Sunday, July 31, 2022

Selfstudy- 4

 मागील काही भागात आपण मेंदूच्या कार्यपद्धतीबद्दल थोडेसे जाणून घेतले. मेंदू आणि चेतासंस्था ही सुमारे एक कोटी चेतापेशींची बनलेली असते. एका चेतापेशीतून दोन हजार ते दहा हजार चेतातंतू निघालेले असतात. हे चेतातंतू आपण काही काम/अभ्यास करतअसताना   जोडले जातात. हे चेतातंतू विजेच्या स्पंदनांद्वारे माहितीचे आदानप्रदान करतात. यामुळे माहितीचे आदानप्रदान करणाऱ्या चेतातंतू-चेतापेशूंचे विद्युत मंडल तयार होते. अभ्यास करताना/ प्रत्येक उजळणीच्या वेळी तेच काम परत करताना हे मंडल कार्यान्वित होते. प्रत्येकवेळी कार्यान्वित होताना त्यावर मेदाचा एक हलकासा थर जमा होतो. हा थर विद्युतरोधक असल्याने माहितीच्या विजेच्या सपंदानांचा ह्रास रोखतो. स्पंदनांची तीव्रता चांगली राहते आणि त्यामुळे ती अभ्यास केलेली गोष्ट वेळेवर लगेच आठवते. हा थर जेवढा जाड होईल तेवढी विद्युत स्पंदने प्रभावी असतात. 

मागच्या भागात आपण दर काही दिवसांनी अभ्यासाची केलेली उजळणी का फायदेशीर ठरते हे पहिले. तसेच पुरेशा झोपेचे अभ्यासाच्या दृष्टीने असलेले महत्वही पाहिले. चेतासंस्थेमधील रासायनिक क्रियांवर झोप आणि उजळणीचा काय परिणाम होतो हे आपण पाहिले. 

आता मेंदूमधील 'डिफॉल्ट मोड नेटवर्क' चा परिणाम अभ्यासावर कसा होतो हे पाहू. मेंदू अनेक कामे करत असतो. यासाठी  मेंदूमधील जवळ असणाऱ्या चेतापेशी एकमेकांशी संपर्क साधत असतात. या चेतापेशी विशिष्ट प्रकारची कामे करण्यात तरबेज असतात. या पेशींच्या मेंदूतील स्थानानुसार मेंदूचे विविध भाग शास्त्रज्ञांनी कल्पिले आहेत. यातील सात प्रमुख भागातील एक भाग म्हणजे 'डिफॉल्ट मोड नेटवर्क'. हा भाग अमूर्त गोष्टींचा विचार करतो. दिवास्वप्ने बघणे, भूतकाळात घडलेल्या गोष्टींवरून भविष्यकाळाची चिंता करणे, एखाद्या गोष्टीबद्दल राग-लोभाचा सतत विचार करणे, स्वत:बद्दल मत बनविणे अशा गोष्टी हा भाग करतो. आपल्या जगण्यासाठी काही प्रमाणात असा विचार आवश्यक असतो. परंतु या गोष्टी सतत मनात येत राहिल्या तर मेंदूच्या बाकीच्या कामांमध्ये अडथळा ठरू शकतात. त्यातच मेंदूच्या या भागाचा मेंदूच्या बाकी अन्य भागांशी निकट संपर्क असतो. या भागातील चेतापेशींचे चेतातंतू अन्य भागातील चेतातंतूंशी जोडलेले असतात. कधी काय करायचे याचे सिग्नल्स अन्य भागांना हे नेटवर्क देत असते. त्यामुळे मेंदूच्या या भागाचे कार्य अनावश्यकपणे सतत चालू राहिले तर मेंदूला आवश्यक कामे करण्यास पुरेशी संधी मिळत नाही. या भागाचे कार्य अनावश्यकपणे सतत चालू राहिले तर त्याची अन्य भागांसोबत बनलेली विद्युतमंडले त्यांच्या चेतातंतूंवर अधिक मेदाचा थर जमून अधिक कार्यक्षम बनत जातात आणि मेंदूच्या कामात अधिकाधिक अडथळा बनत जातात. ही समस्या फार वाढली तर स्निझोफ्रेनियासारखे आजारही होऊ शकतात. अभ्यास करताना मनात अनावश्यक विचारांनी थैमान घातले तर अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही ते याच 'डिफॉल्ट मोड नेटवर्क'मुळे. भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे भविष्यातील घटनांबद्दल चिंता वाटू लागते ती याच नेटवर्कमुळे.

