Sunday, April 29, 2018

जात

आज का असे वाटते जातीचा रंग सच्चा आहे
आयुष्यातल्या मैत्रीचा धागा मात्र कच्चा आहे

मुंजीला जेवलो तो बर्व्या आज ब्राम्हण आहे
भंडारा लावून जेजुरी चढलो तो सुर्व्या मराठा आहे

कांबळ्याने सोललेला ऊस खाल्ला तो दलित आहे
खरंच का हेच आमच्या मैत्रीचे फलित आहे

लहानपणी खेळताना कधीच नव्हते कळले
कोणालाही लागले तरीही थुंकी लावून चोळले

चिखल असो वा माती नखशिखांत अंगभर लोळले
मैत्रीचे सारे नियम बिनदिक्कतपणे पाळले

बर्व्याचे बाबा गंभीर असताना रक्तदान केले
सुर्व्याने दिलेल्या रक्ताने बर्व्याचे बाबा वाचले

कांबळ्याने आणलेल्या औषधाचे पैसे कुणी दिले
त्यावेळी हे हिशोब कुणीच नाही मागितले

बाबा वाचले म्हणून बर्व्याने देवाला पेढे ठेवले
पण पहिले दोन पेढे मैत्रीच्या देवांना दिले

अश्रु भरल्या डोळ्यांनी छातीशी कवटाळले
एका बापामुळे तिघे पोरके होताना वाचले

सुर्व्याच्या बाबांचे कलेवर सीमेवरून आले
शत्रूच्या गोळ्यांनी शरीर पिंजून सारे गेले

जातीचे प्रमाणपत्र गोळ्यांनी नाही पाहिले
खांद्यावर घेताना तिघे हमसाहमशी रडले

अशा ह्या मैत्रीला ग्रहण कशामुळे लागले
खट्याळपणा कुणाचा अन् सारे रान पेटले

इतिहासातल्या घटनांवरून राजकारण तापले
जिवाभावाच्या मित्रांचे चेहरे कावरेबावरे झाले....

(Whatsapp वरुन साभार)

No comments:

Post a Comment