*मद्य वेद:* (संदर्भ : हेमंत कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट)
भारतीय संस्कृतीत मद्य परंपरा खूप प्राचीन काळापासून समृद्ध आहे. विविध प्रकारची मद्ये तयार आणि सेवन केली जायची.
मद्यपान भारतात कधीच निषिद्ध नव्हते. फक्त ब्रिटिश सत्ता आणि पेशवाईचा
काही काळ सोडला तर मद्यपान बंदी भारतात कधीच नव्हती. मद्यपान करणे हे
तुच्छतेने पाहिले जात नव्हते. विविध मद्य निर्मिती विधी हे रिकाम्या वेळचा
विरंगुळा नव्हता. म्हणूनच विविध मद्य प्रकार आणि त्यांचे गुण दोष यांची
सविस्तर चर्चा आयुर्वेदात आहे. तसाच बहुतेक प्राचीन लिखाणात मद्यपान विधी
मुक्तपणे, सहजतेने वर्णन केलेला आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे
स्त्रियाही मद्यपान करत असत. उल्लेखनीय गोष्ट अशी, की, मद्य हे मर्यादित
प्रमाणात घ्यावे हेही सांगितले आहे. अति मद्यसेवन हे फक्त आरोग्यच नव्हे तर
दैनंदिन जीवन सुद्धा दूषित आणि नष्ट करते ही सूचनाही केलेली आहेच.
*या
सर्व माहितीत अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आजच्या सारखी मद्याला
निंदा नालस्ती सोसावी लागत नव्हती.* उत्तम प्रतीचे मद्य बनवण्याचे विधी,
त्यांना विविध सुगंध देणे, त्यांचं सेवन करणे वगैरे माहिती विस्ताराने दिली
आहे.
मद्याचे अगदी जुने उल्लेख सर्वात प्राचीन ज्ञात साहित्य जो
ऋग्वेद, त्यात आहेत. त्यात सोम या नावानं मद्याचा उल्लेख आहे. या रसाचा *मद
आणणे* हा गुण तत्कालीन लोकांना ठाऊक होता. *मद आणणारे ते मद्य.* त्यामुळे
सर्व दैनिक कर्तव्ये संपवून घरी परतल्यावर तत्कालीन वैदिक लोक *श्रम
परीहारा साठी यथेच्छ मद्यपान करीत.*
त्यानंतर महाभारत काळात इतर मद्य
प्रकारांचे उल्लेख आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी आधी मद्य निर्मिती सुरू
करत असत. त्याशिवाय योद्धे वीरश्रीने लढत नसत. कुरुक्षेत्राच्या
युद्धापूर्वी दुर्योधनाने आधी मद्य निर्मिती सुरू करण्याची आज्ञा दिली
होती. मद्याचे अनेक औषधी उपयोगही माहीत होते. मद्यपान हे श्रम परिहार
म्हणून करणही संमत होतं. महाभारत हा ग्रंथ तत्कालीन समजुती, चालीरीती
याबद्दल जास्त माहिती देतो. त्यानुसार मद्यपान निंदनीय नव्हतं. सहकुटुंब,
मित्र आणि त्याचा परिवार यांच्या सोबतही मद्यपान, भोजन होत असे.
सगळं
कसं ओळखीचं वाटतंय ना!! आजही मद्यपान या विषयाबद्दल याच धारणा आहेत. याला
आपल्या पूर्वजांचा द्रष्टेपणा म्हणायचं की आपली परंपराप्रियता?
मद्य या
पेयाबद्दल आयुर्वेदाचा अभिप्राय असा आहे: मद्य हे अग्नि दीपक, रूचीदायक,
उष्ण, तुष्टी-पुष्टी दायक, मधुर गुणांचे आहे. (इथे मी अन्य अनावश्यक,
दुर्बोध अन्य गुण उल्लेख टाळले आहेत.) स्वर, आरोग्य, प्रतिभा आणि त्वचेला
कांतिदायक आहे. निद्रानाश आणि अतिनिद्रा यावर उपयुक्त आहे. कृश त्व आणि
स्थूल पणा दोन्ही नष्ट करणारे आहे. *योग्य मात्रेत घेतल्यास वात कफघ्न आणि
अधिक मात्रेत विषाप्रमाणे मारक आहे. नवीन मद्य त्रिदोष कारक तर जुने मद्य
त्रिदोष नाशक आहे.* उन्हात फिरून आल्यावर, उष्ण आहार, चर्या तसच विरेचन
केलेल्यांना मद्य वर्ज्य समजावे. अति संहत, अति स्वच्छ, गढूळ, दाट मद्य पिऊ
नये. भूक लागली असताना मद्य प्राशन करू नये.
