Wednesday, January 19, 2022

समांतर विश्वे तर्क आणि संभावना : भाग ११ लेखक जयेश चाचड

या लेखमालिकेत आपण विविध वैज्ञानिक संकल्पनांमधून व्यक्त होणारे समांतर विश्वाचे प्रकार बघितले. क्वांटम मेकॅनिक्स, हायरस्पेस, क्विल्टेड युनिव्हर्स, बबल युनिव्हर्स, अँटी मॅटर युनिव्हर्स, स्ट्रिंग थिअरी, एम थिअरी, ब्रेनवर्ल्ड थिअरी अश्या विविध सिद्धांतातून समांतर विश्वांची शक्यता व्यक्त होते. या सर्वच शक्यता विलक्षण आहेत. या भागात आपण विश्वातील एका अतिविचित्र संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या तितक्याच विचित्र समांतर विश्वाच्या संकल्पना जाणून घेणार आहोत.

१९७० च्या दशकात कृष्णविवरावरून एक प्रदीर्घ वाद दोन दिग्गज शास्त्रज्ञांमध्ये सुरू झाला. (या बद्दल सविस्तरपणे मी "जिनियसच्या शोधत : एका वैचारिक युद्धाचा इतिहास" या लेखमालिकेत सविस्तर लिहिले आहे). या वादामधूनच "ब्लॅक होल होलोग्राम" ही संकल्पना जेरार्ड टी हुफ्ट आणि लिओनार्ड सस्किंड यांनी विकसित केली. "ब्लॅक होल इन्फॉर्मेशन पॅराडॉक्स" वर उपाय शोधताना हुफ्ट आणि सस्किंड यांनी असे मांडले की कृष्णविवराच्या इव्हेंट होरायझन बाहेर हॉकिंग रेडिएशन मुळे होरायझन बाहेरील त्रिमितीय विश्वाची एक द्विमितीय प्रतिकृती एखाद्या फोटोकॉपी सारखी तयार होईल. यालाच ब्लॅक होल होलोग्राफीक इमेज म्हणतात. या संकल्पनेचा जर विस्तार केला तर सस्किंड यांच्या मते आपले विश्व म्हणजे एखाद्या चतुर्मितीय विश्वाची त्रिमितीय प्रतिकृती असण्याची दाट शक्यता आहे. अर्थात जश्या हायपरस्पेस मधील मित्या वाढत जातील तशी अश्या समांतर विश्वांची संख्याही वाढत जाईल. याचाच अर्थ आपण कदाचित बहुमिती मध्ये अस्तित्वात असलेल्या आपल्या खऱ्या रूपाची त्रिमितीय भासमान प्रतिकृती असू.
कृष्णविवरातून समांतर विश्वाची आणखीन एक शक्यता व्यक्त होते ती म्हणजे नोबेल पारितोषिक विजेत्या रॉजर पेनरोज यांनी मांडलेल्या संकल्पनेतून. रॉजर पेनरोज यांनी कृष्णविवराच्या अध्ययनासाठी त्याचा टाईम डायग्रॅम काढण्यात यश मिळवले. यासाठी त्यांनी कन्फोर्मल मॅपिंग या पद्धतीचा वापर करून कृष्णविवराचा टाईम किंवा वेळ हा घटक पकडून आलेख काढण्यात यश मिळवले. "पेनरोज डायग्रॅम" म्हणून हे आलेख सुप्रसिद्ध आहेत. १९६२ मध्ये रॉय केर यांनी परिवलनशील कृष्णविवराचे गणित सोडवून परिवलनशील कृष्णविवराची सिंग्युलॅरिटी ही बिंदूवत नसून चक्राकार किंवा रिंग सिंग्युलॅरिटी असेल असे मांडले. "कृष्णविवराला केस नसतात" या सिद्धांतानुसार कृष्णविवरातून आपल्याला फक्त वस्तुमान, विद्युतभार आणि कोनिय संवेग