आज गुरुपौर्णिमा. महाभारताचे रचयिता, वेदांचे संकलक कृष्ण द्वैपायन व्यास यांच्या नावाने ही पौणिमा ओळखली जाते. कृष्ण द्वैपायन व्यास हे व्यास परंपरेतील अठरावे आणि शेवटचे व्यास. सप्तचिरंजीवांपैकी एक आहेत. पराशर ऋषी आणि सत्यवती (मत्स्यगंधा - योजनगंधा) यांचा पुत्र. ते रंगाने कृष्ण असल्याने आणि त्यांचा जन्म एका बेटावर झाल्याने त्यांना कृष्ण द्वैपायन व्यास असे म्हणतात. वयाच्या आठव्या वर्षी ते हिमालयात तपश्चर्येला निघून गेले. जाताना आईला वचन देऊन गेले की कधीही आईने मनोमन आठवण करून बोलाविले तर आईच्या सेवेत हजर होईन. सत्यवतीने अंबिका आणि अंबालिकेसाठी नियोगासाठी बोलाविताच ते दिलेल्या वचनाप्रमाणे हजर झाले आणि कुरु वंशाला धृतराष्ट्र आणि पांडुराजा हे पुत्र आणि विदुर हा दासीपुत्र दिला.
Saturday, July 5, 2025
गुरुपौर्णिमा
Thursday, June 26, 2025
आषाढाच्या पहिल्या दिवशी : वसंत बापट
आषाढाच्या पहिल्या दिवशी
भिजून गेली चिंब धरित्री
कैक दिसांनी न्हाऊन माखून
प्रसन्न झाली तुटकी छत्री
स्वर्गधारेचे मीलन झाले
सांगत फिरतो गंधित वारा
जाने दो जी मारो गोली
आज कचेरीस बुट्टी मारा
हिरवळ हसली खडकांवरूनी
झरे लागले थयथय नाचू
गरम भज्यांसह चहा भुरकूनी
आपण फिल्मी मासिक वाचू
आषाढाच्या पहिल्या दिवशी
जलधारांना कशास भेटा ?
खरे सांगू का ? कवितेतच तो निसर्ग
सुंदर दिसतो बेटा
Friday, April 18, 2025
मिले सुर मेरा तुम्हारा
"मिले सुर मेरा तुम्हारा ssssss" या अजरामर गाण्याचं बाळंतपण
"मिले सूर मेरा तुम्हारा ssssss" हे गाणे माहीत नाही असा एकही भारतीय नसेल. इतकं हे गाणं सगळ्यांच्या हृदयात वसलेलं आहे. हे गाणे जितके श्रवणीय तितकीच त्याच्या निर्मितीची कहाणी देखील अद्भुत आहे.
झालं असं की, पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या मनात एक विचार आला की, तरुणांना विशेषतः लहान मुलांना प्रेरित करणारे आणि एकतेचा संदेश देणारे एखादं गाणे तयार करून ते दूरदर्शनवरून सर्वत्र पोचवावे. ज्यातून "मेरा भारत महान" ही संकल्पना तर सर्वत्र जाईलच शिवाय प्रत्येकाला यात आपला प्रांत सामावून घेईल. त्यांच्या इच्छेनुसार मग एक प्रस्ताव तयार करण्यात आला आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याकडे हे गाणे कंपोज करण्यासाठी आले.
संपूर्ण फिल्म इंडस्ट्री एकत्र आली. या एकूणच गाण्याची व ते कसे कसे आणि कुठे कुठं शूट करायचे, यात कुणाकुणाला घ्यायचे इत्यादींची संकल्पना सुरेश मलिक आणि प्रसिद्ध ऍड फिल्ममेकर कैलाश सुरेंद्रनाथ यांची आहे. विशेषतः यातील सिनेकलाकार यांच्या तारखा मिळवताना त्रास होईल असा या जोडगोळीचा अंदाज होता मात्र एकूण एक कलाकारांनी अगदी हव्या त्या तारखा यांना दिल्या त्यामुळे जवळपास पूर्ण फिल्म इंडस्ट्री यात दिसते.
