Sunday, October 10, 2021

अचपळ मन माझे - भाग ५

'मला माझ्यासाठी योग्य-अयोग्य काय आहे याचे भान आहे. परंतु ऐन वेळी माझ्या मनातील एक अनामिक शक्ती मला अयोग्य गोष्ट करण्यास भाग पाडते' असे दुर्योधनाचे सांगणे आहे. ऐन युद्धाच्यावेळी समोर आपल्याच भाऊबंदांना पाहून अर्जुनाची गात्रे कापू लागतात, यावेळी अर्जुन दुर्योधनासारखेच वक्तव्य करतो आणि श्रीकृष्णाला सल्ला विचारतो. असाच प्रश्न आपल्यालाही जीवनात अनेकवेळा पडतो. यातून मार्ग कसा काढायचा याचे उत्तर कृष्णाने दिले, ते आपण मागील लेखात पाहिले. अर्जुन आणि कृष्ण यावेळी युद्धभूमीवर उभे होते. युद्धाला प्रारंभ होण्याची वेळ आली होती. अशावेळी कृष्णाने अर्थातच थोडक्यात उत्तर दिले. याचे विस्तृत विवेचन आपल्याला निरनिराळ्या उपनिषदांत सापडते. 

आधुनिक मानसशास्त्राने आपल्या मनाचे अंतर्मन आणि बाह्यमन असे भाग केले आहेत.  अगदी असेच विभाजन आपल्या प्राचीन गंथांतही आढळते. अंतर्मनात दडलेल्या भावनांना आपल्या प्राचीन भाषेत 'संस्कार' असे नाव आहे, आपल्या पंचेंद्रियांना अथवा मनाला एखाद्या गोष्टीचा (विषयाचा) स्पर्श झाल्यास त्यासंबंधित संस्कार बहिर्मनात येतात, वृत्तींना जन्म देतात. आपण त्या वृत्तीच्या आधारे प्रतिक्रिया देतो. याच प्रतिक्रिया पुनश्च अधिक दृढ संस्कार बनून अंतर्मनात जातात. 

श्रीकृष्णाने या दुष्टचक्राला भेदण्याचा मार्ग सांगितला तो स्पष्ट आहे. आपल्याला या देहात ज्ञानेंद्रिये आहेत. त्यांना कोठल्यातरी गोष्टीचा स्पर्श होणारच. डोळ्यांना काही दिसेल, कानावर आवाज येईल इत्यादी. त्यामुळे अंतर्मनातील संस्कार जागृत होऊन बहिर्मनातही येणार. आपले त्यावर काहीच नियंत्रण नाही. मात्र बहिर्मनात त्याच्या वृत्ती बनण्यापूर्वी आपल्याला त्यांना थोपविता येते. काही क्षणांसाठी ही Opportunity Window आपल्यासाठी उघडी असते. अशा वेळी या संस्कारांना - आठवणींना - प्रतिसाद न देता म्हणजेच मनात राग-द्वेषाचे भाव उमटू न देता त्याकडे केवळ द्रष्टया भावाने बघता येते. यासाठी आपण सतत सावध - सजग असणे आवश्यक आहे. काहीजण ही सजगता मागील जन्मातूनच घेऊन येतात. आपण त्या व्हिडीओमध्ये पाहिले की काही मुले मोहावर मात करू शकली. समोर मॅशमेलो दिसत असतानाही तो खाण्याचा मोह त्यांनी आवरला. आपल्याला ही सजगता आपल्या अंगात बाणावयाची आहे, असलेली सजगता अधिक दृढ करायची आहे. 

