Showing posts with label दर्शनशास्त्र. Show all posts
Showing posts with label दर्शनशास्त्र. Show all posts

Friday, December 8, 2023

सांख्य दर्शन ७ : उपसंहार

 गेला आठवडा आपण सांख्य दर्शनाचा अभ्यास करत होतो. हे इ.स. पूर्व ७०० वर्षे इतके प्राचीन दर्शन आहे.  भारतीय जनमानसावर सर्वात अधिक प्रभाव या दर्शनाचा आहे. 

'सत्कार्यवाद' हा या दर्शनाचा आधार आहे. म्हणजेच शून्यातून काही निर्माण होऊ शकत नाही असे हे दर्शन मानते, त्यामुळे या आधीच्या न्याय आणि वैशेषिक दर्शनाच्या 'देवाने विश्व घडविले' या सिद्धांतास हे दर्शन विरोध करते. या विश्वाची 'पुरुष' आणि 'प्रकृती' ही दोन मूलभूत तत्वे असल्याचे हे दर्शन प्रतिपादन करते.

प्रकृतीमध्ये असीम शक्यता दडलेल्या आहेत. मात्र या शक्यतांचे प्रकटीकरण करण्यासाठी ती अस्वस्थ आहे. पुरुष हा केवळ चैतन्य आहे. अनुभवाशिवाय चैतन्यला अर्थ नाही. प्रकृती आणि पुरुष एकत्र आल्यावर प्रकृती पुरुषापुढे विश्व उभे करते. पुरुष त्याचा अनुभव घेण्यात अडकत जातो. आपण प्रकृतीपासून वेगळे आहोत हेच विसरतो. त्यामुळे तो दु:ख अनुभवतो. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे पुरुषाला आपल्या निरंजन चैतन्याची जाणीव होणे. याला या दर्शनात 'कैवल्य' असे नाव आहे. पुरुषाला ही जाणीव होण्यासाठी अनेक मार्ग या ऋषीमुनींनी दाखविले आहेत. आपण एक उदाहरण म्हणून त्यातील एका मार्गाची ओळख करून घेतली.

हे दर्शन प्रकृतीचा खोलात शिरून अभ्यास करते. प्रकृतीने हे विश्व आपल्यापुढे उभे केले आहे. आपल्या समस्याच या विश्वातील समस्याच आहेत. त्यामुळे आपल्या विविध ज्ञानशाखांनी आपल्या दैनंदिन समस्यांवर उपाय शोधण्यासाठी याच दर्शनाचा आधार घेतला. आपण यापैकी एका ज्ञानशाखेचे उदाहरण पाहिले. 


प्राचीन भारतीय ज्ञान हे विविध शाखांच्या तुकड्यातुकड्यात निर्माण झालेले नाही. ते एकसंघ (streamlined) आहे. हेच आपल्या विविध ज्ञानशाखांचे वैशिष्ट्य आहे.  आयुर्वेदाचा अभ्यास सांख्यदर्शनाच्या अभ्यासाशिवाय अपूर्ण राहील. असेच अन्य शाखांच्याबाबत आहे. 

एक भारतीय म्हणून आपल्याला सांख्य दर्शनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे असे मला वाटते. 

ही लेखमाला येथेच संपवितो. 
लेखनसीमा  !

Thursday, December 7, 2023

सांख्य दर्शन ६ : आयुर्वेद


सांख्यदर्शन हे आपले अतिप्राचीन दर्शन आहे. भारतीय माणसावर या दर्शनाने अनेक शतके प्रभाव टाकलेला आहे. 

वेदान्त दर्शन प्रामुख्याने हे विश्व 'माया' आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या विश्वातील समस्यांवर या दर्शनाच्या माध्यमातून उपाय शोधणे कठीण जाते. याउलट सांख्य दर्शन हे पुरुष आणि प्रकृती अशी विभागणी करून प्रकृतीचा खोलात जाऊन वेध घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या विश्वातील विविध समस्यांची कारणे आणि उपाय शोधण्याचा मार्ग मोकळा होतो. 

भारतीय आयुर्विज्ञान शास्त्र आयुर्वेद हे ही सांख्य दर्शनावर आधारलेले आहे. यात आपल्या शरीरात 'कफ', 'पित्त' आणि 'वात' या तीन दोषांचे (गुणांचे) संतुलन असते असे मानले गेले आहे. हे दोष पंचमहाभूतांच्या एकत्रीकरणातून तयार होतात. जर हे संतुलन बिघडले तर आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात असे आयुर्वेद मानतो. हे संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी विविध रसायने आयुर्वेद सुचवितो. 


आकाश आणि वायू एकत्र येऊन 'वात' दोषाची निर्मिती होते. 'आकाश' आणि 'वायू' एकत्र आल्यामुळे 'हालचाल' हे वाताचे मुख्य लक्षण आहे. आपल्या शरीरातील आणि चित्तामधील चलनवलन यावर वातदोषाचे नियंत्रण असते. उदाहरणार्थ रक्तप्रवाह, शरीरातील विषद्रव्यांचे निराकरण, श्वासोच्छवासाची प्रक्रिया, चेतासंस्थेचे कार्य, मनातील विचारांचा प्रवाह, सांध्यातील हालचाली इत्यादींवर वातदोषाचा प्रभाव असतो. वातदोष असंतुलित झाल्यास शरीराच्या या कार्यात अडथळा येऊ शकतो. 

पंचमहाभुतांमधील 'अग्नी' आणि 'जल' एकत्र येऊन 'पित्त' दोषाची निर्मिती होते. ही दोन पंचमहाभूते एकत्र आल्याने उष्णता, तरलता आणि स्निग्धता ही पित्ताची मुख्य लक्षणे आहेत. पचनसंस्था, त्वचा आणि त्वचेचा उजळपणा, शरीराचे तापमान यावर पित्तदोषाचा प्रभाव असतो. पित्तदोष असंतुलित झाल्यास शरीराच्या या कार्यात अडथळा येऊ शकतो. 

पंचमहाभुतांमधील 'जल' आणि 'पृथ्वी' एकत्र येऊन 'कफ' दोषाची निर्मिती होते. 'पृथ्वी' हे अत्यंत स्थिर पंचमहाभूत आहे हे आपण जाणतोच.  संथपणा, स्थिरता, शांतता, गारवा ही कफदोषाची मुख्य लक्षणे आहेत. कफदोष असंतुलित झाल्यास शरीराच्या या कार्यात अडथळा येतो. 

आयुर्वेदात या तीन दोषांच्या संतुलनाचा विचार केला जातो. पण आपल्या शरीरावर 'प्रकृती' आणखीही वेगळ्या मार्गाने प्रभाव टाकत असते. जन्मत:च आपले शरीर संतुलित नसते. प्रत्येकाच्या शरीरात कोणत्या ना कोणत्या दोषाचा अधिक प्रभाव असतो. आपले शरीर त्यानुसार विविध गोष्टींना प्रतिसाद देत असते. त्यामुळे आयुर्वेदिक औषध देताना आपल्या शरीरात मूलभूत कोणते दोष अधिक आहेत यावरही औषधयोजना ठरत असते. आपल्या शरीरात कोणता दोष अधिक आहे हे आपले आपल्याला ओळखता येते आणि त्याप्रमाणे आपण आपली काळजी घेऊ शकतो. हा विषय मोठा आहे आणि विस्तारभयास्तव येथे देता येत नाही. कधीतरी यावर विस्तृत लिहीन. 

आयुर्वेदाचा आधार 'सांख्यदर्शन' आहे.  सांख्यदर्शन भारतीय समाजात खोलवर मुरलेले आहे. 







Wednesday, December 6, 2023

सांख्य दर्शन ५ : कुंडलिनी ध्यान

 प्रकृती आपल्यातील असीम शक्यता दाखविण्यासाठी अस्वस्थ आहे. पुरुष (चैतन्य) विविध अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहे. म्हणूनच प्रकृती आणि पुरुष एकत्र आले की एकमेकांना सहाय्यभूत होतात. परंतु आपला खेळ अधिकाधिक वेळ चालत राहावा म्हणून प्रकृती पुरुषाला आपल्यात अधिकधीक गुंतवत जाते. यात पुरुष आपण मुळात 'केवळ चैतन्य' आहोत हेच विसरतो. मग प्रकृतीमुळे मनात निर्माण होणारी सुख-दु:खे आपलीच आहेत असे समजू लागतो. हेच माणसाच्या दु :खाचे कारण आहे. पुरुषाला आपण प्रकृतीपासून वेगळे असल्याची जाणीव होणे - म्हणजे कैवल्य प्राप्त होणे - हा या जीवनातील दु:खातून बाहेर येण्याचा मार्ग आहे असे सांख्य दर्शन मानते. 

कपिल मुनींनी इ.स.पूर्वी सातशे वर्ष या काळात सांख्य दर्शन प्रतिपादन केले. त्यानंतर सत्तावीसशे वर्षात पुरुषाला प्रकृतीच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचे अनेक मार्ग सुचविले गेले. यापैकी एक मार्ग आहे 'कुंडलिनी ध्यान'. कुंडलिनी ध्यानाचा आधार सांख्य तत्वज्ञान आहे. 

पुरुषाला प्रकृतीच्या जाळ्यातून बाहेर यायचे असेल तर अत्यंत सावधपणे ज्या क्रमाने गुंतत गेलो त्याच्या विरुद्ध क्रमाने स्वत:ला सोडवून घ्यावे लागेल. म्हणजेच ज्या गोष्टीत शेवटी गुंतलो त्यातून प्रथम सुटका करावी लागेल. कोठल्याही जाळ्यात अडकलेल्या माणसाला अशाच क्रमाने जावे लागते. कुंडलिनी ध्यानात हाच क्रम आहे. 

पाठीच्या काण्यात प्रत्येक दोन मणक्यांमधून चेतातंतू बाहेर पडतात. यातील पाच ठिकाणे कुंडलिनी ध्यानात महत्वाची मनाली गेली आहेत. या शिवाय कपाळावरील दोन भुवयांमधील जागा (भ्रूमध्य) आणि डोक्याचा सर्वात वरचा भाग (टाळू) ही ठिकाणेही महत्वाची मनाली गेली आहेत. या ठिकाणांना 'चक्र' म्हणतात. ही सात चक्रे कुंडलिनी ध्यानात महत्वाची मनाली जातात. 

