Sunday, May 31, 2020

पराभवाचे श्राद्ध १-- लेखक जयंत कुलकर्णी

फेसबुकवरून साभार : लेखक जयंत कुलकर्णी 

नमस्कार!

आज एक नवीन लेखमालिका सुरु करतोय. ‘‘पराभवाचे श्राद्ध‘‘

चिनने जे भारतावर आक्रमण केले त्याची ही कहाणी. नवीन पिढीला हे सांगणे आपले काम आहे. आपली नाचक्की झाली असली तरी कोणी तरी हे सांगायलाच हवे. आता परिस्थिती बदलली आहे आणि भारताने या आक्रमणापासून बरेच धडे घेतले आहेत. पण योग्य राजकारणी जर सत्तेवर नसले तर काय होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. यात वादाचे मुद्दे बरेच आहेत पण जर या लेखात काही खोटे लिहिले असेल तरच वाद होऊ शकतो नाही तर यातून शिकण्यासारखेच खूप आहे. असो..

हे याच महिन्यात लिहीले पाहिजे.

हे युद्ध संपल्यानंतर मी आमच्या शाळेत आलेल्या एका सेन्याधिकाऱ्याला विचारले होते की हा पराभव पं नेहरूंमुळे झाला का आपल्या सैन्यामुळे(ज. कौल.) झाला ? त्यांनी विचारले की तुला यातील काय माहीती आहे. मी सांगितले की मी हिमालयन ब्लंडर वाचलेले आहे. अर्थातच मला तेव्हा गप्प बसवण्यात आले. ते योग्यच होते. कारण प्रश्र्न वयाच्या दृष्टीने जरा आगाऊपणाचाच होता. पण मित्रांनो जेव्हा असा प्रसंग तुमच्यावर येईल तेव्हा तुम्ही मात्र गप्प बसू नका.

पराभवाचे श्राद्ध!

भारताच्या सैनिकी इतिहासातील सगळ्यात मोठ्या आणि अपमानास्पद पराभवाला या महिन्यात ५८ वर्षे पूर्ण होतील. हा पराभव कसा साजरा करायचा हे मला समजत नव्हते. शेवटी ही लेखमालिका लिहावी असे ठरवले.

या घटनेची आठवण म्हणून ब्रिगेडियर जॉन दळवी यांच्या “हिमालयन ब्लंडर” या पुस्तकातील काही पानांचे स्वैर भाषांतर आपल्यासमोर ठेवत आहे... ते “कडू” मानून घ्यावे. पण यात राजकीय प्रवास जास्त आहे. प्रत्यक्ष लढाई कशी झाली हे वाचायचे असेल तर बरीच पुस्तके उपलब्ध आहेत.

( लेखाची भाषा माझी आहे )

No photo description available.छायाचित्र -१

पहाटे ५ वाजता नेफामधील शांत नामका चू खोऱ्याला तोफांच्या आवाजाने जाग आली. काय होत आहे हे कोणालाच कळेना. चिनी तोफखाना धडाडला आणि मागोमाग चिनी पायदळाने आक्रमण केले. तीन तासातच त्या खोऱ्यातील लढाई संपली. संपणारच होती ती, कारण ती लढाई होती दोन अतुल्यबळ सैन्यामधली. आसामला जाणारे सर्व रस्ते आता त्यांना मोकळेच होते. या पहिल्या दणक्याचा फायदा चिन्यांनी उठवला नसता तर नवलच. त्यांनी सरळ १६० मैल भारताच्या भूमीवर मुसंडी मारली आणि २० नोव्हेंबरला ब्रह्म्पूत्रेच्या खोऱ्यात आक्रमण केले. सेला आणि बोमडिलाच्या संरक्षण व्यवस्थेच्या चिंधड्या उडवत त्यांनी काहीही विरोध न होता तवांगवर कब्जा केला. भारताचे याला उत्तर फारच केविलवाणे होते. त्या उंचीवर युद्धाचे प्रशिक्षण नसलेले, त्या उंचीवर लागणारी युद्धसामग्री नसलेले, त्या हवामानाची सवय नसलेले आणि दूर १६०० मैलावर असलेले पंजाबमधील सैन्य घाइघाईने जमा करण्यात आले आणि त्यांना राजकारण्यांनी मोठ्या आवेशाने ‘चिन्यांना सिमेबाहेर फेकून द्या’ असे आदेश दिले. खरे तर आपल्या राजकारण्यांनी हे सगळे सैन्य चिनी सैन्याच्या नरड्यात अलगद सोडून दिले असे म्हणायला हरकत नाही. कारण या सर्व हालचालीत ना ठाम योजना होती ना खोलवर संरक्षणाची तयारी होती. या चिन्यांच्या विजयाचा सगळ्यात मोठा धक्का बसला तो आपल्या राजकारण्यांना नाही, तर चिन्यांना. त्यांनी मारे मोठ्या युद्धाची तयारी ठवली होती. ३०,००० ते ५०,००० सैनिक या युद्धासाठी त्यांनी सिमेलगत तयार ठेवले होते. पूर्वचाचणी म्हणून चिन्यांनी ८ स्प्टेंबरला थागला भागात घुसखोरी करून आपल्या इच्छाशक्तीची परीक्षा घेतली होती. अर्थातच नेहमीप्रमाणे आपल्या राजकारण्यांनी सिमेवरच्या नेहमीच्या किरकोळ चकमकी म्हणुन त्याकडे दुर्लक्ष केले होते.

