Sunday, June 5, 2022

सत् - अस्तित्व

आज अद्वैत तत्वज्ञानात थोडे खोल जाऊ.

ब्रह्म हे सत्-चित्-आनंद स्वरूपी असते हे आता आपल्याला माहीत आहे. (माझे या आधीचे लेख आपण वाचले असतील हे गृहीत धरले आहे). यातील सत् म्हणजे अस्तित्व. म्हणजेच ब्रह्म अस्तित्वरूपात असते असे ढोबळमानाने म्हणता येईल. आपल्याला अस्तित्व (सत्), चैतन्य (चित्) आणि आनंद या तिन्ही स्वरूपात ब्रह्माची अनुभूती नेहमी येत  असते. 


आपण पुढील विवेचनाचा सुरुवात करण्यापूर्वी अंगभूत गुण (Intrinsic Properties) आणि उधार गुण (Acquired  Properties) यामधील फरक जाणून घेऊ. एखादे पाण्याने भरलेले भांडे चुलीवर ठेवले आहे. या पाण्याची उष्णता ही त्याने भांड्याकडून उसनी घेतली आहे. भांड्यातून ते पाणी दुसऱ्या भांड्यात ओतले तर हळूहळू ही उष्णता निघून जाईल. म्हणजेच उष्णता हा पाण्याचा उधार गुणधर्म आहे. तसेच आकार हा ही पाण्याचा उधार गुणधर्म आहे. तो त्याने भांड्याकडूनच घेतलेला आहे. मात्र वस्तुमान हा पाण्याचा अंगभूत गुणधर्म आहे. दसऱ्या भांड्यात ओतले तरी पाण्याचे वस्तुमान तेच राहील.  अशाच प्रकारे उष्णता हा भांड्याचा उधार गुणधर्म आहे. तो त्याने खालील अग्नीकडून घेतला आहे. पण आकार आणि वस्तुमान हे भांड्याचे अंगभूत गुणधर्म आहेत. अग्नीचा मात्र उष्णता हा अंगभूत गुणधर्म आहे. अग्नी विझविताच उष्णता असणार नाही. जे उधार गुणधर्म आहेत ते काही कालच अस्तित्वात असतील. 

आपल्या आसपासच्या वस्तूंचा 'अस्तित्व' हा मूलभूत गुणधर्म नाही. या वस्तू नष्ट होतील आणि त्यांचे अस्तित्व ही त्यांच्याबरोबरच नष्ट होईल. आपला देह नष्ट होईल. मग अस्तित्व हा कोणाचाच मूलभूत गुणधर्म नाही काय? 

भगवत गीतेतील दुसऱ्या अध्यायातील सोळाव्या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला ज्या गोष्टीचा अस्तित्व (सत्) हा अंगभूत गुणधर्म आहे त्या गोष्टीची माहिती सांगतात. या गोष्टीलाच अद्वैत वेदांत ब्रह्मन् या नावाने ओळखते. या उलट काही गोष्टी कधीच अस्तित्वात येऊ शकत नाहीत. म्हणजे त्या कायम 'असत्' असतात. याचे उदाहरण उपनिषदे देतात. 'चौकोनी वर्तुळ'. असे वर्तुळ अस्तित्वात नाही, नव्हते, कधीच अस्तित्वात येऊ शकत नाही.  

परंतु या दोन गोष्टींव्यतिरिक्त आणून एक प्रकार आहे. तो म्हणजे अस्तित्व उधार घेतलेल्या गोष्टी. या गोष्टींनाच वेदांतात 'मिथ्या' असे म्हणतात. या गोष्टी काही काळ अस्तित्व 'सत्' कडून उधार घेतात. म्हणजेच 'जगत् मिथ्या' असे म्हणताना हे सर्व जग खोटे आहे असे उपनिषदे सांगत नाहीत तर जगाचे अस्तित्व हे अल्प काळ आहे, चिरंजीव नाही असे उपनिषदांना सांगायचे आहे. 


अंधाऱ्या खोलीत दोर पडलेला आहे. आपल्याला तो साप असल्याचे भासते. आपण घाबरतो. जवळ गेल्यावर तो दोर असल्याचे कळते. म्हणजेच सापाचे अस्तित्व आहे, पण ते अल्पकाळ आहे.  वाळवंटात मृगजळ दिसते. आपल्याला ते पाणी असल्याचे वाटून आपण काहीकाळ फसतो. पण जवळ गेल्यावर तेथे पाणी नसल्याचे समजते. पाण्याचे अस्तित्व अल्पकाळ असते. दोराने सापकडून काही काळ अस्तित्व उधार घेतलेले आहे. वाळूने काही काळ पाण्याकडून अस्तित्व उधार घेतलेले आहे. शंकराचार्य सांगतात की आपल्याला या विश्वात येत असलेले सर्व अनुभव या मिथ्या प्रकारात मोडतात.  हे अनुभव/वस्तू काही काळ अस्तित्वात राहणार आहेत. एवढेच नाही तर आपल्याला जाणवत असलेले वस्तूंचे अस्तित्व हे त्यांचे स्वत:चे नाही तर त्यांनी ते 'सत्' कडून उधार घेतलेले आहे. म्हणूनच या वस्तू अनंत काळ अस्तित्वात राहू शकत नाहीत. याचाच अर्थ आपल्या आसपासचे विश्व - त्यातील गोष्टी आधी अस्तित्वात नव्हत्या, काही काळाने अस्तित्वात नसतील आणि आताही त्या अस्तित्वात असल्याचे जाणवत असले तरी ते अस्तित्व त्यांनी उधार घेतलेले आहे. 