विश्वविक्रमी गाणे - १५ ऑगस्ट १९८८ रोजी दूरदर्शनवरून हे गाणे प्रथमच रिलीज करण्यात आले. याचे संगीतकार अशोक पत्की. भैरवी रागातील या गाण्याचे गीतकार होते प्रसिद्ध कवी पियूष पांडे. भारतातील प्रमुख अशा चौदा भाषेत प्रथमच असं हे गाणं तयार झालं असून तोही एक विश्वविक्रम आहे. हिंदी, काश्मीरी, पंजाबी, सिंधी, उर्दू, तामिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम, बांगला, आसामी, उडिया, गुजराती आणि मराठी भाषेत दोन दोन ओळी रचल्या गेल्यात.
लता दीदीची एन्ट्री - खरं तर सुरुवातीला यातील गायिकेच्या आवाजातील सर्व ओळी भारतरत्न लता मंगेशकर गाणार असं ठरलं होत. मात्र जेव्हा गाणे रेकॉर्डिंग करण्यासाठी स्टुडिओ बुक करण्यात आला, तेव्हा नेमक्या लतादीदी परदेशात होत्या. त्यामुळे मग कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात ते गाणे सुरुवातीला रेकॉर्ड करण्यात आले. मात्र गाणे रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी लता दीदी भारतात परतल्या. त्यांना हे गाणे रेकॉर्ड झाल्याचे कळले. त्यांनी स्टुडिओत जाऊन ते गाणे ऐकले आणि म्हणाल्या, "पंडितजी.... मला ही संधी सोडायची नाहीय. काहीतरी जुळवून आणा. मी आजच रेकॉर्डिंगसाठी वेळ देते."
आता पंचाईत झाली. कारण त्यामुळे कविताजीचे नाव आणि गायन वगळून तिथं दीदीचे बसवायचे.... कविताजी नाराज झाल्या खऱ्या पण मन मोठं करून त्यांनी यासाठी आनंदाने होकार दिला. याबद्दल दीदी इतक्या ज्येष्ठ असूनही त्यांनी कविताजी यांचे आभार मानले आणि मग लतादीदी तिरंगी ध्वज रंगाचा पदर असलेली पांढरी साडी परिधान करून स्टुडिओत आल्या आणि त्यांच्या स्वरात हे गाणे रेकॉर्ड झाले. मात्र परस्पर सामंजस्याने नंतर असं ठरलं की कविताजी यांनीही मेहनत घेतलेली आहे तर किमान एक दोन ओळी त्यांच्या पण असू द्यात ! त्याप्रमाणे मग गाण्यात शबाना आझमीच्या तोंडी असलेल्या ओळी या कविता यांच्या आहेत तशाच ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.
प्रसिद्ध धबधबा - या गाण्यात सुरुवातीला पं. भीमसेनजी ज्या धबधब्याजवळ उभे राहून गाणे गाताना दिसतात तो कोडईकनाल पम्बर फॉल्स आहे ! हाच तो धबधबा आहे जिथं लिरील साबणाची त्या काळात सुपर हिट झालेली जाहिरात शूट करण्यात आली होती. त्यामुळे त्याला नंतर "लिरिल फॉल्स" असेच नाव पडले !
ताजमहाल शूटिंग किस्सा - या गाण्यातील एका कडव्यात ताजमहाल दिसतोय जो एरियल व्ह्यू स्टाईलने शूट करण्यात आला आहे. खरेतर वर्ल्ड हेरिटेज जाहीर झालेल्या वास्तूच्या भोवती असं एरियल शूट करण्याची परवानगी नसते. मात्र कैलाशजी याना तसेच शूट हवे होते मग प्रॉडक्शन टीमसह भीमेसनजी यांनी थेट एयर मार्शल यांची भेट घेऊन इच्छा सांगितली. शिवाय हा प्रोजेक्ट खुद्द पंतप्रधान यांच्या मनातला आहे हेही सांगितलं आणि त्यानंतर परमिशन मिळाली. इतकंच नव्हे तर भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरमधून ते एरियल व्ह्यू शूट घेण्यात आलं.