मद्याचा इतका सूक्ष्म अभ्यास अन्य कुठल्याही संस्कृतीत झालेला नाही.
आता भारतीय मदिरा प्रकार पाहूया.
*वारूणी:* हिला *प्रसन्ना* असंही म्हणतात. ही तांदूळ पीठ किंवा ताड/खजूर
यांच्या पेंडीतील रसापासून तयार करतात. ही हृदयाला उत्तम; दमा, वांती, पोट
फुगी, पडसे नाशक आहे.
या मदिरेचा सध्या उल्लेख हिमालय आयुर्वेद कंपनीच्या "Pure Hands" या sanitizer वरच्या घटक पदार्थांत आहे.
*वैभितकी*: ही बेहड्यापासून बनवलेली असते. ही सौम्य मादक आणि पथ्यकारक असते. ही पंडुरोग आणि कुष्ठ रोग असताना घेतली तरी चालते.
*यव सुरा*: ही यव म्हणजे बार्ली पासून करतात. ही मलावरोधक आणि त्रिदोष कारक असते.
*कौहली*: ही कोहळ्या पासून केलेली मदिरा.
*मधूलक*: ही मोहाच्या फुलांपासून केलेली मदिरा. ही कफ कारक आहे. कोणत्याही इतर फुलांच्या मदिरेलाही मधूलकच म्हणतात.
*मार्द्विक*: ही मदिरत मनुकांपासून बनवली जाते. ही हृदयाला उत्तम, मधुर, अल्प दोष कारक आणि कृमींचा नाश करणारी आहे.
*खार्जुर मद्य*: मार्द्वी क सारखेच गुण परंतु वात कारक आहे.
*शार्कर*: हे मद्य साखरेपासून बनवतात. हे मधुर, सुगंधी, हृदयाला उत्तम आणि सौम्य मादक असते.
*गौड*: हे मद्य गुळापासून बनते. हे मल, मूत्र आणि अपान वायू उत्सर्जक, उष्ण आणि पाचक आहे.
*शीधू*: हे उसाच्या रसापासून बनवलेलं श्रेष्ठ मद्य असतं. हे मेद, कफ विकार, सूज, उदर रोग यांचा नाश करतं.
याशिवाय मैरेयक, शंडाकी, सौविरक वगैरे मद्य प्रकार आहेत.
यात पूर्वी सांगितलेला "सोमरस" आणि "सुरा" असे दोन ठळक भेद आहेत. सोमरस
सौम्य मादक आणि सुरा ही जास्त मादक. म्हणजे बहुधा आत्ताच्या वाईन आणि हार्ड
ड्रिंक असा फरक असावा. यजुर्वेदात तर या दोन्हींचे कॉकटेल सुद्धा सांगितले
आहे. सोमरस हे त्या काळी देवांचे मादक पेय तर सुरा ही मानवांचे मादक पेय
होते.
Distillations प्रक्रियेचा उल्लेख वाजसनेयी संहितेत आहे. ही
क्रिया हैहय क्षत्रिय काळात सुरू झाली असावी असं अभ्यासक म्हणतात. मद्यांची
उत्तेजकता वाढवण्यासाठी त्यांची मिश्रणे करण्याची पद्धत वेद काळापासून
भारतीयांना माहीत होती.
सुरा तयार करणारे वैश्य असत. त्यांना *शौंडिक*
म्हणत. कारण नि: सारण यंत्रात तयार झालेली मदिरा त्याच्या सोंडेसारख्या
मुखातून थेंब थेंब उतरते. या मद्याची साठवण पखाल आणि बुधले यांत करत होते.
हे तयार मद्य चषक किंवा सुरई सारख्या पात्रात ओतले जाई.
मद्यपान विषयक बराच पुरावा महाभारतात आढळतो. भारतीय लोक त्याकाळी मद्यपान
निषिद्ध मानत नव्हते. बलराम मद्यासक्त होता आणि कृष्ण सुद्धा मर्यादेत
मद्यपान करत असे.
