Sunday, July 31, 2022

Selfstudy-5

 मागील लेखांत आपण मेंदूचे आणि चेतासंस्थेचे कामकाज कसे चालते हे पाहिले. चेतातंतूंची नवनवीन जोडणी आणि त्यावर तयार होणारा एक मेदाचा थर (myelin layer) हे आपली बुद्धिमत्ता वाढविण्यास कारणीभूत होतात हे आपण पाहिले. एकच गोष्ट वारंवार केल्याने (उजळणी) ती गोष्ट करण्याचे चेतापेशींचे विद्युत मंडल कार्यंवित होते, त्यामुळे या मेदाच्या थराची जाडी वाढत जाते. हा मेदाचा थर चेतातंतूंकडून जाणारी विद्युत स्पंदनांचे रक्षण करीत असल्याने या मंडलातून दिले जाणारे संदेश वेगाने आणि अधिक सामर्थ्याने पाठविले जातात. त्यामुळे त्या गोष्टीत/विषयात आपण प्रवीण होतो. 

आता जर या मेदाच्या थराची (myelin layer) जाडी वाढवायची असेल तर या मेदासाठी लागणारी द्रव्ये आपल्या आहारात पुरेशी असली पाहिजेत. अर्थातच मेदाचा थर बनविण्यासाठी लागणारे पहिले द्रव्य म्हणजे मेद अर्थात fat. देशी गायीच्या लोणकढ्या तुपाची रचना बरीचशी या myelin च्या रचनेसारखी असते. त्यामुळे देशी गायीचे लोणकढे तूप हे myelin layer बनविण्यास शरीराला मदत करते. आपल्या मुलाला अभ्यासात मदत व्हावी असे वाटत असेल तर हे तूप त्याच्या आहारात  योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. माझ्या लहानपणी माझी आजी मला डब्यात अधूनमधून गूळ-तूप चपाती अथवा तूप -साखर  आवर्जून देत असे त्याची मला ही माहिती मिळवताना आठवण झाली होती. लोणकढे तूप याचा अर्थ विरजण लावून दूध घुसळून लोणी काढून ते तापवून मिळविलेले तूप (bilona ghee). हल्ली अनेक ठिकाणी विरजण न लावता यांत्रिक पद्धतीने दुधातील fat छान अंश काढतात आणि त्यापासून तूप बनवितात. हे तूप लोणकढे नाही. 

myelin layer बनविण्यास उपयोगी अशा अन्य गोष्टींचा विचार केल्यास 'ड जीवनसत्व महत्वाचे आहे.  त्यामुळे 'ड जीवनसत्व असलेल्या पदार्थांचा जेवणात समावेश असावा. दुधातून हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळते. याशिवाय अंडी, लिव्हर, कठीण कवचाचे प्राणी (चिंबोऱ्या, कोळंबी इत्यादी), सोयाबीनचे पदार्थ यातूनही 'ड' जीवनसत्व मिळते. ओमेगा-३ फॅटी ऍसिडचाही myelin layer बनविण्यास उपयोग होतो. Vitamin C आणि collagen यांचाही उपयोग हा थर बनविण्यासाठी होतो. आयोडीन आणि झिंक यांचाही हा थर बनविण्यात सहभाग असतो. काजू, बदाम, अक्रोड, सुके अंजीर यासारख्या सुक्या मेव्यातून तसेच माशांमधून हे पदार्थ भरपूर प्रमाणात मिळतात. 

मात्र बाजारात मिळणारे फास्ट फूड आणि वाईट तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्याने या myelin layer बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनसत्त्वांची हानी होण्याची शक्यता असते. यामुळे अभ्यासात प्रगती होण्यासाठी मुलांनी असे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत. 

पुढील लेखात आपण अभ्यास करण्याच्या निरनिराळ्या पद्धतींचा विचार करू. 

No comments:

Post a Comment