मुलांशी काय बोलायचं? भाग १
मला आठवतंय मी होमस्कुलिंग म्हणजे काय? या विषयांवर बोलण्यासाठी एका पालक गटाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे मला एका पालकांनी विचारलेला प्रश्न आश्चर्यचकित करणारा होता. तो म्हणजे "होमस्कुलिंग करता म्हणजे तुमचं मूल सारखं तुमच्या डोळ्यासमोर असणार. मग तुम्हाला ते "इरिटेट" होत नाही का? सारखं त्याच्याशी बोलत राहण्याचा कंटाळा येत नाही का? आमचं मूल सुट्टीच्या दिवशी घरी असलं तरी त्याच्याशी सारखं काय बोलायचं हा प्रश्न पडतो? मग तुम्ही नक्की बोलता तरी काय?"
त्यावेळी मी या प्रश्नाला फक्त हसून उत्तर दिलं!
आपल्या मुलाशी काय बोलायचं, असा प्रश्न पालकांना पडत असेल का? हा विचार मनात तेव्हापासून घोळत असताना मला काही दिवसांपूर्वी रिबेका रोलंड यांनी लिहिलेल्या "थी आर्ट ऑफ टॉकिंग विथ चिल्ड्रेन" या नावाच्या एका पुस्तकाविषयी कळलं. मी हे पुस्तक पूर्ण वाचलेलं नसलं तरी या पुस्तकात मुलांशी काय बोलावं याविषयीच्या टिप्स मला वाचायला मिळाल्या, त्या सोप्या करून इथे मांडायचा मी प्रयत्न करतोय.
१. तू मला काय शिकवशील? या वाक्याने मुलांशी संवादाला सुरुवात करू मुलांना "शिकवण्यासाठी" त्यांच्याशी केलेल्या संवादापेक्षा, मुलांकडून "शिकण्याच्या" इच्छेने केलेला संवाद हा अधिक प्रभावी असतो.
आपण पूर्वी मुलांकडून शिकायच्या गोष्टींची यादी तयार करून तसा एखादा समर कॅम्प घेण्याचा विचार केला होता. गंमत म्हणजे या लेखिकेने सुद्धा "चल, मी तुला शिकवतो यापेक्षा तू मला काय शिकवशील" या वाक्याने संवाद कसा मस्त बहरतो, हेच सुचवले आहे! म्हणजे या दिवाळीत आपण असा प्रयोग करून बघायला हरकत नाही!
२. तू आणि मी चिडल्यावर घाबरल्यावर, दुःखी असू तर किंवा कुणाकडून दुखावले असू तर आपण कसे रिऍक्ट होतो? या विषयावर आपण गप्पा मारू शकतो. गप्पा मारता मारता अशा वेळी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत आपला राग, आनंद, दुःख, भीती कशी व्यक्त करायची याच्या टिप्स आपण शेअर करू शकतो.
३. तुला अशी एखादी गोष्ट आठवतेय जी करताना तुझ्या मनात प्रचंड भीती होती, अस्वस्थता होती तरीही ती गोष्ट तू केलीस? तेव्हा तुला कसं वाटलं?
हे बोलता बोलता भीती आणि त्या अनुषंगाने एकीकडे धोकादायक कृत्य तर करायचं नाही पण दुसरीकडे भीतीमुळे मागं राहून संधीही घालवायची नाही, हे कसं जमवायचं हे उदाहरणांतून मुलांना सांगत आपण संवाद वाढवू शकतो. मग त्यात हेल्मेट घालणे असेल, गिर्यारोहण असेल किंवा मग बेफिकीरपणे रस्त्यावर सायकल, गाडी चालवणं असे, अशा विषयांवर गप्पा होऊ शकतात.
४. अशी कुठली ऍक्टिव्हिटी आहे जी करताना तुला स्ट्रेस तर येतो पण मजा पण येते ?
हे बोलता बोलता आपण स्ट्रेस ही काही दरवेळी वाईटच गोष्ट असते असं नाही तर स्ट्रेस घेतल्याने आपण दोन पावलं पुढं देखील कसं जाऊ शकतो? हे सांगू शकतो. तसेच कष्ट घेणं ही काही वाईट किंवा कमी पणाची गोष्ट नाहीये, उलट अनेकदा कष्ट आपल्या प्रगतीसाठी कसे गरजेचे असते हेही सांगू शकतो.
५. तुला सगळ्यात जास्त सुरक्षित कधी वाटतं आणि का?
मला माहिती नाहीये आपण कितीवेळा या विषयवार आजपर्यंत मुलांशी बोलले असू. पण मला वाटतं की हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मूल जेव्हा बोलण्याच्या मनस्थितीत असेल, आजूबाजूला योग्य वातावरण असेल तेव्हा हा प्रश्न आपण विचारून बघितलाच पाहिजे! याचे फायदे काय आहेत? हे मी सांगण्याची गरज नसावी!!
पुढचे पाच मुद्दे पुढच्या भागात..
महत्वाचे: अशा प्रकारे संवाद करत असताना, घरातील वातावरण, मुलाचा आणि आपला मड या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे मुलांशी संवाद सुरु करण्याआधी मुलाला कंफर्टेबल वाटेल असं वातावरण तयार करण्यावर भर दिला पाहिजे नाहीतर हा संवाद "बॅकफायर" होऊ शकतो!!
क्रमशः
चेतन एरंडे
No comments:
Post a Comment