Showing posts with label श्रावणातील कहाण्या. Show all posts
Showing posts with label श्रावणातील कहाण्या. Show all posts

Friday, August 9, 2024

संपत शनिवारची कहाणी

 आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहात होता. त्याला तीन सुना होत्या. पावसाळ्या दिवशीं तो लवकर उठे. सकाळींच जेवी, लेकी सुनांसुद्धां शेतावर जाई. धाकट्या सुनेला मात्र घरीं ठेवीं. याप्रमाणं आपला नित्याप्रमाणं शेतावर गेला. जातांना घरी सुनेला सांगितलं. “मुली मुली, आज शनिवार आहे. माडीवर जा. घागरीमडक्यांत कांहीं दाणे पहा. थोडेसे काढ. दळून त्याच्या भाकर्‍या कर. केनीकुर्डूची भाजी कर. तेरड्याचं बीं वाटून ठेव.” सुनेनं बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहूं लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले तेवढेच तिनं दळले. त्याच्या लहान लहान भाकर्‍या केल्या. केनीकुर्डूची भाजी केली. तेरड्या टाकळ्याचं बीं वाटलं नि सासूसासर्‍यांची वाट पहात बसली.

इतक्यांत तिथं शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यांनं आंघोळ घाल. घरांत गेली, चार तेलाचे थेंब घेतले, त्यांच्या अंगाला तेल लावलं. वांटलेले बीं लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला, तो काय दिला?” तुला कांहीं कमी पडणार नाहीं” म्हणून म्हणाला. आपलं उष्टं वळचणीला खोंचलं, शनिदेव अदृश्य झाले. काहीं वेळानं घरीं सासूसासरे, दीरजावा आल्या. त्यांनीं सर्व तयाई उत्तम पाहिली, संतोषी झालीं. आपल्या घरांत तर कांहीं नव्हतं. हें असं कशानं आलं, म्हणून आश्चर्य करूं लागली.

दुसर्‍या शनिवारीं ब्राह्मणानं दुसर्‍या सुनेला घरी ठेवलं. सगळीं माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मौज झाली? शानिदेवांनी मागच्यासारखंच कुष्ठ्याचं रूप घेतलं, ब्राह्मणाच्या घरीं आले. मागच्या सारखंच मला न्हाऊं घाल, मांखू घाल, म्हणून म्हणूं लागले. ब्राह्मणाची सून घरीं होती ती त्याच्याशीं बोलूं लागली, “बाबा, आम्हीं काय करावं! आमच्याजवळ कांहीं नाहीं.” देव म्हणाले, “ जे असेल त्यांतलंच थोडंसं मला दे.” ब्राह्मणाची सून मजजवळ कांहीं असलं तरी नाहीसं होईल.” असा त्यांनीं शाप दिला नि आपण अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडीमडकीं पाहूं लागली. तिला कांहीं सापडलं नाहीं. संध्याकाळ झाली, सासूसासरा घरीं आलीं. सर्व तयारी पाहू लागलीं. तो त्यांना कांहींच दिसेना. मग सुनेला रागं भरलीं. सुनेनं झालेली हकीकत सांगितलेली.

पुढं तिसरा शनिवार आला. ब्राह्मणानं तिसर्‍या सुनेला घरीं ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला, अंगाला तेल लाव म्हणून म्हणूं लागले. तिनं दुसर्‍या जावेसारखा जबाब दिला. देवांनीं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढं काय झालं? कांहीं वेळानं सासुसासरा घरीं आलीं, जेवणाची तयाई पाहूं लागलीं, तों तिथं कांहीं दिसेना. मग त्यांनीं सुनेला विचारलं, मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपवास पडला, मनांत फार खिन्न झालीं.

पुढं चौथ्या शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरीं ठेवलं. पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवानं काय केलं? गलितकुष्ठ्याचं रूप धरलं. ब्राह्मणाचे घरीं आला. सुनेला म्हणूं लागला. “बाई बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव.” तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं आंघोळ घातली. भाजीभाकर खायला दिली. त्याचा आत्मा थंड झाला. तेव्हां देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझाच आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला. आपलं उष्टं वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडींमडकीं पाहूं लागली. डाळदाणा दृष्टीस पडला. तो काढला, तिनं चांगला स्वयंपाक केला, आणि सासूसासर्‍यांची वाट पहात बसली. इतक्यांत सासूसासरा तिथं आलीं. सुनेला विचारूं लागली. “मुली मुली, आज तूं काय केलं आहेस?” सुनेनं सांगितलं, “सगळी तयारी आहे. न्हायला तेल आहे. टाकळ्याची चोखणी आहे. आंघोळीला ऊन पाणी आहे. जेवायला बाजरीची भाकरी आहे. तोंडीं लावायला केनीकुर्डूची भाजी आहे.” सासूसासर्‍यांस आनंद झाला. “आपल्या घरांत तर कांहीं नव्हतं आणि इतकं सामान कुठुन आणलसं?” म्हणून तिला विचारलं. तिनं कुष्ठ्याची हकीकत सांगितली. दिलेला आशिर्वाद सांगितला. सासर्‍याला आनंद झाला.

