Saturday, December 10, 2022

माया-ब्रह्म

 मायेच्या पांघरुणासंबंधी लिहिण्याचे मी आश्वासन दिले होते. प्रथमदर्शनी 'मायेचे पांघरूण' ही काहीशी गूढ संकल्पना वाटते. पण त्यासंबंधी जाणून घेतल्यावर तो आपला नित्याचा अनुभव आहे हे लक्षात येते.  अद्वैत वेदांत कोणत्याही गूढ गोष्टी सांगत नाही. आपल्या रोजच्या अनुभवांचे विश्लेषण करते. मायेच्या पांघरुणासंबंधी आणि त्यातून ब्रह्म कसे डोकावत असते हे समजण्यासाठी आपण प्रथम ब्रह्म म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. 

'सत्-चित्-आनन्द' हे ब्रह्माचे त्रिगुण स्वरूप आहे. विश्वातील प्रत्येक गोष्टीत (Object) हे गुण आपल्याला ओळखता येतात. सत् ची ओळख करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. 

सोन्याचा दागिना हा मुलत: केवळ सोने आहे. या दागिन्यातून काही पद्धतीने सोने काढून घेतले तर तो दागिना राहणार नाही. जर ते सोने वितळले तर तो दागिना राहणार नाही. त्या सोन्यापासून अन्य दागिनेही घडविता येतील. म्हणजेच दागिना नष्ट केला तरी सोने तसेच राहाते. म्हणजेच सोन्याचा उपयोग व्हावा म्हणून त्याला एक रूप दिलेले आहे आणि एक नाव दिलेले आहे. वस्तूत: ते केवळ सोने आहे. तसेच मातीचा घट ही केवळ माती आहे. मातीला उपयोगासाठी एक रूप दिलेले आहे आणि नाव दिलेले आहे. समुद्रातील लाट ही केवळ समुद्राचे पाणी आहे. तिच्या त्या रुपाला आपण 'लाट' असे संबोधतो. त्यातून पाणी काढले तर त्या लाटेला अस्तित्व उरणार नाही. परंतु ती लाट फुटल्यावर पाणी तसेच राहाते. 

तसेच हे विश्व म्हणजे केवळ 'सत्' म्हणजे अस्तित्व आहे.  विश्वातील प्रत्येक गोष्ट (Object) म्हणजे अस्तित्वाला दिलेले नाम-रूप आहे. त्या गोष्टींतू अस्तित्व काढून घेतले तर ती वस्तू राहणार नाही. ही गोष्ट प्रथमदर्शनी विचित्र (Absurd) वाटते. कारण प्रत्येक गोष्टीचा 'अस्तित्व' हा गुण आपण गृहीतच धरलेला असतो.

या वस्तूला 'अस्तित्व' हा गुण आपणच प्रदान केलेला असतो.  विस्तवावर एक भांडे ठेवले आहे. त्यात पाणी आहे आणि त्या पाण्यात काही बटाटे उकडत ठेवले आहेत. बटाटे आता गरम झाले आहेत. बटाट्यामधील उष्णता हा बटाट्याचा अंगभूत (Intransic Property) गुणधर्म नाही. हा गुणधर्म बटाट्याने पाण्याकडून उधार (Incidental Property) घेतला आहे. बटाटा गरम पाण्यातून बाहेर काढला तर थोड्याच वेळात थंड होईल. बटाट्याचा आकार आणि वस्तुमान मात्र त्याचा अंगभूत गुणधर्म आहे. तसेच भांड्यातील पाण्याचाही उष्णता हा अंगभूत गुणधर्म नाही. पाण्याने ती उष्णता भांड्याकडून घेतली आहे. पाण्याचा आकारही पाण्याने भांड्याकडून घेतला आहे. पाण्याचे वस्तुमान हा मात्र पाण्याचा अंगभूत गुणधर्म आहे. विस्तवावर ठेवलेल्या भांड्याचाही उष्णता हा मूलभूत गुणधर्म नाही. त्याने तो अग्नीकडून उधार घेतलेला आहे. मात्र आकार आणि वस्तुमान हा भांड्याचा मूलभूत गुणधर्म आहे. अग्नीचा मात्र उष्णता हा मूलभूत गुणधर्म आहे. उष्णता काढून घेतली तर अग्नी राहणार नाही. 

तसेच अस्तित्व हा गुण प्रत्येक गोष्टीला आपणच प्रदान केलेला असतो. आपल्या ज्ञानेंद्रियांना ती वस्तू जाणवते म्हणून ती तेथे असते. अन्यथा ती वस्तू तेथे आहे असे आपण केवळ तर्काने सांगू शकतो.  त्या वस्तूचे अस्तित्व केवळ आपल्या अस्तित्वाच्या परिक्षेत्रात असते.  अस्तित्व हा आपला म्हणजेच ब्रह्माचा मूलभूत गुण आहे. या विश्वातील प्रत्येक गोष्ट हा गुण आपल्याकडून उधार घेत असते. 

