Friday, March 16, 2018

आदिरहस्य

स्टीफन हॉकिन्ग याना माझी कवितेतून श्रद्धांजली. कवी आहेत वसंत बापट.

कविता थोडी मोठी आहे, पण आशयपूर्ण आहे. शेवट तर सुंदरच आहे.

------------------------------------------------------

आदिरहस्य

आज विश्वरचनेची पाहून घेतली रंगीत तालीम
आदिरहस्याने दिले मला एकवार दर्शन
निराकारा आकार देते तेजाबाचे तेज जालीम
पोलादाचे पंख छाटीत चालू होते वज्र घर्षण
लाल जीभा, लाल जटा, अग्निदेव अप्रमेय
आकाश भरून वारा फुंकील एवढा मोठा वीजविंझण
कितीतरी योनींमधून परिभ्रष्ट कार्तिकेय
अगदी तसे ज्योतीर्मुख सहस्त्राश्व लोहइंजिन

विश्वाकार मेघ जसा ‘बहु स्याम’ गर्जत उठला
स्फोटायमान पोलादाचा थेट जसा निळा लोळ
सूर्यस्फटिक पेरण्यासाठी आदिमहासूर्य फुटला
तसा इथे द्रवीभूत अग्निप्राय लोहगोळ
अहा अहा ! पहा तरी निळे निळे शुक्र शंभर
तेज:पुच्छ धूमकेतू ! एवढ्या उल्का कोण मोजील ?
स्वयंचलित विश्वमाला, नवनिर्मित अमित अंबर...
कोण यांच्या ऋचा रचील ? कोण नवे यज्ञ योजील ?

अणुप्राणित अणुरेणू जेव्हा नानाकार झाले
थेट अशीच घडामोड तेव्हादेखील घडली होती
अमिबा ते दिनासुर एका क्षणात जुळून गेले
यदृच्छेने चैतन्याची गाठभेट पडली होती...
कुणास ठाऊक पुढे काय ? एक दिवस असा येईल,
तथाकथित जडाकार करू लागतील चलनवलन
आम्ही धक्का दिला ज्याला तेच चाक कुठे नेईल?
कुणास ठाऊक! उत्क्रांतीचे हेच असेल नवे स्फुरण !

पहा इथे, भूमिमधून ताठ मान वर करून
विद्युन्मंत्र देत घेत एक मिनार उंच उभा
नसानसांत इथरवाणे पेट्रोलियम भरभरून
सूर्यचुंबी पतंगाची धडक बसते नव्या नभा
स्वाहाकार किती होवो, एक तिथी अशी येईल
यज्ञकुंड भूकभूक तेव्हा देखील करीत असेल
उरले सुरले जुने जग...त्याची शेषाहुती होईल
कृतार्थ खापरपणतू समाधानाने हसेल

का नाही हसू त्याने? त्याच्यासाठी कोण बांधील
अदृश्य किरणांचा सूर्यापर्यंत गगनझुला
त्याच्यावरून जाईल त्याची मनोवेग अॅटममोबिल
प्रियेसाठी घेऊन येईल मंगळावरील लाल फुलां
त्याची मुले करीत बसतील गणित एक पार नवे....
...प्लुटोपासून पृथ्वीपर्यंत सूर्य दिसला हजार वेळा
तर सेकंदाला वेगमान काय हवे?
...त्यातले एक पोर म्हणेल, हे गणित की पोरखेळ?

त्याच विराट विश्वाचा हा इथे आहे मूळ वाफा
पहा तरी पोलादाची निळी निळी बागशाही...
जागोजाग आगफुले, रातंदीस उभा ताफा
गुलछडीहून वेल्डिंगवेली कमी शोभिवंत नाही
भुईवरती बकुळफुले इवले त्यांचे दंतुर दात
नटमोगरे ढाळत आहेत पोलादाचे नाजूक पराग
चिमण्या-देठावरती उले केशरी कमळ आभाळात
लोखंडाच्या चाफ्यावाराती मिणमिणणारे सोनचिराग

जशी जॅकची वालीवेली उंचउंच वाढत गेली
तशी इथली परसबाग वाढणार आहे दाटदाट.
तुमच्या भ्रष्ट मंदिरांची फार दिवस गय केली
याच्यापुढे ईश्वराला जरा मिळणार नाही वाट
दुसरी खूप कामे आहेत : शीतगृहे सूर्यावर,
चंद्रावरती अणुभट्टी, शुक्रावरच्या प्रयोगशाळा..
चवथ्या सूर्यमालेकडचा रस्ता तयार झाल्यावर
पाठवायचे आहे तान्ह्या बाळां !

‘धन्य धन्य आहे यांची’, म्हणा जरा मोकळ्या स्वरात
वेगळे असले तरी तुमच्याच वंशवेलींवरचे तुरे
जाणारच आहे वाहून तुमचे सारे नव्या पुरात,
तरी देशील शाप बंद! षंढ पुटपुट आता पुरे
तुम्हीच त्यांचे बुस्टर बरे! रॉकेट गेले, आता जळा!
दिशा ठरली वेग ठरला नवे विश्व त्यांच्यासाठी
सूर्यचंद्र त्यांची कुळे, त्याना नको तुमचा मळा!
बाण काय रॉकेट काय पुन्हा येत नसते पाठी !

त्यांना नको आशीर्वाद, तरी म्हणा ‘सुखी असा’
आणि मौन धरण्यापूर्वी त्यांना आपले एवढे पुसा
...सारे चंद्र तुमचे असोत, चांदण्यात फिरणार ना?
कधी काळी दु:ख झाले, कुशीमध्ये शिरणार ना?
पहिल्या सूर्ययात्रेपूर्वी कडकडून भेटाल बापा?
यात्रिक परत येताक्षणी आई घेईलच ना पापा?
मन येईन उचंबळून पाहून बाळ गोजिरवाणे?
गणित पुढले करीत असता कधी गुणगुणाल ना गाणे?

त्यांनी नकार दिला तरी होऊ नका बापुडवाणे!
त्यांना त्यांची गती प्रिय तुम्हा जसे तुमचे गाणे
विश्वास ठेवा, एक दिवस लोहमिनारपूजा होईल
नवा सूर्य दिसताक्षणी कोणी उषासूक्त गाईल
सप्तग्रही फिरताफिरता प्रेमिकांना ओढ लागेल
नेपच्यूनकडला चंद्र पहात गुरुवरचा कवी जागेल
एकटे कोणी रहाणार नाही परार्धाव्या सूर्यावरती
‘बहु स्याम’ म्हणत म्हणत गजबजेल पुन्हा धरती.

वसंत बापट

‘सकीना’ काव्यसंग्रहातून

No comments:

Post a Comment