आतापर्यंतच्या विवेचनावरून हे लक्षात येते की येथे तीन प्रकारच्या गोष्टी आहेत. आपले (स्थूल आणि सूक्ष्म) शरीर, परावर्तित चैतन्य (आपल्याला जाणवणारे चैतन्य) आणि साक्षी चैतन्य. या तिघांशी आपला (आपल्या अहंकाराचा) संबंध काय?
- आपला आणि आपल्या शरीराचा (स्थूल आणि सूक्ष्म)
- आपला आणि या परावर्तित चैतन्याचा
- आपला आणि साक्षी चैतन्याचा
आपला (आपल्या अहंकाराचा) आणि परावर्तित चैतन्याचा संबंध हा 'नैसगिक' आहे. एखाद्या गोष्टीसमोर आरसा धरावा आणि नैसर्गिकपणाने त्या वस्तूचे त्यात प्रतिबिंब पडावे असा हा संबंध आहे. आपला अहंकार हा आरशासारखा आहे. आरशात प्रतिबिंब दिसणे नैसर्गिक आहे. म्हणूनच आपल्याला आपल्यातील चैतन्याची नेहमीच जाणीव असते. त्याचे आणि अहंकाराचे तादात्म्य झालेले असते. तळपत्या साक्षी चैतन्याचे ते केवळ प्रतिबिंब आहे.
आपला आणि आपल्या शरीराचा संबंध 'कर्मज' आहे. वेदांताप्रमाणे आपले शरीर हे पूर्वकर्मानुसार मिळालेले आहे. या कर्मातील काही भाग (पुण्य आणि पाप कर्म) या जन्मात फलित होणार आहे. त्याला वेदांतात 'प्रारब्ध' म्हटले आहे. हे प्रारब्ध संपवून आपण या स्थूल शरीराचा त्याग करणार आहोत.
आपला आणि साक्षी चैतन्याचा संबंध 'भ्रान्तिजन्य' आहे. आपला म्हणजेच आपल्या अहंकाराचा आणि साक्षी चैतन्याचा काहीही संबंध नाही. तो केवळ एक आरसा आहे. केवळ अपघाताने त्यात साक्षी चैतन्याचे प्रतिबिंब पडले आहे. म्हणूनच आपल्याला मुक्ती मिळणे हा भ्रम आहे असे वेदांत मानते. आपण मुक्तच आहोत. आपले तादात्म्य अहंकाराशी झाल्याने आपल्याला आपण बद्ध झाल्यासारखे वाटते. आपला आणि आपल्या अहंकाराचा हा भ्रांतीजन्य संबंध लक्षात आला की आपल्याला मुक्तीचा अनुभव येतो (आपण कायम मुक्तच आहोत, अनुभव तेव्हा येतो) असे वेदान्ताचे उच्चारवाने प्रतिपादन आहे. ही मुक्ती 'आपल्याला' म्हणजे आपल्या 'अहंकाराला' मिळत नाही तर अहंकाराने निर्माण केलेल्या भ्रमापासून आपली मुक्ती असते. आपल्याला आपल्यापासूनच (आपल्या अहंकारापासून) मुक्ती मिळते. त्यानंतरही अहंकार असतोच, त्यात साक्षी चैतन्याचे प्रतिबिंबही असते. हाच अहंकार आपल्याला आपल्या पुढील आयुष्यात उपयोगीही असतो. मात्र आता त्याचे खरे स्वरूप आपल्याला समजलेले असते. त्यामुळे हा अहंकार आता आपल्या जीवनात नव्या समस्याच उभ्या करीत नाही तर आपल्याला उपयोगी कामे करतो. एखादा रानटी हत्ती खूप उपद्रवी असतो, पण माणसाळविला की तोच आपली मोठी कामे करतो तसेच या अहंकाराचे आहे.
