लेखक -निखिल बेल्लारीकर
लोकमत मधून साभार
लोकमत मधून साभार
पोर्तुगीज सत्तेचा शिरकाव झाल्यापासून, म्हणजेच साधारणपणे इ.स. १५०० नंतर भारतात सागरी सत्तेची तात्त्विक, आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या फेरमांडणी होऊ लागली. अर्थात पोर्तुगीजांअगोदरही भारतात लढाऊ नौदले होतीच. परंतु समुद्रावर फक्त आमची एकट्याचीच मालकी असून ती सर्वांनी मान्य केली पाहिजे आणि तसे न केल्यास आम्ही ती इतरांना जबरदस्तीने मान्य करायला लावू, हे भूमध्य समुद्रात प्रचलित असलेले दादागिरीचे तत्त्व पोर्तुगीजांनी भारतात प्रथम आणले आणि लगोलग त्याची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणीही सुरू केली. पोर्तुगीजांना काहीएक "फी" देऊन समुद्रात विशिष्ट मार्गावर फिरायचा परवाना अर्थात पोर्तुगीज भाषेत "कार्ताझ" घेतल्याशिवाय जहाजांना प्रवासास निघण्याची मुभा नसे. आणि पोर्तुगीज गलबतांचे कप्तान कधीही कोणत्याही जहाजांना अडवून कार्ताझ दाखवण्याची मागणी करत. कार्ताझ नसला तर त्या जहाजावरील सर्व मालमत्तेवर पोर्तुगीजांचा हक्क असे. तत्कालीन भारतातील प्रबळ सत्ता म्हणजे मुघल, आदिलशाही, कुतुबशाही, विजयनगर, इ. या भूमीकेंद्रित होत्या. त्यांची लढाऊ नौदले नव्हती. त्यामुळे जंजिऱ्याचा सिद्दी किंवा पोर्तुगीज यांच्याशी करार करून मगच त्यांची व्यापारी गलबते समुद्री प्रवासाला निघत.
ही व्यवस्था अर्थातच पोर्तुगीज सागरी सत्ता प्रबळ असेपर्यंतच त्यांच्या फायद्याची असणार हे उघड होते. हळूहळू इंग्रज, डच, इ. युरोपातील इतर सत्तांनीही भारतात प्रवेश केला तसे त्यांनीही आपापल्या वतीने तशीच व्यवस्था राबवायला सुरुवात केली. त्यामुळे जेव्हा जावळी ताब्यात घेतल्यानंतर लगेचच काही काळानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीकडील काही भाग प्रथम स्वराज्याला जोडला तेव्हा त्यांना ही कायदेशीर लुटालुटीची व्यवस्था चटकन लक्षात आली. त्याला तोंड देण्यासाठी व जंजिऱ्याच्या सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी इ.स. १६५७ साली मराठी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. अष्टप्रधानांपैकी अमात्य रामचंद्रपंत कृत आज्ञापत्र या ग्रंथात एका छोट्या परंतु अर्थगर्भ वाक्यात अखिल मराठी आरमारामागील प्रेरणेचे सार सामावले आहे - "ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र". शिवछत्रपतींनी लावलेल्या या आरमाररूपी बीजाचा पुढे पेशवेकाळात आंग्रे घराण्याच्या आधिपत्याखाली मोठा वटवृक्ष झाला. जे मराठे अगोदर पोर्तुगीज वगैरे युरोपियन सत्तांचे कार्ताझ घेत ते आता स्वत: इतरांना आपला दस्तक देऊ लागले. दस्तक नसेल तर बिनदिक्कत जहाजे ताब्यात घेऊ लागले. कैक लढायांत टोपीकरांच्या तोडीस तोड शौर्य गाजवून त्यांना हरवू लागले. इतकी वर्षे समुद्रावर जवळजवळ एकछत्री अंमल गाजवणाऱ्या युरोपियनांना ही नवीन व्यवस्था पचनी पडली नसली तरच नवल. त्यामुळेच मराठी आरमाराचे सरखेलपद निभावणाऱ्या आंग्रे घराण्याचा उल्लेख हा जुन्या पोर्तुगीज, इंग्लिश, डच व फ्रेंच साधनांत लुटारू म्हणून येतो. त्यांच्या तशा उल्लेखामागे सत्य नसून युरोपीय सत्तांची मराठी आरमारापुढची हतबलता आणि आंग्र्यांप्रतीचा द्वेष आहे. भारताच्या आरमारी व सागरी इतिहासावरची नवीन पुस्तके मात्र आंग्र्यांची योग्य ती दखल घेतात हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे.
