माझा नास्तिकतेकडून अस्तिकतेकडे झालेला प्रवास
माझ्या अनेक फेसबुक मित्रानी माझ्या परम नास्तिकतेकडून परम अस्तिकतेकडे झालेल्या प्रवासाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे म्हणून हा लेख. खरे तर मी या विषयावर फारसे बोलत नाही. पण खूप आग्रह झाल्याने हे लिहीत आहे.
माझ्या मते परम नास्तिकता आणि परम अस्तिकता यात फारसे अंतर नाही. मात्र अर्धवट नास्तिकता अथवा अर्धवट अस्तिकता यापासून परम नास्तिकता अथवा परम अस्तिकता फारच दूर आहेत.
मी माझी नास्तिकता अथवा अध्यात्मिक बैठक मागच्या जन्मातूनच घेऊन आलो होतो असे आता वाटते. मी केवळ आठ-दहा वर्षांचा असतानाच माझ्या मुंजीला विरोध केला होता. शेवटी मी बारा वर्षांचा झाल्यावर माझ्या वडिलांनी माझी मुंज सोसायटीच्या गच्चीवर जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत केली. मी आधीच जाहीर केल्यानुसार माझे जानवे मुंजीच्या दुसऱ्या दिवशी खुंटीला अडकविले ते आजतागायत. कोठलेही धार्मिक विधी करण्यात मला स्वारस्य नव्हते. मी कधीच कोणत्याही पूजेला बसलो नाही - आजही बसत नाही. देवासमोर कसलेही मागणे मागणे मला लहानपणापासून हास्यास्पद वाटत होते. आजही हास्यास्पद वाटते. परमेश्वराने मला जे काही दिले आहे त्यात मी आनंदी आहे. त्याबद्दल मी परमेश्वराचा कृतज्ञही आहे. पण त्यासाठी ही कृतज्ञता केवळ देवाच्या मूर्तीसमोर व्यक्त न करता मनात असणे मी अधिक महत्वाचे मानतो. म्हणूनच माझे बाह्य वर्तन आजही परम नास्तिकाचेच आहे. या दृष्टीनेच परम नास्तिकता आणि परम अस्तिकता यात फार अंतर नाही असे मी म्हणतो.
मी असा लहानपणापासूनच नास्तिक आणि बंडखोर होतो. सुदैवाने मला माझ्या पालकांनी देवपूजा अथवा कोठल्याही विधीसंबंधी कोठलीही सक्ती केली नाही. माझे लग्नही रजिस्टरच झाले होते. मुंजीनंतर झालेली सत्यनारायणाची पूजा सोडता मी कधीच सत्यनारायणाच्या पूजेला बसलो नाही.
माझ्या या बाह्य वर्तनाने मी नेहमीच 'नास्तिक' म्हणून ओळखला जात होतो. परंतु 'देव' या संकल्पनेबद्दल माझ्या मनात नेहमी विचार चालू असत. म्हणूनच IIT मध्ये असताना मी तत्वज्ञानाचे विषय माझे Elective म्हणून निवडत होतो. तेथेच मला भारतीय प्राचीन तत्वज्ञानाची तोंडओळख झाली.
IIT मध्ये असल्यापासूनच मी रोज संपूर्ण शरीर Relax करीत होतो. झोपून मनानेच शरीराचा प्रत्येक अवयव पूर्ण शिथिल करीत होतो. हे मला कोणी शिकविले नव्हते, तर अंत:प्रेरणेने मी करत होतो. शिक्षण संपवून नोकरीला लागल्यावरही मी रोज हे Relaxation करत होतो.
मी सुमारे तीस वर्षांचा असताना मी खूप आजारी पडलो. यावेळी माझी पत्नी आठ महिन्यांची गरोदर होती आणि बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. माझ्या आजाराचे निदान होत नव्हते. अंगात खूप ताप होता. मी खोलीत एकटाच पडून होतो आणि माझ्या शरीराकडे लक्ष ठेऊन होतो. अचानक मला माझ्या शरीरातील रक्तप्रवाह कमी होत आल्याचे जाणवले. मी आता पूर्ण लक्ष माझ्या शरीराकडे दिले. आणि मला अचानक out of the body अनुभव आला. त्यानंतर मी अनेक अनुभवांतून गेलो. माझ्या (जन्माच्या प्रतीक्षेत असलेल्या) बाळाला माझी गरज असेल याची जाणीव होताच मी माझ्या शरीरात क्षणार्धात परत आलो. माझा ताप आता पूर्ण उतरला होता. नंतरही दोन दिवस मला अनेक वेगळे अनुभव येत होते. घरच्यांना (आणि मलाही) मला एखादी मानसिक व्याधी जडली असावी असा संशय आला. मला ठाण्यातील एक प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्यात आले. पण त्यांनी मी मानसिकदृष्ट्या संपूर्ण सुदृढ असल्याचा निर्वाळा दिला.
