Monday, November 18, 2019

Problem of Evil आणि कर्मसिद्धान्त

तत्वज्ञानाचा अभ्यास करताना अपरिहार्यपणे एक मुद्दा पुढे येतो. तो तत्वज्ञानात Problem of Evil या नावाने ओळखला जातो.  परमेश्वराची व्याख्या करताना तो  सर्वज्ञ (Omniacient), सर्वशक्तिमान (Omnipotent) , सार्वकालिक (Omnivorous) , आणि चराचरात सामावलेला (Omnopresent) अशी केली जाते.  मग असा सर्वशक्तिमान परमेश्वर जगात असताना जगावर, माणसांवर संकटे येतातच कशी हा प्रश्न अनेकवेळा सर्वसामान्य माणसाला पडतो.  पाश्चात्य धर्मकल्पनांनुसार (Abrahamic religions) परमेश्वरासारखाच एक सैतान आहे अशी कल्पना करून या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही सर्वशक्तिमान परमेश्वर या सैतानाला काबूत का आणू शकत नाही हा प्रश्न उरतोच.
मानवाच्या आदिम अवस्थेत मानवाला सर्वशक्तिमान परमेश्वराची कल्पना सुचली असावी. हा परमेश्वर माणसासारखाच असून प्रसन्न झाल्यास आपले संरक्षण करेल, इच्छापूर्ती करेल, रागावल्यास संकटे निर्माण करेल अशी कल्पना मानवाने केली असावी.  अधिक प्रगती झाल्यावर मानवाने या परमेश्वराला दयाळूपणा जोडला असावा. मग सर्वशक्तिमान आणि दयाळू परमेश्वर असतानाही जगावर आणि आपल्यावर संकटे का येतात अशी शंका निर्माण झाली असणार. पाश्चात्य कल्पनांनुसार या परमेश्वराला तुम्ही शरण जाणे आवश्यक आहे. मगच तो तुमचे संरक्षण करेल.
भारतीय भूमीत मात्र या Problem of Evil ला वेगळे उत्तर शोधले गेले. येथे या प्रश्नाच्या उत्तरासाठी कर्मसिद्धांत मांडला  गेला.  परमेश्वर सर्वशक्तिमान आहे. पण तुम्ही चांगली/वाईट कर्मे केली असतील तर त्यांची फळे तुम्हाला कधीनाकधी भोगावीच लागतील असे हा कर्मसिद्धांत सांगतो. चार्वाक सोडता भारतीय भूमीत जन्मलेल्या सर्व धर्मानी/दर्शनांनी ही कर्मसिद्धांताची कल्पना कोणत्या ना कोणत्या मार्गाने उचलून धरली आहे.  शून्यवाद स्वीकारलेल्या बौद्ध धर्मानेही ही कर्मसिद्धान्ताची कल्पना प्रतीत्यसमुत्पादात संख्ररा (संस्कार) या नावाने स्वीकारली आहे.
मात्र ही कर्मसिद्धान्ताची संकल्पना स्वीकारतानाही एक अडचण निर्माण होते. जीवाच्या जन्माचे कारण मागील कर्मांची फळे भोगणे हे आहे असे सांगितले जाते. जीव कर्माची फळे भोगताना अज्ञानामुळे नवी कर्मे निर्माण करतो आणि ही साखळी चालू राहते असे कर्मसिद्धांत मानतो. जरी कर्मसिद्धांताच्या साखळीची कल्पना मान्य केली तरी ही साखळी मुळात सुरूच का झाली हा प्रश्न उभा राहतो. कर्मसिद्धांतावरील हाच मुख्य आक्षेप आहे.
कर्मसिद्धान्ताची संकल्पना समजावून घेताना 'माया' ही संकल्पनाही समजावून घेणे अपरिहार्य ठरते. माया ही ब्रह्माची शक्ती आहे हे आपण या आधीच्या लेखात पहिले आहे. सर्व विश्व ब्रह्मस्वरूप आहे, मायेच्या आवरणामुळे ते आपल्याला भासमान होते.  आपले मायेसंबंधीचे अज्ञान दूर झाले की ब्रह्म प्रकट होते.  स्थल आणि काल हे मायेचे क्षेत्र आहे. विश्वाच्या आरंभापूर्वी काल नव्हता तसेच स्थल (Space) नव्हते. त्यामुळे तेव्हा मायेचे अस्तित्व नव्हते. मात्र ब्रह्माचे होते.  कार्यकारणभाव हा कालावर अवलंबून असतो. कारण आधी घडावे लागते, मगच कार्य होते. म्हणजेच कार्यकारणभाव हे मायेचे क्षेत्र आहे. कर्म आधी घडावे लागते, त्याची फळे नंतर मिळतात. अर्थात कर्मसिद्धांत हा मायेच्या क्षेत्रात येतो.
माया ही अज्ञानरूपात आहे.  ब्रह्माच्या अज्ञानात मायेचा जन्म आहे. कोणत्याही अज्ञानाला आरंभ नसतो. अंत असू शकतो. उदाहरणार्थ मला रशियन भाषेचे ज्ञान नाही.  'कधीपासून मला रशियन भाषेचे ज्ञान नाही?'  असा प्रश्न उद्भवत नाही.  माझ्या या अज्ञानाला आरंभ नाही.  परंतु अंत असू शकतो. मी रशियन शिकल्यास या अज्ञानाचा अंत होईल. तद्वतच अज्ञानारुपी मायेत जन्म झालेल्या आपल्या कर्मसाखळीला आरंभ नाही. परंतु अंत असू शकतो. आपल्याला  मायेचे खरे स्वरूप कळल्यास या अज्ञानाचा अंत होईल. आपली कर्मसाखळी तुटून आपण मुक्त होऊ.
आपल्या सर्वांना मायेच्या स्वरूपाचा बोध व्हावा आणि आपली कर्मसाखळी तुटून आपण मुक्त व्हावे ही शुभेच्छा.