याच 'डिफॉल्ट मोड नेटवर्क' मुळे परीक्षेची अनावश्यक भीती वाटू शकते. अचानक भीती वाटली की काय करायचे याची कार्यपद्धती निसर्गाने आपल्या शरीरात पूर्वीच तयार केली आहे. याला इंग्रजीत 'Fight or Flight' असे नाव आहे. पूर्वी मानव जंगलात राहत असताना अचानक समोर वन्य प्राणी आल्यास पळणे अथवा त्याच्याशी लढणे हाच उपाय होता. त्यासाठी आपल्या पायांत आणि हातात अधिक ऊर्जा येणे आवश्यक होते. त्यामुळे खूप भीतीची भावना निर्माण झाली की आपले रक्त हाताकडे आणि पायांकडे जाते. पोटातील रक्त हाता-पायांकडे गेल्याने आपल्याला अशावेळी पोटात खड्डा पडल्यासारखे वाटते. पोट थंड पडते. आपल्या मेंदूला शरीराला लागणाऱ्या ऊर्जेपैकी २०% ऊर्जा लागते. त्यामुळे ही ऊर्जा पुरविण्यासाठी मेंदूत रक्ताचा मोठा साठा असतो. भीती वाटली की मेंदूतील  या रक्तापैकी काही रक्त हातापायांकडे वळविले जाते. अर्थात यावेळी मेंदूला ऊर्जेचा पुरवठा कमी पडतो. मेंदूच्या कामावर परिणाम होतो. डोके सुन्न होते. मग परीक्षेच्या वेळी आपल्या मुलाला या 'डिफॉल्ट मोड नेटवर्क' मुळे भीतीची अनावश्यक भावना निर्माण झाली तर काय होईल याचा विचार करा. 

'डिफॉल्ट मोड नेटवर्क' मधील चेतातंतूंवर तयार झालेल्या मेदाच्या जाड थरामुळे हे नेटवर्क तोडणे कठीण होऊन जाते. आपल्या ऋषींनी यावर मार्ग शोधले होते. काही मार्गांचा आपण विचार करू. 

'त्राटक' हा  'डिफॉल्ट मोड नेटवर्क' तोडण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. 'त्राटक' करण्याच्या अनेक पद्धती आहेत. मी माझा मुलगा सहावी-सातवीत असताना त्याच्याकडून ज्योती त्राटक करवून घेत असे. अंधाऱ्या खोलीत एक मेणबत्ती डोळ्यांच्या पातळीवर ठेऊन मेणबत्तीच्या ज्योतीचे तेज डोळ्यांनी शरीरात घेऊन थोड्या थोड्या वेळाने डोळे मिटून ते तेज सर्व शरीरात पसरत आहे अशी कल्पना करणे म्हणजे ज्योती त्राटक. हे सुमारे दहा मिनिटे करायचे असते. नंतर डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मरायचे असतात. यामुळे 'डिफॉल्ट मोड नेटवर्क'चा प्रभाव कमी होऊन अभ्यासात लक्ष लागते. 

ध्यानमुळेही 'डिफॉल्ट मोड नेटवर्क'चा प्रभाव कमी करता येतो. मुलाला मांडी घालून बसायला सांगावे. डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. प्रत्येक आत येणारा आणि बाहेर जाणारा श्वास जाणवला पाहिजे. याला विपश्यना ध्यानपद्धतीत 'आनापान सति' असे नाव आहे. पातंजल योगात याला 'प्राणधारणा' म्हणतात. 

आपण आपल्या मुलाला 'त्राटक', 'ध्यान' अथवा अन्य मार्गांनी या  'डिफॉल्ट मोड नेटवर्क'चा प्रभाव कमी करण्यास मदत करणे हे त्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक आहे. 

मुलांच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेले हे myelin मेद बनविण्यासाठी आवश्यक घटक काय असतात हे पुढील लेखात पाहू. 

No comments:

Post a Comment