल्याने ('अंत' हा शब्द 'उच्चतम' या अर्थानेही येतो) त्याला वेदांत म्हणत असावेत.
उपनिषदे अनेक आहेत. त्यातील दहा महत्वाची समजली जातात. ही महत्वाची समजण्याचे कारण म्हणजे त्यावर आद्य शंकराचार्यानी भाष्य केले आहे. इशोपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, प्रश्नोपनिषद, ऐतरेय उपनिषद, तैत्तरीय उपनिषद, मुंडक उपनिषद, मांडुक्य उपनिषद, छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद ही ती दहा उपनिषदे होत. यातील मांडुक्य उपनिषद सर्वात लहान आहे तर बृहदारण्यक उपनिषद खूप मोठे आहे. काही उपनिषदे पद्यात (मंत्र) आहेत तर काही गद्यामध्ये आहेत. ती सुमारे तीन ते चार हजार वर्षांपूर्वीची असावीत. उपनिषदे 'अपौरुषेय' समजली जातात. म्हणजे ती कोणा  माणसाने रचलेली नसून प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांनी रचना केली आहे अशी श्रद्धा आहे. ऋषींना ध्यानावस्थेत आलेल्या अनुभवाचे ते सार आहे. हे ज्ञान त्यांना ध्यानावस्थेत मिळालेले असल्याने ते प्रत्यक्ष परमेश्वराने दिले असे मानतात.
उपनिषदांचा अर्थ भगवान कृष्णाने गीतेत सोप्या भाषेत उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रह्मसूत्रे हे ही उपनिषदांचे सार मानले जाते. ब्रह्मसूत्रात ५५५ सूत्रे आहेत. प्रत्येक सूत्र अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. उपनिषदे हे काव्य आहे, ब्रह्मसूत्रे ही त्या उपनिषदांचे अत्यंत तर्कशुद्ध विवेचन आहे. आद्य शंकराचार्यांनी उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यावर भाष्य केले आहे. या तीन ग्रंथांना 'प्रस्थानत्रयी' असे नाव आहे. अद्वैत वेदांत दर्शन या प्रस्थानत्रयीच्या भक्कम पायावर उभे आहे. जर अद्वैत वेदांताचा  'तत्वज्ञान' या भूमिकेतून अभ्यास करायचा असेल तर 'ब्रह्मसूत्रें महत्वाची ठरतात.
वेदांत दर्शनाच्या अनेक शाखा आहेत. उपनिषदांचा आणि विशेषतः: ब्रह्मसूत्रांचा अर्थ लावताना जी विविध मते-मतांतरे दिसतात त्यातून या विविध तत्वज्ञान शाखा निर्माण झाल्या आहेत. शंकराचार्यांचे 'ब्रह्मसूत्रभाष्य' हे अद्वैत वेदान्ताचा मुख्य मार्गदर्शक ग्रंथ समाजाला जातो. रामानुजाचार्य यांचे ब्रह्मसूत्रांवरील 'श्रीभाष्य' हे 'विशिष्टअद्वैत वेदांत' या शाखेचा मार्गदर्शक ग्रंथ समाजाला जातो. माध्वाचार्यांचे ब्रह्मसूत्रांवरील 'पूर्णप्रज्ञभाष्य' हा ग्रंथ 'द्वैत वेदांता'चा आधारभूत ग्रंथ आहे. निंबार्काचार्य यांचा 'वेदांतपारिजातभाष्य' हा ग्रंथ 'द्वैताद्वैत वेदांत' शाखेचा प्रमुख ग्रंथ आहे. वल्लभाचार्यांचे ब्रह्मसूत्रांवरील  'अनुभाष्य' हे 'शुद्धाद्वैत वेदांत' या शाखेचा मार्गदर्शक ग्रंथ आहे. 'गोविंदभाष्य' ही ब्रह्मसूत्रांवरील टीका  'अचिंत्यभेदाभेद' ही गौडवैष्णव पंथियांचा प्रमुख ग्रंथ आहे. 'हरेराम पंथीय' हे गौडवैष्णव पंथीयांमध्ये येतात.
अद्वैत वेदांत दर्शन समजण्यास कठीण आहे. म्हणूनच याच्या अभ्यासास सुरुवात करताना सुकर व्हावे म्हणून प्रत्येक शाखेचे काही 'प्रकरण ग्रंथ' (Introductory Texts) आहेत.  दृक्-दृश्य विवेक, वेदांतसार, वेदांत परिभाषा, विवेक चुडामणी, अपरोक्षअनुभूती, उपदेशसहश्री , आत्मबोध हे असे काही प्रकरण ग्रंथ आहेत. या प्रकरण ग्रंथात संपूर्ण वेदांताचा सारांश सांगितलेला असतो अथवा वेदान्ताच्या एखाद्या पैलूचा उहापोह केलेला असतो.
पुढील काही लेखात आपण यातील काही 'प्रकरण ग्रंथांचा' उहापोह करणार आहोत. 

No comments:

Post a Comment