सर्वात खालचे गदद्वाराजवळचे मूलाधार चक्र  या चक्रावर  'पृथ्वी' या पंचमहाभूतांचे  वर्चस्व असते. त्यानंतर अनुक्रमे स्वाधिष्ठान चक्र (जल), मणिपूर चक्र (अग्नी), अनाहत चक्र (वायू) आणि घशातील विशुद्ध चक्र (आकाश) अशी चक्रे येतात. प्रकृतीच्या खेळातून बाहेर पडायचे असेल तर क्रमाक्रमाने मूलाधार चक्रापासून सुरुवात करून विशुद्ध चक्र जागृत करावे लागते. नंतर भ्रूमध्यातील आज्ञाचक्र आणि टाळूमधील सहस्त्रार जागृत करावे लागते. शेवटची दोन चक्रे आपल्या चित्ताशी संबंधित आहेत. अशा प्रकारे पुरुष ज्या क्रमाने प्रकृतीच्या जाळ्यात अडकला त्याच्या विरुद्ध क्रमाने सुटका करून घ्यावी लागते. 

पुरुषाला प्रकृतीच्या जाळ्यातून सोडविण्यासाठी इतरही अनेक उपाय ऋषीमुनींनी शोधले आहेत. परंतु त्यावर माझा फार अभ्यास नाही. आपला नित्य व्यवहार प्रकृतीशी होत असल्याने सांख्य दर्शन आधारभूत मानून अनेक जीवनोपयोगी शास्त्रे विकसित झाली आहेत. उदा. योग, आयुर्वेद. आपण याबद्दल पुढील लेखात विचार करू. 

कुंडलिनी ध्यानासंबंधी विस्तृत विवेचन माझ्या ब्लॉगवर 'कुंडलिनी ध्यान' विभागात आहे. 

Monday, December 4, 2023

सांख्य दर्शन - ३ : त्रिगुणात्मक प्रकृती

सत्कार्यवाद हा सांख्य दर्शनाचा पाया आहे हे आपण पाहीले. सत्कार्यवादानुसार कोणतीही गोष्ट शून्यातून निर्माण होऊ शकत नाही. कोणत्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी निमित्त कारण आणि उपादन कारण या दोन्हीची आवश्यकता असते. या विश्वाच्या निर्मितीसाठी 'पुरुष' हे निमित्त कारण आहे आणि 'प्रकृती' हे उपादान कारण आहे असे हे दर्शन मानते. पुरुष हे प्रत्येकाचे चैतन्य आहे तर प्रकृती ही चेतनाहीन  आहे. 

जेव्हा कोणत्याही गोष्टीची निर्मिती होते तेव्हा तिच्यात उपादान कारणाचे काही गुणवैशिष्ट्य सापडू शकते असे सांख्य दर्शनकर्त्यांचे मत होते. मातीपासून मातीचा घट बनविला तर तो पाहून आपण तो मातीचा आहे, सोन्याचा नाही हे सांगू शकतो. कारण मातीचे काही गुण (उदा. रंग) त्या घटात आलेले असतात. तसेच ही सृष्टी बनताना प्रकृतीचे काही गुण सृष्टीत आले असणार असे त्या ऋषींनी मानले. 

जेव्हा त्यांनी सृष्टीचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना सृष्टीतील काही गोष्टी तेजस्वी (उदा. तारे) दिसल्या, काही गोष्टी गतिमान दिसल्या (उदा. ग्रह) तर काही गोष्टी एकाच ठिकाणी स्थिर आहेत, अंधाऱ्या आहेत असे दिसले. यावरून त्यांनी मूळ प्रकृतीतही ही तीन गुण असावेत असे मानले. या तीन गुणांना त्यांनी सत्व, रज आणि तम अशी नावे दिली. 

प्रकृतीमध्ये या तीन गुणांचे समत्व असते तेव्हा प्रकृती स्थिर असते. तिच्यात काहीही बदल होत नाहीत. परंतु काही कारणाने या तीन गुणांचे प्रमाण बदलते तेव्हा त्यांच्या विविध प्रमाणातील मिश्रणामुळे विविध गोष्टींची (Objects) निर्मिती होते. या विविध गोष्टी म्हणजे वस्तू अथवा ऊर्जा असू शकतात.  लाल, पिवळा आणि निळा या तीन मूलभूत रंगांच्या मिश्रणातून अनेक रंग बनू शकतात तसेच काहीसे हे आहे. 

पण ही तीन गुणांच्या समत्वाने बनलेली प्रकृती अस्थिर का होते? प्रकृतीमध्ये असीम शक्यता (Potential) दडलेल्या आहेत. परंतु प्रकृती स्थिर राहिल्यास या असीम शक्यतांचे प्रकटीकरण होण्यास वाव राहात नाही. आपल्यातील असीम शक्यतांचे प्रकटीकरण करण्यासाठी प्रकृती सतत अस्वस्थ असते. म्हणून प्रकृती अस्थिर होऊन (सत्व, रज आणि तम) गुणांचे विविध प्रकारे मिश्रण करून पुरुषासमोर - चेतनेसमोर एक विश्व उभे करते. 

पुरुषांची चेतना ही अनुभवाशिवाय निष्क्रिय असते. चेतनेचे अंतिम उद्दिष्ट विविध अनुभव घेणे हेच असते. प्रकृती  स्थिर असेल तर चेतनेला म्हणजेच पुरुषाला विविध घेता अनुभव येणार नाहीत. आपण 'चेतना' आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्याला अनुभव घ्यावे लागतात. प्रकृती आणि पुरुष या दोघांच्याही अस्तित्वाला अर्थ येण्यासाठी त्यांनी एकत्र येणे आवश्यक असते. विश्वाची निर्मिती झाल्यावर पुरुष या विश्वातील अनुभव घेण्यात रमतो. त्यात तो प्रकृतीच्या जाळ्यात गुंतत जातो. 

सत्व, रज आणि तमोगुणांच्या सहाय्याने प्रकृती क्रमाक्रमाने विश्वाची निर्मिती कशी करते, त्यात पुरुष कसा गुंतत जातो आणि त्याचा आपल्या जीवनाशी कसा संबंध आहे हे पुढील काही लेखांत पाहू. 

सांख्य दर्शन -२ : सत्कार्यवाद

 सांख्य दर्शन हे अत्यंत प्राचीन दर्शन आहे. इ.स. पूर्व ७०० या कालखंडातील कपिल मुनी या दर्शनाचे प्रवर्तक समजले जातात हे आपण मागील लेखात पाहिले. 


'सत्कार्यवाद' हा सांख्य दर्शनाचा पाया आहे. आपण अद्वैत वेदांत दर्शनाचा अभ्यास करताना 'सत्' शब्दाचा अर्थ पाहिला आहे. सत् म्हणजे 'अस्तित्व'. कोणतीही गोष्ट शून्यातून अस्तित्वात येऊ शकत नाही. एका गोष्टीतून दुसरी गोष्ट अस्तित्वात येते असे सत्कार्यवाद मानतो. (आधुनिक विज्ञान असेच मानते). 'माती' या कारणावर 'कार्य' घडून 'घट' बनतो, 'दुध' या कारणावर कार्य घडून 'दही' बनते.


'कारण' हे ही दोन प्रकारचे असते. एखादे कार्य घडण्यास ही दोन्ही प्रकारची कारणे आवश्यक असतात. मातीपासून घट बनविण्यासाठी केवळ माती असून पुरेसे नसते. घटाची निर्मिती करणारा कुंभारही आवश्यक असतो. म्हणजेच कुंभाराची चेतना आवश्यक असते. कुंभार हे 'निमित्त' कारण आहे. तर माती हे 'उपादान' कारण आहे.

हा सत्कार्यवाद कपिलमुनींच्या आधीच्या न्याय आणि वैशेषिक दर्शनाच्या प्रतिपादनाला छेद देणारा आहे. न्याय आणि वैशेषिकांच्या मते या विश्वाला देवाने/परमेश्वराने घडविले. कपिल मुनींच्या मते हे केवळ 'निमित्त कारण' आहे. मात्र त्यातून 'उपादान कारणाचा' बोध होत नाही.

कपिल मुनींनी विश्वाच्या उपादान कारणाला 'प्रकृती' असे नाव दिले. विश्वाचे निमित्त कारण 'पुरुष' हे आहे. अर्थात पुरुषाची चेतना हे आहे. मात्र विश्वाच्या निर्मितीनंतर प्रकृतीच्या खेळात पुरुष फसत जातो. आपले स्वतंत्र अस्तित्व तो विसरतो. मानवी दु:खाचे हेच मूळ कारण असल्याचे सांख्य दर्शन मानते. पुरुषाला आपण प्रकृतीपासून वेगळे असल्याचे उमगणे - म्हणजेच पुरुष कैवल्याला पोचणे - हा दु:खमुक्तीचा मार्ग असल्याचे सांख्य दर्शन प्रतिपादन करते.

पुढील काही लेखात आपण 'पुरुष या प्रकृतीच्या खेळात कसा फसत जातो आणि त्यातून बाहेर येण्याचा मार्ग' पाहू. तसेच प्रकृती कशी बनली आहे, तिची तत्वे याचा विचार करू. आयुर्वेद, योगशास्त्र, कुंडलिनीविद्या, तंत्रशास्त्र, शिवस्वरोदय शास्त्र अशा अनेक प्राचीन विद्यांचा आधार प्रकृतीची तत्वे आहेत. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ.

Sunday, December 3, 2023

सांख्य दर्शन

 

आपण अद्वैत दर्शन खूप खोलात जाऊन पहिले. आता सांख्य दर्शनाकडे वळू. माझा सांख्य दर्शनावर अद्वैत वेदांत दर्शनाएवढा सखोल अभ्यास नाही. आपण मला समजून घ्याल अशी आशा. 

सांख्य दर्शन हे खूप प्राचीन दर्शन आहे. कपिल मुनी याचे प्रणेते आहेत. कपिल मुनींचा काळ हा इसवीसन पूर्व सातशे वर्ष मानला जातो. न्याय आणि वैशेषिक दर्शन या पूर्वीचे आहेत.  'सांख्य प्रवचन सूत्र' हा कपिलमुनींनी लिहिलेला ग्रंथ या दर्शनाचा आधारभूत ग्रंथ आहे. परंतु काळाच्या ओघात तो नष्ट झाला आहे. त्यानंतर अनेक ऋषींनी यावर ग्रंथ लिहिले आहेत. इसवीसन   पूर्व ३०० च्या सुमारास ईश्वरकृष्ण ऋषींनी 'सांख्य कारिका' हा ग्रंथ लिहिला आहे.  आज हा ग्रंथ सांख्यदर्शनाचा प्रमाण ग्रंथ म्हणून अभ्यासला जातो. 

