Friday, July 22, 2022

Self Study Part 2


आपण या लेखात मेंदूचे कार्य आणि त्याच्या आपण आपल्या पाल्यांच्या अभ्यासात कसा उपयोग करून घेणार आहोत हे बघणार आहोत. 

आपल्याला माहीतच आहे की मेंदू सुमारे एक कोटी चेतापेशींनी (न्यूरॉन्स) बनलेला आहे. प्रत्येक न्यूरॉन्सपासून दोन हजार ते दहा हज़ार चेतातंतू (डेन्ड्रॉईड्स) निघालेले असतात. हे चेतातंतू एकमेकांशी संपर्क साधून असतात. हे त्यांचे संपर्क करण्याचे मार्ग (Communication Channels) प्रचंड प्रमाणात असतात. कदाचित जगातील मूलकणांपेक्षा हे मार्ग अधिक भरतील. आपल्या मेंदूत ही प्रचंड गुंतागुंतीची अवाढव्य यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या साहाय्यानेच आपण नवे ज्ञान आत्मसात करत असतो. पण आपल्यापैकी अनेकांना ही यंत्रणा अधिक कार्यक्षमपणे कशी वापरायची याचीच कल्पना नसते. मग आपल्या मुलांना या यंत्रणेचा कार्यक्षम वापर कसा करायचा हे कोण शिकविणार? प्राचीन काळी मुले शिक्षणासाठी गुरुगृही जात असत. या गुरूंना या मेंदूच्या कार्यप्रणालीची कल्पना होती. ते याचा उपयोग करून घेत असत. कसा ते आपण नंतर पाहू. 

आपण कसे शिकतो?

१> पाच ज्ञानेंद्रीयान्च्या साहाय्याने जे आपण सहज ग्रहण करतो 

२> वाचन 

३> लेखन 

४> उजळणी (प्रॅक्टिस) 

५> एकमेकांबरोबर चर्चा

६> भावनांद्वारे 

वरील सहा प्रकारांनी अथवा त्यांच्या एकत्रीकरणानी आपण शिकतो. त्या व्यतिरिक्त अन्य कोणताही मार्ग नाही. 

संवेदना वाहून नेताना अथवा वरील सहापैकी एक अथवा अनेक घटना घडताना आपल्या मेंदूतील चेतापेशी आपल्या चेतातंतूंच्या साहाय्याने सतत एकमेकांशी संपर्क साधत असतात. हा संपर्क विजेच्या स्पंदनांनी होतो. त्याला स्नॅप्स म्हणतात. अशा प्रकारे एक चेतापेशी दुसऱ्या चेतापेशीला संदेश पाठवते, ती पेशी आवश्यक असल्यास हा संदेश पुढील पेशींकडे पाठवते. अशा प्रकारे एक विजेचे मंडल (सर्किट) आपल्या चेतासंस्थेत तयार होते. जेव्हा आपण तीच गोष्ट परत करतो (वाचन, लेखन इत्यादी) तेव्हा हेच सर्किट परत उपयोगात येते. मग या सर्किटमध्ये असलेल्या चेतातंतूंवर  एक हलकासा मेदाचा (fat) थर  (myelin layer) तयार होतो. या मेदाच्या थरामुळे या सर्किटमधून जाणारी विजेची स्पंदने अधिक वेगात जातात, म्हणजेच  होणारा संवाद अधिक जलद होतो.  आपल्याला अनुभव आहे की सायकल शिकताना प्रथम आपल्या मेंदूला अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. पण परत परत चालवून मेंदूतील त्या सर्किटवरील चेतातंतूंवर मेदाचा थर पुरेशा प्रमाणात साठला की मेंदू त्या दिशेने जलद काम करतो. मग आपल्याला सायकल चालविणे सोपे वाटू लागते. हीच शिकण्याची -ज्ञान मिळविण्याची प्रक्रिया आहे. ही केवळ आपले चेतातंतू अन्य योग्य चेतातंतूंना जोडले जाण्याची आणि त्या चेतांतूंवरील मेदाचे आवरण अधिकाधिक जाड करण्याची प्रक्रिया आहे. आपल्याला आपल्या मुलांच्या बाबतीत हीच प्रक्रिया अधिक चांगली कशी होईल हे आपल्याला बघायचे आहे. 

हे कसे करायचे यावर आपण पुढील लेखात विचार करू. 

संतोष कारखानीस ठाणे 

#SelfStudy

No comments:

Post a Comment