इ.स. १७२९ मध्ये कान्होजी आंग्र्यांचा मृत्यू झाल्यानंतर काही वर्षांनी आंग्रे घराण्यात दोन तट पडले. एकाची राजधानी होती कुलाबा तर दुसऱ्याची राजधानी होती विजयदुर्ग. साधारणपणे पाहता कुलाबा शाखेपेक्षा विजयदुर्ग शाखा जास्त पराक्रमी होती. इ.स. १७४२ नंतर विजयदुर्ग शाखेचे प्रमुख तुळाजी आंग्रे यांना आरमाराचे सरखेलपद देण्यात आले. तुळाजी यांनी साधारण पंधराएक वर्षांच्या कारकीर्दीत मराठी आरमाराचा दबदबा अनेक पटीने वाढवला. इंग्रज, पोर्तुगीज, डच, इत्यादी अनेक शत्रूंना अक्षरश: चारीमुंड्या चीत केले. त्यांच्या कारकीर्दीत इ.स. १७५४ साली झालेल्या एका अज्ञात लढाईचा इथे मागोवा घ्यायचा आहे. ही लढाई डच ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांसोबत झाली.
(डच बार्कशिप) |
इसवी सनाच्या सतराव्या व अठराव्या शतकातील भारतातील एक अतिशय प्रभावी परंतु तितकीच दुर्लक्षित सत्ता म्हणजे डच. मराठेकालीन कागदपत्रांत यांचा उल्लेख वलंदेज असा येतो. Hollanders या शब्दाचा अपभ्रंश म्हणून वलंदेज हा शब्द तयार झाला. इ.स. सतराव्या शतकातील भारतात सर्वांत मोठी युरोपीय व्यापारी सत्ता ही इंग्रज किंवा पोर्तुगीजांची नसून डचांची होती. कोकणात वेंगुर्ला व बसरूर इथे डचांच्या वखारी होत्या. पुढे इ.स. अठराव्या शतकात त्या सोडून डचांनी गुजरातेत सुरत, भरुच व केरळात कोचीन वगैरे ठिकाणी लक्ष केंद्रित केले. मसाल्यासारख्या अतिशय फायदेशीर वस्तूंची पूर्ण मक्तेदारी घेऊन व्यापार करणाऱ्या डच कंपनीचा व्यापार हा इंग्लिश व फ्रेंच कंपन्या आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांच्या एकत्रित व्यापारापेक्षा पेक्षा अनेक पटीने मोठा होता. इ.स. १७२० नंतर अनेक कारणांमुळे हळूहळू ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही डच कंपनीपेक्षा वरचढ झाली. असे असले तरीही इ.स. अठराव्या शतकात डचांचे सामर्थ्य आजिबात कमी नव्हते. भारतातील पश्चिम किनाऱ्यावर सुरत, कोचीनसारखी मोठी केंद्रे, तर पूर्व किनाऱ्यावर आंध्र प्रदेश व तमिळनाडूचा पूर्ण किनारा भरून त्यांच्या वखारी होत्या. पण त्यांचा भर भारतापुरता तरी इंग्रजांच्या तुलनेत राजकारणापेक्षा व्यापारावर जास्त असल्यामुळे क्रमिक इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्यांची घ्यावी तशी दखल घेतली जात नाही.
अशा या बलशाली डच सागरी सत्तेचे आंग्र्यांशी वाजले नसते तरच नवल! कान्होजी आंग्र्यांपासून तुळाजी आंग्र्यांपर्यंत डच आणि मराठ्यांनी पाचसहा वेळेस तरी एकमेकांशी युद्ध केले. हॉलंडमधील लेडन विद्यापीठातील इतिहाससंशोधक स्टेफान बाउस्ट (Stefan Buist) यांनी या विषयावर अलीकडेच एक प्रबंधही लिहिलेला आहे. त्यावरून हे दिसून येते की यापैकी प्रत्येक वेळेस डच कंपनीला काही जहाजे तरी गमवावी लागली किंवा बाकी नुकसानही भरपूर झाले. तेव्हा सागरी युद्धात युरोपियनांच्या तुलनेत भारतीय सरसकट मागासलेले होते ही समजूत अतिशय चुकीची आहे.
