Thursday, February 24, 2022

ज्ञानमार्ग

 भारतीय प्राचीन अध्यात्मानुसार तीन अध्यात्मिक  प्रमुख मार्ग दर्शविण्यात आले आहेत. भक्तिमार्ग, ध्यानमार्ग आणि ज्ञानमार्ग. यापैकी भक्तिमार्ग आणि ध्यानमार्ग यांचा विस्तृत उहापोह आपण पूर्वीच केला आहे.  भक्तीमार्गात साधक आपल्या उपास्यदैवतासमोर पूर्णपणे लीन होतो. ही लीन होण्याची प्रक्रिया एवढी तीव्र होत जाते की शेवटी त्या साधकाला सभोवतालची सृष्टी आणि स्वत: तो साधक त्या उपास्य दैवतात सामावून गेल्याचे जाणवते. शेवटी एकच उपास्यदैवत उरते. ध्यानमार्गात साधक आपण स्वतः ब्रह्म (अथवा शिव) असल्याचे मानून साधनेला सुरुवात करतो. अंतिमतः आसपासचे विश्व ब्रह्मरूपी आपल्यात सामावले गेल्याची त्याला अनुभूती येते. शेवटी एकाच ब्रह्म उरते. हे दोन्ही मार्ग अंतिमतः एकाच ठिकाणी जातात. आपण याचे विस्तृत विवेचन मागील एका लेखात पाहिले आहे.  आता सर्वसाधारणपणे अपरिचित असलेल्या ज्ञानमार्गाकडे वळू. 

ज्ञानमार्ग हा अद्वैत वेदांत या दर्शनाने पुरस्कृत केलेला मार्ग आहे. अद्वैत वेदान्ताच्या मान्यतेनुसार आपण आणि आसपासचे विश्व हे ब्रह्मच आहेत. परंतु आपल्याला त्याची जाणीव नसते. जाणीव नसल्याने अज्ञानामुळे (Ignorance) आपण आपल्याला आणि सभोवतालच्या विश्वाला वेगळे समजतो. ही केवळ अज्ञानामुळे झालेली चूक (Error) आहे. ही चूक दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्ञानाच्या साहाय्याने अज्ञान दूर करणे. हे अज्ञान दूर झाल्यावर आपल्याला आपण आणि विश्व हे एकाच ब्रह्म असल्याची जाणीव होईल असे अद्वैत वेदांत  मानते. 

हे अज्ञान दूर करण्याच्या तीन पायऱ्या आहेत असे अद्वैत वेदांतात प्रतिपादले आहे. आद्य शंकराचार्यांचे आजेगुरु गौडपादाचार्य (शंकराचार्यांचे गुरु गोविंदाचार्य - त्यांचे गुरु गौडपादाचार्य) यांनी त्यांच्या मांडुक्यउपनिषदावरील विवेचनात (मांडुक्यकारिका) या तीन पायऱ्यांचा उहापोह केला आहे. श्रवण-मनन-निदिध्यास या त्या तीन पायऱ्या. 

प्रथम हे  घ्यायला हवे की जर एखाद्या विषयाचे अज्ञान दूर करायचे असेल तर आपल्याला त्या विषयाचेच ज्ञान घ्यावे लागेल. जर मला भौतिकशास्त्र या विषयाचे अज्ञान दूर करायचे असेल तर मी अर्थशास्त्राचे ज्ञान घेऊन उपयोग नाही. मला भौतिकशास्त्राचेच ज्ञान ग्रहण करावे लागेल. आपल्याला 'मी कोण आहे', 'ब्रह्म' इत्यादी  संबंधात अज्ञान असेल तर त्यासंबंधीच ज्ञान प्राप्त करून घ्यावे लागेल. विविध उपनिषदे त्याचसाठी लिहिली गेली आहेत. 

आपल्याला जे ज्ञान ग्रहण करायचे आहे ते देणाऱ्या माणसाला/पुस्तकाच्या लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे हे नीट समजून घेणे हे झाले श्रवण.  जर एखाद्या बाबतीत त्या माणसाला काय म्हणायचे आहे ते कळले नाही तर ते परत नीट समजावून घेणे हे आवश्यक आहे.  त्या लेखकाच्या मतांशी सहमत होणे यावेळी अपेक्षित नाही. केवळ त्याला काय म्हणायचे आहे तेच समजून घ्यायचे आहे. हे नीट समजल्यावरच 'श्रवण' पूर्ण होते आणि आपण पुढील पायरीकडे म्हणजेच 'मननाकडे' वळू शकतो.  

समोरच्या माणसाला काय म्हणायचे आहे हे नीट कळल्यावर आपण त्यावर विचार करू शकतो. आपल्या पूर्वानुभवावरून आणि विविध कसोट्या लावून त्या माणसाचे म्हणणे किती योग्य-किती अयोग्य हे ठरवू शकतो. एखादी गोष्ट न पटल्यास त्या माणसाबरोबर संवादही साधू शकतो. हे झाले मनन. मननाच्या प्रक्रियेनंतर कदाचित आपल्याला समोरच्या व्यक्तीचे/ग्रंथाचे म्हणणे पटेल. आपल्या उदाहरणात कदाचित आपल्याला आपण आणि सभोवतालचे विश्व हे ब्रह्मच असल्याचे पटेल. पण तरीही आपल्याला ब्रह्मज्ञान झाल्याचे म्हणता येणार नाही. कारण आपले हे ज्ञान केवळ बौद्धिक पातळीवरील असेल. दुसऱ्यांच्या अनुभवावर आधारलेले 'परोक्ष ज्ञान' (Indirect Knowledge) असेल. आपल्यावर संकटे आली की आपण हे ज्ञान विसरून आपल्या पूर्वीच्या भूमिकेत शिरू. आपल्याला असीम आनंदाचा अनुभव मिळणार नाही. म्हणूनच तिसरी पायरी 'निदिध्यास' महत्वाची आहे. 

आपल्या एखादी गोष्ट समजली, बौद्धिक पातळीवर पटली तरी तेवढेच पुरेसे नसते. आपल्याला तसा अनुभव यायला हवा. ही अनुभव घेण्याची प्रक्रिया म्हणजेच निदिध्यास. ही अनुभव घेण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी आपण ध्यानाचा उपयोग करू शकतो. मात्र श्रवण-मनन या पायऱ्या पार केल्याशिवाय आपण ध्यानात उतरलो तर ध्यानात येणाऱ्या अनुभवांचे विश्लेषण करण्यात अडचणी येतात असे अद्वैत वेदान्ताचे मत आहे. 

लेखनसीमा !


सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग् भवेत्।।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
 

No comments:

Post a Comment