मातीचा घट आहे. तो वस्तूत: केवळ माती (मृदा) आहे. मातीला एक 'रूप' दिलेले आहे. त्या रुपाला आपण एक नाव


(नाम) दिलेले आहे. आणि व्यवहारात त्याचा उपयोग आहे. 'नाम-रूप-व्यवहाराच्या' आवरणामुळे आपल्याला ती माती घटाच्या रूपात दिसते. घटाने त्याचे अस्तित्व मातीकडून उधार घेतलेले आहे. तो आधी माती होता. नष्ट झाल्यावर परत त्याची माती होईल. घटातून माती काढून घेतली तर तो अस्तित्वात राहणार नाही . अगदी तसेच कोणत्याही गोष्टीतून 'सत् ' काढून घेतले तर ती वस्तू राहाणार नाही, अस्तित्वहीन होईल. 

हे विश्व निर्मितीपूर्वी अस्तित्वात नव्हते, प्रलयानंतरही काहीच राहणार नाही. म्हणजेच या विश्वाचा अस्तित्व हा मूलभूत गुण नाही. त्याने तो कशापासूनतरी उधार घेतला आहे. हे 'कशापासून' तेच ब्रह्म आहे. तेच अस्तित्वरूपी आहे. 

आपल्या प्रत्येक अनुभवात दोन गोष्टी निश्चित असतात. पहिली गोष्ट म्हणजे त्या अनुभवाचा 'विषय' (Object) आणि दुसरे म्हणजे त्या विषयाचे 'अस्तित्व'. अनुभवाच्या विषयामध्ये  त्या विषयाचे रूप आणि नाव असते. उदाहरणार्थ आपण एक घड्याळ बघत आहोत. तर आपण एकाच वेळी घड्याळाचे रूप-नाम बघत असतो आणि त्याचवेळी त्या घड्याळाचे अस्तित्व अनुभवत असतो. आपले अनुभवाचे विषय बदलत असतात. कधी घड्याळ तर कधी पुस्तक ... असे अनेक. पण यातून सातत्याने 'अस्तित्वाचा' अनुभव येत असतो. हा अस्तित्वाचा अनुभव स्थायी असतो, कायम तसाच असतो.  ज्याचा  अनुभव बदलता असतो, अस्थायी असतो ते मिथ्या असते. पण ज्याचा अनुभव स्थायी असतो ते 'सत्' असते. म्हणूनच आपल्याला सतत 'मिथ्या' आणि 'सत्' यांचा एकात-एक गुंफलेला अनुभव मिळत असतो. आपण निरनिराळे विषय - विचार, वस्तू - यांचा अनुभव घेताना त्या मागे अस्तित्वाचा - 'सत्'चा खंबीर आधार उभा आहे हे अनेक वेळा विसरतो. चित्रपट बघताना त्यावरील बदलते प्रसंग मागील पडद्याच्या आधारावर दिसत असतात. पण आपल्याला अनेक वेळा त्या पडद्याचे अस्तित्व जाणवतही नाही. तसेच या बदलत्या 'मिथ्या' अनुभवामागे अस्तित्वाचा - 'सत्' - चा पडदा असतो. त्याच्याच आधारे हा जीवनाचा - विश्वाचा- चित्रपट चालू असतो. 


आणखी एक प्रश्न उद्भवतो. विषय बदलत राहतील पण अस्तित्व कायम असेल असे आपण म्हटले आहे. मग प्रलयानंतर अस्तित्व राहील काय? प्रलयानंतर अस्तित्वाचे- सत् चे - काय होईल? अस्तितवाची जाणीव होण्यासाठी एखाद्या विषयाची (Object) आवश्यकता असते.  अवकाशात सर्वत्र प्रकाश भरून राहिलेला असतो. परंतु जेव्हा त्याच्यामध्ये एखादी वस्तू येते तेव्हाच त्यावरून परावर्तित झालेल्या प्रकाशामुळे अवकाशातील प्रकाशाचे अस्तित्व जाणवते. खिडकीतून प्रकाशाचा कवडसा  आत येतो तेव्हा हवेतील धूलिकणांमुळे त्या कवडशातून येणाऱ्या प्रकाशाचे अस्तित्व जाणवते. अन्यथा तेथील प्रकाशाचे अस्तित्व जाणवणार नाही, पण तेथे प्रकाश असेल. तसेच वस्तू अथवा विचार अशा विषया(object)मुळे अस्तित्व जाणवते. या विषयांनी हे अस्तित्व आपल्याकडून (आपण म्हणजे वैयिक्तक 'मी' नाही, तर 'अस्तित्व' ) उधार घेतलेले असते.  जेव्हा प्रलय होईल तेव्हा अस्तित्वाची जाणीव नसेल, पण अस्तित्व असेल. 

शेवटी एक महत्वाचा मुद्दा. आपल्या अनुभवाचे विषय (Objects) बदलते असले तरी आपल्याला त्या अनुभवातून जसे या विषयांचे अस्तित्व सतत जाणवते तसेच आपले अस्तित्व हे ही सतत जाणवत असते. याचाच अर्थ आपण अस्तित्व आहोत. आपण सत् आहोत. आपण अस्तित्वरूपी ब्रह्म आहोत. अहम् ब्रह्मास्मि ।



No comments:

Post a Comment