उंटांचा काफिला वाळवंटातून चालला होता. संध्याकाळ झाली. मुक्कामाची जागा निवडली गेली. तंबू ठोकले गेले. उंटांच्या पाठीवरील सामान उतरवले गेले. आता उंटांना बांधण्याची तयारी झाली. उंटांना दोरीने खुंटीला बांधले. पण शेवटचा उंट राहिला. लक्षात आले की एक दोरी कमी पडत आहे. जर उंटाला बांधले नाही तर रात्री तो कोठेतरी निघून जाण्याची शक्यता होती. काफिल्याचा प्रमुख विचारात पडला. तेवढ्यात त्या काफील्यातील एक हुशार माणूस पुढे आला. त्याने त्या शेवटी राहिलेल्या उंटाला काल्पनिक दोरीने खुंटीला बांधण्याचा अभिनय केला. तो उंट रात्रभर तेथेच बसून होता. सकाळी काफिला निघण्याची तयारी झाली. पण तो उंट हलायला तयार नव्हता. त्याने पुढे जावे म्हणून त्याला काठीने रट्टे दिले. तरी तो हालत नव्हता. त्या हुशार माणसाच्या लक्षात आले. त्याने त्या उंटाला आदल्या रात्री बांधलेली काल्पनिक दोरी सोडविण्याचा अभिनय केला आणि तो उंट चालू लागला. उंट मोकळाच होता पण त्याला आपल्याला बांधले आहे असे वाटत होते. म्हणून तो मुक्तीचा आनंद घेऊ शकत नव्हता.
ही त्या उंटाची नाही तर आपलीच कहाणी आहे. उपनिषदे वारंवार उद्घोषणा करीत आहेत की आपण मुक्त आहोत. तरीही आपल्याला मुक्तीचा अनुभव येत नाही. आपण बद्ध आहोत अशी आपण आपलीच समजूत करून घेतली आहे. आपल्या मुक्ततेची ग्वाही देण्यासाठी अनेक संत-महात्म्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. पण उपयोग झाला नाही. आपण मुक्तच आहोत हे ऐकायला खूप छान वाटते. आपण मुक्तच आहोत म्हणजे आता अध्यात्मिक वाटेवर आपल्याला काहीच करण्याची आवश्यकता नाही असे वाटून आपल्याला खूप आनंद होतो. पण आपण मुक्त आहोत हे सैद्धांतिक पातळीवर चांगले समजूनही आपण जीवनात येणाऱ्या सुख-दु:खात बुडून जातो. मुक्ततेत येणाऱ्या नि:संगपणाचा, असीम आनंदाचा किंचितही अनुभव आपल्याला येत नाही. असे का होते हे समजून घेऊ.
अद्वैत वेदांत असे सांगते की तुम्ही स्वभावत: ब्रह्मच आहात. त्यामुळे तुम्हाला काही वेगळे होण्याची आवश्यकताच नाही. तुम्ही मुक्तच आहात. येथे आणि या क्षणी तुम्ही मुक्त आहात. काही व्रत-कैवल्ये करण्याची गरजच नाही. तुमची मुक्ती ही या क्षणी झालेली गोष्ट आहे, मेल्यानंतर स्वर्गात जाणार अशी भविष्यकाळाची हमी नाही. तुम्ही जेथे आहात तेथेच तुमचा असीम आनंद लपलेला आहे. त्यासाठी कोठल्या वेगळ्या स्वर्ग लोकाची गरज नाही. पण मग आपल्याला त्याचा अनुभव का येत नाही?
आपण ब्रह्म आहोत, हे विश्वही ब्रह्म आहे. पण या दोन्हींवर मायेने पांघरूण घातले आहे. त्यामुळे आपल्याला आपण ब्रह्म असल्याचे अनुभवाला येत नाही. ब्रह्माचे सत्, चित् आणि आनंद हे गुण आहेत. ते आपल्यात आणि विश्वात आहेतच. पण मायेने नाम-रूपाचे पांघरूण टाकल्याने आपण ब्रह्माला पटकन ओळखू शकत नाही. ते आपले अज्ञान आहे. यावर उपाय काय? अज्ञानावर उपाय अर्थात ज्ञान मिळविणे हा आहे. ज्ञानाच्या सहाय्याने हे मायेचे पांघरूण बाजूस सारून आपल्याला ब्रह्माचे दर्शन होऊ शकेल. मायेने कितीही पांघरूण घातले तरी ब्रह्म त्यातून डोकावत असते. आपण सजग चित्ताने अनुभव घेतले तर मायेच्या पांघरुणाडून होणारे हे ब्रह्माचे दर्शन आपल्याला होऊ शकेल. हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, केवळ उपनिषदे वाचून येणारे ज्ञान नाही तर अनुभवातून येणारे ज्ञान आहे. आपण रोज अनेक अनुभव घेत असतो. तरी आपल्याला ज्ञान का होत नाही? आपण जेव्हा विविध अनुभव घेतो तेव्हा आपले चित्त विचलित झालेले असते. त्यामुळे आपण अनुभव पूर्णतः: घेऊ शकत नाही. त्यामुळे ज्ञान मिळत नाही आणि आपण मुक्ततेचा - ब्रह्म असल्याच्या अनुभवाला मुकतो. असीम आनंदाचा साक्षात्कार आपल्याला होऊ शकत नाही.