इतक्यांत काय चमत्कार झाला? सासर्‍यांची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथं कांहीं खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी तें सोडून पाहिलं तॊ, पत्रावळींवर हिरेमोत्यें दृष्टीस पडलीं सुनेला दाखविलीं, ह्याच पत्रावळींवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरा म्हणाला, “देवानं मुलीला दर्शन दिलं.” पुढं दुसर्‍या सुनांस हकीकत विचारली, त्यांनीं दोन वेळां आला होता म्हणून सांगितलं, “आम्ही त्याला कांहीं दिलं नाहीं, त्याचा त्याला राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ कांहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्यामडक्यांत दाणे नाहींसे झाले. म्हणून दोन शनिवार आपणाला उपवास पडला.” पुढं सासुसासर्‍यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करूं लागली.

जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला. तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

शुक्रवारची कहाणी

 एक आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. 

त्याची पत्नी शेजारणीकडे गेली. आपल्या गरीबीबद्दल सांगितलं. तेव्हा शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. 

“श्रावणातील शुक्रवारपासून हे व्रत धर. दिवसभर उपास करावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावेत. हळदी कुंकू देऊन ओटी भरावी. दूध-साखर प्यायला द्यावी. भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून व्रताचं उद्यापन करावं.” 

त्याप्रमाणे ब्राह्मण स्त्री शुक्रवारचं व्रत करू लागली.

त्याच गावात तिचा भाऊ राहत होता. एके दिवशी त्यानं गावाला सहस्रभोजन घातलं; पण बहिणीला बोलवलं नाही. त्याला वाटलं, बहिणीला बोलावलं, तर गरीब म्हणून सारे हसतील. अनेक मंडळी येऊन भोजन करून जात होती. 

बहिणीनं विचार केला, भाऊ आपल्याला बोलवायला विसरला असेल. भावाच्या घरी जायला काय हरकत आहे ? ती मुलांना घेऊन भावाच्या घरी गेली व पानावर बसली. शेजारच्या पानांवर मुलांना बसवलं. 

भाऊ वाढता वाढता तिच्या पानाशी आला. तिला म्हणाला, “ताई, तू गरीब. तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दागदागिने नाहीत. तुझ्याकडे पाहून सगळे हसतात. मी तुला बोलावलं नाही. आज तू आलीस. आता उद्या येऊ नकोस.” 

हे ऐकून ती हिरमुसली होऊन जेवली. मुलांना घेऊन घरी आली.

दुसरे दिवशी मुलांनी मामाकडे जेवायला जाण्याचा हट्ट केला. तिनं विचार केला, “कसाही असला, तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं?” ती मुलांना घेऊन जेवायला गेली. तेव्हा पहिल्या दिवशीप्रमाणेच तो तिला बोलला. 

तिसरे दिवशी जेवायला गेली. भावानं तिला हात धरून घालवून दिलं. ती खूप दु:खी-कष्टी झाली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची दया आली. नंतर तिला सुखाचे दिवस आले.

एक वर्ष निघून गेले. तशी तिची गरीबी गेली. ती श्रीमंत झाली. देवीची तिजवर कृपा झाली. शुक्रवारचं उद्यापन करायचं; म्हणून भावाला जेवायल बोलावलं.

भाऊ मनात ओशाळला व म्हणाला, “ताई, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये. तू नाही आलीस, तर मी काही तुझ्या घरी येणार नाही.” ती ‘हो’ म्हणाली. 

भावाच्या मनातलं कारण तिने ओळखलं. दुसऱ्या दिवशी दाग-दागिने घालून, उंची पैठणी नेसून भावाकडं जेवायला गेली. 

भावानं मोठ्या प्रेमाने व आदराने तिला पानावर बसवलं. ताईनं आपली शालजोडी काढली व बसल्या पाटावर ठेवली. भावानं विचार केला, उकडत असेल. नंतर दागिने काढून पाटावर ठेवले. भावानं विचार केला, जड म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला. मोठा घास उचलून सरीवर ठेवला. एकेक पक्वानाचा घास एकेका दागिन्यावर ठेवत गेली. 

आता मात्र भावानं विचारलं, “ताई, हे काय करते आहेस ?” 

ती म्हणाली, “दादा, मी करते, हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलावलंस, तिला मी भरवते आहे.” 

भावानं तिला पुन्हा जेवावयास सांगितलं. 

तेव्हा ती म्हणाली, “हे माझं जेवण नाही. हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं, ते मी सहस्रभोजनाचे दिवशी जेवले.” 

