Saturday, September 11, 2021

अचपळ मन माझे - भाग १

त्रहो, आज एका नव्या लेखमालेला सुरुवात करीत आहोत. आपल्याला आवडेल अशी आशा आहे. 

हे लेख स्वामी सर्वप्रियानंद यांच्या 'Bhagawad geeta for Students' या IIT Kanpur येथे दिलेल्या व्याख्यानावर  आधारित आहेत. 

--------------------------------------------------------------------------

अचपळ मन माझे नावरे आवरीता

तुजवीण शीण होतो, धाव रे धाव आता ..

करुणाष्टके - समर्थ रामदास

--------------------------------------

अध्यात्माचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा काही संबंध आहे काय? अध्यात्म जाणून घेतल्याने ऐहिक जीवनात काही फायदा होईल का हा प्रश्न अनेक वेळा उपस्थित केला जातो. म्हणूनच आपण आज भगवद्गीतेतील / महाभारतातील काही श्लोकांचा विचार करणार आहोत. 

आपल्यापुढील पहिला प्रश्न असा आहे की कृष्ण हा कौरव आणि पांडवांचाही मित्र होता. कृष्णाने गीतेचा उपदेश अर्जुनाला केला, पण तो दुर्योधनाला केला असता तर कदाचित महाभारत युद्ध टाळता आले असते. 

खरे आहे. कृष्णाने दुर्योधनालाही उपदेश केला होता. परंतु दुर्योधनाने त्याला स्पष्ट शब्दात सांगितले होते 

जानामि धर्मम्, नच मे प्रवृत्ति | जानामि अधर्मम्, नच मे निवृत्ति |

'तू मला माझ्या हिताच्या गोष्टी सांगतो आहेस ते मला कळते. परंतु तसे वागण्याचा माझा स्वभाव नाही.  माझ्या अहिताच्या गोष्टी मी करत आहे हे  मला कळते. पण तसे करण्यापासून मी मला रोखू शकत नाही. ' सध्याच्या भाषेत सांगायचे तर 'मला सगळे ठाऊक आहे, जास्त शानपना शिकवू नको' असेच त्याने कृष्णाला स्पष्टपणे सांगितले.  

दुर्योधनाने आपले असे का होते हे ही सांगितले. 

केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि ।

मला असे वाटते की माझ्या हृदयात कोणी शक्ती वास करते आहे आणि ती शक्ती माझ्याकडून (माझी इच्छा नसतानाही) जसे  करवून घेते तसे मी करतो.  मी माझ्या इचछेनुसार याबाबत काही करू शकत नाही. 

खरेतर ही समस्या केवळ दुर्योधनाची नाही. आपण सर्वांचीच ही समस्या आहे. एखादी गोष्ट करण्याचे आपण ठरवतो, ठाम निश्चय करतो. परंतु तो निर्णय अमलात आणण्याची वेळ येताच आपण अगदी विरद्ध पर्यायाची निवड करतो. नंतर काही काळाने आपल्याला पश्चात्ताप होतो. पण हा स्वभाव काही बदलत नाही. आपण आपले वजन कमी करण्यासाठी भरपूर पैसे भरून डॉक्टरांचा सल्ला घेतो.  पण डॉक्टरांनी वर्ज्य करण्यास सांगितलेले खाद्य पदार्थ समोर येताच आपला निश्चय ढासळतो. थोडे खाल्ले तरी काही होत नाही अशी आपणच आपली समजूत घालतो आणि नंतर पस्तावतो. विद्यार्थी नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस खूप अभ्यास करण्याचा निश्चय करतो. वर्षाच्या शेवटी त्याची आठवण येते. आपण रोज सकाळी उठून व्यायाम करण्याचा निश्चय करतो. पण सकाळी घड्याळाचा गजर होताच स्नूझ करून पुन्हा झोपी जातो. आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे.  काहीतरी करून दाखविण्याचा आपण निश्चय करतो, पण प्रत्यक्ष कृतीची वेळ येताच आपण भलतेच करतो.   कठोपनिषदात हीच समस्या 'श्रेयस' आणि 'प्रेयस' अशा द्वंदातून पुढे येते. जे आपल्या भविष्यासाठी योग्य ते श्रेयस आणि जे आत्ता करावेसे वाटते ते प्रेयस. 

कृष्णाने जेव्हा अर्जुनाला उपदेश करण्यास प्रारंभ केला तेव्हा अर्जुनाने हीच समस्या कृष्णापुढे मांडली. मात्र दुर्योधन आणि अर्जुन यांच्या सांगण्यात फरक आहे. दुर्योधन याकडे समस्या म्हणून पाहात नाही, तर वस्तुस्थिती म्हणून स्वीकार करतो. त्याला ही वस्तुस्थिती बदलण्याची इच्छा नाही, तसा विचारही तो करू शकत नाही. मात्र अर्जुन ही समस्या कृष्णापुढे मांडतो आणि ती कशी सोडवावी याच्या मार्गदर्शनाचीही अपेक्षा करतो. अर्जुनाचा समस्येकडे बघण्याचा - समस्येतून मार्ग काढण्याचा दृष्टिकोनच आपल्याला बरेच काही शिकवून जातो. 

श्रीकृष्णाने यावर काय उपाय सांगितला हे आपण बघू पुढील लेखात. 


संतोष कारखानीस

No comments:

Post a Comment