मग या अस्थिर चित्तावर उपाय काय? चित्त कसे स्थिर करायचे? यावर उपाय उपासना हा आहे. उपासना ही दोन मार्गांनी होऊ शकते. ध्यानमार्ग अथवा भक्तिमार्ग. साधक आपल्या वृत्तीनुसार, पूर्वजन्मातील साधनेनुसार कोठलाही मार्ग निवडू शकतो. ध्यानमार्गात आपणच ब्रह्म असल्याची साधकाला पूर्ण श्रद्धा असते. त्यानुसार ध्यानाच्या निरनिराळ्या पद्धती वापरून साधक चित्त स्थिर करू शकतो. या मार्गात आपल्या जीवनात घडणाऱ्या सर्व प्रसंगांची जबाबदारी साधकाला पूर्णपणे उचलावी लागते. म्हणून अनेकांना हा मार्ग कठीण वाटतो. भक्तीमार्गात इष्ट देवतेला पूर्णपणे समर्पण करायचे असते. इष्ट देवतेत पूर्णपणे विलीन व्हायचे असते. आपल्या अहंकाराचे पूर्णपणे दहन झाल्याशिवाय हे समर्पण शक्य नसते. हा मार्ग सुरुवातीला सोपा वाटलं तरी पुढे कठीण होत जातो. काही साधक या दोन्ही मार्गांवरून एकाच वेळेला जाण्याचा प्रयत्न करतात. ते ही योग्य आहे. साधनेत प्रगती झाली की आपोआप आपला मार्ग कळून येतो - जन्मोजन्मी आपण कोठल्या मार्गाने जात होतो ते कळते. हे दोन्ही मार्ग साधनेसाठी सारखेच योग्य आहेत. 'आपण ब्रह्म असल्याचा साक्षात्कार होणे' अथवा 'आपण ब्रह्मात विलीन होण्याचा साक्षात्कार होणे' असे हे दोन्ही मार्ग अंतिमतः: एकाच उद्दिष्टाकडे जातात. चित्त स्थिर केल्याशिवाय असीम आनंदाचा अनुभव येत नाही, मुक्ततेचा अनुभव येत नाही.
अनेक साधकांना साधनेत चित्त खूप अस्थिर असल्याचा अनुभव येतो. कितीही साधना केली तरी चित्त स्थिर होत नाही. याचे कारण आहे मलीन चित्त. मलीन चित्त कधीही स्थिर होऊ शकत नाही. यावर उपाय अर्थातच चित्ताची मलिनता धुवून काढणे. ही मलिनता दूर करण्यासाठी समाजासाठी काहीतरी निस्वार्थ बुद्धीने करणे आवश्यक आहे. नेहमी सत्य बोलणे-वागणे याचा आग्रह धरणे आवश्यक आहे. दिलेला शब्द पाळणे आवश्यक आहे. प्राणिमात्रांबद्दल-वृक्षवल्लीबाबत आत्मीयता अंगी बनविणे आवश्यक आहे. अनेक जण संतांची चरित्रे वाचताना मी पाहतो. हे संत जसे वागले तसे वागण्याचा प्रयत्न करणे ही मलिनता धुवून काढण्याची पहिली पायरी होऊ शकेल. सुरुवातीला कदाचित ही फक्त संतांचे शारीरिक अनुकरण करण्याची कृती असेल, पण हळूहळू त्यातील भाव लक्षात येऊ लागेल आणि आपल्या हातून अशा कृती नकळत घडू लागतील आपले चित्त निर्मल होऊ लागेल. कर्म करताना ते आपोआप घडेल, त्यामागील कर्ता भाव लुप्त होऊ लागेल, फळाची अपेक्षा राहणार नाही. गीतेत सांगितलेला कर्मयोग तो हाच.
याचंच अर्थ मुक्तीच्या दिशेने चालताना आपल्याला या तीन पायऱ्यांवरून जावे लागेल. प्रथम आपले चित्त निर्मल करावे लागेल. यासाठी सर्व भारतीय धर्मांत विविध पद्धती सांगितल्या आहेत. पातंजल योगात यम-नियम आहेत, बौद्ध धर्मात दशपारमी आहेत, जैन धर्मात अणूव्रत आहे.
चित्त निर्मल होऊ लागले की आपले चित्त स्थिर करावे लागेल. त्यासाठी उपासना अथवा साधना करावी लागेल. ही उपासना ध्यानमार्ग अथवा भक्तिमार्गाने करता येईल. चित्त स्थिर झाले की उपनिषदातील-गीतेतील उपदेशाने आपल्या मनातील अंधार दूर होऊन आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल, आपल्याला मुक्तावस्थेची जाणीव होईल. आपण परम आनंदात न्हाऊन निघू.
No comments:
Post a Comment