मुलांशी काय बोलायचं? भाग १
Tuesday, August 9, 2022
मुलांशी काय बोलायचं? भाग १ लेखक चेतन एरंडे
Wednesday, August 3, 2022
selfstudy-8
या लेखमालेतील हा शेवटचा लेख. आपण यापूर्वी आपल्या मेंदूचे आणि चेतासंस्थेचे काम कसे चालले हे पाहिले. चेतातंतूंवरील मेदाच्या थराचे महत्व ओळखले. मागील काही लेखांत आपण विज्ञान, समाजशास्त्रे, गणित या विषयांचा अभ्यास कसा करायचा हे पाहिले. या लेखात भाषा विषयाचा अभ्यास कसा करायचा हे पाहू.
आपल्यापैकी अनेकांना इंग्रजी ही भाषा कठीण वाटते. बोली इंग्रजी भाषा शिकविण्याचे वर्ग भरपूर पैसे कमावतात. माझी इंग्रजी भाषा नानावीपर्यंत कच्ची होती. पण आमच्या मुख्याध्यापकांनी (सामंतसर - मो.ह.विद्यालय ठाणे) आम्हाला भाषा शिकण्याची एक युक्ती सांगितली. त्यामुळे माझी इंग्रजी चांगली झाली. कोणतीही भाषा शिकायची असेल तर तुमचे विचार त्या भाषेतून आले पाहिजेत. मराठीतून विचार करून त्याचे इंग्रजी अथवा अन्य भाषांत रूपांतर करून तुम्ही बोललात तर त्या भाषेवर प्रभुत्व येणार नाही. यासाठी रोज एक पान त्या भाषेत निबंध लिहिणे आवश्यक आहे. या निबंधाचा विषय कोणताही असावा. त्या दिवशी तुमच्या डोक्यात येईल तो विषय. हा निबंध लिहून झाला की इंग्रजी येत असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून तपासून घ्यावा. मात्र कोणत्याही विषयाच्या शिक्षकाकडून नको. बहुसंख्य शिक्षकांना चुका काढून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खच्ची करण्याची सवय असते. म्हणून शिक्षक नकोत. घरातील अथवा ओळखीची कोणीही व्यक्ती, जी ढोबळ चुका प्रेमाने दाखवू शकेल अश्या व्यक्तीकडून हा निबंध तपासून घ्यावा. रोज असा एक निबंध लिहिला की काही महिन्यात आपण निबंध लिहिण्यास बसलो की आपले विचार त्या त्या भाषेत सुरु होऊ लागतील. इंग्रजी पुस्तक वाचणे अथवा दिवसातून काही वेळ इंग्रजी बोलणे यापेक्षा ही पद्धत मला सुटसुटीत वाटते.
मी गेले काही दिवस ही लेखमाला लिहितो आहे. आपल्या पाल्यांवर विश्वास ठेवणे हे प्रथम आवश्यक आहे. कोचिंग क्लासचे शिक्षक कदाचित विद्यार्थ्यांकडून या वर्षीचा अभ्यास करून घेतील ही, पण त्यातून आपल्या पाल्याचा आत्मविश्वास कसा जागृत होणार? पुढे तो जेव्हा व्यवसायात/नोकरीत पाऊल ठेवेल तेव्हा त्याला येणाऱ्या समस्या त्यालाच सोडवायच्या आहेत. तेथे कोठलाही कोचिंग क्लास नसेल. या समस्या सोडविण्यासाठी त्याचा आत्मविवास जागृत असायला हवा. आणि त्याच्यात आत्मविश्वास जागृत करण्याचे काम तो लहान असतानाच - त्याच्या संस्कारक्षम वयातच व्हायला हवे. कोचिंग क्लासला न जाता कदाचित त्याला आज थोडे कमी मार्क्स मिळतील. पण मिळवलेले मार्क्स 'त्याचे' असतील त्याने परिश्रमाने मिळविलेले असतील. हे मार्क्सच त्याला आत्मविश्वास देतील.
पालकांनो, विचार करा. आपल्या मुलांना भविष्यात या जगात वावरताना आत्मविश्वास देणे हे आपले कर्तव्य आहे. आपणास काही शंका असतील, भविष्यातही काही मदत लागली तर माझ्याशी संपर्क साधण्यास संकोच करू नका. ही लेखमाला मी येथेच संपवितो.
Monday, August 1, 2022
selfstudy-7
या पूर्वी आपण या लेखमालेत चेतासंस्थेचे - अर्थात मेंदूचे काम कसे चालते याचा थोडक्यात आढावा घेतला. चेतासंस्थेला अधिक सुदृढ बनविण्यासाठी - मेंदूने आपले कां अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्या खाण्यात कोणते पदार्थ असले पाहिजेत आणि कोणते पदार्थ टाळले पाहिजेत हेही आपण पाहिले. मागील लेखात विज्ञान आणि समाजशास्त्रे यांचा अभ्यास करण्याची पद्धतही पाहिली. आता या लेखात गणित या विषयाचा अभ्यास कसा करायचा हे पाहू.