एवढंच नव्हे तर याबाबतीत स्त्रियाही आसक्त होत्या.
गोभिल गृह्य सूत्रात विवाहानंतर नाव वधूचे अंग भिजेल इतक्या मद्याचे
तिच्यावर सिंचन करावे असा प्रघात सांगितला आहे.
कुलीन स्त्रियांच्या
मनमुराद मद्य प्राशन प्रसंगांची अनेक वर्णने महाभारतात आढळतात.
स्त्री-पुरुषांच्या मद्यपानात फरक एवढाच होता की चवीला गोड असणारी माध्वी,
मधु माधवी अशी मद्ये स्त्रियांना विशेष आवडत. ऋषिकन्या देवयानी आणि
राजपुत्री शर्मिष्ठा यांनी वण भोजनाच्या वेळी मधु माधवी मद्याचे सेवन केले.
कृष्ण आणि अर्जुन वन विहाराला सपत्नीक गेले तेव्हा कृष्णानं अर्जुनाला
विवाहानिमित्त भेट दिलेल्या सहस्र सुंदरीही त्यांच्या सोबत होत्या. द्रौपदी
आणि सत्यभामा सुद्धा होत्या. या सर्व स्त्रियांनी बेभान होईल इतकं मद्य
सेवन केलं. कोणी चालताना अडखळू लागल्या, कुणी मोठ्यानं हसू लागल्या, कोणी
गायन नृत्य सुरू केलं, कुणी भांडू लागल्या... रावणाच्या स्त्रिया मद्यासक्त
होत्या. अशोक वनात रामाची सीतेशी भेट झाली तेव्हा त्याने स्वहस्ते तिला
मद्य प्यायला दिले. वाली ची विधवा पत्नी तारा सुग्रिवाकडे त्याची राणी
म्हणून जाताना धुंदी येण्या इतके मद्य सेवन करून गेली. सोवळ्या मानलेल्या
रामायणात हे उल्लेख आहेत, हे विशेष.
यानंतर कालिदास काळ येतो. या काळात
प्रतिष्ठित वर्गातच नव्हे तर बहुजन समाजात, एवढेच नव्हे तर स्त्रियांत
सुद्धा मद्यपानाची प्रथा होती. त्याहीपुढे, त्याच्या लेखनात मद्यपानाचा
किंचितही निषेध आढळत नाही. धनिक लोक सुगंधी मद्ये सेवन करीत. मद्ये सुगंधित
करण्यासाठी आंब्याचा मोहोर, नीलकमल पाकळ्या किंवा पाने, पाटलीची फुले
वापरीत. स्त्रिया व्यसन म्हणून, सौंदर्यवर्धक म्हणून, कामोत्तेजक म्हणून,
शिष्टाचार म्हणून किंवा प्रिय जनांच्या आग्रहामुळे मद्यपान करत असत.
अग्निमित्राची राणी इरावती मद्यप्राशन करून झिंगल्याचे वर्णन
मालविकाग्निमित्र काव्यात आहे. कुमारसंभवात शिव स्वतः मद्य प्राशन करतोच
आणि पार्वतीला सुद्धा पाजतो.
वेद काळात लोक मद्यांचा उत्तेजक द्रव्य
म्हणून उपयोग करत असत. तरतरी व मद येण्यासाठी, युद्धात वीरश्री येण्यासाठी,
प्रतिभेच्या विकासासाठी, वक्तृत्व ओघवते होण्यासाठी सोमाचा (मद्याचा)
उपयोग होतो असे ऋग्वेदात वर्णन आहे. वैदिक लिखाणात कोठेही सोम प्राशनाचा
निषेध केलेला नाही. उलट पुरस्कार केला आहे.
इसवीसनाच्या सुरुवातीला
स्मृती निर्माण झाल्या. त्यात मद्यपान बंदी ही ब्राम्हण, क्षत्रिय आणि
वैश्य या तीन *द्विज वर्गांवर* लादली गेली. स्मृतींमध्ये निर्बंध घातले,
कडक शिक्षा निश्चित केल्या. पण त्यांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. कारण हे
निर्बंध आणि शिक्षा व्यवहार नव्हे तर केवळ नीती तत्वे अनुसरून केले गेले.