हे ऐकताच भाऊ अतिशय खजील झाला. उठून त्याने बहिणीचे पाय धरले. झालेल्या अपराधाची क्षमा मागितली. बहीण मोठ्या मनाची; तिने क्षमा केली. एकमेकांबद्दल मनात असलेला गैरसमज दूर करून दोघं प्रेमाने जेवले. 

दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला खूप आनंद झाला. 

तिनं शुक्रवारचे देवीचे व्रत केले; त्यामुळे ती श्रीमंत व सुखी, आनंदी झाली. तसं तुम्हा-आम्हां करो. 

ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Tuesday, August 6, 2024

बुध-बृहस्पतींची कहाणी

 ऐका बुध-बृहस्पतींनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या. त्यांच्या घरीं रोज एक मामाभाचे भिक्षेस जात. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत.

असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दरिद्र आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणें भिक्षेला आले. सर्व सुनांनीं सांगितलं, असतं तर दिलं असतं, आमचे हात रिकामे झाले.

सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला, होतं तेव्हां दिलं नाहीं, आतां नाहीं म्हणून नाहीं, ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पायां पडली. त्यांना सांगूं लागली, आम्ही संपन्न असतां धर्म केला नाहीं ही आमची चुकी आहे, आतां आम्हीं पूर्वीसारखीं होऊं, असा कांहीं उपाय सांगा !

ते म्हणाले, श्रावणमासीं दर बुधवारी आणि बृहस्पतवारीं जेवावयास ब्राह्मण सांगावा. आपला पति प्रवासीं जाऊन घरीं येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बाहुलीं काढावीं. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावीं. त्यांची मनोभावं पूजा करावी, अतिथींचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात ! त्याप्रमाणं ती करूं लागली.

एके दिवशी तिला स्वप्न पडलं. ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यांत तूप वाढते आहे. ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनीं तिची थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला ! तिचा नवरा प्रवासाला गेला होता, त्या नगरचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाहीं, म्हणून तेथील लोकांनीं काय केलं? हत्तिणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरांत फिरविली. ज्याच्या गळ्यांत माळ घालील, त्याला राज्याभिषेक होईल, अशी दवंडी पिटविली. हत्तिणीनं ह्या बाईच्या नवर्‍याच्या गळ्यांत माळ घातली. मंडळींनीं त्याला हाकलून दिलं. पुन्हा हत्तीण फिरविली, पुन्हां त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणे तीनदां झालं.

पुढं त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हां तीं अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली.मग राजानं काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारों मजूर खपूं लागलें. तिथं त्याचीं माणसं आलीं. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्यें संतोष झाला.

तिनं बुध-बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली. देवानं देणगी दिली, पण जावांनीं थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनांत ठेविली. ब्राह्मणभोजनाचा थाट केला. हिच्या हातांत चांदीचं भांडं दिलं, तूप वाढूं सांगितलं, ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनीं तें पाहिलं. त्यांचा सन्मान केला, मुलंबाळं झालीं, दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले. जशी त्यांच्यावर बुध-बृहस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हां आम्हांवर करोत ! ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

मंगळागौरीची कहाणी

 आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असें म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. “दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी भिक्षा झोळीत घातली. बुवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाहीं असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बुवांनी उःशाप दिला. बोवा म्हणालें, “आपल्या नवर्‍याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.” असं बोलून बोवा चालता झाला. तिने आपल्या पतीला सांगितलं.

वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणल. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आंत देवीची मूर्ती आहे. मनोभावें पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “घरंदारं आहे, गुरंढोरं आहेत. धन द्रव्य आहे; पोटीं पुत्र नाहीं, म्हणून दुःखी आहे.” देवी म्हणाली, “तुला संततीचं सुख नाहीं, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्माध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तें मागून घे.” त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपति आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; मोटभर घरीं नेण्याकरितां घेतले. खालीं उतरून पाहूं लागला, तो आपल्या मोटेत आंबा एकच आहे. असं चार पांच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबीं एकच फळ आहे.” फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. दिवसमासां गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासां वाढूं लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाहीं असा माझा नवस आहे. असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जातां जातां काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणूं लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे.” हे भाषण मामान ऐकलं त्याच्या मनांत आलं हिच्याशी भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं ? त्याच दिवशीं तिथं त्यांनीं मुक्काम केला. इकडे काय झालं ? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करूं, म्हणून धर्मशाळा पाहूं लागले. मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं.

उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोंपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अग अग मुली, तुझ्या नवर्‍याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प क-यात शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळीं उठून आईला तें वाण दे.” तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणूं लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बि-हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले. दुसरे दिवशीं काय झालं? हिनं सकाळीं उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहूं लागली, तों आंत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडपांत आला. मुलीला खेळयला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाहीं. मी त्याचे बरोबर खेळत नाहीं.” रात्रीची लाडवांची व आंगठीची खूण कांहीं पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो ? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं, आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेंकडो लोक येऊन जेवूं लागले.

इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगू  लागला, “मला असं असं स्वप्न पडलं.” मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझावरचं विघ्न टळलं. उद्यां आपण घरी जाऊ.” परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाहीं.” दासींनी यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नव-यानं आंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला,” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असता. ही सगळी तिची कृपा.” सासर माहेरचीं घरचींदारचीं माणसं सर्व एकत्र झाली, आणि त्या व्रताचं उद्यापन केलं.

तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी  सुफळ संपूर्ण.

Monday, August 5, 2024

श्रावणी सोमवार शिवमूठ कथा

 आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता, त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या एक नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरगटं,नेसायला जाडें भरडे,राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत. पुढे श्रावणमास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली, ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामूठ वाहायला जात आहेत. नावडतीने विचारलं त्याने काय होतं ? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं,मुलबाळ होतं,नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशिर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण ? नावडतीने सांगितले राजाची सून, मी देखील तुमच्या सोबत येते.नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली.

नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या, नावडतीने विचारलं काय बोलताय, तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामूठीचा वसा वसतो आहोत. या वसाला नेमकं काय करावं ? मूठ चिमूट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी. गंध फूल घ्यावं, दोन बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरादेवा, सासूसासऱ्या, दिराभावा,नणंदाजावा,भ्रतरा,नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पाच वर्ष करावा.पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग,चौथ्यास जव आणि पाचव्यास सातू शिवमूठीकरीता घ्यावे.
पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावानणंदानीं उष्टं माष्टं पान दिलं ते तीनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला , नावडतीने घरातून सर्व सामान घेतला, पूढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली, आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासूसासऱ्या,दिराभावा, नणंदाजावा,नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून तिळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिलं,दूध पिऊन निजून राहिली, संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे. नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहेत कांटे कुटे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला, पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली,घरची माणसं मागे जाऊ लागली. नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे.
नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करूणा आली. नागकन्या, देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं, नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा,सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा,नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने घालायला दिले, खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले. नावडतिची पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला, माझं पागोटं देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागलं हे असं कसं झालं ? सूनेने सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव, मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
Like
Comment
Send
Share

Sunday, August 4, 2024

आदित्यराणूबाईची कहाणी : (रविवारची) कहाणी

 ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानांत जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, "काय ग बायांनों, कसला वसा वसतां? तो मला सांगा." " तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील." ब्राह्मण म्हणाला, "उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं." तेव्हा त्या म्हणाल्या, "श्रावणमास येईल, तेव्हां पहिल्या आदितवारीं मौन्यान (मुकाट्यान) उठावं, सचीळ (वस्त्रासहित) स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यराणूबाई काढावी. सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तातू करावा. त्याला सहा गाठी द्याव्या. पानफूल वहाव, पूजा करावी. पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळाखोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा, सहा मास चाळावी, सहा मास पाळावी, माघी रथसप्तमीं संपूर्ण कराव. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकड तूप, मेहूण जेवू सांगाव. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाच उद्यापन कराव." असा वसा ब्राह्मणान केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावण धाडलं, ब्राह्मण जाते वेळेस भिऊं लागला. कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीन सांगितलं, " भिऊ नका, कापू नका, तुमच्या मुली आमचे येथे द्या" "आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरीं कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल." राणी म्हणाली, " दासी करीत नाही, बटकी करीत नाहीं. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू."

मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या, एक राजाचे घरीं दिली. दुसरी प्रधानाचे घरीं दिली. गेल्या पावलीं मुलींचा समाचार घेतला नाहीं. बारा वर्षांनीं समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीन बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. "बाब बाबा, गूळ खा पाणी प्या." गूळ खात नाहीं, पाणी पीत नाहीं. माझी कहाणी करायची आहे ती तूं ऐक." तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाहीं. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनांत राग आला. तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला. म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. "बाबा, बाबा, गूळ खा, पाणी प्या." " गूळ खात नाही पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तूं अगोदर ऐक. " तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू?" घरांत गेली, उतरडीची सहा मोत्ये आणली. तीन आपण घेतलीं. तीन बापाच्या हातांत दिलीं. त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, " मुलींचा समाचार कसा आहे?" जिनं कहाणी ऐकली नाहीं, ती दारिद्रयाने पीडली. दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती, ती भाग्यनं नांदत आहे." इकडे दरिद्री जी झाली होती, तिनं आपल्या लेकाला सांगितले. "मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये."

पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला." अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?" " आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे." "कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे." ‘परसदारन घेऊन या.’ परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊ माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं. कोहोळा पोखरला, होनमोहोरा भरल्या. "वाटेस आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहोळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, " काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?" दैवे दिलं, कर्मानं नेलं. कर्माच फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं. पण सर्व गेलं.
 