आता ब्रह्माच्या दुसऱ्या गुणांचा म्हणजेच चित् या गुणाचा विचार करू. चित् म्हणजे चैतन्य. चैतन्य हे विश्वात सगळीकडे भरलेले आहे. खरे तर 'भरलेले' हा शब्दच चुकीचा आहे. विश्व म्हणजे एखाद्या भांड्यासारखे असून त्यात चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे असा त्याचा अर्थ नाही. हे विश्व म्हणजे मूलभूत चैतन्यच आहे असा याचा अर्थ आहे.  आपण स्वप्न बघतो. स्वप्नातील विश्व आपल्यापुढे आकार घेते. स्वप्नाच्या पातळीवर त्या विश्वातील सर्व घटना 'सत्य' असतात. हे स्वप्न आपल्या 'मनात' घडत असते. स्वप्नाला कच्चा माल आपले मन पुरवीत असते. म्हणजेच स्वप्नातील विश्व हे आपले केवळ मन असते.  तसेच आपले जागृतीतील विश्व चैतन्यात आकार घेत असते. या विश्वातील सर्व दृश्ये, गोष्टी (Objects) यांचा कच्चा माल (Raw Material) केवळ आपले चैतन्य असते.  मग आपल्याला हे चैतन्य सर्व गोष्टीत जाणवत का नाही? आकाशात सर्वत्र प्रकाश पसरलेला असतो. पण अवकाशात गेले की सर्वत्र अंधार पसरलेला दिसतो. मात्र एखादी वस्तू या  प्रकाशाच्या वाटेत आली तर त्या वस्तूवरून प्रकाश परावर्तित होतो आणि आपल्याला प्रकाशाचे अस्तित्व जाणवते. म्हणजेच प्रकाशाचे अस्तित्व जाणण्यासाठी एखादी वस्तू तेथे असणे आवश्यक आहे. तद्वतच चैतन्याचे अस्तित्व जाणण्यासाठी तेथे सजीव वास्तूचे अस्तित्व आवश्यक आहे.  एखादी सजीव वस्तू असेल तर तेथे चैतन्य प्रकट होते, आपल्याला ते जाणवते. 

'आनंद' हा ब्रह्माचा तिसरा गुण. ब्रह्माचा अनुभव झाल्यावर सर्व चिंता नाहीशा होतात. आनंदाचे झरे फुटतात. 

अशा या 'सत्-चित्-आनन्द' रुपी ब्रह्मावर मायेने पांघरूण टाकले आहे. माया ही ब्रह्माचीच एक शक्ती आहे. या शक्तीत 'आवरणशक्ती' आणि 'विक्षेपशक्ती' या दोन शक्ती अंतर्भूत आहेत. आवरणशक्ती ब्रह्मावर आवरण टाकते. यातुन ती ब्रह्माला झाकून टाकण्याचा प्रयत्न करते. (परंतु ब्रह्म पूर्णपणे झाकले जात नाही). विक्षेपशक्ती ब्रह्माच्या ठिकाणी अन्य काहीतरी आहे असा आभास निर्माण करते. अंधाऱ्या खोलीत दोर (रज्जू) पडलेला आहे. अंधारामुळे आपल्या सापाच्या खऱ्या स्वरूपाचा बोध होत नाही. मात्र तेथे साप (सर्प) असल्याचा भास होतो. तसेच हे आहे. आपल्यासमोर मातीचे भांडे (घट) ठेवले असता खरे तर केवळ घटाचा आकार दिलेली माती ठेवलेली असते. अन्य काहीही नसते. या मातीला घटाचे रूप दिलेले असते आणि त्या रुपाला 'घट' असे नाव दिलेले असते. त्याकडे बघताना आपण मातीकडे बघत आहोत हे आपल्या झटकन लक्षात येत नाही. हीच ती आवरणशक्ती. आपले त्या मातीच्या रुपाकडे लक्ष जाते आणि आपण त्याला 'घट' असे संबोधतो. हीच ती विक्षेपशक्ती. या विश्वातील विविध गोष्टींकडे बघताना त्या गोष्टींचे  'सत्-चित्-आनन्द' असे ब्रह्मस्वरूप आपल्या झटकन लक्षात येत नाही. आपण त्या गोष्टींच्या नाम-रूपातच अडकतो. यालाच 'मायेचे पांघरूण' असे म्हणतात. अर्थात या सर्व गोष्टींतून  'सत्-चित्-आनन्द'रुपी ब्रह्म डोकावत असतेच. आपण ध्यानपूर्वक पाहिले तर ते लक्षात येते. 

माझ्यात आणि आपण सर्वांच्यात या मायेच्या पांघरुणाआडून डोकावणाऱ्या ब्रह्माला ओळखण्याची क्षमता प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 

No comments:

Post a Comment