Friday, March 23, 2018

आम्ही हिमवादळात सापडतो...भाग २

Image may contain: 7 people, outdoor
बियास कुंड : मागे बियास नदीचा उगम दिसतो आहे.
मागील लेखात वर्णन केल्याप्रमाणे राष्ट्र सेवादल ठाणे तर्फे आम्ही काढलेल्या हिमालयन ट्रेकमध्ये आम्ही हिमवादळात सापडलो होतो. तंबूचा वरचा काही भाग फाटून त्यातून वाऱ्यास जाण्यास वाट मिळाल्याने आता तंबू उडून जाण्याची भीती राहिली नव्हती. पण सतत होत असलेल्या हिमवर्षावामुळे तंबूतून बाहेर जाण्याची सोय नव्हती. आमचे तीन तंबू होते, शिवाय स्वयंपाक्याचा वेगळा तंबू होता. त्यामुळे जेवणासाठी तंबूच्या बाहेर पडणे आवश्यक होते. तसेच प्रातार्विधींसाठी बाहेर पडणे गरजेचे होते.
त्यातच आणखी एक गोष्ट होती. हिमवर्षावामुळे उंचावरील प्राणी खालच्या बाजूस आले होते. त्यामुळे प्रातर्विधींसाठी जाताना हे प्राणी हल्ला करतील अशी भीती होती. बसलेल्या माणसावर हे प्राणी बसलेला माणूस छोटा प्राणीच आहे असे समजून हल्ला करतात. त्यामुळे निसर्गाच्या हाकेसाठी जाताना सोबत कोणीतरी घेऊन जाणे गरजेचे होते.
आमचा स्वयंपाकी तशाही परिस्थितीत रोज डोंगरावर जाऊन तेथील भाज्या खुडून आणीत असे आणि आमच्यासाठी शिजवीत असे. (या ट्रेकमध्ये हिमालयात मिळणाऱ्या भाज्याच रोज आणून शिजवीत असे. भाज्या बरोबर नेणे शक्य नव्हते).
Image may contain: one or more people and outdoor
खळखळती बियास लाकडाच्या ओंडक्याच्या सहाय्याने पार करताना. पाय घसरल्यास जलसमाधी.
अशा या हिमवर्षावात चार दिवस गेले. मात्र आम्ही कोणीच चिंताग्रस्त झालो नव्हतो अथवा घाबरलोही नव्हतो. त्या काळी मोबाईल नव्हते. त्यामुळे घराच्या कोणालाही आमच्या परिस्थितीचा पत्ता नव्हता. त्यामुळे तेही निवांत होते. आमच्याकडे असलेल्या एकमेव रेडीओवर बातम्या ऐकणे हाच उर्वरित जगाशी संपर्क. पत्ते खेळणे, गप्पा मारणे आणि सेवादलाची गाणी म्हणणे हाच या काळातील उद्योग होता. चार दिवसांनी हिमवर्षाव थांबला आणि आम्ही पुढील प्रवासास निघालो. या चार दिवसातील पहिल्याच रात्री आम्हाला एक चित्तथरारक अनुभव आला. पुढील लेखात त्याविषयी.
Image may contain: one or more people and outdoor
आमचे तंबू
Image may contain: outdoor and nature
हिमनदी

No comments:

Post a Comment