यासाठी उपनिषदांनी काय मार्ग सांगितलं आहे ते बघू. सजगता वाढविण्यासाठी उपनिषदे विपश्यना ध्यानाचा मार्ग सुचवितात. विपश्यना ध्यानात आपण आपल्या श्वासाबाबत, शरीरावरील संवेदनांबाबत सजग बनतो. बहिर्मनात येणारा - वृत्तीत रूपांतरित होणारा प्रत्येक संस्कार आपल्या श्वासात प्रथम सूक्ष्मसा बदल घडवितो. आपल्या शरीरावर कुठेतरी कसलीतरी संवेदना जागवितो. आपण याबाबत खूप जागरूक असू तर आपल्याला हा बदल लगेच जाणवतो. मग या संस्कारातून वृत्ती जागृत करायची का पूर्णपणे तटस्थ राहायचे हे आपल्या हातात रहाते. एखादा आपल्याला न आवडणारा माणूस समोर आला तर आपले द्वेषाचे संस्कार बहिर्मनात येतील, पण द्वेषवृत्तीत त्याचे रूपांतर होणार नाही. मग ही द्वेषवृत्ती परत अंतर्मनात जाऊन त्याचे नवे संस्कारही बनणार नाहीत. हळूहळू अंतर्मनातील मोह आणि द्वेषाच्या संस्कारांचे ओझे कमी होऊ लागेल. आपल्या इंद्रियांचा स्पर्श एखाद्या गोष्टीला झाला (कोणती गोष्ट पाहिली, एखादा आवाज ऐकू आला इत्यादी) तरी अंतर्मनातील संस्कार बहिर्मनावर येण्याची तीव्रता कमी होऊ लागेल, या संस्कारांना वृत्तीत बदलण्याआधी पकडणे सोपे होऊ लागेल. आपला आपल्या मनावर ताबा येऊ लागेल. आपल्यसाठो योग्य तीच गोष्ट (श्रेयस) करण्याची, अयोग्य गोष्ट (प्रेयस) करण्याच्या उर्मिला रोखण्याची आपली क्षमता वाढू लागेल. मग अर्जुनासारखा प्रसंग आपल्यावर आल्यास आपली गात्रे कापणार नाहीत, हातातले धनुष्य गळून पडणार नाही. 

विपश्यना ध्यान शिकण्यासाठी आपण गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरांत जाऊ शकता. हे शिबीर विनामूल्य आहे. http://www.dhamma.org येथे रजिस्ट्रेशन करता येते. माझ्या ब्लॉगवर (http://chintan.karkhanisgroup.com) 'कुंडलिनी ध्यान' विभागात मी त्रोटक माहिती दिली आहे. पण विपश्यना केंद्रात जाऊन ध्यान शिकल्यास उत्तम. तेथे आपल्याला टप्याटप्प्याने ध्यानाची पद्धत शिकवितात. संपूर्ण जगभर अनेक विपश्यना केंद्रे आहेत, त्यात दर महिन्याला हजारो साधक ही विद्या शिकून जातात. मग आपल्याला जमणे सहज शक्य आहे. 

जर काही कारणामुळे आपणास विपश्यना शिबिरात जाणे शक्य नसेल तर आपण ध्यानाची पूर्वतयारी असलेले 'अनापान सति' / प्राणधारणा करूनही काही प्रमाणात सावधपणा आपल्या स्वभावात आणू शकतो.  विपश्यना ध्यान / अनापान सति/ प्राणधारणा  कशी करायची याची थोडक्यात माहिती माझ्या ब्लॉगवर 'कुंडलिनी ध्यान' या विभागात आहे. प्राणधारणा आणि विपश्यना ध्यान या कुंडलिनी ध्यानाच्या पहिल्या दोन पायऱ्या आहेत. 

आपल्या सर्वांचे मन आपल्याला वश होवो आणि त्याद्वारे आपली ऐहिक आणि अध्यात्मिक प्रगती होवो ही परमेश्वराकडे प्रार्थना. 

लेखमाला समाप्त. लेखनसीमा.


