अद्वैत वेदांत हे दर्शन अन्य कोणत्याही दर्शनापेक्षा अथवा पाश्चात्य धर्मांपेक्षा क्रांतिकारी आहे. हे दर्शन आपल्याला देव कोठे अन्य ठिकाणी (स्वर्ग, देऊळ, चर्च, मशीद इत्यादी) असल्याचे सांगत नाही, देव तुम्हाला भविष्यात भेटण्याची (मृत्यूनंतर, काही कर्मकांडे केल्यावर, प्रार्थना केल्यावर) हमी देत नाही. देव तुमच्यासाठी काही सुख भविष्यात देईल असे अमिष दाखवीत नाही, तुम्ही काही कर्मकांडे न केल्यास दु:खाचे डोंगर कोसळतील अशी भीती दाखवीत नाही. हे दर्शन तुम्हाला काही अलौकिक अनुभव देण्याची हमी देत नाही. तुमच्या नेहमीच्या अनुभवाचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करून प्रथम आपण ब्रह्म असल्याचे दाखवून देण्याचे काम हे दर्शन करते. नंतर केवळ आपणच नव्हे तर हे विश्व ब्रह्म असल्याचे हे दर्शन दाखवून देते. आसपासचे विश्व ब्रह्म असून त्यावर मायेने नाम-रूपाचे पांघरूण घातलेले आहे. या नाम-रूपाआडून सत्-चित्-आनन्द रुपी ब्रह्म डोकावत असते. हे ब्रह्माचे स्वरूप ओळखायचे कसे हे ही हे दर्शन शिकविते. म्हणूनच मला हे दर्शन क्रांतिकारी वाटते.
आजवर मी अद्वैत वेदांतासंबंधी बरेच लिहिले आहे. परंतु ते प्रामुख्याने या दर्शनाच्या विविध प्रकरण ग्रंथांच्या ((Introductory Text) टिपणी (नोट्स) या स्वरूपात होते. प्रथमच मी या विषयावर स्वतंत्रपणे लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. विषयाचा आवाका प्रचंड आहे. हा विषय संक्षिप्तपणे आणि तरीही सामान्यांना समजेल अशा भाषेत मांडणे ही तारेवरची कसरत आहे. पण सध्याचे युग हे अति जलद युग आहे. कोणालाही मोठे ग्रंथ वाचण्यास अथवा विस्तृत विवेचन वाचण्यास वेळ नाही. म्हणून हा प्रयत्न करून बघणार आहे.
अद्वैत वेदांत दर्शन हे सहा प्रमुख हिंदू दर्शनांपैकी सर्वात अर्वाचीन दर्शन आहे. भारत बौद्ध दर्शनाच्या प्रभावाखाली जात असतानाच आद्य शंकराचार्यांनी अद्वैत हिंदुत्वाचा प्रसार करून भारतीय जनतेला उपनिषदांची नव्याने ओळख करून दिली. जरी आद्य शंकराचार्यांनी अद्वैत वेदांताची शास्त्रशुद्ध मांडणी प्रथमच केली असली तरी त्यापूर्वी त्यांचे आजेगुरु (गुरूंचे गुरु) गौडपादाचार्य यांनी त्यांच्या मांडुक्यकारिका (मांडुक्य उपनिषदावरील टीका) या ग्रंथातून या दर्शनाची बीजे रोवली होती.
सहा प्रमुख दर्शनांत पूर्वमीमांसा (अथवा मीमांसा) आणि उत्तरमीमांसा (अथवा वेदांत ) ही दोन दर्शने आस्तिक दर्शने मानली जातात. आस्तिक याचा अर्थ वेदप्रामाण्य मानणारी दर्शने. ही दोन दर्शने वेदप्रामाण्य मानणारी असली तरी त्यांच्यात खूप फरक आहे. यज्ञयाग आणि अन्य पूजाविधींच्या साहाय्याने देवतांना प्रसन्न करून घेणे आणि त्याद्वारे भौतिक आणि पारलौकिक सुखे मिळविणे हा पूर्वमीमांसकांचा (मीमांसकांचा) उद्देश आहे. म्हणूनच वेदातील तत्वज्ञानाचा भाग -अर्थात उपनिषदे- मीमांसक दुय्यम समजतात. या उलट वेदान्तिक आणि त्यातही अद्वैत वेदान्तिक उपनिषदांना महत्व देतात, तर वेदातील कर्मकांडाला दुय्यम महत्व देतात.
अद्वैत वेदांत उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवतगीतेवर आधारलेले आहे. त्यांना अद्वैत वेदांतात 'प्रस्थानत्रयी' म्हणतात. १०८ प्रमुख उपनिषदांपैकी दहा (अथवा अकरा .. याबद्दल मतभेद आहेत) उपनिषदांवर आद्यशंकराचार्यांनी टीका लिहिली आहे. म्हणून ही दहा उपनिषदे प्रमुख मानली जातात. या दहा उपनिषदातही 'मांडुक्य उपनिषद' हे महत्वाचे आहे. हे सर्वात लहान उपनिषद असून अर्थवाही आहे. त्यावर अद्वैत वेदान्ताच्या अनेक भाष्यकारांनी टीका लिहिली आहे.
No comments:
Post a Comment