आपण आधी अभ्यासलेला अद्वैत वेदांत हा 'विश्व हे सत्-चित् -आनंद रुपी ब्रह्म आहे आणि त्यावर मायेने नाम-रूपाचे पांघरूण टाकले आहे' असे मानतो. अद्वैत वेदांताची संपूर्ण मांडणी ही मायेचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झालेली आहे. मायेचे अस्तित्व लक्षात आले आणि ब्रह्माचा क्षणोक्षणी अनुभव येऊ लागला की आपण मुक्त असल्याची प्रचिती येते असे हे दर्शन मानते. जागृतावस्थेत विश्व हे ब्रह्माचे विवर्त असल्याने त्याचा फार खोलात जाऊन अभ्यास या दर्शनात नाही.

याउलट सांख्य दर्शन हे पुरुष आणि प्रकृती या भिन्न गोष्टी आहे असे मानते. प्रकृती (जागृतावस्थेतील विश्व) का आणि कशी निर्माण झाली हे शोधण्याचा प्रयत्न हे दर्शन करते. यामुळे जागृतावस्थेतील विश्वात येणाऱ्या विविध समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न या दर्शनाच्या माध्यमातून आपण करू शकतो. हेच या दर्शनाचे बलस्थान आहे. यामुळेच भारतवर्षात 'योग', 'आयुर्वेद', 'कुंडलिनी विद्या', 'शाक्तविद्या', 'शिवस्वरोदय शास्त्र' यासारख्या नित्य जीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक विद्या या दर्शनातूनच निर्माण झाल्या. कदाचित यामुळेच हे दर्शन गेली कित्येक शतके भारतीय जनमानसावर आपला प्रभाव टिकवून ठेवत आहे.

सांख्य दर्शन काय आहे ते पुढील लेखापासून बघू.

Sunday, November 17, 2019

विश्व आणि ईश्वर यातील संबंध

प्राचीन भारतात विविध तत्वज्ञाने उगम पावली. या तत्वज्ञानांना 'दर्शने' या नावाने ओळखले जाते. तत्वज्ञानाचा अभ्यास हा 'दर्शनशास्त्र' या नावानेच ओळखला जातो. प्राचीन भारतीय दर्शनांपैकी आठ दर्शने ही प्रमुख मानली जातात. त्यात सहा दर्शने ही हिंदू दर्शने म्हणून ओळखली जातात (षटदर्शने) तर जैन आणि बौद्ध दर्शने ही अहिंदू दर्शने मानली जातात. सहा प्रमुख हिंदू दर्शने पुढील प्रमाणे .. न्याय, वैशेषिक, सांख्य, चार्वाक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अथवा वेदांत. या विविध दर्शनांनी विश्व आणि ईश्वर यांचा संबंध याबाबत उहापोह केलेला आहे.
चार्वाक दर्शन हे इहवादी आहे. त्यामुळे ईश्वराचे अस्तित्वच हे दर्शन नाकारते.
विश्व आणि ईश्वर यांच्यातील संबंध तीन प्रकारे दाखविता येतो. याला आरंभवाद, परिणामवाद आणि विवर्तवाद अशी नावे आहेत.
१> आरंभवाद : नैय्यायिक आणि वैशेषिक विश्व आणि ईश्वर यातील संबंध 'आरंभवाद' या तत्वाने मांडतात. आरंभवाद म्हणजे कोठल्यातरी कारणाने कोणत्यातरी गोष्टीपासून पूर्णतः नवी गोष्ट उदयास येणे. प्राणवायू आणि हायड्रोजन यांच्या संयुगातून पूर्णतः: वेगळे गुणधर्म असणारे पाणी तयार होते तसेच काहीसे हे आहे. आरंभवादानुसार ईश्वराने हे विश्व निर्माण केले. पाश्चात्य धर्मही विश्व आणि ईश्वर यांचा संबंध आरंभवादानुसार दाखवितात. माणसाच्या आदिम अवस्थेत स्फुरलेला हा विचार आहे.
२> परिणामवाद : सांख्य दर्शन विश्व आणि ईश्वर यांच्यातील संबंध 'परिणामवाद' या तत्वाने मांडतात. एखादी गोष्ट दुसऱ्या भिन्न गुणधर्म असलेल्या गोष्टीत परावर्तित होते त्याला परिणामवाद म्हणतात. उदाहरणार्थ दूध हे दह्यात रूपांतरित होते तेव्हा दुधाचे गुणधर्म बदलतात. सांख्य दर्शनानुसार प्रकृती ही या विश्वात परिवर्तित होते. हे विश्व म्हणजे प्रकृतीचेच परिवर्तन आहे. योग आणि आयुर्वेद हे सांख्य दर्शनातून आलेले असल्याने त्यावर या तत्वज्ञानाचा प्रभाव आहे.
३> विवर्तवाद : अद्वैत वेदांत विश्व आणि ईश्वर यातील संबंध 'विवर्तवादाने' मांडते. विवर्तवादानुसार एखादी वस्तू अज्ञानामुळे वेगळी भासते. वस्तू तीच असते, केवळ अज्ञानामुळे ती वेगळी भासते. अंधाऱ्या खोलीत दोर पडलेला असतो, परंतु आपल्या अज्ञानामुळे आपल्याला तो सापासारखा वाटतो. आपला तो अनुभव पूर्णतः: खरा असतो. आपण तो साप समजून घाबरतोही. आपले अज्ञान दूर होताच आपल्याला तो दोर आहे हे कळते. अद्वैत वेदांतानुसार विश्व हे ईश्वरच (ब्रह्म) आहे, परंतु केवळ आपल्या अज्ञानामुळे आपल्याला ते विश्व ब्रह्मापासून वेगळे भासते. आपले अज्ञान दूर झाल्यावर विश्व हे ब्रह्मच असल्याची स्पष्ट जाणीव होते.
संतोष कारखानीस

Tuesday, May 22, 2018

उपसंहार

मित्रहो, गेले काही दिवस मी भारतीय प्राचीन दर्शनशास्त्रावर लिहित होतो. खरे तर मी यातील अधिकारी व्यक्ती नाही. पण तरीही यावर लिहिण्याचे औधात्य केले. आपण माझे हे औधत्य सहन केलेत. हे औधत्य करण्याला एकाच कारण होते की सध्याची सामाजिक स्थिती पाहून भारताची संस्कृती कशी सर्वसमावेशक आहे याची जाणीव करून द्यावी असे प्रकर्षाने वाटले. आपल्या विरुद्ध मताचे कोणी आहे असे दिसले की फेसबुकवर जी अर्वाच्य भाषा काहीजणांकडून वापरली जाते त्याने मनाला यातना होतात. आपल्या दर्शनांनी किती वेगवेगळे विचार मांडले आहेत. त्यांनी वाद-विवाद केले. पण ते समोरच्या मताचा आदर ठेऊनच. या वादविवादातून आवश्यक त्या सुधारणा करीत आपले दर्शन अधिक निर्दोष बनविले.

आपण आठ दर्शने पहिली. त्यातील तीन (जैन, बौद्ध आणि चार्वाक) नास्तिक दर्शने होती. नास्तिक याचा अर्थ वेदप्रामाण्य पूर्णपणे नाकारणारी. दोन दर्शने (पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा) वेदप्रामाण्याला महत्व देणारी होती.  तर अन्य तीन दर्शने (वैशेषिक, न्याय, सांख्य) वेदप्रामाण्य नाकारीत नाहीत. पण स्वीकारासंबंधी स्पष्टपणे सांगतही नाहीत. चार्वाक वगळता अन्य दर्शने मोक्ष/कैवल्य/ निर्वाण इत्यादी मनुष्याचे अंतिम लक्ष्य मानतात.

जैन आणि बौद्ध दर्शने वगळता अन्य सहा दर्शने (चार्वाक, वैशेषिक, न्याय, सांख्य, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा) हिंदू दर्शने (षटदर्शने) म्हणून परंपरेने मानली जातात. (अंबेच्या आरतीत 'साही विवाद करीता' असा या षटदर्शनांचा उल्लेख आहे) त्यांच्याकडे नजर टाकली असता हिंदू धर्माचा पाया किती विस्तृत आहे याची कल्पना येते. चार्वाकासारखे परलोक नाकारणारे , सांख्यांसारखे ईश्वर नाकारणारे, न्याय-वैशेषिक दर्शनासारखे अनेक ईश्वर आणि त्यांचा प्रत्येकाचा आत्मा मानणारे, वेदांतासारखे एकच ब्रह्म मानणारे दर्शन अशी ही विस्तृत परंपरा आहे. सांख्य दर्शन 'पुरुषाला' आपण अन्य पुरुषांपासून आणि प्रकृतीपासून वेगळे असण्याची जाणीव होणे (विवेक) म्हणजे मोक्ष असे समजते, तर वेदांत याच्या उलट, म्हणजे आत्म्याला आपण सर्व एकच ब्रह्मस्वरूप आहोत असे समजणे' म्हणजे मोक्ष असे समजते.

सध्या काही हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्वाचा अर्थ संकुचित करू लागल्या आहेत. त्यांना अपेक्षित असलेली जीवनपद्धती, खाणेपिणे म्हणजेच हिदुत्व अशी त्यांची भावना आहे.  अनेक दर्शनांच्या विस्तृत पायावरच आज हिंदुधर्म टिकून आहे. या अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनांना कळकळीची विनंती की त्यांनी हिंदू धर्माचा हा विस्तृत पाया खिळखिळा करू नये.

दु:ख निवारण हे बौद्ध धर्माचे मुख्य उद्दिष्ट आहे. बुद्धाने त्यासाठी यादेशात अनेक वेळा उगम पावून लुप्त झालेली ध्यानाची विद्या परत परिश्रमाने शोधून काढली.  'अविद्या' हे सर्व दु:खांचे मूळ कारण आहे असे सांगितले. अविद्या म्हणजे 'मी' (अहंकार) आणि 'माझे' (ममत्व). सध्या फेसबुकवर अनेक पोस्ट वाचताना बौद्धधर्म समर्थकांची भाषा पाहून गौतम बुद्धाच्या या शिकवणुकीचा त्यांना विसर पडला आहे अथवा त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी समाजाचे धुरीण कमी पडताहेत असे वाटते. अशा पोस्टमधून 'अविद्येचीच' जोपासना होते आहे अशी भीती वाटते. हीच गोष्ट स्वत:ला हिंदू म्हणविणाऱ्या माझ्या काही बांधवांसाठी खरी आहे. 'अहंकार' आणि 'ममत्व' यांच्यामुळेच आपण मायेच्या आवरणाखाली येतो, बंधनात अडकतो असे अनेक उपनिषदांनी वारंवार सांगितले आहे. मग अहंकाराच्या आहारी जावून द्वेष जागवित ते धर्माचे कोठले काम करीत असतात?

आपण भारतीय आहोत. आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचा आदर करण्याची आपली परंपरा आहे. एवढे लक्षात आले तरी या लेखमालेचा फायदा झाला असे मी म्हणेन.