ही लढाई डचांची तीन जहाजे व आंग्र्यांची छत्तीस जहाजे यांमध्ये झाली व आंग्र्यांचा विजय झाला. या आकड्यांवरून कदाचित वाटेल की इतकी जास्त जहाजे असताना आंग्रे जिंकले यात नवल काय? पण बाकी तपशील पाहिल्याशिवाय उभय पक्षांच्या ताकदीचा अंदाज येणे अशक्य आहे. डचांची तीन जहाजे विमेनम (Wimmenum), फ्रीड (Vrede) आणि याकात्रा (Jaccatra) ही होती. त्यांचे तपशील खालीलप्रमाणे.
विमेनम: जहाजप्रकार: Spiegelretourschip, भारवहनक्षमता ११५० टन, लांबी १५० फूट. एकूण खलाशी वगैरेंची संख्या ३५६ व तोफांची संख्या ३६. कॅप्टन: जॉन लुई फिलिप.
फ्रीड: जहाजप्रकार: (बहुधा) Spiegelretourschip, भारवहनक्षमता ८५० टन, लांबी १३६ फूट. एकूण खलाशी वगैरेंची संख्या ६० व तोफांची संख्या ३६. कॅप्टन: सायमन रोट.
याकात्रा: जहाजप्रकार: Bark, भारवहनक्षमता ११५० टन, लांबी ८० फूट अदमासे. एकूण खलाशी वगैरेंची संख्या अज्ञात. व तोफांची संख्या २०. कॅप्टन: अज्ञात.
आंग्र्यांच्या आरमारात काही पाल व गुराबे होती. याशिवाय काही वर्षांपूर्वी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून हस्तगत केलेले द रेस्टोरेशन नामक जहाजही होते. बहुसंख्य जहाजे ही डचांच्या तुलनेत बरीच छोट्या आकाराची होती. ही आंग्र्यांची खासियतच होती. ३००-४०० टनांपेक्षा जास्त भारवहनक्षमता असलेली जहाजे शक्यतोवर मराठी आरमारात नसत. किनाऱ्यापासून फार आत जात नसल्यामुळे शक्यतोवर लहान ते मध्यम आकाराची, उथळ पाण्यात जलदगत्या अंतर कापणारी जहाजे हे मराठ्यांचे बलस्थान होते. युरोपियनांचा तोफखाना आपल्यापेक्षा सरस आहे याची जाणीव असल्यामुळे मराठे समोरासमोर लढाई न करता शक्यतोवर मागून पाठलाग करून शिडांना जोडणाऱ्या दोरखंडांवर नेम धरून ते निकामी करीत. परिणामी शिडे तुटल्यामुळे जहाज पंगू होत असे. अशा स्तब्ध जहाजाला मग चहूबाजूंनी लहान जहाजांनी घेरून मग हातघाईची लढाई करून जहाज ताब्यात घेतले जाई. ही युद्धपद्धत अपरिचित असल्याने अनेक युरोपीय असे झाल्यावर भांबावत आणि आंग्र्यांचा विजय होई. अर्थात यालाही अनेक मर्यादा आणि अपवाद आहेत परंतु तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
(गुराब आणि पाल जहाज) |
६ जानेवारी १७५४ रोजी तीन डच जहाजे कोकण किनारपट्टीलगत असताना त्यांना आंग्र्यांचे आरमार दिसले. त्यात ९ जहाजे ही पाल या प्रकारातली तर काही गुराब व गलबत या प्रकारातली होती. दोन्ही बाजूंनी एकमेकांना पाहताक्षणी गोळागोळी सुरू झाली ती दुसऱ्या दिवशीपर्यंत. आंग्र्यांचे आरमार त्यानंतर माघारी गेले आणि थोड्या वेळात लढाई पुन्हा सुरू झाली. तुळाजी आंग्रे जातीने तिथे हजर होते. विमेनम जहाजानजीक दोन पाले आली आणि जहाजाला घेरले, तरी मराठे जहाजावर प्रवेश करू शकले नाहीत. तोफाबंदुकांच्या माऱ्यामुळे पालांनी पेट घेतला. ती पाले विमेनम जहाजाच्या इतक्या जवळ आली होती की त्यांच्या पेटलेल्या दोरखंड व शिडांमुळे विमेनमलाही आग लागली. ही आग त्या जहाजाच्या दारूगोळ्यापर्यंत पोचताक्षणी अतिशय जबर स्फोट झाला. जहाजावरचे शेकडो लोक मरण पावले. आंग्र्यांचेही अनेक लोक मेले. तरी काही काळ मराठे विमेनमजवळ गेले नाहीत, कारण त्या जहाजावरील तोफा दारुगोळ्याच्या स्फोटामुळे अजूनही आपोआप आग ओकत होत्या. काही काळाने ते थांबले. अनेक लोकांनी त्या तरंगत्या लाकडाचा आधार घेतला. त्यांपैकी अनेक लोक आंग्र्यांनी टिपून मारले आणि काही लोकांना युद्धकैदी म्हणून घेतले. जहाजाचे अनेक तुकडे झाले आणि पाण्यावर तरंगू लागले.
