Thursday, July 23, 2020

शुक्रवाराची जिवतीची कहाणी

ऐका शुक्रवारा, तुमची कहाणी.
Image may contain: 1 person, standingआटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हां राणीने काय केलं? एका सुईणीला बोलावून आणलं. “ अग अग सुईणी, मला नाळवारीसुद्धां एक मुलगा गुपचुप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन.” सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली.

गांवांत एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हां ही सुईण तिच्या घरीं गेली, तिला सांगूं लागली कीं, “बाई बाई, तूं गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखूं लागेल तेव्हां मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन.”

तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली, “बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरांत एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचींच दिसताहेत. तेव्हां आपल्या घरापासून तों तिथपर्यंत कोणास कांही कळणार नाहीं असं एक गुप्त भुयार तयार करावं.

आपल्यास कांहीं दिवस गेल्याची अफवा उठवावी. “मी तुम्हांस नाळवारीचा मुलगा आणून देईन.” असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला, आणि जसजसे दिवस होत गेले, त्याप्रमाणं डोहाळ्याचं ढोंग केलं. पोट मोठं दिसण्याकरितां त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं. नऊ मास भरतांच बाळंतपणाची तयारी केली.

इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखूं लागलं. सुईणीला बोलावूं आलं त्याबरोबर “तुम्ही पुढं व्हा, मी येतें,” म्हणून सांगितलं. धांवत धांवत राणीकडे आली, पोट दुखण्याचं ढोंग करूं सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरीं आली. “बाई बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहींस, नाहीं बांधलेस तर भय वाटेल.” असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली, मुलगा झाला.

सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला, आणि तिच्यापुढें ठेविला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगूं लागली. तिनं नशिबाला बोट लावलं. मनामध्यें दुःखी झालीं. सुईण निघून राजवाड्यांत गेली.

राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊं लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावणामासीं दर शुक्रवारीं जिवतीची पूजा करावी, आणि नमस्कार करून म्हणावं कीं, ‘जय जिवतीआई माते! जिथं माझं बाळ असेल, तिथं खुशाल असो.” असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमीं वागूं लागली.

इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशीं बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशीं ही न्हाऊन आपल्या अंगणांत राळे राखीत बसली होती. तेव्हां याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्रीं तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्रीं तिच्या घरीं आला. दारांत गाय-वासरूं बांधली होतीं. चालतां चालतां राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला. वांसराला वाचा फुटली. तें आपल्या आईला म्हणालं, “कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला?” तेव्हां ती म्हणाली, “जो आपल्या आईकडे जावयास भीत नाहीं, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल काय?” हें ऐकून राजा मागं परतला आणि घरीं येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली.

काशीस जाऊं लागला. जातां जातां एका ब्राह्मणाच्या इथें उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होतीं. पण तीं पांचवी-सहावीच्या दिवशीं जात असत. राजा आला त्या दिवशीं चमत्कार झाला. पांचवीचा दिवस होता. राजा दारांत निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणूं लागली, ‘ कोण ग मेलं वाटेंत पसरलं आहे ?” जियती उत्तर करिते, “ अग अग, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी कांहीं त्याला ओलांडूं देणार नाहीं.” मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचीं आईबाप चिंता करीत बसलीं होती. त्यांनीं हा संवाद ऐकला.

इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी जिवती आपापल्या रस्त्यांनीं निघून गेल्या. उजाडाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. “तुमच्यामुळें आमचा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा.” अशी विनंती केली राजानं ती मान्य केली. त्याही रात्रीं याचप्रमाणं प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला.

इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला. पुढं काशींत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळीं ते घ्यायला दोन हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरीं जा. सार्‍या गांवांतल्या बायकापुरुषांस जेवायला बोलाव. म्हणजे याचें कारण समजेल.”

मनाला मोठी चुटपुट लागली. घरीं आला. मोठ्या थाटानं मामदं केलं.त्या दिवशी शुक्रवार होता. गांवांत ताकीद दिली. “घरीं कोणीं चूल पेटवूं नये. सगळ्यांनीं जेवायला यावं,” ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला. “मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईन.” राजानं कबूल केलं. जिथं तांदुळाचं धूण होतं तें काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहींत. कारल्याच्या मांडवांखालून गेलीं नाहीं. दर वेळेस “जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असॊ,” असं म्हणे.