No photo description available.छायाचित्र २
No photo description available.छायाचित्र ३

या नेफामधील पराभवाने भारतातील जनता खडबडून जागी झाली. सत्ताधाऱ्यांना आणि संरक्षणदलाला हादरे बसले पण सगळ्यात नुकसान झाले ते भारतीय जनतेचे. जनता पराभूत मनोवृत्तीच्या गर्गेत कोसळली. त्यांचा त्यांच्या पुढाऱ्यांवरचा विश्वास उडाला. यातून बाहेर पडायला पूढे दोन युद्धे जावी लागली. (पण राजकारणाच्या दृष्टीकोनातून जनता काही शिकली आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल)

या चिनी आक्रमणाच्या अगोदर आपल्या सत्ताधाऱ्यांची ठाम कल्पना होती की चीनबरोबर युद्ध होणारच नाही. (अपवाद फक्त सरदार पटेलांचा. त्यांनी पं. नेहरूंना १९५० मधे पत्र लिहून याची स्पष्ट कल्पना दिली होती व चीनला युनोमधे सिक्युरीटी कौन्सीलमधे प्रवेश देण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहोत ते योग्य आहेत का याचा फेरविचार करायला सुचवले होते. हे पत्र आपल्याला आजही उपलब्ध आहे आणि ब्रि. दळवींच्या पुस्तकातही दिले आहे.) हिंदी-चीनी भाई भाई चा नारा जगप्रसिद्ध होता आणि जे काही किरकोळ मतभेद होते ते टिबेटच्या निर्जन भागाच्या ताब्याबद्दल होते. (ज्या ठिकाणी गवताचे पातेही उगवत नाही त्याबद्दल फार विचार करायची आपली तयारी नव्हती) या किरकोळ मतभेदांमुळे सिमेवर काही चकमकी उडतील पण सर्वंकश युद्ध ? छे ! ते शक्यच नव्हते. असा गोड समज आपला झाला होता.

या आक्रमणाने भारताला धक्का बसला आणि त्यातून ते कधीच बाहेर आले नाहीत. (अर्थात आता असे म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण आपण आता या धक्क्यातून पूर्ण सावरलेलो आहोत आणि धक्का देण्याची ताकद ठेऊन आहोत) हा धक्का राजकीय पातळीवर, युद्धनितीच्या पातळीवर, आंतरराष्टीय राजकारणाच्या पतळीवरही तेवढाच जबरी होता. हिमालयाच्या या दुर्गम भागात, त्या थंडीत, आणि उंचीवर आपली ना युद्धाची तयारी होती. ना आमची मानसिक तयारी होती ना शारीरिक. गाफीलपणाची ही हद्द होती. आमची हिमालयात युद्ध लढण्याची तयारीच नव्हती. या आक्रमणाला आमचे उत्तर गोंधळाचे व भावनीक होते.

तेव्हाचे आपले राष्ट्रपती श्री. राधाकृष्णन म्हणाले “ आम्ही (आपले पंतप्रधान, राजदूत, मंत्री इ.) दुधखूळे आहोत आणि निष्काळजी राहीलो हेच खरे”........ भारताच्या सर्वोच्चस्थानावर बसलेल्या या माणसाची ही कबूली सगळे काही सांगून जाते.

आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान पं नेहरू यांनी या आक्रमणाचे विश्लेषण “चीनने आमच्या पाठीत सुरा खूपसला” असे केले. पण शत्रूच्या समोर आपली पाठ करायची नसते हे ते सोयीस्कररित्या विसरले होते. आपल्या आकाशवाणीवरच्या भाषणात ते म्हणाले,

“ मला सांगायला दु:ख होते आहे की आमच्या सैन्याला सिमेवर माघार घ्यावी लागली आहे. चीनी सैन्याची प्रचंड संख्या, तोफखाना, आणि चिनी सैन्याने बरोबर आणलेली अवजड युद्ध सामग्री याच्यापुढे त्यांनी टिकाव धरला नाही.”

ही धाडसी पण खेदजनक कबूली आपल्या देशाच्या सर्वोच्च अधिकारावर असलेल्या व्यक्तीला द्यावी लागली यासारखी दु:खद घटना ती काय.......

त्या वेळचे संरक्षणमंत्री त्यांच्या भाषणात म्हणाले,

“चीनी सैन्य हे आपल्या सैन्यापेक्षा सर्वच बाबतीत वरचढ होते. संख्याबल आणि दारूगोळा यात आपल्यापेक्षा ते फारच सरस होते. आमच्या जुनाट शस्त्रे व कमी संख्या असलेल्या सैन्यदलाला त्यांनी सहज हरवले”.

आपल्या देशाचे संरक्षण व संरक्षणदल ही या माणसाची जबाबदारी होती.

या पराभवाचे खरे कारण हे होते की सत्ताधाऱ्यांना चीनशी युद्ध करावे लागेल असे स्वप्नातही आले नव्हते. या स्वप्नरंजनातच या पराभवाची कारणे दडलेली आहेत...

क्रमश:.....
जयंत कुलकर्णी.

No comments:

Post a Comment