Wednesday, September 8, 2021

गुरु


तो धिटाईने वृद्ध गुरुसमोर उभा होता. गुरु त्यांच्या अनुभवी नजरेने त्याचे निरीक्षण करत होते.
कोवळं वय. असेल साधारण नऊ दहा वर्षाचा. त्याला डावा हातच नव्हता. एका अपघाताने तो हिरावून घेतला होता म्हणे.
" तुला माझ्या कडून काय हवे आहे ???" गुरूने त्या मुलाला विचारले.
"सर, मला तुमच्या कडून ज्युडो-कराटेची विद्या शिकायची आहे !!!"
शरीराला एक हातच नाही आणि ज्युडो शिकायचं आहे ??? अजब मुलगा दिसतोय.
"कशाला ???"
"शाळेत मला मुलं त्रास देतात. थोटक्या म्हणून चिडवतात. मोठी माणसं नको तितकी कीव करतात. मला त्यांच्या या वागण्याचा त्रास होतो !! मला माझ्या हिमतीवर जगायचंय !! कोणाची दया नको. हात नसताना मला माझं रक्षण करता आलं पाहिजे !!"
"ठीक आहे !! पण मी आता तो 'शिक्षण' देणारा गुरु राहिलो नाही. मी आता वृद्ध झालोय आणि आत्मचिंतनात मग्न असतो. तुला माझ्या कडे कोणी पाठवलं ???"
"सर, मला एक हात नसल्याने खूप जणांनी त्यांचा 'विद्यार्थी' म्हणून नाकारलं. त्यातल्याच एकाने तुमचे नाव सांगितले. 'तुला फक्त तेच शिकवू शकतील. कारण त्यांना खूप वेळ असतो आणि त्यांच्याकडे एकही विद्यार्थी नाही !!' असे ते म्हणाले होते."
'तो उन्मत्त 'शिक्षक' कोण हे गुरूंनी तात्काळ ओळखले. अशा अहंकारी माणसांमुळेच ही विद्या गुंड प्रवृत्तीच्या हाती गेली. याचे त्यांना नेहमीच वाईट वाटे.
"ठीक आहे, आज पासून तुला मी माझा 'शिष्य' करून घेत आहे. या शिष्यत्वाचे नियम तुला आज पहिल्यांदा आणि शेवटचे सांगतो. लक्षात ठेव, *आपल्या गुरूवर पूर्ण विश्वास ठेवायचा*. मी माझ्या लहरी प्रमाणे शिकवीन ते शिकून घ्यायचे. ज्युडो-कराटे ही खूप घातक विद्या आहे. तिच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो !! म्हणून ही विद्या फक्त आत्मरक्षणासाठीच वापरायची. नेहमी नम्र रहायचे. समजले ???"
"हो सर. समजले. मी आपल्या या आज्ञांचे पालन करीन." मुलाने गुरूच्या पायावर डोके ठेवले. आणि आपल्या एकुलत्या एक शिष्याच्या शिक्षणास त्यांनी आरंभ केला.
एकच डाव गुरूंनी त्याला शिकवला आणि तोच ते त्याच्याकडून करून घेऊ लागले. सहा महिने हेच चालू राहिले. एक दिवशी मुलाने गुरूचा चांगला मूड बघून हळूच विषय काढला.
"सर, सहा महिने झालेत. एकच मूव्ह तुम्ही माझ्या कडून करून घेत आहात. नवीन डाव असतीलच ना ???"
"आहेत! अनंत डाव आहेत !! ते आत्मसात करायला, तुला तुझं आयुष्य कमी पडेल !! पण तुला मी शिकवतो आहे त्याचीच गरज आहे. आणि इतकेच तुझ्या साठी पुरेसे पण आहे !!"
गुरुवचनावर विश्वास ठेवून तो शिकत राहिला.
बरेच दिवसानंतर ज्युडोचे टुर्नामेंटस जाहीर झाले. गुरूंनी आपला एकमेव शिष्य यात उतरवला. पहिले दोन सामने त्या शिष्याने सहज जिंकले !!
पहाणारे आश्चर्यचकित झाले. एक हात नसलेला मुलगा जिंकलाच कसा ??? कोण गुरु असावा ??
तिसरा सामना थोडासा कठीण होता, पण त्या मुलाच्या सफाईदार आणि वेगवान हालचालींनी तो सामना सुद्धा त्यानेच जिंकला !!
आता त्या मुलाचा आत्मविश्वास बळावला. आपणही जिंकू शकतो !! ही भावना त्याला बळ देत होती. बघता बघता तो अंतिम सामन्यात पोहोचला.