लवकरच दुसऱ्या विषयावर  एखादी लेखमाला घेऊन आपल्या समोर येईन.

  

Sunday, May 20, 2018

उत्तरमीमांसा (वेदांत दर्शन) : अद्वैतवाद

सांख्यदर्शनाखालोखाल भारतीय समाजावर अद्वैत दर्शनाचा प्रभाव आहे.

एका जुन्या सुभाषितकाराने अद्वैतवाद एका श्लोकात मांडला आहे
ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव, नापर: |

आपण आद्यशंकराचार्यांनी मांडलेला अद्वैतवाद थोडक्यात पाहू.
१>पहिला सिद्धांत म्हणजे ब्रह्म हेच सत्य होय. ब्रह्म म्हणजे जाणीव, आपणास एकसारखे होत राहणारे भान. ती स्वयंसिद्ध आहे. इतर पदार्थ आहेत अथवा नाहीत हे जाणीवेच्या सहाय्याने कळते. परंतु जाणीव आहे अथवा नाही हे आपणास कळण्यासाठी अन्य कशाचीही आवश्यकता नसते. अद्वैत्वाद्यान्च्या मते ब्रह्म हे सत्, चित् आणि आनंद स्वरूपी आहे.
२>दुसऱ्या सिद्धांतानुसार जग हे मिथ्या आहे. मिथ्या याचा अर्थ असा नाही की त्याला घनता, आकार नाही. जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी मिथ्या आहे असा त्याचा अर्थ आहे. दिशा, काल आणि कार्य-कारण संबंध या संदर्भातच या जगाला अर्थ आहे असाही त्याचा अर्थ आहे. काल हे परिमाण सापेक्ष आहे हे आता विज्ञानाने सिद्ध झाले आहे. दिशा/अंतर हे परिमाणेही सापेक्ष आहेत हे अत्याधुनिक पदार्थ विज्ञान सांगते. इतकेच नव्हे तर या विश्वासारखीच अनेक विश्वे एकाचवेळी अस्तित्वात असू शकतील असेही नवे विज्ञान सांगते. या सापेक्षतावाद सिद्धांताचा विचार केला तर 'जग हे मिथ्या आहे' या विधानाचा अर्थ थोडा थोडा उलगडू लागतो.
३>'जीवो ब्रह्मैव' हा तिसरा सिद्धांत आहे. 'जग हे मिथ्या' म्हटल्यावर काहीच उरणार नाही असा आपला समाज होतो. पण वेदांत दर्शन हे 'ब्रह्म सत्यं' अधिक उच्चरवाने सांगते. जीव म्हणजे ज्याला आपण 'मी' म्हणतो त्यातून 'अहंकार' काढल्यावर जे उरते ते. जीवाला आत्मा असेही म्हणतात. हा आत्मा म्हणजेच ब्रह्म होय. उपाधीमुळे आत्म्यास जीवत्व येते असे अद्वैतदर्शन सांगते. स्फटिकाशेजारी जास्वंदीचे फुल ठेवल्यास स्फटिकाला त्या फुलाचा लाल रंग आला आहे असे भासते. तसेच आत्म्याला उपाधी लावल्याने त्याच्यात जीवत्व भासते.
सर्वाचा आत्मा एकाच ब्रह्मस्वरूपी असूनही वेगवेगळे का भासतात याचे कारण देताना अद्वैतदर्शनकार घटाकाश आणि महाकाश यांचे उदाहरण देतात. घटामुळे घटात कोंडलेले आकाश आणि बाहेरील आकाश वेगळे भासते. अशाप्रकारे प्रत्येक घटातील आकाश स्वतंत्र भासते. पण तो घट फुटल्यास घटातील घटाकाश आणि बाहेरील महाकाश एकच आहेत याचे ज्ञान होते.
अद्वैत दर्शनाच्या (आणि उपनिषदांच्या) मते मोक्ष ही प्राप्त करून घेण्याची गोष्ट नव्हे. मोक्ष हा सिद्धच असतो. परंतु आत्म्याला त्याचे भान नसते. म्हणूनच संसार आणि बंध येतात. मायेमुळे आत्म्याला ते भान रहात नाही. म्हणून मायेचे आवरण दूर केल्यावर आत्म्याला तो मुक्त असल्याचे भान येते.
या संदर्भात एक मनोरंजक गोष्ट आहे. उंटांचा एक काफिला प्रवासास निघालेला असतो. रात्री एका ठिकाणी मुक्काम पडतो. काफिल्याच्या प्रमुखाच्या लक्षात येते की बांधण्यासाठी आणलेले दोरखंड अपुरे आहेत. एका उंटाला बांधण्यासाठी दोरखंड कमी पडत आहे. तो विचारात पडतो. पण त्याच्या काफिल्यातील एक शहाणा माणूस प्रश्न सोडवितो. तो त्या उंटाला दोरखंडाने बांधण्याचा अभिनय करतो. आश्चर्य म्हणजे तो उंट आपल्याला बांधले आहे असे समजून रात्रभर तेथेच बसून असतो. सकाळी काफिला पुढे जाण्यास निघतो. पण तो उंट काही जागेवरून हलत नाही. त्याला मारूनमुटकून पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. पण तरी तो काही हलत नाही. तेवढ्यात  या शहाण्या माणसाच्या लक्षात एक गोष्ट येते. तो त्या उंटाला बांधलेली दोरी सोडविण्याचा अभिनय करतो. उंट लगेच चालू लागतो. उंटाची जशी आपल्याला बांधले असल्याची समजूत झाली होती तशीच आपल्या आत्म्याची आपण बद्ध असल्याची समजूत झालेली असते. त्या शहाण्या माणसासारखे कोणीतरी आपल्याला सोडविण्याचा अभिनय करावा लागतो. उपनिषदे याचाच प्रयत्न करीत असतात.
वेदांत दर्शनातील नंतर आलेल्या आचार्यांनी शंकराचार्यांनी प्रतिपादिलेल्या अद्वैतमतात काही बदल सुचविले. परंतु आजही वेदांत दर्शनात शंकराचार्यांचे मत प्रमाण मानले जाते.

आपण आठ महत्वाच्या प्राचीन भारतीय दर्शनांची थोडक्यात माहिती गेले काही दिवस घेतली. पुढील लेखात या सर्व दर्शनांचा एकत्रित गोषवारा घेऊ. तसेच या दर्शनशास्त्राचा सध्याच्या आपल्या जीवनाशी काही संबंध आहे काय हे ही पाहू.


उत्तरमीमांसा (वेदांत) दर्शन

गौतम बुद्धाच्या भारतातील प्रभावास रोखण्यासाठी एका बाजूला यज्ञ-याग कर्मकांड यांच्या विधीत समन्वय साधणारे पण वेदांच्या तत्वज्ञानाच्या भागाला गौण समजणारे पूर्वमीमांसा दर्शन विकसित झाले तर दुसऱ्या बाजूला वेदांमधील तत्वज्ञान अंगाला प्राधान्य देणारे उत्तरमीमांसा हे दर्शनही विकसित झाले. वेदांमध्ये तत्वज्ञान विषयक (उपनिषदे) हा भाग शेवटी येत असल्याने त्याला वेदांत अशीही संज्ञा मिळाली. काहींच्या मते 'सर्व वेदांचे जे सार' या अर्थाने वेदांत हा शब्द आला आहे.
उपनिषदे अनेक आहेत त्या सर्वांचा समन्वय घडवून त्याचे सार सांगण्यासाठी 'ब्रह्मसूत्रे' रचण्यात आली. द्वैपायन कृष्ण व्यास (वेदांचे रचयिता : पराशरऋषी-मत्स्यगंधा यांचा मुलगा)  ब्रह्मसुत्रांची रचना केली असे मानण्यात येते. याशिवाय भागवतगीतेलाही वेदांत दर्शनात उपनिषदे आणि ब्रह्मसुत्राइतकीच मान्यता आहे. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भागवतगीता यांना वेदांतात 'प्रस्थानत्रयी' म्हणून मान्यता आहे. 'प्रस्थान' म्हणजे उगम. वेदविचारांची शुद्धता या तीन ठिकाणी तपासता येते असा त्याचा अर्थ आहे.
या प्रस्थानत्रयींवर वेदांतदर्शनातील आचार्यांनी भाष्ये लिहिली आहेत. त्यातील महत्वाचे आचार्य
१> शंकराचार्य (इ.स. ७८८-८२०)  केवलाद्वैतवाद
२> रामानुजाचार्य (इ.स. १०५६-११३७) विशिष्टाद्वैतवाद
३> मध्वाचार्य (इ.स.११९९-१२७८) द्वैतवाद
४> वल्लभाचार्य (इ.स.१४८१-१५३३)  शुद्धाद्वैतवाद
५> निंबकाचार्य (१३वे शतक) द्वैताद्वैतवाद

यात सर्वाधिक मान्यता पावलेला म्हणजे शंकराचार्यांचा केवलाद्वैतवाद हा आहे. शंकराचार्यांना एवढी मान्यता मिळाली की तत्वज्ञान म्हणजे वेदांत म्हणजेच शंकराचार्यांचा अद्वैतवाद अशीच समजूत बहुसंख्य भारतीयांची झाली.
पुढील लेखात आपण शंकराचार्यांचा अद्वैतवाद काय आहे ते पाहू.