पुढं पानं वाढलीं. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढतां वाढतां ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढूं लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडांत उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. कांहीं केल्या उठेना. तेव्हां त्याची आई गेली. त्याची समजूत करूं लागली. तो म्हणाल, “असं होण्याचं कारण काय?” तिनं सांगितलं कीं, “ ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई.” असं सांगून सर्व हकीकत सांगितली.

नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धां आपण राज्य करूं लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

Tuesday, July 21, 2020

बुध-बृहस्पतींची कहाणी

ऐका बुधबृहस्पतींनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या. त्याच्या घरीं रोज एक मामाभाचे भिक्षेला जात. राजाच्या सुना “आमचे हात रिकामे नाहींत” म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांस दरिद्र आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणं भिक्षेला आले. सर्व सुनांनीं सांगितलं, “असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले.” सर्वांत धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला. होतं तेव्हां दिलं नाहीं, आतां नाहीं म्हणून नाहीं. ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पायां पडली. त्यांना सांगूं लागली, “आम्हीं संपन्न असतां धर्म केला नाहीं ही आमची चुकी आहे. आतां आम्ही पूर्वीसारखीं होऊं, असा कांहीं उपाय सांगा,” ते म्हणाले, “श्रावणमासीं दर बुधवारीं आणि बृहस्पतवारीं जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पति प्रवासीं जाऊन घरीं येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बाहुलीं काढावीं. संपत्ति पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावीं. त्यांची मनोभावें पूजा करावी. अतिथींचा सत्कार करावा. म्हणजे इच्छित हेतु पूर्ण होतात.” त्याप्रमाणे ती करूं लागली.

एके दिवशी तिला स्वप्न पडलं, “ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढतें आहें.” ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केला. इकडे काय चमत्कार झाला? तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाहीं म्हणून तेथील लोकांनीं काय केलं? हत्तिणीच्या सोंडेंत माळ दिली व तिला नगरांत फिरविलं, “ज्याच्या गळ्यांत माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल,” अशी दौंडी पिटविली. हत्तिणीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यांत माळ घातली. मंडळींनीं त्याला हांकलून दिलं. पुन्हा हत्तीण फिरविली. पुन्हा त्याच्याच गळ्यांत माळ घातली. याप्रमाणं तीनदां झालं. पुढं त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हा तीं अन्न अन्न करून देशोधडीस लागल्याची खबर समजली.

मग राजानं काय केलं? मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारों मजूर खपूं लागले, तिथं त्याचीं माणसं आलीं. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्यें संतोष झाला. तिनं बुध-बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविलि. देवानं देणगी दिली, पण जावांनीं थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनांत ठेविली. ब्राह्मणभोजनाचा थाट केला. हिच्या हातांत चांदीचं भांडं दिलं. तूप वाढूं सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनीं तें पाहिलं. त्याचा सन्मान केला. मुलंबाळं झाली. दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले.

जशी त्यांवर बुध-बृस्पतींनीं कृपा केली, तशी तुम्हां आम्हांवर करोत. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

Monday, July 20, 2020

मंगळागौरीची कहाणी

mangalagaur-kahaniआटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असें म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. “दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी भिक्षा झोळीत घातली. बोवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाहीं असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणालें, “आपल्या नवर्‍याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.” असं बोलून बोवा चालता झाला. तिने आपल्या पतीला सांगितलं.

वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणल. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आंत देवीची मूर्ती आहे. मनोभावें पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “घरंदारं आहे, गुरंढोरं आहेत. धन द्रव्य आहे; पोटीं पुत्र नाहीं, म्हणून दुःखी आहे.” देवी म्हणाली, “तुला संततीचं सुख नाहीं, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्माध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तें मागून घे.” त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपति आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; मोटभर घरीं नेण्याकरितां घेतले. खालीं उतरून पाहूं लागला, तो आपल्या मोटेत आंबा एकच आहे. असं चार पांच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबीं एकच फळ आहे.” फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. दिवसमासां गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासां वाढूं लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाहीं असा माझा नवस आहे. असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जातां जातां काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणूं लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे.” हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनांत आलं हिच्याशी भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हें घडतं कसं ? त्याच दिवशीं तिथं त्यांनीं मुक्काम केला. इकडे काय झालं ? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करूं, म्हणून धर्मशाळा पाहूं लागले. मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं.

उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोंपीं गेलीं. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अग अग मुली, तुझ्या नवर्‍याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प क-यात शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळीं उठून आईला तें वाण दे.” तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. कांही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणूं लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बि-हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले. दुसरे दिवशीं काय झालं? हिनं सकाळीं उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहूं लागली, तों आंत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडपांत आला. मुलीला खेळयला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाहीं. मी त्याचे बरोबर खेळत नाहीं.” रात्रीची लाडवांची व आंगठीची खूण कांहीं पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो ? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं, आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेंकडो लोक येऊन जेवूं लागले.

इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगूं लागला, “मला असं असं स्वप्न पडलं.” मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझावरचं विघ्न टळलं. उद्यां आपण घरी जाऊ.” परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाहीं.” दासींनीं यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नव-यानं आंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला,” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असता. ही सगळी तिची कृपा.” सासर माहेरचीं घरचींदारचीं माणसं सर्व एकत्र झाली, आणि त्या व्रताचं उद्यापन केलं.

तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरईं सुफळ संपूर्ण.

Sunday, July 19, 2020

प्रस्तावना : श्रावणातील कहाण्या

Image may contain: textमहाराष्ट्रात पूर्वीपासून श्रावणात कहाण्या सांगण्याची पद्धत आहे. या कहाण्यांतून अंधश्रद्धेची जोपासना हा मुख्य हेतू नव्हता तर समाजाला सामाजिक मूल्यांची जाणीव करून देवे हा प्रधान हेतू होता. मी शाळेत असताना माझ्या आजीला या कहाण्या त्या त्या सणाच्या दिवशी वाचून दाखवीत असे. आता आपला हा अमूल्य सामाजिक ठेवा लुप्त होऊ लागला आहे. म्हणून आपल्या आठवणी जगविण्यासाठी आणि नव्या पिढीला या ठेव्याची ओळख करून देण्यासाठी मी ही श्रावणातील कहाण्यांची लेखमाला आपल्या ग्रुपवर सुरु करीत आहे. सोमवारी यातील पहिली कहाणी असेल.
या कहाण्या मी लिहिलेल्या नाहीत तर आपल्या परंपरेतून आलेल्या आहेत. मी केवळ तुमच्यापर्यंत आणण्याचे काम करणारा भारवाही हमाल आहे.
#श्रावणातील_कहाण्या

क‍हाणी दिव्यांच्या आमावस्येची

Image may contain: indoorऐका दीपकांनो, तुमची कहाणी. एक नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा.
त्यांनी रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसर्‍या दिवशी फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे. रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या आमावस्येच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. ही घरांतून निघाल्यावर तें बंद पडलं.
पुढं अमावस्येच्या दिवशी राजा शिकार करून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार घडला. आपले गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गप्पा मारीत आहेत. कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हावचा, त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत.
इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू? मी ह्या गावाच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घेतला. तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा उदरांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसर्‍या दिवशी तिची फजिती झाली. सासू-‍‍दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणन मला हे दिवस आले. ती दरवर्षी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो! असं म्हणून त्या दिव्याने तिला आशीर्वाद दिला. 
घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरीं आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलें आहे काय? म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सार्‍या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करु लागली. जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो! साठा जन्माची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Wednesday, July 1, 2020