अंधाऱ्या ठिकाणी एक दोर पडलेला असतो. आपण त्याला साप समजतो आणि घाबरतो. ही भ्रांती दूर करण्यासाठी कोणत्या काठीची गरज नाही, तर हा साप नसून दोर आहे या ज्ञानाची गरज असते. हे ज्ञान झाल्यावर तो दोर तेथेच असतो, पण आता त्याची भीती वाटत नाही. तसेच आपला अहंकार म्हणजे 'मी' नव्हे हे समजण्यासाठी केवळ ज्ञानाची गरज असते. हे समजल्यावर तो अहंकार तेथेच असतो, पण आपल्यापुढे समस्या उभ्या करत नाही असे वेदांत सांगते. हाच तो वेदांतात सांगितलेला ज्ञानयोग!
आता आपण (अहंकार) आणि आपले शरीर, आपण आणि हा परावर्तित चैतन्य, आपण आणि साक्षी चैतन्य यातील संबंध कसा तोडायचा हे आपण पाहू.
- आपला (अहंकाराचा) आणि परावर्तित चैतन्याचा संबंध हा नैसर्गिक आहे हे आपण पहिले. जेव्हा या अहंकाराच्या आरशासमोर साक्षी चैतन्य येईल तेव्हा त्या आरशात त्याचे प्रतिबिंब दिसणारच. जेव्हा जेव्हा आपले मन कार्यरत असते तेव्हा मनाचा भाग असलेला अहंकारही कार्यरत असणार आणि तो स्वत:ला या प्रवर्तित चैतन्याशी एकरूप करणार. फक्त गाढ झोपेत (सुषुप्ती) मन कार्यरत नसणार आणि तेव्हाच अहंकार कार्यरत नसेल आणि हा संबंध तुटेल. अन्य वेळी हा संबंध तोडणे शक्य नाही.
- आपला (अहंकार) आणि आपल्या स्थूल शरीराचा संबंध कसा तोडता येईल? हा संबंध 'कर्मज' आहे. ज्यावेळी आपली सर्व प्रारब्ध कर्मे नष्ट होतील तेव्हा आपले सूक्ष्म शरीर हा देह सोडून अन्य देहाशी संलग्न होईल आणि आपला या देहाशी संबंध तुटेल.
- आपला (अहंकार) आणि साक्षी चैतन्याचा संबंध कसा तुटेल? हा संबंध भ्रांतीजन्य आहे. म्हणजेच अहंकारामुळे मला माझ्या स्वत्वाची जाणीव नाही. मी खरा साक्षी चैतन्य आहे याची जाणीव नाही. केवळ ज्ञानाने, जागृतीमुळे हा भ्रांतीजन्य संबंध तुटेल आणि आपल्याला आपल्या स्वत्वाची जाणीव होईल असे वेदांत मानते. ही जागृती आपली नसेल, आपल्या भासमान अस्तित्वाची - अहंकाराची - नसेल तर या भासमान अस्तित्वाची जाणीव असेल, आपण म्हणजे अहंकार नव्हे याची जाणीव असेल. मी या देहात बद्ध नाही तर मी हे अनंत, निराकार अस्तित्व आहे याची ती जाणीव असेल. या देहाला मुक्ती नाही, या अहंकाररुपी स्वत्वाच्या जाणिवेला मुक्ती नाही. हा देह, ही अहंकाराची जाणीव नाशवंत आहे. आपण सदा सर्वकाळ मुक्तच आहोत, अनादी-अनंत आहोत.
ज्ञानाच्या साहाय्याने आपण अज्ञानाचे दोर कापू शकतो. याने आपला अहंकार (व्यावहारिक अर्थाने आपण) आणि परावर्तित चैतन्य यांचा संबंध तुटणार नाही. परंतु आपल्याला आपल्या स्वत्वाची जाणीव झाल्याने हा अहंकार आपल्याला मदतच करेल, बाधा आणणार नाही.
हे अज्ञानाचे दोर कसे कापायचे हे आपण नंतरच्या लेखात पाहू.
स्वामी सर्वप्रियानंद यांची व्याख्यानं ऐकतांना हा ब्लॉग समोर आला. वेदांतावर सूत्रबद्ध रीतीने केलेलं विवेचन भावलं, वाचन चालू आहे. खूप खूप धन्यवाद.👌
ReplyDelete