त्यानंतर दोन मराठी गलबतांनी याकात्रा जहाजाला घेरले, त्याच्या मुख्य डोलकाठीवर नेम धरून ती तोडली आणि जहाजावर गेले. जहाजाच्या कॅप्टनला डोक्यात गोळी घालून ठार केले. डोलकाठी व पर्यायाने जहाजाला लागलेल्या धक्क्याने याकात्रा हे जहाज फ्रीड या जहाजाला धडकले आणि त्याच्या दोरखंडांमध्ये गुंतले. याकात्रा जहाजाचा काही भाग आता बाँब इ. मुळे पाण्याखाली बुडलेला होता. एका गुराबाच्या सहाय्याने याकात्रा जहाज किनाऱ्यापर्यंत आणण्यात आले. त्यावरील खलाशांना एका छोट्या होडीतून विजयदुर्ग किल्ल्यातील तुरुंगात ठेवण्यात आले.
(डच जहाज) |
फ्रीड जहाजावरील सैनिकांनी मराठ्यांचा सर्वांत तिखट प्रतिकार केला. गोळागोळीसोबतच हातबाँबही फेकले. त्यांचा जोर इतका होता की मराठ्यांना परत फिरावे लागले. फ्रीड व याकात्रा ही जहाजे एकमेकांत गुंतलेली होती. याकात्रावरती मराठे आहेत हे पाहताच डचांनी तिकडे बाँब वगैरे फेकण्याचा सपाटा लावला. त्यामुळे याकात्रासोबतच फ्रीड जहाजाचाही स्फोट होऊन काही भाग पाण्याखाली गेला. अनेक मराठे सैनिक मरण पावले. फ्रीड जहाजाचा कॅप्टन सायमन रोट पाण्यावर तरंगत असलेला दिसला, त्याला डचांनी वर घेतले. एकुणात फ्रीड जहाजावर आता फक्त १२ लोक जिवंत उरले होते. त्या सर्वांना नंतर कैद करण्यात आले.
लढाईत जहाजांना जी इजा झाली त्यासाठी त्यांची डागडुजी करण्यात आली. याकात्रा जहाजाची मुख्य डोलकाठी पुन्हा बसवण्यात आली. याकामी विमेनम जहाजातलेच लाकूड पुन्हा वापरण्यात आले. याकात्रासारखे लहान आणि चपळ जहाज मराठ्यांच्या कामाचे होते. विमेनम वगैरेसारखी मोठी जहाजे त्यांच्या पसाऱ्यामुळे मराठे वापरत नसत. याशिवाय कैद्यांपैकी आठ सर्वोत्तम खलाशांना मराठ्यांच्या आरमारात जागाही देण्यात आली. अशी डागडुजी वगैरे करून १२ मार्च १७५४ रोजी मराठी आरमार विजयदुर्गहून नव्या मोहिमेकरिता सज्ज होऊन निघाले.
