Wednesday, November 24, 2021

अद्वैत वेदांत : आत्मा, पुनर्जन्म

 भारतीय अध्यात्मात आत्मा, पुनर्जन्म यांना एक विशिष्ट स्थान आहे. त्यामुळे अद्वैत वेदांताचा अभ्यास करताना या दर्शनात आत्मा, पुनर्जन्म या संकल्पनांना काही स्थान आहे काय याचा विचार ओघानेच येतो. 

अद्वैत वेदांतात ब्रह्म हेच एकमेव आहे असे मानले जाते. त्यामुळे जन्म कोणाचा हा प्रश्न आहे. आपण जर सर्वांभूती असलेले ब्रह्म असू तर हे ब्रह्म जन्म कसे घेणार आणि मृत्यू तरी कसे पावणार? जन्मच नसेल तर पुनर्जन्माचा प्रश्नच येत नाही. तसेच आत्मा कोणाचा हाही प्रश्न येतो. म्हणजेच आत्मा, पुनर्जन्म या संकल्पनांना प्रथमदर्शनी तरी या दर्शनात स्थान नाही. 

जरी आत्मा, पुनर्जन्म या संकल्पनांना स्थान नसले तरी खोलात गेल्यावर भारतीय अध्यात्मात असलेल्या या संकल्पनांचा सांधा कोठेतरी जोडता येतो. प्रथम हे स्पष्ट व्हायला हवे की जन्म, आत्मा हे या दर्शनानुसार 'माये'च्या क्षेत्रात येते. विश्वाच्या  आकाशात सत्-चित्-आनंद रुपी सर्वसाक्षी ब्रह्म तळपत आहे. या ब्रह्माचे प्रतिबिंब आपल्या मनात उमटते. आपले मन ब्रह्माचे हे सत्-चित्-आनंद गुण सर्वसाक्षी ब्रह्माकडून उधार घेते (Acquired qualities).  मनाचा 'अहंकार' हा भाग या प्रतिबिंबाशी एकरूप होतो.  आपल्या चेतासंस्थेच्या साहाय्याने तो संपूर्ण शरीरात पसरतो. मग आपल्याला आपले शरीर चैतन्यमय भासते. हे ब्रह्माचे प्रतिबिंब आपल्या अहंकाराशी (मी-पणाच्या भावनेशी) एकरूप झालेले असल्याने आपल्याला हा चैतन्यमय अहंकार म्हणजे आपला 'आत्मा' आहे असे वाटते. अहंकाराची जोड मिळाल्याने तो 'माझा' आत्मा आहे असे आपण विधान करतो. चेतासंस्थेचे केंद्र मेंदू असल्याने आपल्याला आपला आत्मा आपल्या मेंदूत आहे असेही अनेक वेळा वाटते. अद्वैत वेदान्ताच्या मते 'आत्मा' म्हणजे केवळ सर्वसाक्षी ब्रह्माकडून  सत्-चित्-आनंद उधार घेतलेला आपला अहंकार असतो. 

एका माळ्याने काही बालाद्यांत पाणी भरून ते उघड्यावर उन्हात ठेवले आहे. प्रत्येक बालदीमध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडले आहे. प्रत्येक बालदीला तो आपला स्वतंत्र आत्मा वाटतो. खरे तर ते एकाच सूर्याचे प्रतिबिंब आहे. कधीकधी या बालदीतील पाणी गढूळ होते. मग बालदीतील सूर्याचे प्रतिबिंबही झाकोळते. बालदीला वाटते की आपल्या आत्म्यावर-चैतन्यावर मळभ आले आहे. खरे तर साक्षी-चैतन्याचा सूर्य त्याच तेजाने तळपत असतो. बालदी उगचगच खंतावते. कधीकधी बालदीतील पाणी डुचमळते. सूर्याच्या प्रतिबिंबाचे तुकडे-तुकडे होतात. बालदी खोल निराशेत -डिप्रेशनमध्ये- फेकली जाते. पण खरेतर साक्षीचैतन्याच्या सूर्याला काहीही झालेले नसते. थोड्याच वेळात पाणी शांत होऊन प्रतिबिंब तेजाने झळकू लागते. कधीकधी बालदी जुनी होते. गळू लागते. मग माळी त्यातील पाणी दुसऱ्या बालदीत ओततो. नव्या बालदीत परत सूर्याचे प्रतिबिंब उमटते. हाच तो पुनर्जन्म. या नव्या बालदीत जुन्या बालदीतील प्रतिबिंब गेले आहे काय? मग नव्या जन्मात मागील जन्मातील आत्मा जातो का?

वरील उदाहरणात माळ्याने एका बालदीतील पाणी दुसऱ्या बालवाडीत ओतले. तद्वतच आपला मनोमय कोष दुसऱ्या शरीराला जाऊन चिकटतो आणि त्याच्यात परत साक्षीचैतन्याचे प्रतिबिंब पडते. यालाच कदाचित आपण आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो असे म्हणू शकू. पण हा सर्व खेळ मायेच्या परिक्षेत्रात चालला आहे हे ध्यानात ठेवायला हवे. 

आत्मा आणि पुनर्जन्म या संकल्पनांचा मी माझ्या समजुतीनुसार लावलेला हा अर्थ आहे. 

No comments:

Post a Comment