शाळेत अभ्यासाला गणिताचे पाठ्यपुस्तक लावलेले असते. आपण selfstudy करताना हे पाठयपुस्तक हाच आपला मुख्य resource आहे. पाठ्यपुस्तकात प्रत्येक विभागाला सुरुवात होताना काही गणिते सोडवून दाखवलेली असतात. ही सोडवून दाखवलेली गणिते प्रथम नीट वाचावी. त्यातील प्रत्येक पायरी (step) नीट समजून घ्यावी. त्यामागील logic समजून घ्यावे. जर एखाद्या step मागील logic समजले नसेल तर ते शिक्षकांकडून/मित्रांकडून अथवा पालकांकडून समजून घ्यावे. नंतर हेच पुस्तकात सोडवून दाखविलेले गणित पुस्तक बंद करून सोडवावे. जर सोडविता आले नाही तर परत पुस्तक उघडून आपण कोठे चुकलो ते पाहावे. नंतर परत पुस्तक बंद करून ते गणित पहिल्यापासून सोडवावे.
हे झाल्यावर त्या विभागाखाली आपल्याला सोडविण्यासाठी जी गणिते दिलेली असतात ती १,३,६,९...अशा क्रमाने सोडवावीत. शिक्षकांकडून तपासून घ्यावीत. नंतर तीन-चार दिवसांनी २,४,७,१०.. अशा क्रमाने सोडवावीत. आणखी ३-४ दिवसांनी ५,८,११.. अशा क्रमाने सोडवावीत. आपण हे पाहिले की चेतासंस्थेतील ती गणिते सोडविण्याचे विद्युत मंडल तीच कृती परत ३-४ दिवसांनी केली तर अधिक कार्यक्षम होते. पण तीच कृती लगेच अनेक वेळा केली तर ते मंडल फार कार्यक्षम होणार नाही. म्हणून गणिताच्या धड्याखालील प्रश्न या पद्धतीने सोडवावेत. हीच पद्धत अन्य विषयांखाली दिलेले प्रश्न सोडवितानाही वापरता येते.
उजळणी हा गणिताचा प्राण आहे. त्यामुळे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका मिळवता आल्या तर त्या सोडवाव्या. अन्य काही प्रकाशकांनी काढलेल्या पुस्तकातील गणिते सोडवावी.
पुढील लेखात आपण भाषा विषयाचा अभ्यास कसा करावा हे बघणार आहोत.
Selfstudy-6
मागील काही भागांत भागात आपण मेंदूचे आणि चेतासंस्थेचे काम कसे चालते हे पाहिले. चेतासंस्थेतील संदेशांचे आदान-प्रदान वेगाने आणि सामर्थ्यशाली व्हावे म्हणून चेचेतातंतूंवरील मेदाचा थर जाड बनवावा लागतो. यासाठी आपल्या आहारात कोणते पदार्थ असावेत हे आपण मागील भागात पाहिले. आता आपण मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग करून मेंदूची ही अवाढव्य आणि गुंतागुंतीची व्यवस्था आपल्या कामाला कशी लावायची हे पाहू.
आपल्या लक्षात राहाते
१०% वाचलेले
२०% ऐकलेले
५०% ऐकलेले आणि पाहिलेले
७०% एकमेकांसोबत चर्चा केलेले
९५% दुसऱ्यांना शिकविलेले
याचाच अर्थ शाळेत मुले शिक्षकांचे ऐकतात, शिक्षक फळ्यावर काही लिहितात तेव्हा त्यांच्या जास्तीतजास्त ५०% लक्षात राहते.
जेव्हा ते त्यासंबंधी youtube वर बघतात तेव्हाही केवळ ५०% लक्षात राहते.
मात्र या संबंधी ते मित्रमंडळींशी काही बोलतात तेव्हा ७०% लक्षात राहाते
आणि जर त्यांनी अन्य मित्राना शिकवले तर ९५% लक्षात राहते.
मग या माहितीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो का?
जर आसपास राहणाऱ्या मित्राचा ग्रुप असेल आणि त्यांनी एकमेकांना एखाद्या विषयातील धडे शिकविले तर चांगले लक्षात राहील, तसेच या गटात आपापसात चर्चा झाल्यामुळे सर्वांच्या किमान ७०% लक्षात राहील.
विशेषतः ही पद्धत विज्ञान आणि इतिहास या विषयात खूप उपयोगी ठरते हा अनुभव आहे. चार पाच मित्रांचा गट करावा. प्रत्येकाने काही धडे वाटून घ्यावेत. विज्ञानाचा/इतिहासाचा धडा पुस्तकातून नीट समजावून घेतला, त्या संबंधी अधिक माहिती youtube वरून मिळविली. नंतर त्याचे एक powerpoint presentation करून अथवा अन्य मार्गांनी आपल्या गटातील बाकीच्या मित्रांना हा धडा शिकवावा. नंतर त्यावर चर्चा घडवून आणावी. यामुळे तो धडा शिकविणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्या बाबत खोलवर अभ्यास होईल, ९५% लक्षात राहील. त्यावरील चर्चेने गटामधील बाकीच्या विद्यार्थ्यांच्याही ७०% लक्षात राहील. भूगोल शिकतानाही या पद्धतीचा उपयोग होऊ शकेल. या पद्धतीत मित्रमंडळींच्या सहवासात खेळीमेळीने ही चर्चा झाल्याने मनही प्रसन्न राहाते, कंटाळा येत नाही.
पुढील भागात आपण गणित आणि विविध भाषा कशा शिकाव्यात याबद्दल विचार करू.