अपरोक्षानुभूती : भाग १

'अपरोक्षानुभूती' या अद्वैत वेदान्ताच्या दुसऱ्या प्रकरणग्रंथाच्या निरूपणाला आता  मी सुरुवात करीत आहे. वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्कचे मुख्य आचार्य स्वामी सर्वप्रियानंद यांच्या व्हिडीओ प्रवचनांचा आधार प्रामुख्याने या निरूपणाला आहे. 
वेद हा कदाचित माणसाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात जुना ग्रंथ आहे. कमीतकमी चार हजार वर्षे हा वेदांचा काळ समाजाला जातो. उपनिषदे वेदांचाच एक भाग आहेत. त्यांना 'वेदांत' असेही म्हटले जाते. वेदांत या शब्दाचे दोन अर्थ होतात. वेदांचा शेवटचा भाग हा एक अर्थ. पण अनेक उपनिषदे ही वेदांच्या मध्येच आलेली आहेत. त्यामुळे हा अर्थ नसावा. एखाद्या गोष्टीचे उच्चतम शिखर असाही 'अंत' शब्दाचा अर्थ होतो. उदा. 'सिद्धांत' . त्यामुळे वेदांचे उच्चतम शिखर असाही अर्थ होऊ शकतो. आणि तोच योग्य असावा. अद्वैत वेदान्ताचे मुख्य प्रवर्तक आद्य शंकराचार्य यांनी दहा अथवा अकरा उपनिषदांवर भाष्य केले आहे. भगवतगीतेचा उपनिषदे हा एक आधार आहे. उपनिषदातील अनेक कल्पना गीतेत जश्याच्यातशा येतात. तसेच उपनिषदातील सार ब्रह्मसूत्रांत आहे. भगवतगीता आणि ब्रह्मसूत्रांवरही शंकराचार्यांनी भाष्य केले आहे. म्हणूनच उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यांना 'अद्वैत वेदांताची प्रस्थानत्रयी'  असे म्हणतात. 
अद्वैत वेदान्ताच्या स्पष्टीकरणासाठी आद्य शंकराचार्य आणि नंतरच्या आचार्यांनी काही ग्रंथ लिहिले. त्यांना 'प्रकरणग्रंथ' असे नाव आहे. अपरोक्षानुभूती हा स्वत: शंकराचार्यांनी लिहिलेला प्रकरणग्रंथ आहे. शिवाय त्यावर अद्वैत वेदान्ताचे दुसरे मोठे आचार्य विद्यारण्यस्वामी (विजयनगर साम्राज्याचे प्रवर्तक) यांनी भाष्य लिहिले आहे. म्हणूनच या प्रकरणग्रंथाचे खूप महत्व आहे. 
यापूर्वी आपण द्रष्टा-दृश्य विवेक' या प्रकरण ग्रंथाचा अभ्यास केला आहे. 'अपरोक्षानुभती' हा ग्रंथ आपल्याला त्यापेक्षा खूप वरच्या पातळीवर घेऊन जातो. 
या ग्रंथाच्या सुरुवातीलाच अध्यात्म साधनेसाठी आवश्यक असलेल्या नियमांची माहिती देतो. त्याला 'साधनचतुष्टय' असे नाव आहे. त्यानंतर हा ग्रंथ 'मी कोण आहे' या प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हणजे आपले शरीर, मन नाही हे सर्वच ग्रंथ सांगत असतात. पण हा ग्रंथ आपण शरीर/मन का नाही याचे विस्तृत विवेचन करतो. 'आपण अध्यात्मिक अनुभवाच्या शोधात निघालेले मानवी जीव नाही तर मानवी अनुभवाच्या शोधार्थ निघालेले अध्यात्मिक जीव आहोत'  याची हा ग्रंथ जाणीव करून देतो. आपले स्थूल शरीर आणि आपले सूक्ष्म शरीर या दोन्हीपलीकडे आपण म्हणजेच आपले चैतन्य आहे. या चैतन्याचा प्रत्यक्ष परिचय अनुभवातून करून देणे हाच या ग्रंथाचा प्रधान उद्देश आहे. 'अपरोक्षानुभूती' या शब्दाचाच तोच अर्थ आहे. 
यानंतर हा ग्रंथ आपल्या भोवती पसरलेले विश्व हे सुद्धा ब्रह्मच आहे हे दाखवून देते. शेवटी हा ग्रंथ आपल्याला आपल्या ब्रह्मस्वरूपाची जाणीव होण्यासाठी पंधरा विविध उपाय (techniques) सुचवितो. प्रथमदर्शनी आपल्याला या पंधरा पायऱ्या वाटतात. पण प्रत्येक पायरी ही आपल्याला चैतन्याचा अनुभव करून देण्यास समर्थ आहे.