संतोष कारखानीस ठाणे

अचपळ मन माझे - भाग ४

 दुर्योधनाने कृष्णाला सांगितले की 'मला माझे हित कशात आहे आणि अहित कशात आहे ते कळते. पण माझया अंगात एक अनामिक शक्ती आहे. आणि ती माझ्याकडून जसे करवून घेते तसे मला करावे लागते, माझे त्यात अहित दिसत असेल तरीही'. अर्जुन हाच प्रश्न थोड्या वेगळ्या भाषेत विचारतो आहे, पण तो त्यावर काय करावे याचे उत्तर श्रीकृष्णाकडे मागतो आहे हे आपण पाहिले. हा प्रश्न आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्यासमोर नेहमी येतो. जर आपण आपल्याला योग्य वाटते तेच करू शकलो तर आपल्याला भावी आयुष्यात खूप उपयोगी ठरेल हे आपण जाणतो. म्हणूनच कृष्णाने दिलेल्या उत्तराबद्दल आपल्याला उत्सुकता आहे. आपल्या अंतर्मनात खोलवर दडलेले 'संस्कार' आपल्या 'वृत्ती जागवितात', त्यानुसार आपण प्रतिक्रिया देतो, नंतर याच वृत्ती आपले पूर्वसंस्कार अधिक दृढ बनवितात हे आपण मागच्या भागात पाहिले. मग या चक्रातून बाहेर येण्याचा काहीच मार्ग नाही का? श्रीकृष्ण गीतेच्या तिसऱ्या अध्यायाच्या ३४ व्या श्लोकाच्या उत्तरार्धात या मार्गाकडे निर्देश करतात. पण आपल्याला हा मार्ग विस्तृतपणे समजून घेणे आवश्यक आहे. इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ | तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ || ३-३४|| श्रीकृष्ण सांगताहेत की माणसाने हे राग-द्वेषाचे संस्कार अंतर्मनातून आपल्या बहिर्मनावर येतात तेव्हाच (म्हणजे त्याची वृत्ती बनण्यापूर्वीच) त्यापासून स्वतः:ला सोडवून घेतले पाहिजे. या संस्कारांना वश होणे टाळले पाहिजे. आपल्याला साहजिकच प्रश्न पडतो की हे कसे साध्य होणार? कारण इंद्रियांचा स्पर्श एखाद्या विषयाला होताच हे लोभ-मोहाचे संस्कार आपले डोके वर काढतात, त्यांचे वृत्तीमध्ये रूपांतर होते. मला न आवडणारा माणूस दिसला की त्याक्षणी माझ्या मनात त्याच्याबद्दल द्वेषाची भावना उत्पन्न होते. समोर चमचमीत पदार्थ आला की लगेच माझ्या मनात तो खाण्याची अनावर इच्छा निर्माण होते. मग श्रीकृष्ण सांगताहेत ते मला माझ्या शक्तीपलीकडचे वाटू लागते. पण या संस्कार-वृत्ती-प्रतिक्रिया-संस्कार या चक्रातही एक कमजोर कडी - weak link - आहे. आपण या कमजोर कडीबद्दल आणि त्याचा उपयोग करून हे संस्कार-वृत्ती-प्रतिक्रिया-संस्काराचे दुष्टचक्र कसे भेदायचे हे पुढील भागात पाहू. संतोष कारखानीस ठाणे

अचपळ मन माझे - भाग २

मागील भागात आपण दुर्योधनापुढील समस्या पाहिली. 'मला माझ्यासाठी योग्य काय आहे ते ते समजते. पण तसे करण्याचा माझा स्वभाव नाही. माझ्यासाठी काय अयोग्य आहे तेही मला समजते. पण तेच करण्याचा माझा स्वभाव आहे. कोठलीतरी अज्ञात शक्ती माझ्याकडून तसे करवून घेते' असे तो श्रीकृष्णाला सांगतो. त्याची हा स्वभाव बदलण्याची  इच्छा नाही. मात्र अर्जुनापुढे हीच समस्या आहे. पण यातून कसा मार्ग काढायचा हे तो श्रीकृष्णाला विचारतो. 

