Tuesday, June 2, 2026

अद्वैत वेदांत - २ (२०२६)

अद्वैत वेदांत हे सहा हिंदू दर्शनांमधील सर्वात अर्वाचीन दर्शन आहे. हे दर्शन उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे या तीन गोष्टींवर आधारलेले आहे. म्हणून त्यांना 'प्रस्थानत्रयी' असे नाव आहे. उपनिषदे हा वेदांमधील अध्यात्मविषयक भाग आहे. वेदांत म्हणजे वेदाचा शेवटचा भाग असे नसून वेदातील महत्वाचा भाग आहेत. 'अंत' याचा अर्थ येथे 'उच्चतम पातळीवर पोचलेले' असा आहे.


चार वेदात एकूण १०८ उपनिषदे आहेत. त्यापैकी ११ प्रमुख आहेत. ही उपनिषदे प्रमुख मानतात कारण त्यावर आद्य शंकराचार्यांनी आपले भाष्य लिहिले आहे. आद्य शंकराचार्य या दर्शनाचे संस्थापक नसून प्रमुख प्रेनेते आहेत. या अकरा उपनिषदांपैकी एका - मांडुक्य उपनिषदावर आद्य शंकराचार्यांच्या गुरूंच्या गुरूंनी भाष्य लिहिले आहे. ते ही या दर्शनात महत्वाचे समजले जाते. अकरा प्रमुख उपनिषदे पुढील प्रमाणे
क्र. उपनिषदाचे नाव- संबंधित वेद - मुख्य विषय / विशेष महत्त्व
१ ईशोपनिषद - शुक्ल यजुर्वेद - कर्म आणि ज्ञान यांचा समन्वय. "इशावास्यमिदं सर्वम्" हा प्रसिद्ध मंत्र याच उपनिषदात आहे.
२ केनोपनिषद - सामवेद - परब्रह्माच्या स्वरूपाचे वर्णन आणि शक्ती ही ईश्वराचीच आहे हा संदेश (यक्ष आणि देवांची कथा).
३ कठोपनिषद - कृष्ण यजुर्वेद - बालक नचिकेता आणि यमराज यांचा संवाद; मृत्यूचे रहस्य आणि आत्मज्ञान.
४ प्रश्नोपनिषद - अथर्ववेद - ६ ऋषींनी पिप्पलाद ऋषींना विचारलेले प्राण, सृष्टी आणि आत्म्याविषयीचे ६ महत्त्वाचे प्रश्न.
५ मुंडकोपनिषद - अथर्ववेद - परा आणि अपरा विद्यांचे वर्णन. भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य "सत्यमेव जयते" येथूनच घेतले आहे.
६ मांडुक्योपनिषद - अथर्ववेद - सर्वात लहान उपनिषद (१२ मंत्र). 'ॐ' (ओम्) कार आणि चेतनेच्या ४ अवस्थांचे (जागृत, स्वप्न, सुषुप्ती, तुरीय) विश्लेषण.
७ तैत्तिरीयोपनिषद - कृष्ण यजुर्वेद - यात "सत्यं वद, धर्मं चर" (सत्य बोला, धर्माने वागा) हा दीक्षान्त संदेश आणि 'आनंदवल्ली' चे वर्णन आहे.
८ ऐतरेयोपनिषद - ऋग्वेद - सृष्टीची उत्पत्ती आणि आत्म्याचे स्वरूप. "प्रज्ञानं ब्रह्म" (ज्ञान हेच ब्रह्म आहे) हे महावाक्य यात आहे.
९ छांदोग्योपनिषद - सामवेद - अतिशय प्राचीन आणि मोठे उपनिषद. आरुणी आणि श्वेतकेतू यांचा संवाद, ज्यामध्ये "तत्त्वमसि" (ते तूच आहेस) हे महावाक्य आहे.
१० बृहदारण्यकोपनिषद - शुक्ल यजुर्वेद - सर्वात मोठे उपनिषद. याज्ञवल्क्य-मैत्रेयी संवाद आणि "अहं ब्रह्मास्मि" व "असतो मा सद्गमय" हे प्रसिद्ध मंत्र यात आहेत.
११ श्वेताश्वतरोपनिषद - कृष्ण यजुर्वेद - शिव (रुद्र) यांना परमेश्वर मानून भक्ती, योग आणि सांख्य तत्त्वज्ञानाचा सुंदर मेळ.
या उपनिषदांची थोडक्यात वैशिष्ट्ये:
ईशोपनिषद: हे आकाराने खूप लहान (फक्त १८ श्लोक) आहे, पण यात संपूर्ण वेदांताचे सार आहे. "इशावास्यमिदं सर्वम्" हा प्रसिद्ध मंत्र याच उपनिषदातील आहे.
कठोपनिषद: यात बालक नचिकेता आणि यमराज यांच्यातील अतिशय सुंदर आणि मार्गदर्शक संवाद आहे, ज्यामध्ये मृत्यू आणि आत्मज्ञानाचे रहस्य सांगितले आहे.
मुंडकोपनिषद: भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य "सत्यमेव जयते" याच उपनिषदातून घेतले गेले आहे.
मांडुक्योपनिषद: हे सर्व उपनिषदांमध्ये आकाराने सर्वात लहान आहे (फक्त १२ मंत्र), यात 'ॐ' (ओम्) काराची आणि चेतनेच्या चार अवस्थांची (जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय) सखोल चर्चा आहे.
बृहदारण्यकोपनिषद: हे आकाराने सर्वात मोठे आणि प्राचीन उपनिषद आहे. यात याज्ञवल्क्य, मैत्रेयी आणि जनक राजा यांचे प्रसिद्ध संवाद आहेत. "असतो मा सद्गमय" हा मंत्र याच उपनिषदातील आहे.
या सर्व उपनिषदांचा मुख्य उद्देश माणसाला 'अहं ब्रह्मास्मि' (मीच तो ब्रह्म आहे) म्हणजेच आत्मज्ञान आणि मोक्षाची अनुभूती करून देणे हाच आहे.
आपण पुढील भागात अद्वैत वेदांताच्या अभ्यासात प्रमुख मानल्या गेलेल्या ग्रंथांसंबंधी माहिती घेऊ .
©संतोष कारखानीस

