आधुनिक विज्ञान आणि अद्वैत वेदांत यात एका महत्वाच्या मुद्द्यावर मतभिन्नता दिसून येते. 'चैतन्य' (consciousness) या महत्वाच्या संकल्पनेबद्दल ही मतभिन्नता आहे.
अद्वैत वेदांतानुसार चैतन्य हे कायम सर्व ठिकाणी असते. या चैतन्याच्यामुळे आपल्या मनातील चित्तवृत्ती चैतन्यमय होतात आणि आपल्याला त्या वस्तूचे, विचाराचे ज्ञान होते. आपल्या पंचेंद्रियांच्या साहाय्याने आपण अनुभव घेतो, मनात काही विचार येतात. या सर्व आपल्या चित्तवृत्ती होत. आपल्या मनात/ मेंदूत या चित्तवृत्ती जागृत होतात आणि त्या सर्वव्यापी चैतन्याच्या परिक्षेत्रात येत असल्याने आपल्याला त्याची जाणीव होते. गाढ झोपेत या वृत्ती नसल्याने आपल्याला चैतन्याची जाणीव होत नाही. परंतु तेव्हाही तेथे चैतन्य असतेच.
हे थोडेसे प्रकाशासारखे आहे. अवकाशाच्या पोकळीत सर्वत्र प्रकाशाचे अस्तित्व आहे. परंतु या प्रकाशाच्या मार्गात एखादी पस्तु आली तरच आपल्याला तेथे प्रकाश आहे हे समजते. तेथे कोणतीही वस्तू नसेल तर आपल्याला तेथे प्रकाश असल्याचे ज्ञान होणार नाही.
आधुनिक विज्ञान मात्र चित्तवृत्ती चैतन्यमय झाल्यावरच तेथे चैतन्य आहे असे म्हणते. त्यामुळेच गाढ झोपेत चैतन्याचा अभाव असतो असे आधुनिक विज्ञान मानते.
No comments:
Post a Comment