गाण्यातील एका कडव्यात पाण्यात हत्ती खेळताना दिसतात, ते शूटिंग केरळ येथील पेरियार नॅशनल पार्कमधील असून हत्तीही तिथलेच आहेत. यासाठीही वन विभागाने तातडीने हालचाल करून सर्व त्या परवानग्या दिल्या. नाहीतर अशा रिझर्व्ह पार्क मध्ये शूटिंगला परवानगी नसते.
दोन महत्वाच्या रेल्वे - या गाण्यात दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या रेल्वे दिसतात. त्या दोन्ही पूर्ण देशभरात प्रसिद्ध अशा रेल्वे आहेत. पहिली आहे ती कलकत्याची मेट्रो रेल्वे आणि दुसरी आहे आपल्या महाराष्ट्राची शान असलेली डेक्कन क्वीन ! तनुजा जेव्हा मराठी ओळी गाताना दिसतात त्यावेळी ही रेल्वे येते ! आहे नं अभिमानाची गोष्ट !
कोरस मंडळींचा मोठेपणा - या गाण्यात सर्वात शेवटी भारताच्या नकाशाच्या आकारात अनेक माणसे उभी असलेली दिसतात न ते सगळं शूटिंग मुंबईच्या फिल्मसिटीत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा कोरस शॉटसाठी माणसे पुरवणारी एजन्सी असते त्यांनी नेहमीप्रमाणे पैसे ठरवून माणसे बोलावली. शूटिंग झालं आणि शूट झाल्यावर लोकांना कळलं की ते किती मोठ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहेत आणि देशासाठीचे हे गीत आहे म्हटल्यावर त्यातल्या एकानेही एक रुपयाही मानधन घेतलं नाही. तसेच यातील एका ओळीत शाळेतील लहान मुले तिरंगी गणवेशात एकत्र धावत येतात त्याचे शूटिंग उटी येथील बोर्डिंग स्कूल मध्ये झाले आहे.
स्वतःचे कपडे वापरणारे कलाकार - गाण्यात एका सीनमध्ये अमिताभ, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती आहेत. या तिघांचे शूटिंग भल्या सकाळी एका बंगल्याच्या खाजगी बागेत करण्यात आले आणि अवघ्या दहा मिनिटात तो सीन वन टेक शूट झाला. विशेष म्हणजे यात त्यांच्या अंगावर जे कपडे आहेत ते त्यांचे त्यांचे स्वतःचे आहेत. अन्यथा इतरवेळी शूटिंगवाल्याकडून कपडे पुरवले जातात. ज्याला बऱ्यापैकी खर्च येतो मात्र या तिघांनी त्याला नम्र नकार देऊन स्वतःचे कपडे आणले होते.
कमल हसन यांची ऐनवेळी एंट्री - दाक्षिणात्य प्रसिद्ध गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे या गाण्यातील दोन ओळीचे रेकॉर्डिंग होते. त्यावेळी स्टुडिओत अचानक कमल हसन आले. ते कसे काय आले इथं ? असं विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, "माझे गुरु आहेत बालमुरलीकृष्ण.... त्यामुळे त्यांचे गाणे रेकॉर्ड होताना पाहावे म्हणून आलोय". यावर कैलाशजी म्हणाले की, "संध्याकाळी या ओळीचे शूटिंग आहे समुद्र किनारी तर वेळ असेल तर या की तिथेही" आणि कमल हसन तिथं नंतर पोचले आणि चक्क त्यांनाच शूटिंग मध्ये सहभागी करून घेण्यात आले आणि अशारितीने ऐनवेळी त्यांची एंट्री यात झाली.
