Sunday, May 31, 2020

सप्तचिरंजीव प्रस्तावना लेखक : अभिजित खेडकर

अभिजित खेडकर यांच्या फेसबुक पोस्टवरून साभार 

भारतीय प्राचीन इतिहासातल्या अनेक गूढ संकल्पना आणि गोष्टींच गूढ आजही हजारो वर्षांनंतर तसच कायम आहे. पुराणांमध्ये वर्णन केलेले दशावतार, त्यातही अजून न झालेला आणि हे कलियुग संपवणारा कल्की अवतार, समुद्र मंथनातून देवांनी प्राप्त केलेलं आणि दानवांना अप्राप्य झालेलं अमृत, त्याच तोडीची विलक्षण संजीवनी आणि सोमवल्ली वनस्पती, आणि जगातल्या कुठल्याही अन्य प्राचीन संस्कृतीत नसलेले, मृत्यू वर विजय मिळवून अमरत्वाच वरदान मिळालेले सप्त चिरंजीव...

‘अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।।’

या श्लोकात वर्णन केल्यानुसार अश्वत्थामा, बळीराजा, व्यास महर्षी, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे ते सात चिरंजीव आहेत. खरंतर, आपण सगळ्यांनी या सप्त चिरंजीवांबद्दल लहानपणा पासून ऐकलय, वाचलय. तरीही यांच्या बद्दलचे अनेक प्रश्न जे आपल्या सगळ्यांच्या मनात कधी न कधी तरी रुंजी घालून गेले असतील जसे, ह्या चिरंजीवांचं अस्तित्व नेमकं कशासाठी आहे? चिरंजीव सातच का? खरच, कुणाला असं अमर होता येतं का? यांना असा चिरंजीवी होण्याचं वरदान म्हणा, शाप म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा नेमका कुणी दिला? आणि जर हे चिरंजीव खरंच अस्तिवात असलेच तर आत्ता या काळात नेमके कुठे असतील, काय करत असतील?

ह्या सातही व्यक्ती एका काळातल्याही नाहीत. अश्वत्थामा, व्यास, कृपाचार्य हे महाभारत काळातले, बिभीषण आणि हनुमान रामायण काळातले, परशुराम रामायण पूर्व काळातले रामांच्या आधीचे अवतार आणि बळी तर वामन अवतारातला. बिभीषण आणि बळी तर चक्क असुर कुळातले, तरीही त्यांना हे वरदान मिळालं. परशुराम हे एकाचवेळी अवतारही होते आणि चिरंजीवीही. अश्वत्थाम्याला चिरंजीवीत्वाचा श्राप देणारे कृष्ण हे अवतार असून त्यांना मात्र मृत्यू आहे. अश्वत्थामा सोडून उर्वरित सहा जणांना चिरंजीवीत्व हे वरदान आहे, अश्वत्थाम्याला मात्र त्याने केलेल्या अक्षम्य पातकाचा परिणाम म्हणून मिळालेल्या मस्तकावरच्या सतत भळभळत्या जखमेमुळे हा श्राप आहे. परशुराम सोडले तर बाकीचे सगळे चिरंजीव त्या त्या काळातल्या कथेतले मुख्य नायकही नाहीत, काही जण तर बळी आणि अश्वत्थाम्या सारखे चक्क खलनायक हीआहेत.

या सगळ्यांना फक्त चिरंजीवीत्वाचं वरदान आहे, चिरतारुण्याचं नाही. मग प्रश्न उरतो कि असं गलितगात्र शरीर घेऊन वर्षानुवर्ष जिवंत रहाण्याचं नेमकं औचित्य तरी काय असेल, आणि उद्देश तरी काय असेल. कल्की पुराणात याचा उल्लेख सापडतो, कि जेव्हा कल्की अवतार होतो तेव्हा कल्की ला भेटण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी हे सर्व चिरंजीव शम्भल ग्रामी येतात. असेही म्हंटले जाते कि या सातही जणांचा उद्देश कल्की अवताराला सहाय्य करणे, आणि कलियुगाचा अंत करून पुन्हा सत्युगाची स्थापना करणे असा आहे. या सगळ्याचं चिरंजीवीत्व हे अनादी काळापर्यंत नाही तर कलियुगाच्या अंतापर्यंत आहे, त्या नंतर त्यांच्या अस्तित्वाच प्रयोजन संपेल.

या पुढच्या सात भागात आपण एकेक चिरंजीवाची चर्चा करणार आहोत. त्या प्रत्येकाचा इतिहास तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच, पण त्यांच्या बद्दल असलेल्या वेगवेगळ्या किवंदती, आख्यायिका, भारतात आणि भारताबाहेरही त्यांच्या अस्तित्वाचे दाखले देणारे स्थान, घटना आणि कथांची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात.

मी हि लेखमाला लिहितोय याचा अर्थ मला सगळ्याच गोष्टी परिपूर्णपणे माहिती आहेत असं अजिबात नाही, पण आपल्या सगळ्यांना या विषयात माहिती असलेल्या अनेक गोष्टी, संदर्भ कॉमेंट आणि लिंक च्या स्वरुपात नक्की पाठवा, कारण त्या जाणून घ्यायची माझीही खूप मनापासून इच्छा आहे. प्रत्येक शनिवारी या लेखमालेतला एक एक भाग प्रकाशित करण्याचा प्रयत्न असेल.

आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या आणि शुभेच्छांच्या अपेक्षेत...
आपला,

©अभिजीत खेडकर.

No comments:

Post a Comment