श्रीकृष्णाने काय उत्तर दिले हे बघण्याआधी आपण ही समस्या आपल्याही जीवनातील खरोखरच मोठी समस्या आहे काय हे पाहू. १९६० च्या दशकात वॉल्टर मिशेल या सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने एक प्रयोग केला होता. त्याने चार वर्षांच्या मुलांवर हा प्रयोग केला. प्रत्येक मुलाला एका खोलीत बसवून त्यांना एक मॅशमॅलो (एक अमेरिकन मिठाई) दिले. पण  वॉल्टर खोलीच्या बाहेर जाऊन सुमारे दहा मिनिटात परत येईपर्यंत त्या मुलाने ते मॅशमॅलो न खाल्ल्यास त्याला  आणखी एक मॅशमॅलो बक्षीस म्हणून मिळणार होते. म्हणजेच ते समोर ठेवलेले मॅशमॅलो लगेच खाण्याच्या इच्छेवर त्याने  मात केल्यास त्याला भविष्यात दुप्पट मॅशमॅलो मिळणार होते. ते मॅशमॅलो लगेच खाणे त्यांच्यासाठी प्रेयस-प्रिय गोष्ट होती. पण ते लगेच न खाणे त्यांच्या भविष्यकाळासाठी  श्रेयस-चांगली गोष्ट होती. 

वॉल्टरने त्यानंतर चौदा वर्षांनी या मुलांचे सर्वेक्षण केले. ज्या मुलांनी लहानपणी मॅशमॅलो लगेच खाण्याच्या आपल्या इच्छेवर मात करून दोन मॅशमॅलो मिळविली होती त्यांनी भविष्यात करियरमध्ये, खेळात, कौटुंबिक जीवनात आणि एकंदरीतच खूप प्रगती केली होती. या मुलांच्यात आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला होता. मात्र जी मुले वॉल्टर परत येण्यापूर्वीच मॅशमॅलो खाऊन मोकळी झाली होती, ज्यांना मॅशमॅलो लगेच खाण्याच्या आपल्या इच्छेवर मात करता आली नव्हती ती मुले जीवनात मागे पडली होती. आपण youtube वर शोध घेतल्यास या टेस्टचे अनेक व्हिडीओ बघण्यास मिळतील. 

 https://www.youtube.com/watch?v=y7t-HxuI17Y  लिंकवर  क्लीक केल्यास असाच एक व्हिडीओ बघण्यास मिळेल. खूप मजेशीर व्हिडीओ आहे. नक्की बघा.  

Emotional Intelligence याच गोष्टीवर प्रामुख्याने अवलंबून असतो. आपली भविष्यातील प्रगती IQ पेक्षाही EQ वर अवलंबून असते. म्हणजेच आपल्याही भविष्यातील प्रगतीसाठी अर्जुनाला श्रीकृष्णांनी काय उत्तर दिले हे महत्वाचे आहे.  पुढील लेखात आपण हे उत्तर पाहू आणि आपल्या सध्याच्या जीवनात त्याचा उपयोग पाहू.   

संतोष कारखानीस ठाणे

अचपळ मन माझे - भाग ३

 पहिल्या लेखात आपण दुर्योधनापुढील समस्या पाहिली.  अर्जुनालाही हीच समस्या जाणवत होती. मागील लेखात आपण पाहिले, त्या चार वर्षांच्या मुलांचीही हीच समस्या होती. 'मला मॅशमेलो खाण्यासाठी थोडा वेळ थांबून आणखी एक मॅशमेलो मिळविण्याची इच्छा होती, पण मी माझ्या मनावर नियंत्रण ठेऊ शकलो नाही. मॅशमेलो आधीच खाऊन टाकला.' हीच त्या मुलांची समस्या होती. जर आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेऊ शकलो तर आयुष्यात मोठे पाळले गाठू शकू ही गोष्ट आपल्याला पटते. पण ती अमलात कशी आणायची हाच आपल्यापुढे प्रश्न असतो. म्हणूनच श्रीकृष्णाने अर्जुनाला काय मार्ग सांगितला हे पाहणे आवश्यक आहे. 

आपण गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील ३३ आणि ३४ हे दोन श्लोक पाहू.