जगाच्या पाठीवर प्रथमच असे काहीतरी - एकतेचा संदेश देणाऱ्या या गाण्यात जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी दिसतात. जगाच्या पाठीवर प्रथमच एका गाण्यासाठी हे घडलं आहे. फिल्म लाईन, क्रीडा, गायक, वादक, चित्रकार, कार्टूनिस्ट, फिल्म निर्माता, आर्किटेक्ट, टेलिव्हिजन होस्ट असं सगळं सुंदर मिश्रण यात जुळून आले आहे. एखाद गाणं इतकं अजरामर का होतं.... त्या मागे किती काय काय घडत असत अन कितीजणांचे कष्ट असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसतं. ते माहीत असावं म्हणून हा पोस्ट प्रपंच ! 🙏🙏
थोडक्यात सांगायच तर....
असं गाणं पुन्हा होणे नाही !!
अवश्य वाचा एका अजरामर गाण्याची जन्मकथा अर्थात बाळंतपण !
Saturday, March 22, 2025
मंत्रपुष्पांजली
*मंत्र पुष्पांजली बद्दल थोडंसं -*
*भारतीय इतिहासात अयोध्येचा एक राजा खणिनेत्र होऊन गेला. हा राजा प्रजेवर अत्याचार करत असे , म्हणून एक दिवस प्रजेने राजाला राजपदावरून बेदखल केलं.*
*राजाची हकालपट्टी करणारी प्रजा हे एक विलक्षण उदाहरण इथे सापडतं.*
*खणिनेत्राला पायउतार करून त्याचा मुलगा खाणिनेत्राला राजा बनवले व सुयोग्य कारभार करण्यासाठी अनेक अटी प्रजेनी घालून दिल्या. वडिलांनी शेजारी राज्यांशी शत्रुत्व पत्करल्यामुळे खाणिनेत्राला वारंवार आक्रमणांच्या संकटाला तोंड द्यावे लागले. पण प्रजेच्या भक्कम पाठिंब्याने तो विजयी झाला आणि त्याने चांगले राज्य केले.*
*या खाणिनेत्राचा मुलगा आविक्षित प्रजाहित रक्षक राजा होता. या आविक्षिताचा मुलगा मरुत्त.*
*“आविक्षितस्य कामप्रे” —- मधला हा आविक्षित*
*“मरुत्तस्यावसनगृहे” —- मधला हा मरुत्त*
*हा मरुत्त चक्रवर्ती राजा झाला. त्याच्या गौरवासाठी रचली गेलेली ही मंत्रपुष्पांजली होय.*
*भारतात अनेक चक्रवर्ती राजे झाले मग या मरुत्ताचं वैशिष्टय काय ?*
*त्यानी प्रजेसाठी खूप अडचणींना तोंड देत एक मोठ्ठ यज्ञ केला.*
*यज्ञ म्हणजे अनेकांच्या भल्यासाठी केलेलं प्रोजेक्ट.*
*यज्ञकुंड , समिधा, धूर , मंत्रोच्चार ही कर्मकांडाची अर्थहीन प्रतीकं फक्त आता उरली आहेत, आणि मूळ यज्ञ संकल्पना लोप पावली आहे हा खेदाचा विषय आहे.*
*यज्ञ म्हणजे असं मोठं कर्म ज्यात अनेक लोकांचा सहयोग घेऊन एक टीम बनते. या टीम मधले सहयोगी हे विविध विषयांचे जाणकार,तज्ञ,कामगार असतात त्यांना “ऋत्विक” म्हणतात. या टीमच्या लीडरला “होता” म्हणतात. हे सगळे मिळून एकत्र येऊन प्रजेच्या कल्याणासाठी यज्ञ म्हणजे प्रोजेक्ट करतात. जसे नदीवर बांध घालणे, तळी खणणे,डोंगरावर झाडी लावणे , जलाशय स्वच्छ करणे, अनाचारी दुष्ट चोरांवर वचक बसवणे, औषधोपचार करणे , शिक्षण देणे, अन्न धान्याची सोय करणे इत्यादि अनेक यज्ञाची स्वरूपं आहेत. यज्ञ करणे म्हणजे सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या भल्यासाठी मोठं काम करणे.*
*यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म ! अर्थात यज्ञ हे महानतम कर्म आहे.*