एकूण १८ युरोपियन्स आणि २४ मुसलमान खलाशी व सैनिकांना मराठ्यांनी कैद केले आणि त्यांना दारुगोळ्यासाठी गंधक इ. ची पूड करण्याच्या कामी लावले गेले. कडक पहाऱ्यात त्यांना विजयदुर्गच्या गोदीजवळच रहायला जागा दिलेली होती. त्यातला एक सैनिक कॉर्पोरल योहान आंद्रिसझोन याने तिथून निसटायची बरीच खटपट केली. विजयदुर्गाजवळ एका कोळ्यांच्या वस्तीपर्यंत तो लपत छपत एके दिवशी पोचला आणि तिथली एक होडी घेऊन पळून जाऊ लागला, परंतु ती होडी गळकी असल्याने त्याला तो बेत तिथेच सोडावा लागला. पुढे काही दिवसांनी २३ मार्च १७५४ रोजी त्याने लाकडाचे तीन ओंडके एकमेकांना बांधले आणि तसाच समुद्रात गेला. परंतु भरतीमुळे त्याला समुद्रात पुढे जाता आले नाही. तेव्हा त्याने संध्याकाळपर्यंत वाट पाहिली आणि मग निघाला. थोडे अंतर गेल्यावर तो तराफा सोडून लपत छपत पाच दिवस भीतीमुळे फक्त रात्रीच प्रवास करत आंग्र्यांच्या प्रदेशाला लागून असलेल्या कोल्हापूर छत्रपतींच्या राज्यात पोचला. तिथे त्याला जेवण इ. मिळाल्यावर मग तो थोडा सावरला आणि दीडेक महिन्याभरात एकदम दक्षिणेला तंजावरजवळ तिरुचिरापल्ली इथे पोचला. तिथे फ्रेंच लष्करातल्या पाच मराठ्यांनी त्याला अडवले आणि फ्रेंच लष्करात काम करण्याची खूप गळ घातली, जबरदस्तीही केली. परंतु तो ऐकत नाही हे पाहताच त्याला दोन दिवसांत सोडले. पुढे तो दहाएक दिवसांत तमिळनाडू येथील नागपट्टणम बंदरात पोचला. तिथे डचांची एक वखार होती. तिथे त्याने हा सगळा वृत्तांत सांगितला.
कॉर्पोरल योहान आंद्रिसझोन सोडून बाकी लोकांना नंतर मराठ्यांनी सोडून दिले. त्यांपैकी फ्रीड जहाजाचा कॅप्टन सायमन रोट आणि अन्य १८ खलाशी यांना एकूण १०,००० रुपये देण्यात आले. आंग्र्यांसोबत इतक्या जिवाच्या कराराने लढून जिवंत राहिल्याबद्दलचे हे बक्षीस होते. तत्कालीन डच कंपनीमध्ये एका कॅप्टनचा वार्षिक पगार साधारणपणे ६६६ रुपये तर एका खलाशाचा वार्षिक पगार हा साधारणपणे ४३ रुपये इतका होता. वार्षिक पगाराशी तुलना केली तर प्रत्येकाला वार्षिक पगाराच्या अनेक पट "बोनस" मिळाला हे उघड आहे! तेव्हा या वीसेक लोकांचे या लढाईमुळे अच्छे दिन आले असे म्हणायला हरकत नसावी.
या लढाईमुळे सर्वांत हाहा:कार उडाला तो बटाव्हिया व हॉलंडमध्ये. तेव्हाचे बटाव्हिया म्हणजे आत्ताच्या इंडोनेशियाची राजधानी योग्यकार्ता ऊर्फ जाकार्ता. बटाव्हिया हे डचांच्या आशिया खंडातील साम्राज्याचे केंद्र होते. या लढाईचा अहवाल बटाव्हियामध्ये पोचल्यावर तिथल्या अधिकाऱ्यांनी अतिशय आश्चर्य व्यक्त केले आणि चक्क डच कंपनीच्या जहाजांचा मार्गच बदलून टाकला! बटाव्हियाहून हॉलंडमधील कंपनीच्या संचालक मंडळाला पाठवलेल्या पत्रात या बदललेल्या मार्गांचा उल्लेख सापडतो. अगोदर किनाऱ्याजवळून असलेले मार्ग आता एकदम खुल्या समुद्रातून जातील असे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले. खालील नकाशातून ते स्पष्ट होईल. बटाव्हियाहून सुरतेला ऑगस्टमध्ये जावयास निघणाऱ्या जहाजांनी मालदीवला वळसा घालावा, तर सप्टेंबर इ. मध्ये जाणाऱ्यांनी श्रीलंका आणि तिथून खुल्या समुद्रातून सुरतेला जावे असे त्यांनी फर्मान काढले. सुरतेहून श्रीलंकेला जावयास निघणारी जहाजेच फक्त मलबार किनाऱ्यापाशी राहतील आणि तिथेही आंग्र्यांचा धोका टाळण्यासाठी किनाऱ्यापासून दूर राहतील व लंकेला न जाणारी जहाजे सरळ मालदीवमार्गे बटाव्हियाला जातील असे ते नवीन व्यापारी मार्ग होते.