पुढं दुसर्‍या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. "अग अग दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या?" "आम्ही दासी प्रधानाच्या." प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं. काठी पोखरून होनामोहोरांनीं भरून दिली. " बाबा, ठेवू नको. विसरू नको. जतन करून घरी घेऊन जा, " म्हणून सांगितल. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली. घरी गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली. "दैवे दिलं, ते सर्व कर्मानं नेलं."
 
पुढं तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासरखं प्रधानाचे घरी नेऊन न्हाऊं माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, नारळ पोखरून होनमोहोरांनी भरून दिला. " ठेवू नको, विसरू नको." म्हणून सांगितलं, घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं. " काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?" आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व बुडालं."
 
चवथ्या आदितवारी चवथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हाऊ माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला. जेवूं खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनामोहोरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपान आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, "काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?" "आई मावसशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं."

पाचव्या आदितवारीं आपण उठली, तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरीं नेलं. न्हाऊं घातलं माखूं घातलं, पाटाच बेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. " काय वसा करतेस तो मला सांग." बहीण म्हणाली, "अंग अंग चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहींस, म्हणून तुला दरिद्र आलं." राजाच्या राणीनं विचारलं, "याला बहिणीच्या घरीं राहिली. श्रावणास आला. सांगितल्याप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावूं धाडलं. "मावशी मावशी, तुला छत्रं आलीं, चामरं आलीं, पाईक आले, परवर आले." "मला रे पापिणीला छत्रं कोठली? चामरं कोठलीं? पाईक कोठले? परवर कोठे?" बाहेर जाऊन दाराशीं बघतात, तो राजा बोलावूं आला आहे. राजा आला तशी घरीं जायला निघाली. एकमेकींना बहिणीबहिणींनीं आहेर केले. वाटेनं जाऊ लागलीं. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं, तो कहाणीची आठवण झाली. " करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा." "तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे." असं म्हणून तो राणीकडे आला. तशी सहा मोत्ये राणीनं घेऊन तीन त्याला दिलीं. तीन आपल्या हातांत ठेवलीं. मनोभावें कहाणी सांगितली, चित्त भावें त्यान ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, "बाई बाई! कहाणी ऐकल्याचं एवढं फळं, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा." " तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील," उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही." तेव्हां वसा सांगितला.

पुढं दुसर्‍या मजलेस गेली. स्वंयपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली. " करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याच शोध करा." "उपाशी नाहीं, काही नाही" माळ्याचा मळा पिकत नाहीं, विहिरीला पाणी लागत नाहीं, असा एक माळी चिंतेन बसला आहे त्याला हाक मारली. ‘आमच्या बाईची कहाणी ऐक." तो आला. राणीनं सहा मोत्ये घेऊन तीन आपण घेतलीं, तीन माळ्याला दिलीं. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकूं लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, " बाई बाई! कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा." मग राणीनं त्याला वसा सांगितला.
 
पुढं तिसर्‍या मजलेस गेली स्वंयपाक केला. राजाला वाढलं. मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. " करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा." "उपाशी नाहीं, काही नाहीं." एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनांत गेला होता, एक डोहांत बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता, त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, " आमच्या बाईची कहाणी ऐकू." ती म्हणाली, " कहाणी ऐकून मी काय करूं? मी मुलांसाठी रडते आहें. बरं येते" मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणं तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनांत गेला होता तो आला. डोहांत बुडाला होता तो आला. सर्पानं खाल्ला होता तो आला. ती म्हणाली," बाई बाई! कहाणी ऐकल्याचं हें फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा." मग राणीनं तिलाही वसा सांगितला.

पुढं चौथ्या मजलेस गेलीं. स्वंयपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली. "करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा." "उपाशी नाहीं, काही नाहीं." काणा डोळा, मांसाचा गोळा, हात नाहीं, पाय नाहीं, असा एक मनुष्य रस्त्यामध्यें होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताणा केला. सहा मोत्ये होतीं. तीन मोत्ये त्याच्या बेंबीवर ठेवलीं, तीन मोत्ये आपण घेतलीं, राणीनं मनोभावे कहाणी सांगितली; ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, "कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला.
 
पांचव्या मुक्कामाला घरी आलीं. स्वंयपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. साती दरवाजे उघडले. लोहघंगाळं पाणी तापवलं. पड्रस पक्कान्नं जेवायला केलीं. सूर्यनारायण भोजनाला बसले, त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, "अग अग, कोणाच्या पापणीचा केस आहे?" राजाच्या राणीला बारा वर्षं दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारीं वळचणीखालीं बसून केस विंचरले. "काळं चवाळं, डोईचा केंस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे." राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊ नये. 
 
ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मांसाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवों. ही साठां उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण. 

