Friday, December 3, 2021

अद्वैत वेदांत : माया

परवाच्या माझ्या अद्वैत वेदान्ताच्या पोस्टवर काही मित्रानी प्रतिक्रिया व्यक्त केली की 'हे सर्व सैद्धांतिक दृष्ट्र्या पटते, पण अनुभवाला येत नाही. याला कारण काय असावे? यावर उपाय काय?' हे विश्व म्हणजे ब्रह्म आहे हे आपण मागील लेखात पहिलेच. आसपासचे विश्व सत्-चित्-आनंद रुपी ब्रह्म आहे. पण ते सहज लक्षात येत नाही. कारण त्यावर मायेने 'पांघरूण' टाकलेले असते. याच 'माया' संकल्पनेचा आपण आज विचार करणार आहोत. माया ही संकल्पना समजण्यास थोडी कठीण आहे. पण आपल्या वाचकांना ती समजेल असा विश्वास आहे. मायेचे पांघरूण म्हणजे काय आणि त्या आडून डोकावणारे ब्रह्म कसे ओळखायचे हे या लेखात पाहू.

आसपास आपल्याला अनेक वस्तू दिसतात, अनेक जीव दिसतात, आपले शरीर दिसते, आपल्या मनाची जाणीव होते, आपल्या चैतन्याची जाणीव होते. त्यामुळे हे सर्व खोटे आहे असे म्हणायला आपण धजावत नाही. आसपास जे विश्व दिसते ते खोटे आहे असे अद्वैत वेदांतही म्हणत नाही. आपल्या जाणिवेच्या विविध पातळ्या आहेत. त्यातील व्यावहारिक पातळीवर आसपास दिसणाऱ्या वस्तू, माणसे ही खरीच आहेत. परंतु वेगळ्या पातळीवरून पाहिल्यास हे विश्व आभासी आहे असे हे तत्वज्ञान सांगते. जाणिवेच्या या विविध पातळ्यांचे विवेचन मांडुक्य उपनिषदांत आले आहे. तो मोठा विषय आहे. त्यासंबंधी आपण एका स्वतंत्र लेखात विचार करू.  या लेखात केवळ माया, मायेचे पांघरुण आणि त्या पांघरुणाआडून डोकावणारे ब्रह्म याचाच विचार करू. 

एक सोन्याचा नेकलेस आहे. त्यातून सोने काढले तर त्या नेकलेसला अस्तित्व नसेल. तो वितळविला तर सोने उरेल, नेकलेस राहाणार नाही. त्या सोन्यापासून आपण पाटल्या बनवू शकू. याचाच अर्थ तो नेकलेस अथवा पाटल्या हे वस्तूत:  केवळ सोने आहे. नेकलेस अथवा पाटल्या हे त्या सोन्याला दिलेले रूप आहे. त्या रुपामुळे आपल्याला ते व्यवहारात वापरता येते. त्या सोन्याला आपण 'नेकलेस' अथवा 'पाटल्या' हे नाव दिलेले आहे. या नाम-रुपामुळे आपल्याला मूळचे सोने असलेले 'नेकलेस' आणि 'पाटल्या' वेगळे भासतात. त्यांचा व्यवहारात वेगळा 'उपयोगही' करून घेता येतो. परंतु खोलवर पाहता ती एकच वस्तू आहे - ते केवळ सोने आहे. तसेच हे विश्व म्हणजे सत्-चित्-आनंद रुपी ब्रह्म आहे. त्यावर मायेने नाम-रूपाचे पांघरूण टाकले आहे. 

मायेच्या या पांघरूण टाकण्याच्या शक्तीला 'आवरण शक्ती' असे नाव आहे. मायेची ही आवरण शक्ती ब्रह्मरूपी विश्वावर नाम-रूपाचे पांघरूण टाकत असली तरी ब्रह्माला पूर्णपणे झाकू शकत नाही. यातून ब्रह्म डोकावत असतेच. अंधारात दोर (रज्जू) पडलेला असताना तो साप समजून आपण घाबरतो. पण या काल्पनिक सापाचा आकार, लांबी त्या दोराकडून आलेली असते. ती झाकली जात नाही. तो दोर आहे ही वस्तुस्थिती झाकली जाणे ही झाली 'आवरण शक्ती'. परंतु तेथे साप नसताना तो आहे असा भास होणे हे झाले 'विक्षेप शक्ती'चे उदाहरण. माया ही ब्रह्माची एक शक्ती आहे. तिच्यात 'आवरण शक्ती' आणि 'विक्षेप शक्ती' या दोन शक्ती अंतर्भूत आहेत. 

या विश्वातील प्रत्येक गोष्टीत 'सत्' म्हणजेच अस्तित्वरुपी ब्रह्म आहेच. जसे नेकलेसमधून सोने काढून घेतले तर तो नेकलेस राहणार नाही तद्वतच एखाद्या गोष्टीतून अस्तित्व काढले तर ती वस्तू राहणार नाही. जसा नेकलेस हा नाम-रूपाचे आवरण घातलेले सोने आहे तसेच हे विश्व हे नाम-रूपाचे आवरण घातलेले ब्रह्मच आहे.

विश्वाचे हे ब्रह्मरूपी स्वरूप आपल्या लक्षात येण्यासाठी अत्यंत स्थिर चित्ताची आवश्यकता आहे. चित्त स्थिर करण्यासाठी ध्यानमार्ग आणि भक्तिमार्ग हे दोन मार्ग सांगितलेले आहेत. यापैकी कोणत्याही मार्गाने चित्ताची स्थिरता प्राप्त करता येते. जसजसे चित्त स्थिर होत जाईल तसे काही क्षण या विश्वरूपी ब्रह्माची जाणीव होऊ लागते. हळूहळू हा कालावधी वाढत जातो.

पण काही जणांचे चित्त भक्तिमार्गाने अथवा ध्यानमार्गाने प्रवास करूनही स्थिर होऊ शकत नाही. याचे कारण म्हणजे मनाची मलिनता. मलीन मन असताना चित्त कधीही स्थिर होऊ शकत नाही. ही मनाची मलिनता दूर करण्यासाठी अनेक पद्धती सांगितल्या गेल्या आहेत. राजयोगात यमनियम आहेत. गीतेत 'कर्मयोग' आहे. कोठलीही अपेक्षा न ठेवता समाजसेवा केली तरी मनाची मलिनता दूर होते.

आपल्या सर्वांना मायेचे आवरण बाजूस सारून या विश्वाचे ब्रह्मस्वरूप अनुभवास येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

ईशावास्योपनिषदातील शांतीमंत्राने या प्रदीर्घ लेखाची सांगता करूया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥

*************************************************


No comments:

Post a Comment