हॉलंडमध्येही या लढाईची बातमी किमान १६ वेळेस तरी समकालीन वृत्तपत्रांमध्ये छापून आली. इंग्लंड व फ्रान्समधील वृत्तपत्रे आणि पुस्तकांमधूनही या लढाईचे वर्णन आलेले आहे. एकूणच आंग्रे ऊर्फ "आंग्रिया" या नावाशी युरोपचा परिचय तसा जुनाच आहे. आंग्र्यांना जुन्या साधनांमध्ये लुटारू म्हणत त्याचा परिणाम इतका झाला की पायरेट्स ऑफ करिबिअन या प्रसिद्ध चित्रपटाच्या पार्ट ३ मध्ये "सुंभाजी आंग्रिया" नामक एक "इंडियन पायरेट" दाखवलेला आहे. पण सुदैवाने नवीन संशोधनात आंग्र्यांचे खरे हुद्दे ( मराठी आरमाराचे सरखेल इ.) व कार्य अधोरेखित केले जाते त्यामुळे त्यांच्यावरचा लुटारूपणाचा शिक्का कालांतराने पूर्णपणे पुसला जाईल अशी अपेक्षा आहे.
विमेनम जहाजावरील एक खलाशी मायकेल एव्हरहार्ट याने पुढे काही वर्षांनंतर केरळातील वरकला (त्रिवेंद्रमपासून ५० किमी) येथील जनार्दनस्वामी मंदिराला एक घंटा भेट दिली. २ डिसेंबर २०१६ मध्ये तिथे जाण्याचा मला योगही आला. त्या घंटेवर त्याचे नाव इ. तपशील आहेत. दुर्दैवाने देवळात फोटो काढण्याला परवानगी नसल्यामुळे घंटेचा फोटो घेता आला नाही. अशा तऱ्हेने मराठ्यांशी संबंधित हा अवशेष केरळातील एका देवळात शिल्लक आहे.
ही लढाई हा मराठ्यांचा सर्वार्थाने विजय होता. तरी डचांनीही कडवा प्रतिकार केला. दुर्दैवाने यानंतर दोनच वर्षांत १७५६ साली तुळाजी आंग्र्यांवर अंतर्गत वैमनस्यामुळे पेशवे आणि इंग्रज या दोघांनी मिळून हल्ला केला आणि आंग्र्यांचे सागरी वर्चस्व कायमचे संपले. त्याची कारणे व परिणाम हा एक स्वतंत्र विषय आहे. इथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की मराठे खोल समुद्रात कधीही न जाता, तुलनेने मागासलेल्या युद्धपद्धती वापरूनही युरोपियन सत्तांना अनेकवेळेस भारी पडले. या लढाईच्या निमित्ताने मराठी आरमाराचे गुण आणि दोष हे सारखेच अधोरेखित होतात.
मराठे इ.स. १८ व्या शतकात भारतभर पसरले होते. जसे अगोदरच्या काळात मुघल होते तसेच. दोन्ही सत्तांची तुलना नेहमीच होत असते. पण मराठ्यांकडे एक अशी गोष्ट होती जी मुघलांकडे कधीच नव्हती - समुद्रात जाणारे लढाऊ आरमार. मुघलांचे आरमार बंगालमध्ये ब्रह्मपुत्रा इ. नद्यांमध्ये असे. समुद्रात जाण्याइतपत त्याची झेप नव्हती. युरोपियन सत्तांना हरवणे तर दूर की बात. मराठ्यांनी मात्र शिवकाळापासून अगदी १७८० पर्यंत युरोपीयांना वेळोवेळी समुद्रावर हरवलेले आहे. असे अनेकवेळेस करणारी भारतातील एकमेव सत्ता म्हणजे फक्त मराठेच होत. त्यामुळे मराठ्यांचे वेगळेपण सांगणाऱ्या ज्या ठळक बाबी आहेत त्यात आरमाराचा उल्लेख आवर्जून केलाच पाहिजे.
(लेखक मराठे- डच संबंधांवरील विषयाचे अभ्यासक आहेत.)
No comments:
Post a Comment