दिव्यांच्या अवसेची कहाणी

आपल्याकडे श्रावणतील प्रत्येक महत्वाच्या दिवसाची तसेच प्रत्येक वाराची एक एक कथा आहे. त्या त्या दिवशी ही कथा घरातील सगळ्यांनी भक्तिभावाने ऐकायची असते. या कथांतून बऱ्याचवेळा नीतेमत्तेविषयी काही संदेश दिलेला असतो. या कथा ऐकत ऐकता आपल्या मनात हा संदेश खोलवर रुजतो.

माझ्या आजीला (आजोळच्या) लिहिता-वाचता येत नव्हते. मी शाळेत असताना ती माझ्याकडून या कथा वाचून घेत असे. त्यामुळे या कथांची मी फेसबुकवर लिहीत असलेली ही मालिका माझ्या आजीला समर्पित.
---------------------------------------------------------
दीपकांनो, ऐका तुमची कहाणी.
आटपाट नगरात एक राजा होता.
त्याच्या सुनेने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरावरती घेतला. आपल्यावरचा प्रमाद टाळला.
उंदरांनी ठरविले की, आपल्यावर उगाच आळ आला आहे. आपण सूड घ्यावा.
म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली.
दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू व दिरांनी निंदा केली व तिला घालवून दिली.
हिचा रोजचा नेम असे, की रोज दिवे घासून तेल-वात करून स्वतः ते लावावे व खडीसाखरेच्या खड्यांनी त्यांच्या ज्योती साराव्यात. दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा. पण ही घरातून निघाल्यामुळे ते सारं बंद पडलं.
पुढं ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला, तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला. आपल्या सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं ? कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी करत आहोत. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीगत सांगितली.
त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. “काय सांगू बाबांनो, यंदा मजसारखा हतभागी मीच. दर वर्षी सर्व दिव्यांत मी मुख्य असावयाचा. माझा थाटमाट जास्ती व्हावयाचा. पण मला यंदा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत.”
तेव्हा त्यास सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय?
मग तो त्यास सांगू लागला, “खरं तर मी ह्या गावच्या राजाचा घरचा दिवा. त्या राजाची एक सून होती. एके दिवशी तिने घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला व आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी हिचा सूड घ्यावा म्हणून रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू-सासऱ्यांनी निंदा केली आणि तिला घरातून घालवून दिली. म्हणून मला असे दिवस आले. ती दर वर्षास माझी मनोभावे पूजा करीत असे,” जिथं असेल, तिथं ती खुशाल असो असं दिव्यानं आशीर्वाद दिला.
हा सारा प्रसंग राजानं ऐकला. आपल्या सुनेचा अपराध नाही, अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय, म्हणून चौकशी झाली; तेव्हा कोणीही पाहिलं नाही, असं समजलं. मग तिला मेणा पाठवून आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली. ती सुखानं राज्य करू लागली.
तिला जसा दीप पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो.
ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Thursday, July 23, 2020

शुक्रवाराची जिवतीची कहाणी

ऐका शुक्रवारा, तुमची कहाणी.
Image may contain: 1 person, standingआटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हां राणीने काय केलं? एका सुईणीला बोलावून आणलं. “ अग अग सुईणी, मला नाळवारीसुद्धां एक मुलगा गुपचुप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन.” सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली.

गांवांत एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हां ही सुईण तिच्या घरीं गेली, तिला सांगूं लागली कीं, “बाई बाई, तूं गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखूं लागेल तेव्हां मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन.”

तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली, “बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरांत एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचींच दिसताहेत. तेव्हां आपल्या घरापासून तों तिथपर्यंत कोणास कांही कळणार नाहीं असं एक गुप्त भुयार तयार करावं.

आपल्यास कांहीं दिवस गेल्याची अफवा उठवावी. “मी तुम्हांस नाळवारीचा मुलगा आणून देईन.” असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला, आणि जसजसे दिवस होत गेले, त्याप्रमाणं डोहाळ्याचं ढोंग केलं. पोट मोठं दिसण्याकरितां त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं. नऊ मास भरतांच बाळंतपणाची तयारी केली.

इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखूं लागलं. सुईणीला बोलावूं आलं त्याबरोबर “तुम्ही पुढं व्हा, मी येतें,” म्हणून सांगितलं. धांवत धांवत राणीकडे आली, पोट दुखण्याचं ढोंग करूं सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरीं आली. “बाई बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहींस, नाहीं बांधलेस तर भय वाटेल.” असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली, मुलगा झाला.

सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला, आणि तिच्यापुढें ठेविला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगूं लागली. तिनं नशिबाला बोट लावलं. मनामध्यें दुःखी झालीं. सुईण निघून राजवाड्यांत गेली.

राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊं लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावणामासीं दर शुक्रवारीं जिवतीची पूजा करावी, आणि नमस्कार करून म्हणावं कीं, ‘जय जिवतीआई माते! जिथं माझं बाळ असेल, तिथं खुशाल असो.” असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमीं वागूं लागली.

इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशीं बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशीं ही न्हाऊन आपल्या अंगणांत राळे राखीत बसली होती. तेव्हां याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्रीं तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्रीं तिच्या घरीं आला. दारांत गाय-वासरूं बांधली होतीं. चालतां चालतां राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला. वांसराला वाचा फुटली. तें आपल्या आईला म्हणालं, “कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला?” तेव्हां ती म्हणाली, “जो आपल्या आईकडे जावयास भीत नाहीं, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल काय?” हें ऐकून राजा मागं परतला आणि घरीं येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली.

काशीस जाऊं लागला. जातां जातां एका ब्राह्मणाच्या इथें उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होतीं. पण तीं पांचवी-सहावीच्या दिवशीं जात असत. राजा आला त्या दिवशीं चमत्कार झाला. पांचवीचा दिवस होता. राजा दारांत निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणूं लागली, ‘ कोण ग मेलं वाटेंत पसरलं आहे ?” जियती उत्तर करिते, “ अग अग, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी कांहीं त्याला ओलांडूं देणार नाहीं.” मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचीं आईबाप चिंता करीत बसलीं होती. त्यांनीं हा संवाद ऐकला.

इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी जिवती आपापल्या रस्त्यांनीं निघून गेल्या. उजाडाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. “तुमच्यामुळें आमचा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा.” अशी विनंती केली राजानं ती मान्य केली. त्याही रात्रीं याचप्रमाणं प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला.

इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला. पुढं काशींत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळीं ते घ्यायला दोन हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरीं जा. सार्‍या गांवांतल्या बायकापुरुषांस जेवायला बोलाव. म्हणजे याचें कारण समजेल.”

मनाला मोठी चुटपुट लागली. घरीं आला. मोठ्या थाटानं मामदं केलं.त्या दिवशी शुक्रवार होता. गांवांत ताकीद दिली. “घरीं कोणीं चूल पेटवूं नये. सगळ्यांनीं जेवायला यावं,” ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला. “मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईन.” राजानं कबूल केलं. जिथं तांदुळाचं धूण होतं तें काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहींत. कारल्याच्या मांडवांखालून गेलीं नाहीं. दर वेळेस “जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असॊ,” असं म्हणे.

पुढं पानं वाढलीं. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढतां वाढतां ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढूं लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडांत उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. कांहीं केल्या उठेना. तेव्हां त्याची आई गेली. त्याची समजूत करूं लागली. तो म्हणाल, “असं होण्याचं कारण काय?” तिनं सांगितलं कीं, “ ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई.” असं सांगून सर्व हकीकत सांगितली.

नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धां आपण राज्य करूं लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

Tuesday, July 21, 2020

बुध-बृहस्पतींची कहाणी

ऐका बुधबृहस्पतींनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या. त्याच्या घरीं रोज एक मामाभाचे भिक्षेला जात. राजाच्या सुना “आमचे हात रिकामे नाहींत” म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांस दरिद्र आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणं भिक्षेला आले. सर्व सुनांनीं सांगितलं, “असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले.” सर्वांत धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला. होतं तेव्हां दिलं नाहीं, आतां नाहीं म्हणून नाहीं. ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पायां पडली. त्यांना सांगूं लागली, “आम्हीं संपन्न असतां धर्म केला नाहीं ही आमची चुकी आहे. आतां आम्ही पूर्वीसारखीं होऊं, असा कांहीं उपाय सांगा,” ते म्हणाले, “श्रावणमासीं दर बुधवारीं आणि बृहस्पतवारीं जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पति प्रवासीं जाऊन घरीं येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बाहुलीं काढावीं. संपत्ति पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावीं. त्यांची मनोभावें पूजा करावी. अतिथींचा सत्कार करावा. म्हणजे इच्छित हेतु पूर्ण होतात.” त्याप्रमाणे ती करूं लागली.

एके दिवशी तिला स्वप्न पडलं, “ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढतें आहें.” ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केला. इकडे काय चमत्कार झाला? तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाहीं म्हणून तेथील लोकांनीं काय केलं? हत्तिणीच्या सोंडेंत माळ दिली व तिला नगरांत फिरविलं, “ज्याच्या गळ्यांत माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल,” अशी दौंडी पिटविली. हत्तिणीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यांत माळ घातली. मंडळींनीं त्याला हांकलून दिलं. पुन्हा हत्तीण फिरविली. पुन्हा त्याच्याच गळ्यांत माळ घातली. याप्रमाणं तीनदां झालं. पुढं त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हा तीं अन्न अन्न करून देशोधडीस लागल्याची खबर समजली.

मग राजानं काय केलं? मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारों मजूर खपूं लागले, तिथं त्याचीं माणसं आलीं. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्यें संतोष झाला. तिनं बुध-बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविलि. देवानं देणगी दिली, पण जावांनीं थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनांत ठेविली. ब्राह्मणभोजनाचा थाट केला. हिच्या हातांत चांदीचं भांडं दिलं. तूप वाढूं सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनीं तें पाहिलं. त्याचा सन्मान केला. मुलंबाळं झाली. दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले.