यांचा प्रसार आणि अंमल राजसत्तेने कधीही केलाच नाही आणि बहुसंख्य प्रजेचा
पाठिंबाही या निर्बंधाना कधीच लाभला नाही.
इतिहास काळात चिनी पंडित
युआन श्वांग (ह्यू एन त्संग) हा सातव्या शतकात भारतात आला. तेव्हाच्या
महाराष्ट्रबद्दल लिहितो: *युद्धाला जाताना सर्व सैनिक मद्यपान करून धुंद
होतात आणि मग एकेक भालाईत दहा हजार शत्रू सैनिकांना भारी ठरतो. सम्राट
हर्षवर्धन देखील या शूर लोकांचे राष्ट्र जिंकू शकला नाही.*
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात दिलेली नियंत्रणे अधिक यशस्वी ठरली कारण ती व्यवहार्य होती. त्यांना राजाचा पाठिंबा होता.
सर्व प्राचीन, मध्य युगीन संस्कृत आणि प्राकृत ललित साहित्यात नायक,
नायिका, धनिक, वणिक, राजपुरूष आणि राज स्त्रिया आणि सामान्य जन देखील
मद्यपान करून धुंद होत असल्याची वर्णने आहेत. फक्त पुराण कालीन स्मृतींत
मद्यपानाचा कडक निषेध आहे, जो व्यवहारात कधीच यशस्वी ठरला नाही. मदिरा, सरक
आणि सीधू किंवा शीधू ही इक्षु मद्ये म्हणजे ऊसापासून तयार केली जाणारी
मद्ये होती असं काही अभ्यासक सांगतात. तर सरक हे द्राक्ष मद्य होतं असं
काही अभ्यासक मांडतात. पूर्वी ग्रीक आणि रोमन व्यापारी भारताला द्राक्ष
मद्य निर्यात करत, तर अरब व्यापारी खजूर मद्याची. दक्षिण भारत आणि
महाराष्ट्रात विविध ठिकाणी उत्खननात रिकामे रोमन मद्य कुंभ सापडले आहेत.
मधुक/मधुरस हे मोहाचं मद्य तर सुरा हे तांदळाचं मद्य. कदंब फुलांपासून
कादंबरी, वारूणी आणि हलिप्रिया ही मद्ये तयार होतात.
(मद्याला प्राचीन
काळी सुद्धा *कादंबरी* नाव होतं. वाचन संस्कार किती उच्च असतील ते पहा. आणि
आपल्या मैत्रांगणात जे ज्येष्ठ, गुणश्रेष्ठ आहेत त्यांनीही अशीच *वाचन
संस्कृती* श्रेष्ठ मानली आहे. हे आपले मित्र खरे द्रष्टे, तपोनिष्ठ.
त्यांनाही आत्ताच्या काळात हाच विचार सुचला म्हणजे त्यांची तपश्चर्या विपुल
आणि कडक असणार यात शंकाच नाही मला!)
मोहाच्या फुलांची मदिरा लवकर तयार होते आणि कडक असते.
सुगंधी मद्य संपन्न लोकांनाच सेवन करता येई. कारण ताज्या मद्याचा उग्र
दर्प नष्ट होण्यासाठी ते अनेक वर्षे साठवावे लागते. ते वेळोवेळी तपासत
स्वच्छ, निर्जंतुक ठेवावे लागते. त्यानंतर त्यावर अनेक वेळा सुगंध संस्कार
करावा लागतो. अगदी प्राचीन काळापासून जुनी, मुरलेली मदिराच श्रेष्ठ गुणांची
असते हे भारतीयांना ठाऊक होतं. प्रत्येक मद्याची रुचि, स्वाद आणि मादकता
वेगवेगळी असते. मद्य जितके ताजे, तेवढे स्वस्त, मादक आणि कडक असते. ते घसा
भाजत पोटी उतरते आणि तात्काळ धुंदी आणते. मद्य जेवढे जुने तितके ते महाग
असते. त्याची मादकता संथ गतीनं ताबा घेते. त्याची ऊब सुखद असते, जळजळीत
नसते. ताजे मद्य हे वावटळ जशी अचानक वेगात येऊन सर्व काही सोसाट्याने सर्व
काही आकाशी उडवून नेते तसा परिणाम घडवते. तर जुनी मदिरा वाऱ्याच्या संगती
अलगद तरंगणाऱ्या फूल किंवा पानासारखी अलगद गगनभरारी घेण्याची अनुभूती देतं.