ज्या शिक्षकाने, त्या मुलास म्हाताऱ्या गुरुकडे पाठवले होते, त्या अहंकारी माणसाचा शिष्यच, त्या मुलाचा अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी होता !!
प्रतिस्पर्धी त्या मुलाच्या मानाने खूपच बलवान होता. वयाने, शक्तीने, अनुभवाने सरस होता. या कोवळ्या वयाच्या पोराला तो सहज धूळ चारणार हे स्पष्ट दिसत होते. पंचानी एकत्र येऊन विचार केला.
"हा सामना घेणे आम्हास उचित वाटत नाही, कारण प्रतिस्पर्धी विजोड आहेत. एक बलवान तर एक दिव्यांग आहे. हा सामना मानवतेच्या आणि समानतेच्या दृष्टिकोनातून आम्ही थांबवू इच्छितो. प्रथम जेते पद विभागून देण्यात येईल! अर्थात दोन्ही प्रतिस्पर्धी यास तयार असतील तरच." मुख्य पंचाने आपला निर्णय जाहीर केला.
"मी या चिरगुट पोरा पेक्षा श्रेष्ठ आहे यात दुमत असण्याचे कारण नाही. हे सगळ्यांना स्पष्ट दिसतच आहे. तेव्हा मला विजेता आणि या पोराला उपविजेता म्हणून घोषित करावे !!" तो प्रतिस्पर्धी उर्मटपणे म्हणाला.
"मी लहान असेन, तरी मला हे टाकलेले उपविजेतेपद नको आहे !! माझ्या गुरूंनी प्रामाणिकपणे लढण्याचे शिक्षण दिलेले आहे. मी ठरलेला सामना खेळून जे माझ्या हक्काचे जेते पद आहे ते स्वीकारीन !!" त्या लढवय्याचे उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
जाणकारांच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या. कारण हे ओढवून घेतलेले संकट होते. थोडे कमी जास्त झाले तर ??? आधीच एक हात नाही अजून एखादा अवयव गमावला जायचा !! मूर्ख मुलगा !!
सामना सुरु झाला. आणि सगळी मंडळी आश्चर्याने स्तिमित झाली. त्या एका अनमोल क्षणी त्या अपंग मुलाची जीवघेणी थ्रो केलेली किक, त्या बलवान प्रतिस्पर्ध्याला चुकवता आली नाही. तो रिंगणाबाहेर फेकला गेला. परफेक्ट थ्रो, परफेक्ट टाईमिंग, नेमका लावलेला फोर्स !! अप्रतिम! केवळ अप्रतिम !!!
गुरुगृही पोहचल्यावर, त्या मुलाने आपल्या उजव्या हातातली विजयाची ट्रॉफी गुरुजींच्या पायाशी ठेवली. त्यांना पायावर डोके ठेवून आपली पूज्य भावना व्यक्त केली.
"सर, एक शंका आहे. विचारू ???"
"विचार."
"मला फक्त एकच डाव/ मूव्ह येते. तरीही मी कसा जिंकलो ???"
"तू दोन गोष्टी मुळे जिंकलास !!"
"कोणत्या,सर ???"
"एक तू घोटून, न कंटाळता केलेला सराव !! त्या मुळे तुझा तो डाव 'सिद्ध' झाला आहे, आत्मसात झाला आहे !! त्यात चूक होणे अशक्य आहे !!"
"आणि दुसरे कारण ???"
"दुसरे कारण हे, त्याहून महत्वाचे आहे. प्रत्यक डावाचा एक प्रतिडाव असतो !! तसाच या डावाचाही एक उतारा डाव आहे !!"
"मग तो, माझ्या अनुभवी प्रतिस्पर्ध्यास माहित नव्हता कां ???"
"तो त्याला माहित होता !! पण तो हतबल झाला, कारण ??? कारण या प्रतिडावात, हल्ला करणाऱ्या प्रतिस्पर्ध्याचा डावा हात धरावा लागतो !!"
आता तुम्हाला समजले असेल की, एक सामान्य, एक हात नसलेला मुलगा कसा जिंकला ???
ज्या गोष्टीला आपण आपली कमजोरी समजतो, तिलाच जो आपली शक्ती बनवून जगायला शिकवतो, विजयी व्हायला शिकवतो, तोच खरा गुरु !!!
*आतून आपण कोठे ना कोठे 'दिव्यांग' असतो, कमजोर असतो. फक्त त्यावर मात करून जगण्याची कला शिकवणारा 'गुरु' हवा !!!*
🙏✌️🙏✌️🙏✌️🙏.

No comments:

Post a Comment