सदृशं चेष्टते स्वस्या: प्रकृतेर्ज्ञानवानपि |

प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह: किं करिष्यति || ३-३३||

श्रीकृष्ण सांगत आहेत की प्रत्येक जीव आपल्या प्रकृतीनुसार वागत असतो. या प्रकृतीला - नैसर्गिकरित्या उत्पन्न होणाऱ्या भावभावनांना- आपण आपल्या आधुनिक मानसशास्त्रात 'अंतर्मन' असे म्हणतो.  प्राचीन वाङ्गमयात या अंतर्मनात असलेल्या भावभनांना 'संस्कार' असे नाव आहे.  या संस्कारांची विभागणी आपल्याला 'रागाचे संस्कार ' (म्हणजे लोभाचे संस्कार) आणि 'द्वेषाचे संस्कार' अशा दोन गटात करता येते. हे संस्कार आपल्या अंतर्मनात खोलवर असतात. सामान्यपणे आपल्याला त्याची जाणीव होत नाही.  हे संस्कार कुठून येतात आणि आपल्या वागण्यावर कसा परिणाम करतात हे पाहू. 

इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ |

तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ || ३-३४||

आपली पंचेंद्रिये (नाक, जीभ, डोळे, त्वचा, कान) आणि मन हे एखाद्या विषयाला स्पर्श करते. कोठल्यातरी वास येतो, जिभेवर चव कळते, डोळे काहीतरी बघतात, स्पर्श होतो, कानावर काही ध्वनी पडतो अथवा मनात काही विचार येतो तेव्हा खरेतर ही इंद्रिये केवळ ती  संवेदना ग्रहण करतात आणि मेंदूकडे पोचवितात. मेंदू क्षणार्धात आपल्या पूर्वस्मृतींद्वारे म्हणजेच संस्कारांच्या आधाराने नुकतीच ग्रहण केलेली संवेदना सुखद आहे का दु:खद हे ठरवितो. त्याप्रमाणे आपली प्रतिक्रिया आपल्या ताबडतोब आपल्या बहिर्मनात उमटते. यालाच आपल्या प्राचीन परिभाषेत 'वृत्ती' असे नाव आहे. आपले बहिर्मन त्या 'वृत्तीने व्याप्त' होते. आपले मन क्षुब्ध होते मग आपल्या कृतीतून अथवा आपल्या देहबोलीतून ही क्षुब्धता व्यक्त होते. मग त्या गोष्टीबद्दल आपला मोह अथवा द्वेष अधिक गडद होऊन परत अंतर्मनात जातो. पुढील वेळी हा मोह/द्वेष अधिक तीव्रतेने बहिर्मनात उतरतो आणि आपल्या बहिर्मनाची क्षुब्धता तीव्र करतो. ही प्रक्रिया वारंवार घडली की आपल्या अंतर्मनातील संस्कार अधिक तीव्र होतात. मग पंचेंद्रियांना कसल्याही गोष्टीचा स्पर्श झाला की तीव्रतेने आपली प्रतिक्रिया घडते. यात आपल्यासाठी योग्य काय, अयोग्य काय - श्रेयस कोणते आणि प्रेयस कोणते याचे भान सुटते आणि आपण एखादी कृती करून मोकळे होतो. हीच प्रक्रिया या लहान मुलांच्या बाबतीत घडली होती, हीच प्रक्रिया दु:शासनाला युद्ध करण्यात आपले अहित आहे याची जाणीव असूनही घडली होती, हीच प्रक्रिया अर्जुनाला क्षत्रियांचे कर्तव्य काय आहे हे माहीत असूनही आपले धनुष्य खाली ठेऊन युद्धाकडे पाठ फिरविण्याची तीव्र इच्छा झाली तेव्हा झाली होती. हीच प्रक्रिया आपण व्यायामासाठी सकाळी लवकर उठण्याचे ठरवूनही अंगावर पांघरून घेऊन परत झोपतो तेव्हा होते. श्रीकृष्ण गीतेच्या तिसऱ्या अध्यायाच्या या चौतिसाव्या श्लोकात या परिस्थितीला शरण न जाण्याचे अर्जुनाला सांगत आहेत. 

ही संस्कार-> इंद्रिय संवेदना-> वृत्ती-> संस्कार साखळी तोडायची कशी हे पुढील लेखात पाहू. 

संतोष कारखानीस ठाणे