एवढीच माहिती मिळू शकते. साधारणपणे कृष्णविवराचा विद्युतभार अत्यल्प असतो पण जर कृष्णविवरात जास्तीत जास्त विद्युतभारीत कण सोडले तर अश्या कृष्णविवरात आतील आणि बाहेरील असे दोन इव्हेंट होरायझन तयार होतात. कृष्णविवराचे मुख्य इव्हेंट होराझन ओलांडल्यावर अवकाश आणि काळ यांची अदलाबदल होते. पेनरोज यांच्या पेनरोज डायग्रॅम मधून एक विलक्षण शक्यता समोर येते. विद्युतभारीत परिवलनशील कृष्णविवरात जर कोणी प्रवेश केला तर त्यासमोर दोन पर्याय असतील. एक म्हणजे थेट सिंग्युलॅरिटीत प्रवेश. परिवलनशील विश्वाची सिंग्युलॅरिटी ही रिंग सिंग्युलॅरिटी असल्यामुळे तिच्या विषुववृत्तीय प्रतलाशी कोणताही कोन करून त्यात प्रवेश केला तर आपल्याला ऋण विश्वात जाता येईल. हे ऋण विश्व अँटी ग्रॅव्हीटी विश्व असेल जिथे गुरुत्वाकर्षण हे अपकर्षण बल असेल. गंमत म्हणजे या सिंग्युलॅरिटीच्या वरून खाली प्रवेश करणे आणि खालून वर प्रवेश करणे हे सर्वस्वी भिन्न असेल. दोन्ही वेळा दोन भिन्न अँटी ग्रॅव्हीटी विश्व असतील.
हे कमी म्हणून काय तर पेनरोज डायग्रॅम मधून दुसरा मति गुंग करणारा पर्याय समोर येते. विद्युतभारीत परिवलनशील कृष्णविवराला दोन इव्हेंट होरायझन असतील. मुख्य इव्हेंट होरायझन ओलांडल्यावर अवकाश काळाची अदलाबदल होऊन अवकाश काळाप्रमाणे भासेल तर काळ अवकाशाप्रमाणे भासेल. जर आपण सिंग्युलॅरिटी पार न करण्याचे ठरवले तर आपल्यासमोर एक पर्याय आहे. कृष्णविवराचे अंतर्गत इव्हेंट होरायझन पार करणे. या अंतर्गत होरायझन पार पुन्हा अवकाश आणि काळ आपापली जागा बदलतील आणि आपण भविष्यातील एखादया समांतर विश्वात दाखल होऊ. इथे पुन्हा आपल्यासमोर दोन पर्याय असतील. सिंग्युलॅरिटी पार करणे किंवा अंतर्गत इव्हेंट होरायझन ओलांडणे. दुसरा पर्याय निवडला तर अश्या अनंत विश्वाच्या प्रवासावर आपण जाऊ शकू. अर्थात आपल्या मूळ विश्वात मात्र आपल्याला कधीच परतता येणार नाही.
समांतर विश्वाच्या सर्व संकल्पना गणितातून व्यक्त होतात आणि अजूनही त्यांना कोणीच खोडून काढू शकलेले नाहीये. सध्या आपल्याकडील तंत्रज्ञान इतके प्रगत नाही की या संकल्पना निरीक्षणातून सिद्ध करता येतील. तरीही भविष्यात जसे तंत्रज्ञान विकसित होत जाईल तशी अधिक अचूक निरीक्षणे घेतली जातील.
आपल्या विश्वाचा आवकाच इतका मोठा आहे की आपल्याला आपल्या नगण्यत्वाची जाणीव होण्यास पुरेसा आहे. जर समांतर विश्वे अस्तित्वात असतील तर आपले विश्वच नगण्य ठरण्याची शक्यता आहे. असे असेल तर नगण्याहून नगण्य अश्या अर्थाच्या शब्दाची सर्वच भाषेत भर घालावी लागेल.
समाप्त

No comments:

Post a Comment