*तर मरुत्त राजानी प्रजेला दुष्काळापासून वाचवण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घ्यायचं ठरवलं. पण मरुत्त राजाची कीर्ति यामुळे अधिकच पसरेल अशी ईर्ष्या उत्पन्न झाल्याने त्याकाळातील अनेक प्रबळ आणि संसाधन पुरवणा-या गटांनी( इंद्र आदि देवांनी ) मरुत्ताला विरोध केला. मरुत्ताचे सल्लागार असलेल्या बृहस्पतिलाही त्यांनी ह्या यज्ञात सहयोग देण्यापासून परावृत्त केले. यामुळे खचलेल्या मरुत्त राजाला समवर्त नावाच्या बृहस्पतीच्या दुर्लक्षित भावानी consultancy ( सल्ला , मंत्रणा) द्यायचं मान्य केलं.*
*समवर्तासोबत मरुत्त राजानी प्रकल्प पुढे नेला. एवढेच नव्हे तर नंतर हळु हळु मरुत्ताने सर्व विरोधक गटांना आमंत्रित करून , त्यांचं मन वळवून यज्ञात सहभागी करून घेतलं आणि यज्ञ यशस्वी केला.*
*यामुळे “मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसनगृहे” - अर्थात मरुत देव मरुत्त राजाच्या घरी अन्न देऊ लागले म्हणजेच मरुत्ताचे राज्य पर्जन्याने/योग्य पाऊस पाण्याने अन्नधान्यानी समृद्ध झाले.*
*अशाप्रकारे “ यज्ञेन....” यज्ञाद्वारे मोठ्ठी कार्य सार्थकी लावता येतात ही पूर्वापार परंपरा आहे. या परंपरेप्रमाणे सर्वांना सहभागी करत, अडचणीत मार्ग शोधत, न खचता लोककल्याण कारी प्रकल्प पूर्ण केल्याने संपन्नता ( कुबेर म्हणजे संसाधन विपुलता) राहील आणि संपूर्ण पृथ्वीवर सार्वभौम प्रजाहितकारी राज्य पसरेल.*
*असा हा मंत्र पुष्पांजली चा इतिहास आणि आशय आहे. एकत्र येऊन सर्व कल्याणासाठी यज्ञ करा हा सुख संपन्न समाज, देश आणि विश्व बनवण्याचा परंपरा प्राप्त मार्ग वारंवार मनावर बिंबवण्यासाठी ही मंत्र पुष्पांजली आहे.*
*मंत्रपुष्पांजली हे प्राचीन राष्ट्रगीत मानतात.*
*मंत्रपुष्पांजली शिवाय पूजेची सांगता होत नाही.*
*असा हा मंत्र खाली दिलाय स्पष्ट उच्चार करण्यासाठी.*🙏🙏
*प्रथम:*
*ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन्।*
*ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:||*
*द्वितीय:*
*ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।*
*नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।*
*स मे कामान् काम कामाय मह्यं।*
*कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय। महाराजाय नम:।*
*तृतीय:*
*ॐ स्वस्ति, साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं*
*वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं ।*
*समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् ।*
*पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकराळ इति ॥*
*चतुर्थ:*
*ॐ तदप्येषः श्लोकोभिगीतो।*
*मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे।*
*आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥*
*॥ मंत्रपुष्पांजली समर्पयामि ॥*
🙏🍁🙏
Wednesday, February 19, 2025
नासदीय सूत्र अर्थ
नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो
नो व्योमा परो यत् । किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद् गहनं गभीरम् ॥ १॥
• तेव्हा शून्यही नव्हते, अस्तित्वही नव्हते, तेव्हा हवा नव्हती, त्यापलीकडे
आकाशही नव्हते. ते कशाने झाकले गेले होते? ते
कुठे होते? तेव्हा वैश्विक पाणी कोणाच्या
आश्रयाने होते, ते किती अथांग, किती खोलवर होते?
