Sunday, May 31, 2020

सप्तचिरंजीव १ महाबली लेखक : अभिजित खेडकर

#सप्त_चिरंजीव_१_महाबली लेखक अभिजित खेडकर ((फेसबुक पोस्टवरून)

सप्त चिरंजीवांच्या श्लोकात उल्लेख आल्याप्रमाणे प्रथम नाव अश्वथाम्याचं येतं, परंतू जन्म कालक्रमानुसार पुराणकाळातील बळी किंवा महाबली याचा या यादीत पहिला क्रमांक लागतो.

Image may contain: 2 peopleबळी हा विष्णुभक्त प्रल्हादाचा पुत्र विरोचन याचा मुलगा. दक्ष प्रजापतीच्या दोन कन्या दिती आणि आदिती यांचा विवाह कश्यप ऋषींशी झाला. दिती पासून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोन पुत्र झाले, त्यांच्या वंशाला दैत्य (दितीपासून झालेले) असे संबोधले गेले, तर आदिती चा पुत्र इंद्र उत्पन्न झाला, त्याच्या वंशाला देव संबोधले गेले. नृसिहांनी हिरण्यकश्यपू चा वध केल्यावर त्याचा पुत्र प्रल्हाद दैत्यांचा राजा झाला. प्रल्हादाचा पुत्र विरोचन याला बळी हा पुत्र झाला.

देवांचे गुरु बृहस्पती आणि दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांच्या परस्पर विरोधी तत्वज्ञानाचा परिपाक म्हणून देव आणि असुर यांच्यात झालेल्या देवासुर संग्रामात अनेक वेळा दैत्यांना पराभव पत्करावा लागला. समुद्र मन्थनातून निघालेल्या अनेक शक्तींच्या सहाय्याने इंद्राने बळीचा वध केला. देव अमृत मिळवून अमर झाले, पण शुक्राचार्यांनी आपल्या मंत्रबलाच्या सामर्थ्याने बळी ला पुन्हा जिवंत केले. बळीने ब्रम्हांची तपश्चर्या करून स्वतःला अधिक सामर्थ्यशाली बनवले. गुरु शुक्राचार्यांच्या सल्ल्यानुसार त्याने शंभर अश्वमेध यज्ञ पूर्ण करायचा संकल्प सोडून तिन्ही लोकांवर, म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यावर आपले राज्य स्थापित केले.

आपल्या सामर्थ्याच्या बळावर नव्याण्णव अश्वमेध यज्ञ पूर्ण करून शेवटच्या शंभराव्या यज्ञाची तयारी करीत असतांना विष्णूंनी वामन अवतार घेऊन त्याच्याकडून तीन पद भूमी दान मागितली. शंभराव्या यज्ञपूर्ती नंतर खरंतर त्याचं त्रैलोक्याचं राज्य अखंड काळापर्यंत अबाधित राहीलं असतं. परंतू दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवायचं नाही या भूमिकेमुळे म्हणा किंवा माझ्या दारी प्रत्यक्ष विष्णूला याचक म्हणून यावं लागलं या अहंकारामुळे म्हणा, त्याने शुक्राचार्यांच्या विरोधाकडे साफ दुर्लक्ष करून वामनाची मागणी पूर्ण केली. एका पदात स्वर्ग, दुसऱ्यात पृथ्वीचं राज्य देवांसाठी दान देऊन, तिसरं पाउल ठेवायला जागाच उरली नाही म्हणून स्वतःच्या मस्तकावर पाउल ठेऊन घेत स्वतः पाताळाचं राज्य स्वीकारलं. विष्णूंनी त्याच्या भक्तीवर आणि दानीवृत्तीवर प्रसन्न होऊन त्याला चिरंजीवित्वाचं वरदान दिलं आणि त्याच्या विनंती नुसार स्वतः त्याच्या पातालसाम्राज्याचे रक्षक म्हणून बळी चे द्वारपाल ही भूमिका स्वीकारली. हि कथा आपणा सर्वांनी लहानपणापासून ऐकलीये, वाचलीये.

No photo description available.या बळी चे म्हणजेच महाबली चे राज्य पूर्वे पासून पूर्ण दक्षिण भारतापर्यंत पसरलेले होते. दक्षिण भारतात त्याला महाबली चा अपभ्रंश म्हणून मावेली असेही संबोधिले जाते. दरवर्षी केरळ मध्ये ओणम हा उत्सव याच महाबलीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. आपलं पाताळाचं राज्य सोडून महाबली आपल्या या प्रजेला दर्शन देण्यासाठी ओणम च्या वेळी खास केरळ मध्ये येतो अशी वदंता आहे. बळीला त्याची पत्नी वेदवल्ली हिच्या पासून सहा पुत्र होते, ज्यांच्या सहित तो या प्रदेशावर राज्य करत होता. त्यांची नावे अंग, वंग, कलिंग, सुम्ह, पौंड्र आणि आंध्र. यांच्याच नावाने पुढे त्यांची राज्ये बंगाल पासून ते आंध्रप्रदेशा पर्यंत वसवली गेली. यांच्या सोबतच बाणासुर नावाचाही एक पुत्र बळी ला होता असेही मानतात. या बाणासुराने आपल्या पित्याचा अपमान सहन न होऊन वामनाला विरोध केला, तेव्हा वामनाच्या रुपात असलेल्या विष्णूंनी त्याला पुढच्या मन्वंतरात पुढचा इंद्र हा बळी हाच असेल असेही वचन दिले.