Saturday, May 19, 2018

पूर्वमीमांसा दर्शन

पूर्वमीमांसा दर्शन हे 'मीमांसा' या नावानेही ओळखले जाते. मीमांसासूत्रे रचणारा जैमिनी याचा काल इसवीसनाचे पहिले शतक आहे. इ.स.पूर्व ५६३ यावर्षी जन्मलेल्या बुद्धाच्या बुद्धदर्शनाने संपूर्ण भारतावर मोहिनी घातली होती. यावेळी वेदवाङ्मयावर श्रद्धा असलेले चिंताक्रांत झाले. अजूनही समाजाची वेदवाङ्मयावर काही प्रमाणात श्रद्धा शिल्लक होती. या श्रद्धेला प्रामाण्यआधार मिळवून देण्याचा मीमांसाकारांचा प्रयत्न दिसतो.
वेदांच्या कर्मकांडातील, म्हणजे संहिता आणि ब्राह्मणे यातील वचनांचा समन्वय करणारे जे शास्त्र आहे त्यास पूर्वमीमांसा (अथवा नुसते मीमांसा) म्हणतात. तर वेदांचा तत्वज्ञानविषयक भाग, म्हणजे प्रामुख्याने उपनिषदे यांचा समन्वय करणारे जे शास्त्र आहे त्यास उत्तरमीमांसा (अथवा वेदांत) म्हणतात. या लेखात आपण पूर्वमीमांसा अथवा मीमांसा या दर्शनासंबंधी माहिती घेणार आहोत.
वेदवाङ्मयातील अतिप्राचीन भाग हा देवतांची स्तुती करण्याचा, त्याची स्तुती असलेला आहे. त्यांची स्तुती करून, त्याना यज्ञात हवन देऊन त्यांच्यामार्फत आपली दु:खे, व्याधी कमी करावीत असा हा प्रयत्न आहे. (नंतरच्या काळात होमहवन आणि मंत्रांना अतिरिक्त महत्व येऊन देवतांचे महत्व कमी झाले) या साठी यज्ञविधी कसा करावा याचे विस्तृत वर्णन वेदांच्या ऋचात आहे. परंतु हे वर्णन निरनिराळ्या काळात तसेच निरनिराळ्या वेद, स्मृती, श्रुतींमध्ये आहे आणि काहीवेळा त्यातील विधाने परस्पर विरोधी आहेत, काही विधानांची एकमेकांशी संगती लागत नाही. अशावेळी या विधानांत सुसंगती आणणे हाही मीमांसाकारांचा प्रयत्न दिसतो.
यज्ञयागाचे तात्त्विक समर्थन करणे हाही मीमांसाकारांचा प्रयत्न राहिला आहे. मरणानंतर आत्म्याचे काय होते, परलोक, कर्म, कर्मफळ इत्यादींबद्दल मीमांसक माहिती देतात.
मिमंसेची मूळ वृत्ती तत्वज्ञानपार नाही. जैमिनीचे पहिलेच सूत्र 'अथतो धर्मजिज्ञासा' आहे. येथे 'धर्म' याचा अर्थ 'इष्ट आणि अलौकिक फळे देणारी यज्ञयाग इत्यादी कर्मे' हा आहे.
मीमांसकांच्या मते वेद हे मनुष्याने अथवा ईश्वराने निर्माण केलेले नाहीत, ते अपौरुषेय म्हणजेच नित्य आहेत. त्यांच्यामते धर्मासंबंधी वेद हेच परम प्रमाण आहेत.  इतर कोठल्याही प्रमाण स्मृतीतील वचनाच्या विरोधात जात असेल तर स्मृतीत लिहिलेलेच सत्य समजावे. स्मृतीने न सांगितलेला एखादा विधी श्रुतीने सांगितलेला असेल तर तो लुप्त स्मृतीतील आहे असे समजून त्याचे पालन करावे. धर्मासंबंधी श्रुती, स्मृती, पुराणे यांना उतरत्या क्रमाने प्राधान्य आहे. 
यज्ञ योग्यप्रकारे सिद्ध झाला आणि त्यातील मंत्रोच्चार योग्य प्रकारे झाले की त्याचे फळ आपोआपच मिळते, देवतांच्या कृपाप्रसादाने मिळत नसते अशी यज्ञविधीसंबंधी टोकाची भूमिका मीमांसकांची आहे. कोणते यज्ञ कधी आणि कसे करावेत, त्यांचे फळ काय आहे हे समजावून सांगणे हेच मीमांसेचे मुख्य काम आहे.
मीमांसक आत्मा मानतात पण ईश्वर मानत नाहीत. ईश्वराला मानण्याने वेदांना गौणत्व येते अशी त्यांची भूमिका आहे. एक ईश्वर मानीत नसले तरी इष्ट फळ देणाऱ्या देवता मानतात. मात्र यज्ञ योग्यप्रकारे केल्यावर देवतांना फळ द्यावेच लागते अशी ही भूमिका आहे.
यज्ञयागादी धर्माचे आचरण स्वर्गसुखासाठी करायचे असे मीमांसक सांगतात. मात्र नंतरचे मीमांसक अन्य दर्शनाच्या प्रभावामुळे 'मोक्षाची कल्पना' स्वीकारू लागले.
उपनिषदात येणारी तत्वज्ञानविषयक चर्चा मीमांसक गौण समजतात.
पुढील लेखात आपण 'उत्तरमीमांसा' अथवा 'वेदांतदर्शन' समजून घेण्याचा प्रयत्न करू.

Friday, May 18, 2018

सांख्यदर्शन

सांख्यदर्शन हे भारतीयांवर सर्वात प्रभाव टाकणारे दर्शन आहे. भगवतगीता सर्वच दर्शनांना सामावून घेणारी असली तरी तिच्यावर सांख्यदर्शनाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. सांख्यदर्शन भारताच्या पूर्व भागात खूपच प्रभावी आहे. या दर्शनाचा बुद्धधर्माच्या महायान पंथाबरोबर संयोग होऊन ते तिबेट आणि जगाच्या पूर्वेकडे पोचले.
सांख्य दर्शनाचा पहिला प्रवर्तक कपिल ऋषी मनाला गेला आहे. भगवतगीतेतील 'सिद्धानां कपिलो मुनि:'असा आदराने उल्लेख केलेला कपिल मुनी हाच असावा. परंतु कापिल ऋषींचा एकही ग्रंथ उपलब्ध नाही. त्यांनी आपले तत्वज्ञान आपला शिष्य आसुरी याला शिकविले. आसुरीने त्याचा शिष्य पंचशीख याला दिले. पंचशीखाने त्याचा विस्तार केला.  या दर्शनावरील 'माठरवृत्ती' ही टीका सर्वात प्राचीन आहे. तिचे भाषांतर इ.स. ४५० च्या सुमारास चीनी भाषेमध्ये (मँडरीन ??) भाषेमध्ये झाले आहे.
तंत्र, कुंडलिनीविद्या, पातंजलयोग, आयुर्वेद इत्यादी शास्त्रे सांख्यदर्शनातूनच उगम पावली आहेत.
चेतन आणि जड पदार्थ यांचे यथार्थ ज्ञान करून देणे यासाठी सांख्यदर्शन प्रयत्न करीत आहे. त्यांचे प्रमुख सिद्धांत असे
१> पुरुष (म्हणजे व्यवहारात आपण ज्याला आत्मा म्हणतो तो) आणि प्रकृती (आपले शरीर आणि सर्व बाह्य सृष्टी) ही मूलत: दोन भिन्न द्रव्ये आहेत.
२>सृष्टीतील नानाविध वस्तूंचे आणि घडामोडींचे एकमेव आदिकारण 'प्रकृती' आहे. ती 'सात्विक',  'रजस्' आणि 'तमस्' गुणांनी बनलेली आहे. ती 'जड' म्हणजे जाणीव नसलेली आहे.
३> पुरुष चेतन, निर्गुण आणि निष्क्रिय असून अनेक आहेत.
४>पुरुषाने प्रकृपासून आपल्या निराळेपणाचा बोध घेणे म्हणजेच 'कैवल्य' अथवा मोक्ष होय.

प्रकृतीविषयी आणखी काही गोष्टी मानण्यात आलेल्या आहेत.
१> इतर पुरुषांपासून अथवा प्रकृतीपासून स्वत:ला अलग समजण्याचा विवेक (जो पुरुषापाशी आहे) तो प्रकृतीपाशी नाही. ती अविवेकी आहे.
२>ती ज्ञानाचा विषय होते. ज्ञातृत्व तिच्याकडे नाही.
३>सामान्य पदार्थ तिच्यावर राहू शकतो.
४>तिला जाणीव नसते. ती अचेतन आहे.
५>तिचा विकास होतो. ती प्रसवधर्मी आहे. अशांत झालेली त्रिगुणात्मक प्रकृती दृश्य जग निर्माण करते. यापूर्वी तिच्यात अहंकार निर्माण होतो.

सांख्य परिभाषेत मोक्षाला 'कैवल्य' असे नाव आहे. पुरुषाला स्वत:च्या (अन्य पुरुषांपासून आणि प्रकृतीपासून) वेगळे असण्याची जाणीव नसणे (अविवेक) हे बंधनात पडण्याचे कारण आहे. (अद्वैत दर्शनाच्या बरोबर विरोधी असे हे मत आहे : द्वैतभावना हे बंधनात पडण्याचे कारण).

प्रकृतीचे हे सारे सर्जन पुरुषाच्या कैवाल्यासाठीच असते असे सांख्यांचे मत आहे. हा विश्वाचा पसारा प्रकृती मांडते तो पुरुषाच्या भोगाकरता.  पुरुषाच्या भोगातूनच प्रकृतीत सत्वगुण उत्पन्न होतो. हा सत्वगुणच पुरुषामध्ये विवेक उत्पन्न करतो आणि पुरुष कैवल्याप्रत जातो.

सांख्यांनी पुरुषार्थ (कैवल्याप्रत पोचणे) ही अन्तीम प्रेरणा मानली त्यामागे दु:खवाद दिसतो. आयुष्य हे दु:खमय आहे ही भूमिका त्यांनी ठामपणे घेतली.  त्यांची ही भूमिका बुद्धाच्या भूमिकेच्या जवळ जाते. या दु:खातून सुटका मिळविण्यासाठीच कैवल्यप्राप्ती आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते.

सांख्य दर्शनाने ईश्वर नाकारला आहे. पुरुष-प्रकृती सिद्धांतात त्यांना ईश्वराची गरज वाटली नाही. प्रकृती हे जड विश्व प्रसाविते. त्यात ईश्वराला स्थान नाही.

पुढील लेखात आपण पूर्वमीमांसा दर्शनाचा विचार करू.