Sunday, November 17, 2019

विश्व आणि ईश्वर यातील संबंध

प्राचीन भारतात विविध तत्वज्ञाने उगम पावली. या तत्वज्ञानांना 'दर्शने' या नावाने ओळखले जाते. तत्वज्ञानाचा अभ्यास हा 'दर्शनशास्त्र' या नावानेच ओळखला जातो. प्राचीन भारतीय दर्शनांपैकी आठ दर्शने ही प्रमुख मानली जातात. त्यात सहा दर्शने ही हिंदू दर्शने म्हणून ओळखली जातात (षटदर्शने) तर जैन आणि बौद्ध दर्शने ही अहिंदू दर्शने मानली जातात. सहा प्रमुख हिंदू दर्शने पुढील प्रमाणे .. न्याय, वैशेषिक, सांख्य, चार्वाक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अथवा वेदांत. या विविध दर्शनांनी विश्व आणि ईश्वर यांचा संबंध याबाबत उहापोह केलेला आहे.
चार्वाक दर्शन हे इहवादी आहे. त्यामुळे ईश्वराचे अस्तित्वच हे दर्शन नाकारते.
विश्व आणि ईश्वर यांच्यातील संबंध तीन प्रकारे दाखविता येतो. याला आरंभवाद, परिणामवाद आणि विवर्तवाद अशी नावे आहेत.
१> आरंभवाद : नैय्यायिक आणि वैशेषिक विश्व आणि ईश्वर यातील संबंध 'आरंभवाद' या तत्वाने मांडतात. आरंभवाद म्हणजे कोठल्यातरी कारणाने कोणत्यातरी गोष्टीपासून पूर्णतः नवी गोष्ट उदयास येणे. प्राणवायू आणि हायड्रोजन यांच्या संयुगातून पूर्णतः: वेगळे गुणधर्म असणारे पाणी तयार होते तसेच काहीसे हे आहे. आरंभवादानुसार ईश्वराने हे विश्व निर्माण केले. पाश्चात्य धर्मही विश्व आणि ईश्वर यांचा संबंध आरंभवादानुसार दाखवितात. माणसाच्या आदिम अवस्थेत स्फुरलेला हा विचार आहे.
२> परिणामवाद : सांख्य दर्शन विश्व आणि ईश्वर यांच्यातील संबंध 'परिणामवाद' या तत्वाने मांडतात. एखादी गोष्ट दुसऱ्या भिन्न गुणधर्म असलेल्या गोष्टीत परावर्तित होते त्याला परिणामवाद म्हणतात. उदाहरणार्थ दूध हे दह्यात रूपांतरित होते तेव्हा दुधाचे गुणधर्म बदलतात. सांख्य दर्शनानुसार प्रकृती ही या विश्वात परिवर्तित होते. हे विश्व म्हणजे प्रकृतीचेच परिवर्तन आहे. योग आणि आयुर्वेद हे सांख्य दर्शनातून आलेले असल्याने त्यावर या तत्वज्ञानाचा प्रभाव आहे.
३> विवर्तवाद : अद्वैत वेदांत विश्व आणि ईश्वर यातील संबंध 'विवर्तवादाने' मांडते. विवर्तवादानुसार एखादी वस्तू अज्ञानामुळे वेगळी भासते. वस्तू तीच असते, केवळ अज्ञानामुळे ती वेगळी भासते. अंधाऱ्या खोलीत दोर पडलेला असतो, परंतु आपल्या अज्ञानामुळे आपल्याला तो सापासारखा वाटतो. आपला तो अनुभव पूर्णतः: खरा असतो. आपण तो साप समजून घाबरतोही. आपले अज्ञान दूर होताच आपल्याला तो दोर आहे हे कळते. अद्वैत वेदांतानुसार विश्व हे ईश्वरच (ब्रह्म) आहे, परंतु केवळ आपल्या अज्ञानामुळे आपल्याला ते विश्व ब्रह्मापासून वेगळे भासते. आपले अज्ञान दूर झाल्यावर विश्व हे ब्रह्मच असल्याची स्पष्ट जाणीव होते.
संतोष कारखानीस