त्यानंतर सुमारे अकरा वर्षे उलटली. मला आलेले out of the body आणि अन्य अनुभव कोणाला सांगितले नव्हते. ज्या जवळच्या व्यक्तींना सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी ते मला झालेले भास होते असे सांगून गप्प बसविले होते आणि हे अनुभव विसरून जाण्याचा सल्ला दिला होता. पण अचानक माझ्या अनुभवांचा अर्थ लावणारे गुरु मला भेटले. मला प्राचीन अध्यात्मिक ज्ञानाची आवड असल्याने मी ठाण्यात सहयोग मंदिरातर्फे चालविण्यात येणाऱ्या 'पातंजल योग' अभ्यासवर्गाला गेलो. हा वर्ग 'स्वामी आनंदऋषी' घेत होते. पहिल्या दिवशी वर्ग संपल्यावर मी त्यांना मला अकरा वर्षांपूर्वी आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले. त्यांनी लगेच मला त्यांच्या घरी नेले. तेथे अनेकांचे Near Death Experiences (NDE) चे अनुभव संकलित केलेले (त्यांनी लिहिलेले) पुस्तक वाचण्यास दिले. यातील अनुभव आणि मला 'मी शरीराबाहेर पडून परत शरीरात येईपर्यंतचे' अनुभव शब्दश: सारखे होते. मला नक्की काय झाले होते याचे कोडे अकरा वर्षांनी उलगडले होते. मी मृत्यूला स्पर्श करून आलो होतो. (त्यानंतर दोन दिवस येत असलेले अनुभव अद्वैत वेदान्ताच्या मांडणीशी सुसंगत होते हे नंतर लक्षात आले). नंतर स्वामीजींनी हे सर्वसामान्यांना सहसा न येणारे अनुभव का आले असावेत याचा शोध घेतला. तेव्हा मी कॉलेजजीवनापासून करत असेलेले Relaxation म्हणजे दुसरे-तिसरे काहीही नसून 'विपश्यना ध्यान' होते हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मला ताबडतोब विपश्यना शिबिरास जाण्यास सांगितले. त्यानंतर मी आजवर नऊ वेळा विपश्यना शिबीर (प्रत्येकी दहा दिवसांचे) केले आहे आणि विपश्यनेचे तंत्र घोटवून घेतले आहे.
यानंतर माझ्या अध्यात्मिक प्रवासाला दिशा मिळाली. स्वामी आनंदऋषी यांच्याकडे ओशोंच्या पुस्तकाचे भांडार होते. स्वामीजी हे ओशोंच्या पहिल्या काही शिष्यांपैकी एक. स्वामीजी हे व्यवसायाने CA. टाटा हॉटेल्सच्या अमेरिकेतील व्यवसायाचे अर्थविषयक कामकाजाचे उपाध्यक्ष. त्यामुळे त्यांची विविध विषयांवरील मते तर्कशुद्ध आणि स्पष्ट होती. त्यांच्यासोबत अध्यात्मिक संवाद साधताना स्पष्टता मिळत असे. हळूहळू वाचनाच्या कक्षा रुंदावल्या. youtube वर स्वामी सर्वप्रियानंद Swamisarvapriyanandafans यांच्याशी सूर जुळले. त्यांच्या भाषणातून अद्वैत वेदान्तातील खाचाखोचा कळल्या. मला तीस वर्षांपूर्वी आलेले अनुभव आणि अद्वैत वेदांत यांची संगती जुळली. सध्या अद्वैत वेदांताचा अभ्यास सुरु आहे.
अशाप्रकारे मी आज परम अस्तिक आहे. या विश्वात ब्रह्माशिवाय काहीही नाही असा मला विश्वास आहे - अनुभव आहे. आजही मी पूजा-अर्चा करीत नाही. भक्तिमार्ग आणि ध्यानमार्ग हे दोन मार्ग ब्रह्मज्ञानाकडे जाणारे मार्ग आहेत. मी ध्यानमार्गाचा साधक आहे.
माझ्या अनुभवांतून एक गोष्ट स्पष्ट होते. आपण मागील जन्मांतून अध्यात्मिक प्रवास केलेला असतो. तेथूनच पुढे सुरुवात करायची असते. म्हणून इतरांकडे बघून, त्यांची कॉपी करून तुमचा प्रवास करू नका. आपण कोठे आहोत, कसा प्रवास केला आहे याचा शोध घ्या आणि आपला मार्ग ठरवा. आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरु प्रवासात वेळोवेळी भेटतील. कोणालाही आपल्याला भावलेल्या मार्गाने साधना करण्याची सक्ती करू नका. कोणता माणूस मागील जन्मी कशाप्रकारे साधना करून आला आहे आणि कोणत्या टप्प्याला आहे हे केवळ तोच जणू शकतो.
असा आहे माझा या जन्मातील अध्यात्माचा प्रवास ... परम नास्तिकतेकडून परम अस्तिकतेकडे झालेला प्रवास.
No comments:
Post a Comment