न मृत्युरासीदमृतं न तर्हि न
रात्र्या अह्न आसीत् प्रकेतः । आनीदवातं स्वधया तदेकं तस्माद्धान्यन्न परः किं
चनास ॥२॥
•तेव्हा मृत्यू नव्हता, अमरत्व नव्हते किंवा रात्र-दिवसाचे चक्र नव्हते. त्याने हवाविरहित आणि स्वयंप्रेरणेने श्वास घेतला. तेव्हा तो एकमेव अस्तित्वात होता, आणि दुसरे कोणीही नव्हते (केवळ ब्रह्म होते ) .
तम आसीत् तमसा गूळ्हमग्रे प्रकेतं
सलिलं सर्वमा इदम् । तुच्छ्येनाभ्वपिहितं यदासीत् तपसस्तन् महिनाजायतैकम् ॥३॥
•आधी फक्त अंधारात लपेटलेला अंधार
होता. (अंधाराच्या अंत लपलेले पाणी होते (अथांग पाण्याचा महासागरही अस्तित्वात नव्हता). तो यातूनच अस्तित्वात आला, पण तो मुक्त होता. तो शेवटी अग्नीच्या सामर्थ्याने जन्माला आला
कामस्तदग्रे समवर्तताधि मनसो रेतः
प्रथमं यदासीत् । सतो बन्धुमसति निरविन्दन् हृदि प्रतीष्या कवयो मनीषा ॥४॥
•सुरुवातीला तो इच्छेतून जन्माला. ते मनापासून जन्मलेले आदिम बीज होते. ज्या ऋषींनी आपल्या अंतःकरणाचा शहाणपणाने शोध घेतला आहे ते जाणतात की त्यांचे खरे नाते कोणाशी आहे आणि कोणाशी नाही (ब्रह्म आणि माया यातील भेद ते ओळखतात) .
तिरश्चीनो विततो रश्मिरेषामधः स्वि
दासीदुपरि स्वि दासीत् । रेतोधा आसन् महिमान आसन् स्वधा अवस्तात् प्रयतिः परस्तात्
॥५॥
•त्यांनी (ऋषींनी ) आपले अस्तित्व शून्यात विलीन केले आहे, वर काय आहे आणि खाली काय आहे हे त्यांना माहीत आहे. मुख्य शक्तीने (ब्रह्माने) बलाढ्य शक्तींची निर्मिती केली. मुलत: एक शक्ती होती आणि तिच्यावर आवेग स्वार होता.
को अद्धा वेद क इह प्र वोचत् कुत
आजाता कुत इयं विसृष्टिः । अर्वाग् देवा अस्य विसर्जनेनाथा को वेद यत आबभूव ॥६॥
•पण, शेवटी, हे विश्व कोठून आले आणि निर्मिती कशी
झाली हे कोणाला माहीत आहे काय, कोण सांगू शकेल? देव स्वतः विश्वाच्या निर्मितीनंतरचे आहेत, मग तहे विश्व कोठून उद्भवले हे कोणाला माहित आहे?
इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे
यदि वा न । यो अस्याध्यक्षः परमे व्योमन् सो अङ्ग वेद यदि वा न वेद ॥७॥
सर्व सृष्टीची उत्पत्ती कोठून झाली, त्याने ती घडवली की नाही - तो, जो सर्व उंच स्वर्गातून सर्व पाहतो, त्याला माहित असेल - किंवा कदाचित त्यालाही माहित नसेल.