Thursday, May 17, 2018

न्याय दर्शन

या आधीच्या लेखात आपण न्याय-वैशेषिक या जोडगोळीतील 'वैशेषिक दर्शन' पाहिले. आता न्याय दर्शनाकडे वळू. आपण पाहिले की न्याय-वैशेषिक दर्शने सामान्य माणसाच्या व्यावहारिक भाषेचा हिरीरीने पुरस्कार करतात. यापैकी वैशेषिक दर्शन हे प्रमेये मांडते तर न्याय दर्शन हे या प्रमेयाना प्रमाण देण्याचे काम करते.
गौतम ऋषी (मेघानिधी गौतम : इ.पू.५५०) हे न्याय दर्शनाचे प्रणेते मानले जातात. त्यांचा न्यायशास्त्र हा ग्रंथ न्याय दर्शनाचा आद्य ग्रंथ मानण्यात येतो. न्याय दर्शनाचे विपुल वाङ्मय आणि टीका उपलब्ध आहेत.
न्यायदर्शनाची मूलभूत प्रेरणा ही वादविवाद / चर्चेत उपयुक्त ठरतील अशी प्रमाणे ठरविण्याची आहे. 'न्याय' या शब्दाचा अर्थच 'उभय पक्षांना मान्य असणारा सिद्धांत' असा आहे. न्यायदर्शनात 'अनुमान' या प्रमाणाचा सखोल विचार झाला आहे. या दर्शनात यथार्थ ज्ञानाचे स्वरूप, भ्रम म्हणजे काय याचाही विचार झाला आहे. 'प्रमाणे' ठरविणे हाच मुख्य हेतू असल्याने प्रमाणांची चर्चा विस्तृतपणे केली आहे. ती आपण 'प्रमाण' या लेखात यापूर्वीच पाहिली आहे.
नैयायीकानी ईश्वर मानला. किंबहुना पाश्चात्य ज्याला theism म्हणतात त्याची व्यवस्थित मांडणी प्रथम त्यांनीच केली. नैयायीकांचा ईश्वर सृष्टीचा कर्ता आहे, तिचा नियंता आहे आणि भक्तांवर अनुग्रह करणारा आहे. जीवात्म्याप्रमाणे तो ही एक आत्मा आहे. मात्र तो सुख-दु:ख , पाप-पुण्य याना अलिप्त आहे. त्याने हे विश्व निर्माण केले. त्यासाठी इतस्तत: पसरलेले परमाणु ही सामग्री वापरून त्याने के कार्य केले. या मांडणीत अनेक त्रुटी दिसतात. परंतु सामान्य माणसाच्या समजुतींना आधार देणे न्याय-वैशेषिक दर्शनाने आपले कार्य मानल्याचे दिसते.
ईश्वराचे अस्तित्व नैयायीकानी जरी मानले असले तरी त्याचा आणि मोक्षाचा संबंध लावल्याचे दिसत नाही. तत्वज्ञानाने म्हणजे पदार्थांच्या सम्यक आणि यथार्थ ज्ञानाने मिथ्याज्ञान नाहीसे होते. हे मिथ्याज्ञान हे आत्मा, त्याचे स्वरूप या संबंधाने असते. यथार्थ ज्ञानाने रागद्वेष  (राग म्हणजे पूर्वीच्या भाषेत लोभ) नाहीसे होतात. त्यामुळे त्या गोष्टी मिळविण्यासाठी अथवा टाळण्याच्या प्रवृत्तीचा नाश होतो. ही प्रवृत्तीच पुनर्जन्मास कारणीभूत ठरते. मोक्ष हा सुखस्वरूप असून परमेश्वराच्या प्रत्यक्ष ज्ञानाने प्राप्त होतो असे नैयायिक मानतात.
मोक्ष म्हणजे आत्म्याने मूळच्या प्रवृत्तीत रहाणे हे अन्य दर्शनकारांचे मत नैयायीकाना मान्य आहे. पण या अवस्थेत आत्म्याला जाणीव नसते असे ते मानतात. जाणीव ही मनाच्या आत्म्याशी झालेल्या संयोगाने निर्माण होते असे त्यांचे मत आहे.
वैशेषिक आणि नैयायिक यांच्यात काही भेदही आहेत. उपमान हे प्रमाण नैयायिक मानतात, पण ते वैशेषिक नाकारतात. नैयायिक 'एक' हीच संख्या वास्तव सृष्टीत असे मानतात. अन्य संख्या एकच्या संयोगाने झाल्या आहेत असे त्यांचे मत आहे. हे वैशेषिकांना मान्य नाही. असे अन्य काही छोटे भेट आहेत.
पुढील लेखात 'सांख्य दर्शनाची' माहिती घेऊ. 

Wednesday, May 16, 2018

वैशेषिक दर्शन

जैन, बुद्ध आणि चार्वाक या 'नास्तिक' दर्शनानंतर आपण आता 'आस्तिक' दर्शनांकडे वळू. नास्तिक म्हणजे 'वेदप्रामाण्य' नाकारणारी दर्शने. वैशेषिक दर्शन वेदप्रामाण्य नाकारीत नसले तरी ठामपणे त्याचा पुरस्कारही करीत नाही.
दर्शनशास्त्रासंबंधी चर्चा करताना न्यायवैशेषिक अशा जोडगोळीचा उल्लेख करण्याची प्रथा आहे. कारण ही दोन दर्शने स्वतंत्र असली तरी कालौघात ती एकरूप झालेली आहेत. विश्वाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन जवळपास सारखाच झाला आहे. तरी त्यात थोडे फरकही आहेत. आपण या दोन्ही दर्शनान्चा  वेगळा विचार करू. कालदृष्ट्या वैशेषिक दर्शन हे न्याय दर्शनाच्या आधीचे आहे. म्हणून त्याचा प्रथम विचार करू.
वैशेषिक दर्शनाचा पहिला व्यवस्थित ग्रंथ म्हणजे कणाद ऋषींची 'वैशेषिक सूत्रे'. यामुळे कणाद ऋषींना वैशेषिक दर्शनाचे प्रथम प्रवक्ते मानण्यात येते.
सामान्य माणसांच्या व्यावहारिक दृष्टीचे समर्थन ही न्यायवैशेषिकांची मूलभूत प्रेरणा आहे. सर्वसाधारण तत्वज्ञान सामान्य माणसाच्या व्यावहारिक ज्ञानाला चीकीचे ठरविते. परंतु न्याय-वैशेषिक हिरीरीने सामान्य माणसाच्या व्यवहाराचे समर्थन करतात. याचा अर्थ असा नाही की ही दर्शने समजण्यास सोपी आहेत. त्यांचा व्यावहारिक पक्ष समजण्यास सोपा असला तरी त्या व्यावहारिक पक्षाला समर्थन देण्यासाठी असलेला तात्त्विक पक्ष अत्यंत जटील आहे. म्हणूनच आपण या लेखमालेत या तात्त्विक पक्षात फार खोलात जाणार नाही.
'वस्तूचे ज्ञान करून देण्यास आम्ही शेवटी अनुभवलाच शरण जातो' (संविदेव हि भगवती वास्तुपगमे न:शरणम्  | ) असे वैशेषिक दर्शन सांगते. वस्तुमधील द्रव्य आणि तिचे गुण वेगळे आहेत असे आपण सामान्यपणे समजतो. तसेच करणापासून उद्भवलेले कार्य स्वतंत्रपणे सुरु होते असे आपण व्यवहारात समजतो. वैशेषिक दर्शन यालाच तात्त्विक समर्थन देते.
वैशेषिकांचा परमाणु सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे. कोणत्याही द्रव्याचे (वस्तूचे) विभाजन केले असता शेवटी अत्यंत सूक्ष्म अविभाज्य परमाणु मिळतो. परमाणूचे गुण मूळ वस्तूपेक्षा वेगळे असू शकतात. परमाणु हा 'नित्य द्रव्य' आहे. अन्य अनित्य द्रव्यांप्रमाणे त्यात बदल होत नाही. दोन परमाणुंच्या संयोगाने एक 'द्वणूक' बनते.  तीनच्या संयोगाने एक त्रीणूक बनते. अशीच चतूरणूक वगैरे बनतात.  परमाणुंच्या संयोगानेच हा दृश्य विश्वाचा पसारा बनलेला आहे असे वैशेषिक सांगतात. हा सिद्धांत सध्याच्या Atomic सिद्धांताच्या अत्यंत जवळ जाणारा आहे.
प्राचीन काळी ग्रीक तत्ववेत्त्यांनीही परमाणु सिद्धांत मांडला होता. परंतु त्यांच्यामते कोणत्याही द्रव्याच्या परमाणु स्थितीत असलेले परमाणु एकाच प्रकारचे गुण असलेले असतात. वैशेषिकांनी मात्र वेगवेगळे गुण असलेले परमाणु मानले.
वैशेषिकांची प्रमुख प्रेरणा नितीमुल्ये समजावून सांगणे नव्हती तर सर्व ज्ञात गोष्टींचा खोलात जाऊन अभ्यास करण्याची होती. त्यामुळे त्यांच्या दर्शनात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यांचा काही भाग डोकावतो. प्राचीन काळी विज्ञान हे तत्वज्ञानातच गणले जात होते. त्यामुळे वैशेषिक ग्रंथात 'उखळात टाकलेले मुसळ परत उसळून वर का येते', 'पक्षी आकाशात कसा उडू शकतो' अशासारख्या गोष्टीवरही विवेचन आढळते.
थोडक्यात सांगायचे तर जगातील सर्व ज्ञेय गोष्टींचा विचार वैशेषिक दर्शन करते. हे प्रामुख्याने प्रमेय शास्त्रआहे. यातील बहुसंख्य प्रमेये न्यायशास्त्राला मान्य आहेत. या प्रमेयशास्त्राला प्रमाणांची जोड देण्याचे महत्वाचे कार्य न्यायदर्शनाने केले आहे. त्याचा विचार पुढील लेखात करू.

