पहिल्या लेखात आपण दुर्योधनापुढील समस्या पाहिली. अर्जुनालाही हीच समस्या जाणवत होती. मागील लेखात आपण पाहिले, त्या चार वर्षांच्या मुलांचीही हीच समस्या होती. 'मला मॅशमेलो खाण्यासाठी थोडा वेळ थांबून आणखी एक मॅशमेलो मिळविण्याची इच्छा होती, पण मी माझ्या मनावर नियंत्रण ठेऊ शकलो नाही. मॅशमेलो आधीच खाऊन टाकला.' हीच त्या मुलांची समस्या होती. जर आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेऊ शकलो तर आयुष्यात मोठे पाळले गाठू शकू ही गोष्ट आपल्याला पटते. पण ती अमलात कशी आणायची हाच आपल्यापुढे प्रश्न असतो. म्हणूनच श्रीकृष्णाने अर्जुनाला काय मार्ग सांगितला हे पाहणे आवश्यक आहे.
आपण गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील ३३ आणि ३४ हे दोन श्लोक पाहू.
सदृशं चेष्टते स्वस्या: प्रकृतेर्ज्ञानवानपि |
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह: किं करिष्यति || ३-३३||
श्रीकृष्ण सांगत आहेत की प्रत्येक जीव आपल्या प्रकृतीनुसार वागत असतो. या प्रकृतीला - नैसर्गिकरित्या उत्पन्न होणाऱ्या भावभावनांना- आपण आपल्या आधुनिक मानसशास्त्रात 'अंतर्मन' असे म्हणतो. प्राचीन वाङ्गमयात या अंतर्मनात असलेल्या भावभनांना 'संस्कार' असे नाव आहे. या संस्कारांची विभागणी आपल्याला 'रागाचे संस्कार ' (म्हणजे लोभाचे संस्कार) आणि 'द्वेषाचे संस्कार' अशा दोन गटात करता येते. हे संस्कार आपल्या अंतर्मनात खोलवर असतात. सामान्यपणे आपल्याला त्याची जाणीव होत नाही. हे संस्कार कुठून येतात आणि आपल्या वागण्यावर कसा परिणाम करतात हे पाहू.
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ |
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ || ३-३४||
आपली पंचेंद्रिये (नाक, जीभ, डोळे, त्वचा, कान) आणि मन हे एखाद्या विषयाला स्पर्श करते. कोठल्यातरी वास येतो, जिभेवर चव कळते, डोळे काहीतरी बघतात, स्पर्श होतो, कानावर काही ध्वनी पडतो अथवा मनात काही विचार येतो तेव्हा खरेतर ही इंद्रिये केवळ ती संवेदना ग्रहण करतात आणि मेंदूकडे पोचवितात. मेंदू क्षणार्धात आपल्या पूर्वस्मृतींद्वारे म्हणजेच संस्कारांच्या आधाराने नुकतीच ग्रहण केलेली संवेदना सुखद आहे का दु:खद हे ठरवितो. त्याप्रमाणे आपली प्रतिक्रिया आपल्या ताबडतोब आपल्या बहिर्मनात उमटते. यालाच आपल्या प्राचीन परिभाषेत 'वृत्ती' असे नाव आहे. आपले बहिर्मन त्या 'वृत्तीने व्याप्त' होते. आपले मन क्षुब्ध होते मग आपल्या कृतीतून अथवा आपल्या देहबोलीतून ही क्षुब्धता व्यक्त होते. मग त्या गोष्टीबद्दल आपला मोह अथवा द्वेष अधिक गडद होऊन परत अंतर्मनात जातो. पुढील वेळी हा मोह/द्वेष अधिक तीव्रतेने बहिर्मनात उतरतो आणि आपल्या बहिर्मनाची क्षुब्धता तीव्र करतो. ही प्रक्रिया वारंवार घडली की आपल्या अंतर्मनातील संस्कार अधिक तीव्र होतात. मग पंचेंद्रियांना कसल्याही गोष्टीचा स्पर्श झाला की तीव्रतेने आपली प्रतिक्रिया घडते. यात आपल्यासाठी योग्य काय, अयोग्य काय - श्रेयस कोणते आणि प्रेयस कोणते याचे भान सुटते आणि आपण एखादी कृती करून मोकळे होतो. हीच प्रक्रिया या लहान मुलांच्या बाबतीत घडली होती, हीच प्रक्रिया दु:शासनाला युद्ध करण्यात आपले अहित आहे याची जाणीव असूनही घडली होती, हीच प्रक्रिया अर्जुनाला क्षत्रियांचे कर्तव्य काय आहे हे माहीत असूनही आपले धनुष्य खाली ठेऊन युद्धाकडे पाठ फिरविण्याची तीव्र इच्छा झाली तेव्हा झाली होती. हीच प्रक्रिया आपण व्यायामासाठी सकाळी लवकर उठण्याचे ठरवूनही अंगावर पांघरून घेऊन परत झोपतो तेव्हा होते. श्रीकृष्ण गीतेच्या तिसऱ्या अध्यायाच्या या चौतिसाव्या श्लोकात या परिस्थितीला शरण न जाण्याचे अर्जुनाला सांगत आहेत.
ही संस्कार-> इंद्रिय संवेदना-> वृत्ती-> संस्कार साखळी तोडायची कशी हे पुढील लेखात पाहू.
संतोष कारखानीस ठाणे
No comments:
Post a Comment