मुघली आक्रमणे आली की प्रथम धनधान्याची लुट करून घेऊन जायचे. वर्षभर शेतात राबराब राबून निर्माण झालेले धान्य गेले तर वर्षभर उदरनिर्वाह कसा करायचा ही मोठी समस्या त्याकाळी होती. म्हणून आपल्या पूर्वजांनी वाड्यातच जमीनीखाली गुप्तपणे धान्य साठविण्याची पेव / बळद निर्माण केले.
सुगीच्या वेळी सर्वच शेतकऱ्यांचा मला तयार झाल्यामुळे बाजारातील आवक वाढते, त्यामुळे भाव पडतात. अशा वेळी काही व्यापारी मोठ्याप्रमाणावर माल खरेदी करून ठेवतात. साठवलेला माल पुढे ते चढ्या भावाने विकतात. म्हणून आपल्या पूर्वजांनी व्यापाऱ्यांचा धूर्तपण ओळखून व बाजारपेठेच्या या चढउतारापासून स्वताचे संरक्षण करण्यासाठी व धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी पेव / बळद निर्माण केले.
धान्य साठवण्याच्या बाबतीत पूर्वी दोन प्रकार होते. १) लहान प्रमाणावरील साठवण २) मोठ्या प्रमाणावरील साठवण हे दोन्ही प्रकार प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. लहान प्रमाणावरील साठवणीत मुख्यता पोती, मातीची भांडी, कणग्या, तांब्या पितळेचे डबे, पत्र्यांचे पिंपे अश्या साधनांचा वापर करत. मोठ्या प्रमाणावरील साठवणुकीसाठी पेव (बळद) चा उपयोग करत. पेव म्हणजे जमिनीमधून पाणी झिरपून आत येणार नाही असे तयार केलेले तळघर. पेव म्हणजे जणू एखादा भलामोठा रांजनच.
जमिनीमध्ये ठराविक खोलीपर्यंत विहिरी सारखा गोल खड्डा खणतात. त्यामध्ये प्रथम दोन फुट उंचीपर्यंत दगडांचे सोलिंग करत. त्यावर जाड मुरूम टाकून परत वाळू टाकली जात असे. वाळूच्या वर माती, शेण, राख, पांढरी माती, लाल माती यांचे मिश्रण करून लिंपन करत. त्यावर दंडगोलाकार किंवा घुमटाकार विट बांधकाम किंवा मातीच्या भेंड्याचे बांधकाम करत. पेव तयार करताना वापरावयाची माती ही सर्व निकष लागून तपासत असत. पेव आतून शेणामातीने लिंपले जात असे. अशी साधारणतः पेवांची रचना असे.
चिकण माती महत्वाची
पेव मुख्यतः पांढऱ्या शुभ्र असलेल्या मातीतच सुरक्षित होऊ शकते हे आपल्या पूर्वजांना ज्ञात होते. कारण ह्या मातीत पावसाचे किंवा अन्य मार्गाने आलेले पाणी कमी झिरपते. वरील सर्व घटकामध्ये पांढरी चिकण माती महत्वाची. ही माती ढासळत नाही. अशा मातीचा थर वजन पेलू शकते. म्हणून तर आत पोकळी असली तरी पेव ढासळत नाहीत. अशा पेवांजवळ धान्यांनी भरलेल्या पोत्यांची बैलगाडी पेवापर्यंत आणत. इतक वजन पेलून धरण्याची क्षमता या मातीमध्ये असते. या मातीमधून पाणी झिरपत नाही त्यामुळे आतल्या धान्याला ओल लागत नाही.
पेवांची रचना
सर्वात वर चार- सहा फुटांच्या थरात पेवांचे तोंड सरळ उभट असते. ते सर्व बाजूंनी बांधून घेतले जाते. त्याच्या खाली या तोंडापेक्षा थोडा कमी व्यासाचा मार्ग असतो. तिथ आढी बांधतात. या ठिकाणी पेवाचं झाकण असत. आढी म्हणजे विटांचे बांधकाम. पेवाचे तोंड आयताकृती दगडाने किंवा रफ शहाबाद फरशीने बंद केले जाते. त्यावर कडबा / गवत /माती टाकून तोंड बुजवून टाकतात. जेणेकरून आत मध्ये वॉटरप्रूफ बनते. पेवाचा व्यास पंधरा फुटांपासून ते सत्तर फुटापर्यंत किंवा त्याही पेक्षा जास्त असतो. व उंची दहा फुटांपासून ते जमिनीमध्ये हार्ड स्टाटा लागेपर्यंत.
धान्य भरण्याची पद्धत
धान्य भरण्याच्या वेळेस अगोदर तेथे संपूर्ण पेव शेणामातीच्या मिश्रणाने सारवून घेतात. तळाशी उसाच्या वाळलेल्या पेंढ्या टाकतात. त्यावर शिंदीच्या पानांपासून तयार केलेल्या चटया अंथरतात. मधल्या भागात धान्याची पोती रिती करतात. जसजसे धान्य भिंतीच्या कडेला येईल त्याबाजूने उसाच्या पेंढ्याचा थर वाढवत नेतात. पेवाच्या झाकणापासून खाली कमीत कमी चार फुटाचा थर मोकळा ठेवला जातो. त्याच्या खालपर्यंत धान्य भरले जाते. एका पेवात साधारणत १५० ते २५० क्विंटल धान्य मावते.
धान्य साठवण्याचे फायदे
पेवात धान्य साठवले की जास्त दिवस टिकते त्याचा दर्जा सुधारतो. धान्याला कीड लागत नाही, कारण तिथे ऑक्सिजन नसतो. धान्य बाहेर काढण्याच्या वेळी पेवाचे तोंड मोकळे करून बराच वेळेपर्यंत तसेच उघडे ठेऊन पेवात बाहेरची मोकळी हवा मिसळू देतात. ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत होण्यासाठी साधारणतः बारा ते आठरा तास लागतात. त्यायोगे पेवातील दूषित हवा सुधारते. एखादे पेव सकाळी उघडले की दुपारी किंवा दुसऱ्या दिवशी त्यात पूर्ण हवा खेळलेली आणि पुरेसा ऑक्सिजन जमा झाला असल्यावरच धान्य काढण्यासाठी आत उतरत असत. त्यासाठी एक परीक्षा घेत असत. त्यात कंदील सोडला जातो. त्याची ज्योत टिकली की धान्य काढण्यासाठी माणूस आत उतरत असे. तोपर्यंत कोणी आत जाऊ शकत नसे. गेलाच तर ऑक्सिजन अभावी त्याचा मृत्यू ओढवतो. पेवात चांगलीच उष्णता असते. आतील धान्य काढण्यासाठी एकच व्यक्ति आत सहज प्रवेश करू शकेल एवढाच मार्ग असायचा. ग्रामीण भागातील आजही नवीन इमारतीचे बांधकाम करताना अशी अनेक पेव आढळून येतात.
"वाडा" या पुस्तकातून
विलास भि. कोळी
संपर्क :- 9763084499
No comments:
Post a Comment