Tuesday, May 15, 2018

चार्वाक दर्शन

जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन ही 'नास्तिक' दर्शने आपण पाहिली. 'वेदप्रामाण्य नाकारणारी' या अर्थानेच ती दर्शने नास्तिक आहेत. परंतु 'चार्वाक दर्शन' हे त्यापेक्षा पूर्णांशाने निराळे आहे. ते सध्याच्या अर्थानेही खरे 'नास्तिक' दर्शन आहे.
चार्वाक दर्शनाचे मंडन करणारा एकाही स्वतंत्र ग्रंथ दुर्दैवाने उपलब्ध नाही. विरोधकांनी लिहिलेल्या संकलन ग्रंथातून आणि विरोधकांनी लिहिलेल्या ग्रंथातील पूर्वपक्षातूनच आपल्याला हे दर्शन समजून घ्यावे लागते.
या दर्शनाचा आद्यप्रवर्तक बृहस्पती (देवगुरु?) आहे असे मानतात. म्हणून या दर्शनाला 'ब्राहास्पत्य दर्शन' असेही म्हणतात. 'लोकायत' असेही या दर्शनाचे नाव आहे. इसवीसनाच्या आठव्या शतकापासून मात्र हे दर्शन 'चार्वाक दर्शन' म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
इतर कोणत्याही दर्शनाप्रमाणे चार्वाक दर्शनाची उभारणी प्रमाण मतांवर झाली आहे. कोणती प्रमाणे मानायची आणि कोणती ताजी ठरवायची हे ठरविल्यावर आपोआपच पुढील सिद्धांतांची मांडणी करता येते. चार्वाक 'प्रत्यक्ष' हे एकमेव प्रमाण मानतो. शब्द (वेद, पुराणे) इत्यादी अथवा अनुमान हे प्रमाण मानण्याचे त्यांनी नाकारले.
अनुमान म्हणजे ज्ञाताच्या आधारावर अज्ञातापर्यंत पोचविणारी मानसिक क्रिया. 'सगळ्या गाढवांचे कान लांब आहेत म्हणून गोऱ्या कुंभाराच्या गाढवाचे कान लांब आहेत' हे अनुमान झाले. पण सर्व गाढवांचे कान लांब आहेत हे कसे ठरविले? जर सर्व गाढवांचे कान लांब आहेत हे सर्व गाढवे पाहून ठरविले असेल तर गोऱ्या कुंभाराच्या गाढवाचे कानही पहिले आहेत. म्हणजेच जे आधीच सिद्ध आहे ते परत सिद्ध करण्याचा हा खटाटोप आहे. काही गाढवे पाहूनच सर्व गाढवान्साम्बंधी विधान केले तर त्याची सत्यता शंकास्पद राहील. म्हणून अनुमान चार्वाकाना मान्य नाही.
पण अनुमानाशिवाय आपल्याला जगातच येणार नाही. त्यामुळे चार्वाकांवर खूप टीका झाली. शेवटी काही चार्वकांनी यावर मार्ग काढून नेहमीच्या जीवनात लागणाऱ्या गोष्टींसाठी अनुमान स्वीकारले. पण लोकोत्तर गोष्टींसाठी (या इन्द्रियांच्या  अनुभवपलीकडे असलेल्या) गोष्टींसाठी अनुमान वापरण्याचे नाकारले. त्यामुळे चार्वाक आत्मा, परलोक, पाप, पुण्य, कर्म इत्यादी काहीच मानीत नाहीत.
आत्मा आणि कर्मवाद नाकारून चार्वाकांनी ऐहीकवाद स्वीकारला. या जीवनात जी जी सुखे शक्य आहेत ती उपभोगावी आणि आनंदात राहावे असे सांगितले. सुखाशी दु:ख हे संलग्न असतेच, म्हणून दु:खाला घाबरून सुखाकडे पाठ फिरविणे योग्य नाही अशी त्यांची भूमिका होती. (बुद्धाने नंतर याच्या बरोबर उलट भूमिका मांडली). या भूमिकेमुळे चार्वाकांवर अतिरेकी सुखावादाचा आरोप केला गेला.
यावज्जीवं सुखम् जीवेत् ऋणम् कृत्वा घृतम् पिबेत् |
असे चार्वाकांचे म्हणणे असल्याचे सांगितले गेले. पण हा त्यांच्यावर अन्याय आहे. 'सर्वसिद्धांतसंग्रह' या ग्रंथात स्पष्ट उल्लेख आहे की चार्वाकांच्या मते शहाण्या, जाणत्या माणसाने शेती, गोपालन, व्यापार, शासनव्यवस्था या सारख्या दृष्ट असलेल्या 'सत्' उपायांनी पृथ्वीवरील भोग उपभोगावेत.
अग्निहोत्र, वेदापठाण इत्यादींचे स्तोम माजवून पौरोहीत्यादी उपायांनी उपजीविका करणार्यांची त्यांनी निंदा केली आहे. त्यांची गणना 'भंड-धूर्त-निशाचारांत' केली आहे.
म्हणजेच चार्वाकांना एक नीतिशास्त्र होते. त्यांनी प्राण्यांना मारून त्याचे मांस खाण्याचीही निंदा केली आहे. अर्थात नीती-अनीती या इंद्रिय संवेदना नाहीत. त्यामुळे त्यांचे नीतिशास्त्र कोणत्या आधारावर बेतले होते याचा पत्ता लागत नाही.
या नंतर आपण 'वैशेषिक दर्शनाचा' विचार करू.

Monday, May 14, 2018

बौद्ध दर्शन : अव्याकृते

बौद्ध दर्शनाची  मुख्य प्रेरणा दु:खमुक्ती हेच आहे. त्यामुळे तात्विक काथ्याकूट करण्यात बुद्धाला रस नव्हता. मृत्युनंतर निर्वाणाप्रत पोचलेल्या व्यक्तीचे काय होते, हा लोक शाश्वत आहे की अशाश्वत अशा प्रश्नांची उत्तरे देणे बुद्ध टाळत असे. ही उत्तरे कळून काही फायदा नाही. दु:ख कसे निवारण होईल याकडेच लक्ष दिले पाहिजे अशी त्याची अत्यंत व्यवहारी भूमिका होती. अशा प्रश्नांना 'अव्याकृते' म्हणून संबोधण्यात येते. अव्याकृते म्हणजे बुद्धाने कधीही ज्या सम्बंधात काही वक्तव्य केले नाही. अशी दहा अव्याकृते आहेत.

  1. जग शाश्वत आहे
  2.  जग अशाश्वत आहे
  3. जगाला अंत आहे
  4. जग अनंत आहे
  5. जीव आणि शरीर एकाच आहेत
  6. जीव आणि शरीर वेगळे आहेत
  7. तथागत मरणानंतर असतो
  8. तथागत मरणानंतर नसतो
  9. तथागत मरणानंतर असतोही आणि नसतोही
  10. तथागत मरणानंतर असतोही आणि नसतोही असे नाही
पुढील लेखात आपण चार्वाक दर्शनासंबंधी (लोकायत) माहिती घेऊ.

Sunday, May 13, 2018

बौद्ध दर्शन : प्रतीत्यसमुत्पाद

प्रतीत्यसमुत्पाद किंवा द्वादश-निदान ही गौतम बुद्धाची सर्वात मोठी उपलब्धी आहे असे त्याचे मत होते.  आपण हा प्रतीत्यसमुत्पाद सध्याच्या भाषेत समजून घेऊ.
माणसाचे मन खूप मोठे असते. आपल्याला जाणविणाऱ्या मनाच्या भागाला आपण बहिर्मन म्हणतो. त्यापलीकडे खूप मोठे अंतर्मन असते. काही बाह्यगोष्टींमुळे ही अंतर्मनातील खळबळ बाह्य मनावर येऊ शकते. त्यामुळे आपण अस्वस्थ होतो हे आपण सगळे जाणतो.
अंतर्मनात आपले पूर्वीचे बरे-वाईट अनुभव (बुद्धाच्या भाषेत 'संस्कार') एकत्र साठविलेले असतात. एखाद्या बाह्य गोष्टीचा स्पर्श आपल्या पंचेन्द्रीयांपैकी एकाला होतो अथवा मनात एखादा विचार येतो. पंचेंद्रिये ही केवळ एखाद्या उपकारणासारखी असतात. ज्याचा स्पर्श  झाला (दिसणे, ऐकणे, चव, स्पर्श, गंध, विचार इ.)  ती गोष्ट ही इंद्रिये निरपेक्षपाने मेंदूला पोचवितात. पुढच्या क्षणी मेंदूचा एक हिस्सा जागृत होतो आणि या आलेल्या अनुभवाचे परीक्षण करतो. आलेल्या अनुभवासारखा (स्पर्श, चव इत्यादी) अनुभव पूर्वी कधी आला होता काय हे स्मृतीतून शोधतो. हा पूर्वीचा अनुभव चांगला असेल तर शरीरावर सुखद संवेदना निर्माण करतो. जर पूर्वीचा अनुभव वाईट असेल तर शरीरावर दु:खद संवेदना निर्माण होतात. या सुखद अथवा दु:खद संवेदनांना आपण प्रतिसाद देतो. सुखद संवेदना परत परत अनुभवाव्याश्या वाटतात. दु:खद संवेदानांपासून आपण दूर पळतो. अशी संवेदना परत अनुभवण्यास लागू नये असे वाटते (बुद्धाच्या भाषेत 'तृष्णा').  परत आपला प्रतिसाद परत अंतर्मनात जातो. आपला प्रतिसाद किती तीव्र होता यावर अंतर्मनात हा प्रतिसाद किती खोलवर जाईल आणि किती काल तसाच राहील हे ठरते. ही क्रिया वारंवार घडल्याने अंतर्मनात या अनुभवाबद्दलचा प्रतिसाद तीव्र रूप घेतो आणि आपल्याला प्रत्येकवेळी अधिकाधिक अस्वस्थ करतो. मृत्युच्या वेळी यातील एखादी तीव्र इच्छा डोके वर काढते. हीच इच्छा हा संस्कारांचा पुंज घेऊन नव्या शरीराला चिकटते आणि पुनर्जन्म होतो (भव).
माणूस या भावाचाक्रात असाच असहाय्यपणे फिरत रहाणार काय हा प्रश्न बुद्धाला पडला. पण ही साखळी तोडण्याचा एक मार्ग त्याला दिसला. शरीरावर सुखद अथवा दु:खद संवेदना निर्माण झाल्यावर त्याला प्रतिसाद न देणे, त्या परत परत अनुभवण्याची अथवा कधीच न अनुभवण्याची इच्छा मनात येऊ न देणे. यामुळे मनातील 'संस्कार' बहिर्मानावर येऊन नष्ट होतील (निर्जरा होतात), त्यांना बळ मिळून ते परत अंतर्मनात जाणार नाहीत. हळू हळू अंतर्मनातील सर्वच संस्कारांची निर्जरा होईल. याला बौद्ध भाषेत 'निर्वाण' म्हणतात. मग मृत्यूच्यावेळी कोणतीच इच्छा डोके वर काढणार नाही, संस्कारांचा पुंज शून्य झालेला असेल. अशावेळी काहीच उरणार नाही. आत्मा सदृश काहीही नसेल. शून्य शून्यात विलीन होईल.
शरीरावर सुखद अथवा दु:खद संवेदना निर्माण झाल्यावर त्याला प्रतिसाद न देण्याची कला म्हणजे ध्यान होय.
ध्यानात खोलवर गेल्यावर या सुखद अथवा दु:खद संवेदनाची जाणीव स्पष्टपणे होऊ लागते. आपण प्रतिसाद न दिल्याने त्याची निर्जरा कशी होते हेही जाणवते. विपश्यनेचा संपूर्ण मार्ग हा स्वानुभवाचा मार्ग आहे. प्रतीत्यसमुत्पाद ही कल्पनेतील गोष्ट नाही हे जाणवते.
आधुनिक शास्त्रही सांगते की अंतर्मनातील गोष्टी बहिर्मानावर येऊ लागल्या की आपल्याला मोकळे वाटू लागते. प्रतीत्यसमुत्पाद हीच गोष्ट वेगळ्या भाषेत सांगतो आणि मन मोकळे करण्यासाठी ध्यान हे एक साधनही आपल्या हाती देतो.
पुढील लेखात बुद्धाने सांगितलेली दहा अव्याकृते पाहू.

