Saturday, July 23, 2022

Self Study Part 3

 आपण मागील भागात मेंदूचे काम कसे चालते याची थोडक्यात माहिती घेतली. आपण ज्यावेळी एखादी कृती करतो (उदा. वाचन) तेव्हा आपली ज्ञानेंद्रिये चेतातंतूंच्या साहाय्याने ही माहिती मेंदूकडे पाठवितात. ही माहिती विद्युत सपंदानाच्या स्वरूपात असते ज्याला सिनॅप्स synapse असे नाव आहे. हे चेतातंतू एकमेकांना जोडलेले असतात आणि ही विद्युत स्पंदने एका चेतापेशींकडून दुसऱ्या चेतापेशींकडे चेतातंतूंच्या जोडणीतून जाते. आपण एखादे काम करीत असता या जोडण्या होतात. अशाप्रकारे जोडल्या गेलेल्या चेतापेशींचे एक विद्युत मंडळ (electric circuit) तयार होते हे आपण मागील भागात पाहिले. ही स्पंदने चेतातंतूतून जात असताना त्यामुळे आसपाश्या भागात एक विद्युत भार निर्माण होतो. या विद्युत भारामुळे या चेतातंतूंभोवती एक मेदाचा थर तयार होतो. हा थर विद्युत रोधक असल्याने चेतातंतूंमधील विद्युतभाराचा ह्रास होऊ देत नाही. त्यामुळे विद्युत स्पंदने अधिक वेगात आणि मोठ्या प्रमाणात जाऊ शकतात. म्हणजेच हा थर जेवढा जाड, तेवढी या स्पंदनांची तीव्रता जास्त. म्हणजेच आपण शिकलेले परत आठवण्याची शक्यता जास्त. म्हणूनच जास्तीतजास्त चेतातंतूंच्या जोडण्या व्हाव्यात आणि त्या भोवतीचा मेदाचा थर अधिक जाड व्हावा हा आपला प्रयत्न असला पाहिजे. 

हा मेदाचा थर बनताना एकदा थर बनला की त्याची जाडी वाढण्यासाठी मध्ये काही काळ जाऊ द्यावा लागतो. म्हणजेच आज मी काहीतरी अभ्यास  केला तर त्याची उजळणी आजच वीस वेळा  केली तर फार उपयोग नाही. त्याची उजळणी एक दोन दिवसाआड अशी वीस वेळा केली तर अधिक फायदा होईल. अभ्यास करताना याचा विचार नक्की हवा. 

मेंदूमध्ये या रासायनिक क्रिया चालू असताना काही टाकाऊ पदार्थ (beta amyloid) तयार होतात. हे पदार्थ मेंदूत तसेच राहिले तर मेंदूच्या कामावर विपरीत परिणाम करतात. मेंदूच्या अनेक रोगांचे कारण हेच  पदार्थ आहेत. हे पदार्थ काढण्याचे काम मेंदूतील द्रवपदार्थ (Cerebrospinal Fluid -CSF) करतात. परंतु जेव्हा मेंदू खूप काम करीत असेल (उदा. जागेपणी) तेव्हा मेंदूतील कामामुळे मेंदूतील  पेशींमधील अंतर खूप कमी झालेले असते. त्यामुळे या द्रवाला मेंदूत नीट शिरता येत नाही. झोपेमध्ये मेंदूच्या पेशींचे काम कमी होते. मग त्यांच्यामधील अंतर वाढते आणि हा द्रव मेंदूत शिरून टाकाऊ पदार्थ बाहेर टाकू शकतो.  म्हणून चांगला अभ्यास करायचा असेल तर पुरेशी झोप आवश्यक आहे. तसेच परीक्षेच्या आदल्या दिवशी जागून परीक्षेला गेल्यास मेंदूतील टाकाऊ पदार्थामुळे मेंदूचे काम परीक्षेच्या वेळेस मंदावण्याची  शक्यता असते. म्हणून परीक्षेआधी पुरेशी आणि शांत झोप आवश्यक आहे. 

व्यायाम आणि मैदानी खेळामुळे मेंदूत काही संप्रेरके तयार होतात. ही संप्रेरके आपल्याला आनंदाची भावना देतात. आपण आनंदी असलो तर अभ्यासात मन लागते.  नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार व्यायामामुळे मेंदूतील चेतापेशींच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे आपले मूल अभ्यासात पुढे यावे असे वाटत असेल तर त्याला मैदानी खेळासाठी उत्तेजन दिले पाहिजे. All work and no play makes jack a dull boy ही इंग्रजी महान आपल्याला माहीत असेलच. 

शेवटची मेंदूच्या बाबतीत  गोष्ट म्हणजे 'डिफॉल्ट मोड नेटवर्क ' . लहानपणापासून आलेल्या विविध अनुभवांमुळे मेंदू  बऱ्याच वेळा काही विचार करत असतो.  आपल्या अंतर्मनात हे विचार सतत चालू  राहातात. यामुळे हे अनावश्यक विचार  करण्याचे मेंदूतील विद्युत मंडल अधिकाधिक शक्ती प्राप्त करते, त्याच्या चेतातंतूंवरील मेदाचे आवरण अधिक जाड बनत जाते. हे 'डिफॉल्ट मोड नेटवर्क ' आपल्या मेंदूच्या कार्यशक्तीचा (Processing Power) बराचसा भाग खाऊन टाकते. एखाद्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस शिरावा तसे हे असते. त्यामुळे अभ्यासात मन लागत नाही, केलेला अभ्यास लक्षात रहात नाही. वर्षानुवर्षे बनत गेलेले हे 'डिफॉल्ट मोड नेटवर्क ' तोडणे ही सोपी गोष्ट निश्चितच नाही. परंतु आपल्या ऋषींनी हे'डिफॉल्ट मोड नेटवर्क ' तोडण्याच्या पद्धती विकसित केल्या होत्या. गुरुकुलांमध्ये विद्यार्थ्यांना यावर काम करणे अनिवार्य होते. 

पुढील भागात आपण या विविध पद्धतींची माहिती घेऊ. 

No comments:

Post a Comment