Saturday, May 16, 2020

पंचांग - महिने

आपले पंचांग अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविले गेले आहे. ग्रेगेरीयान महिन्यांप्रमाणे आपले महिने हे कसेही (२८-२९-३०-३१ दिवसांचे) नसून त्याचा चंद्राच्या कलांशी म्हणजेच निसर्गाशी मेळ घातला आहे. पूर्वीच्या काळी रात्रीच्या अंधारात आकाश स्पष्ट दिसत असे. आपल्या पूर्वजांनी आकाशातील तारे सर्वसाधारणपणे स्थिर असतात तर ग्रह जागा बदलतात हे निरीक्षण केले होते. त्यांनी चंद्राच्या कलेवरून चांद्रमास ठरविले. परंतु चांद्रमास आणि ऋतू यांचे गणित बसविण्यासाठी वर्षाची सूर्याच्या गतिशी सांगड घालणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी वर्षाचे महिने ठरविताना सूर्य महिन्याच्या सुरुवातीला सूर्योदयाला कोणत्या राशीत आहे याची सांगड घातली. आकाशातील ताराकासमुहाचे अंदाजे सारखे बारा भाग पाडून (राशी) त्यातून दिसणाऱ्या आकारावरून त्यांना नावे दिली. सूर्य नव्या महिन्यात कोणत्या राशीत उगवतो याचे निरीक्षण केले आणि त्यावरून महिन्यांची नावे दिली. सूर्य कधी कधी लागोपाठ दोन महिने एकाच राशीत उगवतो. म्हणजेच हे दोन्ही महिने त्यामुळे एकाच नावाने ओळखले जातात. यातील पहिला महिना अधिक मास म्हणून ओळखला जातो. या पद्धतीने चांद्रमासाची सूर्यमासाबरोबर सांगड घातली गेली आणि आपले महिने आणि ऋतू यांचा मेळ बसला. मुस्लीम कॅलेंडरमध्ये असे न केल्याने त्यांचे महिने आणि ऋतू यांचा मेळ बसत नाही. चीनी पद्धतीत अशीच काही युक्ती करून चांद्रमास आणि सुर्यमास यांचा मेळ घातला आहे. तेथेही अधिक महिना असतो.
काही राशी थोडी लांब पसरलेल्या आहेत तर काही लहान जागेत सामावली गेली आहेत. जी थोडी लांब आहेत त्यामध्येच अधिक महिना येऊ शकतो. चैत्र ते अश्विन या मासातच अधिक मास येऊ शकतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो, पण मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांत अधिक मास कधीही येत नाही. अधिक मास जुलै ते ऑक्टोबर या महिन्यांतच येतो.
क्वचित सूर्य एका महिन्यात दोन राशी पुढे सरकतो. यावेळी एखादा महिना येताच नाही म्हणजेच क्षय मास येतो. क्षयमास आकाराने लहान राशी असलेल्या महिन्यातच, म्हणजे मार्गशीर्ष, पौष आणि माघ महिन्यातच येतो.अलीकडच्या काळात इ.स.१९८३मधला माघ महिना हा क्षयमास होता. या पुढचा क्षयमास हा इ.स.२१२३मध्ये येईल.

No comments:

Post a Comment