No photo description available.महाबली हा स्वतः एक उत्कृष्ट कवीही होता. त्याने श्री विष्णूच्या स्तुतीपर लिहिलेले "हरीनाम माला स्तोत्र" हे अजूनही सुपरिचित आहे. पंडित जसराज यांनी गायलेले "ओम नमो नारायणा" हे सुप्रसिध्द भजन याच स्तोत्रातील आहे.

वामनाने जेव्हा बळी ला पाताळ लोकात जाण्याची आज्ञा केली तेव्हा तो त्याच्या जहाजात बसून दक्षिणपूर्व आशिया च्या बेटांना भेट देत ऑस्ट्रेलिया मार्गे पाताळात अर्थात दक्षिण अमेरिकेत पोहचला आणि तेथे पोहोचून त्याने आपल्या राज्याची स्थापना केली. या मार्गाचे वर्णन वाल्मिकी रामायणात किष्किंधा कांडात वाचायला मिळते. जेव्हा सुग्रीव सीतेला शोधण्यासाठी जे वानर सैन्य पाठवतो त्यात त्यांना तो या मार्गाचे सविस्तर वर्णन सांगतो. या वर्णनात पेरू देशातील अँडीज पर्वतावरचा हजारो फुट कोरलेला त्रिशुळाच्या आकाराचा तालवृक्ष, न्यूझीलंड मधील सुदर्शन नावाने वर्णन केलेला अतिशय रम्य असा पुकाकी तलाव, पॅसिफिक महासागरातल्या उकळत्या ज्वालामुखींच म्हणजेच रिंग ऑफ फायर च वर्णन अगदी तंतोतंत मिळत.

दक्षिण अमेरिकेतल्या अतिशय प्राचीन माया संस्कृतीचा मुळ पुरुष मयासुराने बळी साठी तेथे नवीन वसाहत वसवली. बळीचा राजमहाल हा तीन पुरांचा म्हणजेच तीन मोठ्या महालांचा बांधला, त्या मुळे त्याला त्रिभूवनांक म्हणजे तीन भुवनांचा स्वामी संबोधलं गेलं. तोच भाग आजही बोल्विया प्रांतात तियाहुनान्को (Tiahuanaco किंवा Tiwanaku ) या नावाने प्रसिध्द आहे. बळीने वेगवेळी सात नवी नगरे तेथील प्रजेसाठी वसवली त्याला नवतल (नवीन नगर) हे नाव रूढ झालं असं मानलं जात.

याच पेरू देशात वसणारी इंका हि अतिशय प्राचीन संस्कृती. त्या संस्कृती चा उद्गाता मानला जाणाऱ्या विराकोचा (Viracocha) ह्याची मूर्ती याच तीयाहुनान्को भागात कालासासाया (Temple of Kalasasaya) या मुक्त आकाशाखाली असलेल्या मंदिरात बघायला मिळते. इंका च्या प्राचीन साहित्यात उल्लेख केल्याप्रमाणे विराकोचा हा पॅसिफीक समुद्र ओलांडून लांब नौकांमधून हजारो वर्षांपूर्वी पेरू च्या समुद्र किनाऱ्यावर आला. त्याने त्या ठिकाणी मातीपासून प्रजेची निर्मिती केली. त्या प्रजेला कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान ह्या सारख्या अनेक गोष्टीत पारंगत बनवलं, एक प्रगल्भ संस्कृती उभी केली आणि काही कालावाधी नंतर पुन्हा कधीही परत न येण्यासाठी समुद्रावर चालत, ज्या दिशेकडून आला होता, त्याच दिशेने निघून गेला, अशी आख्यायिका त्याच्या बद्दल सांगितली जाते. या विराकोचाने आकाश (Hanan pacha), आंतरिक पृथ्वी अर्थात पाताळ (Uku pacha) आणि बाह्य पृथ्वी (Cay pacha) यावर प्रभुत्व मिळवलं होतं अस इन्काज मानतात.

ह्या विराकोचाचं बरचसं वर्णन महाबलीच्या कथेशी मिळतं-जुळतं आहे आणि विराकोचा हे नावही महाबली च्या पित्याशी म्हणजेच विरोचनाशी साधर्म्य दाखवणारं आहे. विराकोचा ज्या लांब बोटीतून पेरू च्या समुद्र किनाऱ्यावर पोहचला, तश्याच लांब बोटीतून आजही ओणम च्या सणाच्या वेळी केरळ मध्ये नौकानयनाची स्पर्धा हजारो वर्षांपासून आयोजित केली जात असते. अर्नामली भागात पंपा नदीत होणारी हि स्पर्धा ओणम च्या परंपरेचा एक खास भाग आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या एका भाषणात म्हटल्या प्रमाणे पाश्चात्य जनता हि विरोचानाची वंशज आहे हे वाक्यही या साधर्म्याला पुष्टी देतं. (Source: Talks with Vivekananda: Publisher- Advaita Ashram, Mayavati, Himalayas, January 1939.)

अर्थात या सगळ्या महाबली बद्दलच्या आख्यायिका असल्या तरी आधुनिक काळात कुणालाही महाबलीचं दर्शन झाल्याचा उल्लेख मात्र अजिबात सापडत नाही. "इडा पिडा टळो, बळीचे राज्य पुन्हा येवो" या जनभावनेच्या इच्छेतून, दिवाळीतल्या बलीप्रतिपदेच्या पूजनातून आणि ओणमच्या सणातून महाबली अजूनही आपल चिरंजीवित्व राखून आहे, हे तितकच खरं.

©अभिजीत खेडकर.
9420602780.

माहिती संदर्भ - गुगल, विकिपीडिया,
फोटो सौजन्य - गुगल.


सप्त चिरंजीव प्रस्तावना लिंक -
https://www.facebook.com/ekalabhi/posts/3028702153894310

No comments:

Post a Comment