म्हणून रसिक मद्योपासक जुनी मदिराच निवडतात. जी मद्ये ताजी असताना जास्त
कडक असतात, तीच जुनी झाल्यावर सौम्य, सेवनिय होतात.
मद्य सेवन हे
ऋग्वेद काळी करोत्तर नावाच्या कातडी पात्रातून होई. नंतर चषक आले. माती,
धातू आणि स्फटिक यांचे चषक असत. अजिंठा लेण्यात मद्यपान प्रसंग कोरले आहेत.
त्यात एकटे, जोडीने मद्य प्राशन करणारे दिसतात तसच मद्य कुंभ आणि चषकही
दिसतात. तसच प्रत्यक्ष या वस्तू उत्खननांत सापडलेल्या आहेत.
मद्यपान
करायला त्या काळीही घराव्यतिरिक्त जागा होत्या. ते तत्कालीन *बार*.
खेडोपाडी झोपडीत असणाऱ्या या गुत्त्याना पान कुटी म्हणत. म्हणजे पिण्यासाठी
झोपडी. कौटिलीय अर्थशास्त्रात पानागारांचा उल्लेख आहे. पुन्हा अर्थ तोच:
पिण्याचे ठिकाण. त्यात या ठिकाणी स्वतंत्र खोल्या, त्यांत बैठकी व गाद्या,
पुष्प पात्रे आणि पाण्याचे घडे असावेत अशी त्यानं मान्यता दिली आहे.
तर अशी ही मद्य विषयक भारतीय संस्कृतीत असलेल्या धारणा आणि आचार यासंबंधी
माहिती. आता यात मराठी माणूस म्हणून काही गोष्टी मनोरंजक वाटल्या.
सातव्या शतकात सुद्धा मराठी लोक पराक्रमाची कीर्ती जगभर राखून होते. आता
त्यामागे मदिरा प्राशन असल्याचं किरकोळ कारण दिलंय म्हणा. पण दहा हजार
शत्रू सैनिकांना न आटोपणारा पराक्रम? तोही एक *चिनी माणूस* सांगतोय!!
आचार्य अत्र्यांच्या बोलण्यात "दहा हजार वर्षे" हा शब्द प्रयोग असण्याचा
उगम कदाचित या आचारात असेल, कारण तेही मदिरेचे रसिक होते. शिवाय मद्यपान
केल्याचे फायदे जे दिलेत ते आत्ताही रसिक मदिरा भक्त सांगतात. शब्द थोडे
निराळे असतील, पण मूळ अर्थ तोच. तसाच, आजही अति मद्यपान केल्यावर प्राचीन
भारतीयांनी वर्णन केलेलं वर्तनच बेभान मद्यपी करतो.
एकूणच आपले पूर्वज
ज्ञानी आणि द्रष्टे होते पण रसिक होते. ते जीवन समृद्ध पद्धतीनं जगले.
त्यांना उत्तम उपभोग आणि अतिरेक यांच्या मर्यादा ठाऊक होत्या. त्या काळात
देखील मद्याचे विविध प्रकार, त्यांचे रंग व स्वाद, distillery, बार वगैरे
गोष्टी इथे होत्या. तसच मद्यपान हीन मानत नसत. परंतु जबाबदारीने पिणे याला
प्रतिष्ठा होती. एकांती मदिरा पान आणि अन्य विलास यांना हेटाळणी च्या
दृष्टीनं पाहिलं जात नसे. कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात इतर लोक डोकावून
अनाहुत उपदेश करत नसत. नैतिकता ही कुटुंब आणि समाज यांना उपद्रव होऊ नये या
गुणाशी निगडित होती. फक्त मद्यपी लोक हे राष्ट्राच्या अर्थ व्यवस्थेचे
खंबीर आधारस्तंभ होते का, याबद्दल खात्रीशीर माहिती मिळाली नाही.
त्याबाबतीत आताच्या काळात आपण एक पाऊल पुढे आहोत.
इति मद्याख्यानम्..
सर्वे s पि सुखिन: संतु..
No comments:
Post a Comment