या पूर्वी आपण या लेखमालेत चेतासंस्थेचे - अर्थात मेंदूचे काम कसे चालते याचा थोडक्यात आढावा घेतला. चेतासंस्थेला अधिक सुदृढ बनविण्यासाठी - मेंदूने आपले कां अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्या खाण्यात कोणते पदार्थ असले पाहिजेत आणि कोणते पदार्थ टाळले पाहिजेत हेही आपण पाहिले. मागील लेखात विज्ञान आणि समाजशास्त्रे यांचा अभ्यास करण्याची पद्धतही पाहिली. आता या लेखात गणित या विषयाचा अभ्यास कसा करायचा हे पाहू.
शाळेत अभ्यासाला गणिताचे पाठ्यपुस्तक लावलेले असते. आपण selfstudy करताना हे पाठयपुस्तक हाच आपला मुख्य resource आहे. पाठ्यपुस्तकात प्रत्येक विभागाला सुरुवात होताना काही गणिते सोडवून दाखवलेली असतात. ही सोडवून दाखवलेली गणिते प्रथम नीट वाचावी. त्यातील प्रत्येक पायरी (step) नीट समजून घ्यावी. त्यामागील logic समजून घ्यावे. जर एखाद्या step मागील logic समजले नसेल तर ते शिक्षकांकडून/मित्रांकडून अथवा पालकांकडून समजून घ्यावे. नंतर हेच पुस्तकात सोडवून दाखविलेले गणित पुस्तक बंद करून सोडवावे. जर सोडविता आले नाही तर परत पुस्तक उघडून आपण कोठे चुकलो ते पाहावे. नंतर परत पुस्तक बंद करून ते गणित पहिल्यापासून सोडवावे.
हे झाल्यावर त्या विभागाखाली आपल्याला सोडविण्यासाठी जी गणिते दिलेली असतात ती १,३,६,९...अशा क्रमाने सोडवावीत. शिक्षकांकडून तपासून घ्यावीत. नंतर तीन-चार दिवसांनी २,४,७,१०.. अशा क्रमाने सोडवावीत. आणखी ३-४ दिवसांनी ५,८,११.. अशा क्रमाने सोडवावीत. आपण हे पाहिले की चेतासंस्थेतील ती गणिते सोडविण्याचे विद्युत मंडल तीच कृती परत ३-४ दिवसांनी केली तर अधिक कार्यक्षम होते. पण तीच कृती लगेच अनेक वेळा केली तर ते मंडल फार कार्यक्षम होणार नाही. म्हणून गणिताच्या धड्याखालील प्रश्न या पद्धतीने सोडवावेत. हीच पद्धत अन्य विषयांखाली दिलेले प्रश्न सोडवितानाही वापरता येते.
उजळणी हा गणिताचा प्राण आहे. त्यामुळे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका मिळवता आल्या तर त्या सोडवाव्या. अन्य काही प्रकाशकांनी काढलेल्या पुस्तकातील गणिते सोडवावी.
पुढील लेखात आपण भाषा विषयाचा अभ्यास कसा करावा हे बघणार आहोत.
No comments:
Post a Comment