'अपरोक्षानुभूती' या अद्वैत वेदान्ताच्या दुसऱ्या प्रकरणग्रंथाच्या निरूपणाला आता मी सुरुवात करीत आहे. वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्कचे मुख्य आचार्य स्वामी सर्वप्रियानंद यांच्या व्हिडीओ प्रवचनांचा आधार प्रामुख्याने या निरूपणाला आहे.
वेद हा कदाचित माणसाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात जुना ग्रंथ आहे. कमीतकमी चार हजार वर्षे हा वेदांचा काळ समाजाला जातो. उपनिषदे वेदांचाच एक भाग आहेत. त्यांना 'वेदांत' असेही म्हटले जाते. वेदांत या शब्दाचे दोन अर्थ होतात. वेदांचा शेवटचा भाग हा एक अर्थ. पण अनेक उपनिषदे ही वेदांच्या मध्येच आलेली आहेत. त्यामुळे हा अर्थ नसावा. एखाद्या गोष्टीचे उच्चतम शिखर असाही 'अंत' शब्दाचा अर्थ होतो. उदा. 'सिद्धांत' . त्यामुळे वेदांचे उच्चतम शिखर असाही अर्थ होऊ शकतो. आणि तोच योग्य असावा. अद्वैत वेदान्ताचे मुख्य प्रवर्तक आद्य शंकराचार्य यांनी दहा अथवा अकरा उपनिषदांवर भाष्य केले आहे. भगवतगीतेचा उपनिषदे हा एक आधार आहे. उपनिषदातील अनेक कल्पना गीतेत जश्याच्यातशा येतात. तसेच उपनिषदातील सार ब्रह्मसूत्रांत आहे. भगवतगीता आणि ब्रह्मसूत्रांवरही शंकराचार्यांनी भाष्य केले आहे. म्हणूनच उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यांना 'अद्वैत वेदांताची प्रस्थानत्रयी' असे म्हणतात.
अद्वैत वेदान्ताच्या स्पष्टीकरणासाठी आद्य शंकराचार्य आणि नंतरच्या आचार्यांनी काही ग्रंथ लिहिले. त्यांना 'प्रकरणग्रंथ' असे नाव आहे. अपरोक्षानुभूती हा स्वत: शंकराचार्यांनी लिहिलेला प्रकरणग्रंथ आहे. शिवाय त्यावर अद्वैत वेदान्ताचे दुसरे मोठे आचार्य विद्यारण्यस्वामी (विजयनगर साम्राज्याचे प्रवर्तक) यांनी भाष्य लिहिले आहे. म्हणूनच या प्रकरणग्रंथाचे खूप महत्व आहे.
यापूर्वी आपण द्रष्टा-दृश्य विवेक' या प्रकरण ग्रंथाचा अभ्यास केला आहे. 'अपरोक्षानुभती' हा ग्रंथ आपल्याला त्यापेक्षा खूप वरच्या पातळीवर घेऊन जातो.
या ग्रंथाच्या सुरुवातीलाच अध्यात्म साधनेसाठी आवश्यक असलेल्या नियमांची माहिती देतो. त्याला 'साधनचतुष्टय' असे नाव आहे. त्यानंतर हा ग्रंथ 'मी कोण आहे' या प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हणजे आपले शरीर, मन नाही हे सर्वच ग्रंथ सांगत असतात. पण हा ग्रंथ आपण शरीर/मन का नाही याचे विस्तृत विवेचन करतो. 'आपण अध्यात्मिक अनुभवाच्या शोधात निघालेले मानवी जीव नाही तर मानवी अनुभवाच्या शोधार्थ निघालेले अध्यात्मिक जीव आहोत' याची हा ग्रंथ जाणीव करून देतो. आपले स्थूल शरीर आणि आपले सूक्ष्म शरीर या दोन्हीपलीकडे आपण म्हणजेच आपले चैतन्य आहे. या चैतन्याचा प्रत्यक्ष परिचय अनुभवातून करून देणे हाच या ग्रंथाचा प्रधान उद्देश आहे. 'अपरोक्षानुभूती' या शब्दाचाच तोच अर्थ आहे.
यानंतर हा ग्रंथ आपल्या भोवती पसरलेले विश्व हे सुद्धा ब्रह्मच आहे हे दाखवून देते. शेवटी हा ग्रंथ आपल्याला आपल्या ब्रह्मस्वरूपाची जाणीव होण्यासाठी पंधरा विविध उपाय (techniques) सुचवितो. प्रथमदर्शनी आपल्याला या पंधरा पायऱ्या वाटतात. पण प्रत्येक पायरी ही आपल्याला चैतन्याचा अनुभव करून देण्यास समर्थ आहे.
No comments:
Post a Comment