Saturday, May 12, 2018

बौद्धदर्शन : द्वादश-निदान

दु:खकारण या आर्यसत्याचे निरुपण करताना भगवान बुद्धांनी दु:खाला कारणीभूत असलेली बारा कारणांची मालिका सांगितली. यातील प्रत्येक दुव्याला बुद्धांनी 'निदान' असे म्हटले आहे. त्यामुळे ही मालिका 'द्वादश-निदान' या नावाने ओळखली जाते. ही बारा निदाने पुढीलप्रमाणे : अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाति, जरामरण.
जरामरणाच्या अनुषंगाने शोक-परिवेदना-दु:ख-दौर्मनस्य येतात असेही सांगितले आहे.
अविद्येमुळे (अविद्येचा अर्थ मागील लेखात स्पष्ट केला आहे) आपल्या मनात विकार निर्माण होतात. यालाच बौद्ध दर्शनात 'संस्कार' (पाली भाषेत 'संखारा') म्हटले आहे. या विकारातून 'मी आहे' अथवा 'पदार्थ आहेत' अशी अस्तित्वाची जाणीव निर्माण होते. यालाच बौद्ध दर्शनात 'विज्ञान' म्हटले आहे. विज्ञानामुळेच 'नामरूपाची' निर्मिती होते. 'नाम' म्हणजे मन:पिंड आणि रूप म्हणजे शरीरपिंड. या नामरूपामुळे सहा इंद्रिये (पाच ज्ञानेंद्रिये आणि मन) तयार होतात. या सहा इंद्रियांना बाहेरील कोणत्याही गोष्टीचा स्पर्श होतो. डोळ्यांना वस्तू दिसतात, कानाला ऐकू येते, मनात विचार येतात इत्यादी. त्यामुळे सुख-दु:ख इत्यादी भावना निर्माण होतात. त्यांना 'वेदना' म्हटले आहे. या सुखद वेदना पुन्हा पुन्हा अनुभवाव्या, दु:खद वेदना परत अनुभवण्यास लागू नये अशी भावना म्हणजे 'तृष्णा' निर्माण होते. या तृष्णेची अत्यंतिकता म्हणजे 'उपादान' (यालाच 'आसक्ती' असेही म्हणता येईल). उपदान मृत्युनंतर पुढील जन्मास ('भव') कारणीभूत ठरते. त्यामुळे पुढील आयुष्याला ('जाती') सामोरे जावे लागते. आयुष्य आले की वृद्धत्व आणि मृत्यू ('जरामरण') आलेच. त्यामुळेच दु:खाची निर्मिती होते. अशी ही दु:खनिर्मितीची साखळी आहे. या मालिकेतील आधीच्या दुव्यामुळे पुढील गोष्ट घडते. याला 'प्रतीत्यसमुत्पाद' असेही नाव आहे.
ही शृंखला तोडणे मानवाला शक्य आहे. 'तृष्णा जागविणे-न जागविणे' माणसाच्या हातात आहे. समाधी अवस्थेत (समाधीचा अर्थ मागील लेखात स्पष्ट केला आहे) मनाच्या समतोल अवस्थेमुळे नवी तृष्णा जागत नाही आणि मनुष्य या दु:ख निर्माण करणाऱ्या साखळीतून मुक्त होऊ शकतो असे बुद्धाचे प्रतिपादन आहे.
ही मालिका थोडी किचकट आणि ओढून-ताणून आणली आहे असे प्रथमदर्शनी वाटते. पण ध्यानात खोलवर गेले असता या दुव्यातील अनेक गोष्टींचा अनुभव येतो.
पुढील लेखात प्रतीत्यसमुत्पाद आपण अधिक सोप्या शब्दात समजून घेऊ आणि आपल्या जीवनातील दु:खे कमी करण्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल हे पाहू. प्रतीत्यसामुत्पादाचा आणि ध्यान-समाधीचा काय संबंध आहे ते ही पाहू.

Friday, May 11, 2018

बौद्ध दर्शन : आर्यअष्टांगिकमार्ग

दु:खनिरोध शक्य आहे आणि त्यासाठी एक निश्चित मार्गही आहे असे ठाम प्रतिपदन गौतम बुद्धाने केले. या मार्गाला आर्यअष्टांगिकमार्ग असे नाव आहे. ही आठ अंगे पुढीलप्रमाणे

  1. सम्यक दृष्टी
  2. सम्यक संकल्प
  3. सम्यक वाचा
  4. सम्यक कर्म
  5. सम्यक आजीविका 
  6. सम्यक व्यायाम
  7. सम्यक स्मृती
  8. सम्यक समाधी
आटोपशीर व्हावे म्हणून अनेकवेळा या आठ अंगांचा समावेश शील, प्रज्ञा आणि समाधी या तीन भागात केलेला असतो. आपणही या तीन भागातच याचे विवेचन करू.
  1. शील: शील म्हणजे सदाचार. वागण्याचे नैतिक नियम. भिक्खुंसाठी असे दहा नियम आहेत. इतरांसाठी यातील पाच आहेत. यालाच 'पंचशील' असे म्हणतात. जैनांच्या 'अनुव्रत' आणि पातंजल योगाच्या 'यमनियम' याच्याशी साम्य असणारे आहेत.
  2. प्रज्ञा : सर्व पदार्थ अनित्य आहेत असे मनात पुरेपूर ठसणे यालाच 'प्रज्ञा' असे नाव आहे. जगात 'नित्य' असे काहीच नाही. नित्यतेच्या आभासामुळेच दु:ख अनुभवाला येते असे बुद्धाचे प्रतिपादन आहे. उपनिषदांच्या अविनाशी आत्म्याच्या प्रतिपादनाच्या बरोबर विरुद्ध हे प्रतिपादन आहे. अविनाशी आत्म्याच्या कल्पनेमुळेच अहंकार ("मी") आणि ममत्व ("माझे") हे भाव निर्माण होतात आणि अंतिमत: दु:खाला कारणीभूत ठरतात असे बुद्धाचे मत आहे.  
  3. समाधी: शील आणि प्रज्ञा यानंतर समाधीचा टप्पा येतो. समाधी म्हणजे चित्ताची अत्यंत समतोल अवस्था. ध्यानाने चित्ताची अशी अवस्था प्राप्त होऊ शकते. अशी समतोल अवस्था प्राप्त करण्यासाठी गौतम बुद्धांनी 'विपश्यना' ध्यानपद्धतीचा अवलंब करण्यास सामान्य नागरिकांना शिकविले. त्या काळी अशी ४५ दिवसांची ध्यानशिबिरे स्वत: बुद्ध घेत असत आणि त्यात एकावेळी दहा हजारापर्यंत नागरिक सहभागी होत असत. 'राजगृह (बिहार)' येथे त्यासाठी भव्य सभागृह बांधले होते. आता गोएंकागुरुजी ही ध्यानपद्धती शिकविण्यासाठी दहा दिवसांची नि:शुल्क शिबिरे आयोजित करतात. (http://www.dhamma.org)
दु:खकारण या आर्यसत्याचे निरुपण करताना भगवान बुद्धांनी 'द्वादशनिदान सिद्धांत' आणि 'प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत'  मांडला. पुढील भागात आपण हे द्वादशनिदान आणि प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत समजून घेऊ. 



Thursday, May 10, 2018

बौद्ध दर्शन : आर्यसत्ये


गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्यावर पहिले प्रवचन त्यांनी सारनाथ येथे त्यांच्याबरोबर आधी मुक्तीचा मार्ग शोधत असलेल्या पाच श्रमणांना दिले. हे प्रवचन 'धम्मचक्र प्रवर्तन' या नावानेही ओळखले जाते.  अशोकचक्र याच धम्मचक्राचे प्रतीक आहे.
यावेळी गौतम बुद्धांनी चार आर्यसत्ये सांगितली. ('आर्यसत्ये' म्हणजे 'शाश्वत सत्ये').

  1. दु:ख आहे : या जगात दु:ख आहे हे भगवान बुद्धांनी ठामपणे सांगितले. म्हणूनच काही टीकाकार 'दु:खवादी' अशी या धर्मावर टीका करतात. 'सुख पाहता जवापडे, दु:ख पर्वताएवढे' किंवा 'अधिक सुख मिळवावे' अशी बुद्धाची भूमिका नाही. एखाद्या गोष्टीत काही काल सुख वाटले तरी नंतर ती गोष्ट नाहीशी झाल्यावर दु:खच वाट्याला येते. त्यामुळे सुखाचे अंतिम पर्यावसान दु:खातच होते अशी ही भूमिका आहे. एखादा वैद्य रोगावर औषधोपचार करण्यापूर्वी रोग असल्याची खात्री करून घेतो त्याप्रकारची ही भूमिका आहे.
  2. दु:ख समुदाय (दु:ख कारण) : एखादा निष्णात वैद्य रोगाची खात्री करून घेतल्यावर त्या रोगाच्या मूळ कारणांचा शोध घेतो. मूळ कारण सापडल्यावरच त्यावर इलाज करणे शक्य होते. अन्यथा हे इलाज वरवरचे तात्कालिक होतील. दु:खाचे मूळ कारण अविद्या आहे. अविद्या म्हणजे अहंकार ('मी') आणि ममत्व ('माझे') यातून उगम पावलेली आत्मकल्पना. अविद्येतून तृष्णा आणि तृष्णेतून दु:ख जन्माला येते असे बुद्धाने प्रतिपादन केले. अविद्येतून दु:खाचा जन्म कसा होतो याचे विस्तृत विवेचन बुद्धाने केले आहे. त्याला द्वादश-निदान असे म्हणतात. आपण द्वादश-निदान या लेखमालेत नंतर समजून घेऊ. 
  3. दु:ख निरोध : रोगाच्या मूळ कारणांचा शोध घेतल्यावर त्यावर काय इलाज करता येईल याचा वैद्य शोध
    घेतो. मूळ कारण कळल्याने इलाजाची दिशा मिळते. बुद्धाने 'अविद्येचा नाश केल्यास दु:खापासून मुक्ती मिळते' असे सांगितले. दु:खापासून मुक्ती ही केवळ कल्पना नाही तर आपण स्वत: दु:खापासून मुक्ती मिळविली असल्याचे ठाम प्रतिपादन केले.
  4. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा (दु:ख निरोधचा मार्ग) : रोगावर इलाज ठरविला की वैद्य औषध कसे घ्यायचे हे विस्तृतपणे सांगतो. तसेच भविष्यात पुन्हा हा रोग उद्भवू नये म्हणून काय काळजी घ्यायची याची माहिती देतो.  गौतम बुद्धाने हा दु:खापासून मुक्ती मिळविण्याचा मार्ग टप्प्याटप्प्याने विषद केला. आज अडीचहजार वर्षानंतरही सामान्य संसारी माणूस या मार्गाने जाऊन जीवनातील दु:खांवर मात करू शकतो. 'आर्यअष्टांगमार्ग' असे त्या मार्गाचे नाव आहे.
पुढील लेखात या 'आर्यअष्टांगमार्गाचा' विचार करू.