Monday, September 6, 2021

षष्ठी स्थानकाची कहाणी

ऐका महादेवा तुमचे नाव दिलेल्या गावाची कहाणी. आटपाट नगर होते. गावाला सुंदर समुद्र किनारा होता. हिरवाईने नटले होते. कोणा एका राजाला आपली राजधानी महिकापुरीहून येथे हलविण्याचे मनात आले. राजाच तो. त्याच्या मनात आल्यावर त्याने आपल्या सरदारांना ते गाव राजधानीसाठी तयार करायला पाठविले. गावाची पहिली गरज पाण्याची त्यासाठी गावात साठ तळी खोदण्यास सांगितली. मुख्य तळ्याकाठी राजवाडा बांधला. हा मुख्य तलाव हत्तींना पोहण्यासाठी मोठा प्रशस्त बांधला. सर्व तळ्याकाठी महादेवाची मंदिरे बांधली. मुख्य तळ्याकाठी मोठी महादेवाची पिंडी असलेले मंदिर बांधले. तळ्याच्या मध्यभागीही मंदिर बांधले. हे मंदिर तळे भरल्यावर पाण्याखाली गेले, म्हणून त्याच्या कळसावर महादेवाची पिंडी ठेवली. तळ्याकाठी मंदिरे बांधली. महादेवाच्या कृपेने गावाची भरभराट झाली. गावात मोठे वाडे होते, त्यात विहिरी होत्या. साठ तळ्यांच्या कृपेने बारा महिने त्यांना पाणी होते. 


अनेक वर्षे लोटली. या गावावर विलायतेतल्या पोर्तुगीजांचे राज्य आले. या साहेबाने मंदिरे पाडून त्याची भर घालून मुख्य तळे बुजविले. त्या मंदिरांच्या अवशेषांवर मोठे गिरिजाघर बांधले. पण मुख्य महादेवाचे मंदिर तसेच ठेवले. नंतर विंग्रजांचे राज्य आले. तेही जाऊन आपल्याच लोकांचे राज्य आले. गावाला नळाने पाणीपुरवठा होऊ लागला. विहिरी वापराविना ओसाड पडल्या. आता लोकांना पाणी देणाऱ्या तळ्यांचे महत्व वाटेनासे झाले. विकासाच्या नावाखाली तळी बुजवली गेली. हत्तींना पोहण्यासाठी बांधलेला प्रशस्त मुख्य तलाव तर अर्ध्याहून अधिक बुजविला गेला. दसऱ्याला सीमोल्लंघनासाठी जात असत त्या घंटाळी देवीच्या तलावाचा तर मागमूसही राहिला नाही. 


काळ पुढे जात होता. आता लोकांना तळ्याचे महत्व कळू लागले होते. पण बुजविलेल्या तलावांवर इमारती उभ्या होत्या, काही तलावांवरून रस्ते केले होते. मग आता शहराचे 'षष्ठी स्थानक' किंवा 'श्री स्थानक' नाव कसे सिद्ध करायचे हा प्रश्न प्रशासनापुढे पडला. पण प्रशासनातील हुशार माणसांनी त्यावर मार्ग काढला. गावातील आता प्रशस्त झालेल्या रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडतील अशी व्यवस्था केली. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साठेल आणि नागरिक त्यालाच तलाव मानतील अशी ही युक्ती होती. यामुळे शहराचे 'षष्ठी स्थानक' नाव परत दिमाखाने झळकू लागले आणि नागरिक संतुष्ट झाले. असे सर्व भारतवर्षातील नागरिक संतुष्ट होवोत.  ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण 

No comments:

Post a Comment