जशी त्यांवर बुध-बृस्पतींनीं कृपा केली, तशी तुम्हां आम्हांवर करोत. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

Monday, July 20, 2020

मंगळागौरीची कहाणी

mangalagaur-kahaniआटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असें म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. “दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी भिक्षा झोळीत घातली. बोवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाहीं असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणालें, “आपल्या नवर्‍याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.” असं बोलून बोवा चालता झाला. तिने आपल्या पतीला सांगितलं.

वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणल. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आंत देवीची मूर्ती आहे. मनोभावें पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “घरंदारं आहे, गुरंढोरं आहेत. धन द्रव्य आहे; पोटीं पुत्र नाहीं, म्हणून दुःखी आहे.” देवी म्हणाली, “तुला संततीचं सुख नाहीं, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्माध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तें मागून घे.” त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपति आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; मोटभर घरीं नेण्याकरितां घेतले. खालीं उतरून पाहूं लागला, तो आपल्या मोटेत आंबा एकच आहे. असं चार पांच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबीं एकच फळ आहे.” फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. दिवसमासां गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासां वाढूं लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाहीं असा माझा नवस आहे. असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जातां जातां काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणूं लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे.” हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनांत आलं हिच्याशी भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हें घडतं कसं ? त्याच दिवशीं तिथं त्यांनीं मुक्काम केला. इकडे काय झालं ? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करूं, म्हणून धर्मशाळा पाहूं लागले. मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं.

उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोंपीं गेलीं. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अग अग मुली, तुझ्या नवर्‍याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प क-यात शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळीं उठून आईला तें वाण दे.” तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. कांही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणूं लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बि-हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले. दुसरे दिवशीं काय झालं? हिनं सकाळीं उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहूं लागली, तों आंत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडपांत आला. मुलीला खेळयला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाहीं. मी त्याचे बरोबर खेळत नाहीं.” रात्रीची लाडवांची व आंगठीची खूण कांहीं पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो ? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं, आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेंकडो लोक येऊन जेवूं लागले.

इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगूं लागला, “मला असं असं स्वप्न पडलं.” मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझावरचं विघ्न टळलं. उद्यां आपण घरी जाऊ.” परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाहीं.” दासींनीं यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नव-यानं आंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला,” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असता. ही सगळी तिची कृपा.” सासर माहेरचीं घरचींदारचीं माणसं सर्व एकत्र झाली, आणि त्या व्रताचं उद्यापन केलं.

तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरईं सुफळ संपूर्ण.

Sunday, July 19, 2020

प्रस्तावना : श्रावणातील कहाण्या

Image may contain: textमहाराष्ट्रात पूर्वीपासून श्रावणात कहाण्या सांगण्याची पद्धत आहे. या कहाण्यांतून अंधश्रद्धेची जोपासना हा मुख्य हेतू नव्हता तर समाजाला सामाजिक मूल्यांची जाणीव करून देवे हा प्रधान हेतू होता. मी शाळेत असताना माझ्या आजीला या कहाण्या त्या त्या सणाच्या दिवशी वाचून दाखवीत असे. आता आपला हा अमूल्य सामाजिक ठेवा लुप्त होऊ लागला आहे. म्हणून आपल्या आठवणी जगविण्यासाठी आणि नव्या पिढीला या ठेव्याची ओळख करून देण्यासाठी मी ही श्रावणातील कहाण्यांची लेखमाला आपल्या ग्रुपवर सुरु करीत आहे. सोमवारी यातील पहिली कहाणी असेल.
या कहाण्या मी लिहिलेल्या नाहीत तर आपल्या परंपरेतून आलेल्या आहेत. मी केवळ तुमच्यापर्यंत आणण्याचे काम करणारा भारवाही हमाल आहे.
#श्रावणातील_कहाण्या

क‍हाणी दिव्यांच्या आमावस्येची

Image may contain: indoorऐका दीपकांनो, तुमची कहाणी. एक नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा.
त्यांनी रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसर्‍या दिवशी फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे. रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या आमावस्येच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. ही घरांतून निघाल्यावर तें बंद पडलं.
पुढं अमावस्येच्या दिवशी राजा शिकार करून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार घडला. आपले गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गप्पा मारीत आहेत. कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हावचा, त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत.
इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू? मी ह्या गावाच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घेतला. तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा उदरांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसर्‍या दिवशी तिची फजिती झाली. सासू-‍‍दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणन मला हे दिवस आले. ती दरवर्षी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो! असं म्हणून त्या दिव्याने तिला आशीर्वाद दिला. 
घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरीं आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलें आहे काय? म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सार्‍या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करु लागली. जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो! साठा जन्माची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.