Wednesday, August 3, 2022

selfstudy-8

 या लेखमालेतील हा शेवटचा लेख. आपण यापूर्वी आपल्या मेंदूचे आणि चेतासंस्थेचे काम कसे चालले हे पाहिले. चेतातंतूंवरील मेदाच्या थराचे महत्व ओळखले. मागील काही लेखांत आपण विज्ञान, समाजशास्त्रे, गणित या विषयांचा अभ्यास कसा करायचा हे पाहिले. या लेखात भाषा विषयाचा अभ्यास कसा करायचा हे पाहू. 

आपल्यापैकी अनेकांना इंग्रजी ही भाषा कठीण वाटते. बोली इंग्रजी भाषा शिकविण्याचे वर्ग भरपूर पैसे कमावतात. माझी इंग्रजी भाषा नानावीपर्यंत कच्ची होती. पण आमच्या मुख्याध्यापकांनी (सामंतसर - मो.ह.विद्यालय ठाणे) आम्हाला भाषा शिकण्याची एक युक्ती सांगितली. त्यामुळे माझी इंग्रजी चांगली झाली.  कोणतीही भाषा शिकायची असेल तर तुमचे विचार त्या भाषेतून आले पाहिजेत. मराठीतून विचार करून त्याचे इंग्रजी अथवा अन्य भाषांत रूपांतर करून तुम्ही बोललात तर त्या भाषेवर प्रभुत्व येणार नाही. यासाठी रोज एक पान त्या भाषेत निबंध लिहिणे आवश्यक आहे. या निबंधाचा विषय कोणताही असावा. त्या दिवशी तुमच्या डोक्यात येईल तो विषय. हा निबंध लिहून झाला की इंग्रजी येत असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून तपासून घ्यावा. मात्र कोणत्याही विषयाच्या शिक्षकाकडून नको. बहुसंख्य शिक्षकांना चुका काढून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खच्ची करण्याची सवय असते. म्हणून शिक्षक नकोत. घरातील अथवा ओळखीची कोणीही व्यक्ती, जी ढोबळ चुका प्रेमाने दाखवू शकेल अश्या व्यक्तीकडून हा निबंध तपासून घ्यावा. रोज असा एक निबंध लिहिला की काही महिन्यात आपण निबंध लिहिण्यास बसलो की आपले विचार त्या त्या भाषेत सुरु होऊ लागतील.  इंग्रजी पुस्तक वाचणे अथवा दिवसातून काही वेळ इंग्रजी बोलणे यापेक्षा ही पद्धत मला सुटसुटीत वाटते. 

मी गेले काही दिवस ही लेखमाला लिहितो आहे. आपल्या पाल्यांवर विश्वास ठेवणे हे प्रथम आवश्यक आहे. कोचिंग क्लासचे शिक्षक कदाचित विद्यार्थ्यांकडून या वर्षीचा अभ्यास करून घेतील ही, पण त्यातून आपल्या पाल्याचा आत्मविश्वास कसा जागृत होणार? पुढे तो जेव्हा व्यवसायात/नोकरीत पाऊल ठेवेल तेव्हा त्याला येणाऱ्या समस्या त्यालाच सोडवायच्या आहेत. तेथे कोठलाही कोचिंग क्लास नसेल. या समस्या सोडविण्यासाठी त्याचा आत्मविवास जागृत असायला हवा. आणि त्याच्यात आत्मविश्वास जागृत करण्याचे काम तो लहान असतानाच - त्याच्या संस्कारक्षम वयातच व्हायला हवे. कोचिंग क्लासला न जाता कदाचित त्याला आज थोडे कमी मार्क्स मिळतील. पण मिळवलेले मार्क्स 'त्याचे' असतील त्याने परिश्रमाने मिळविलेले असतील. हे मार्क्सच त्याला आत्मविश्वास देतील. 

पालकांनो, विचार करा. आपल्या मुलांना भविष्यात या जगात वावरताना आत्मविश्वास देणे हे आपले कर्तव्य आहे.  आपणास काही शंका असतील, भविष्यातही काही मदत लागली तर माझ्याशी संपर्क साधण्यास संकोच करू नका. ही लेखमाला मी येथेच संपवितो. 

No comments:

Post a Comment