Monday, June 1, 2026

अद्वैत वेदांत - १ (२०२६)

 मी परत एकदा अद्वैत दर्शनावर एक लेखमाला चालू करत आहे. 


भारतीय प्राचीन तत्वज्ञानाच्या आठ (अथवा नऊ - योग हे दर्शन आहे काय याबद्दल मतभेद आहेत) प्रमुख शाखा मानल्या जातात. या शाखांना 'दर्शन' अशी संज्ञा आहे.  प्रत्येक दर्शनाची अनेक उपदर्शने आहेत. यातील सर्वात अर्वाचीन दर्शन म्हणजे वेदांत दर्शन. वेदांत दर्शन हे वेदांमधील उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यावर आधारलेले आहे. म्हणून त्यांना 'प्रस्थानत्रयी' या नावाने ओळखतात. 



वेदांत दर्शनामध्ये अनेक उपदर्शने आहेत.

१. अद्वैत वेदांत :

यात “ब्रह्म आणि जीव एकच” असा ठाम विचार आहे.

प्रणेते — आद्य शंकराचार्य


२. विशिष्टाद्वैत वेदांत

इथे एकत्व आहे, पण त्यात भेदाची झाक आहे—जीव आणि जग हे ब्रह्माचेच अंश.

प्रणेते — रामानुजाचार्य


३. द्वैत वेदांत

“जीव आणि ईश्वर वेगळेच” असा स्पष्ट भेद मांडणारा विचार.

प्रणेते — मध्वाचार्य


४. द्वैताद्वैत (भेदाभेद) वेदांत

इथे एकाच वेळी भेदही आहे आणि अभेदही—दोन्ही एकत्र.

प्रणेते — निंबार्काचार्य


५. शुद्धाद्वैत वेदांत

सगळं काही ब्रह्मच आहे, पण जगाला माया न मानता सत्य मानलं जातं.

प्रणेते — वल्लभाचार्य


६. अचिन्त्य भेदाभेद वेदांत

“भेद आणि अभेद दोन्ही आहेत, पण ते मानवी बुद्धीला पूर्ण कळणं कठीण” असा विचार.

प्रणेते — चैतन्य महाप्रभू


आपल्याला माहीत असलेला आणि पाश्चात्य जगात मान्यता पावलेला 'हरेकृष्ण' संप्रदाय 'अचिन्त्य भेदाभेद वेदांत' या वेदान्ताच्या तत्वज्ञानावर आधारित आहे. 'ईश्वर (कृष्ण), जीव आणि जग यांच्यात भेदही आहे आणि अभेदही आहे, पण तो भेद-अभेद “अचिन्त्य” आहे—म्हणजे पूर्णपणे बुद्धीने समजून घेणं कठीण' असे हा संप्रदाय मानतो. 


या सहा वेदान्ताच्या शाखांत 'अद्वैत वेदांत' हे नाव आणि आद्य शंकराचार्यांची माहिती भारतातील जवळपास प्रत्येक हिंदू माणसाला माहित असते. शंकराचार्यांनी मांडलेला हा अद्वैत वेदांत अत्यंत तर्कशुद्ध असून ईश्वराची (ब्रह्माची) प्रचिती येण्यासाठी कोठे अन्य ठिकाणी (उदा. स्वर्गात) जाण्याची गरज नाही, भविष्याची (उदा. मृत्यू) वाट बघण्याची गरज नाही. ही प्रचिती कोणालाही येथे आणि या क्षणी येऊ शकते असे हे दर्शन मानते. किंबहुना आपण ब्रह्म नेहमीच अनुभवत असतो, पण आपल्याला त्याची ओळख नसल्याने लक्षात येत नाही असे हे दर्शन सांगते. 


आपण या लेखमालेत 'ब्रह्म हेच एकमेव आहे, ब्रह्मशिवाय काहीच नाही' हे तर्कशुद्ध पद्धतीने जाणून घेणार आहोत.  आपण ब्रह्माला का ओळखू शकत नाही, त्यासाठी काय करावे लागेल हे ही या मालिकेत पाहू. आपल्याला आपले ब्रह्मस्वरूप ओळखण्यासाठी ही मालिका नक्कीच सहायय करेल. 


पुढील लेख : अद्वैत वेदांतासंबंधी प्रमुख ग्रंथ आणि अद्वैत वेदांताची ढोबळ मांडणी यासंबंधी. 

©संतोष कारखानीस