Saturday, March 25, 2017

भारतीय अर्थव्यवस्था : लेख २

या आधीच्या पोस्टमध्ये आपण आपल्या प्राचीन अर्थव्यवस्थेतून काही शिकता येते काय हे बघण्याचा मानस व्यक्त केला होता.
साहजिकच पहिला प्रश्न उपस्थित होतो, भविष्यकाळाकडे न बघता आपण आपल्या रम्य भूतकाळात का रममाण होत आहोत? वर्तमानातून पळ काढण्यासाठी ही सबब नाही ना?
आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की समाजाची मानसिकता वर्षानुवर्षे घडत असते. सामाजिक संबंध, नैतिकतेच्या कल्पना यांचा पगडा मनावर असतो असतो. या सगळ्यातूनच समाज घडत असतो आणि समाजाची आर्थिक-सामाजिक प्रगती होत असते. म्हणूनच इतिहासाचे महत्व असते.
भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील एक समृद्ध अर्थव्यवस्था होती. येथील समृद्धी पाहूनच आपल्यावर सतत एक हजार वर्षे अतिक्रमणे होत होती. अल्लाद्दीन खिलजीने देवगिरी येथून काहीशे हत्तींवर सोने लादून नेल्याचा उल्लेख आहे. प्रथम मलाही ही भाकडकथा वाटली. परंतु नंतर History of Gold चा अभ्यास करताना उलगडा झाला. युरोपमध्ये सरदारांमध्ये रेशमी कपडे वापरण्याची फॅशन आली होती. परंतु रेशमी कापड केवळ सोन्याच्या बदल्यात मिळत असे. यामुळे युरोपमधील सोने संपत आले. शेवटी ओटोमानसाम्राज्याच्या सम्राटाने या 'सोन्याच्या बदल्यात रेशीम' व्यापाराला बंदी घातली.
रेशमाच्या कापडाच्या निर्मितीचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र देवगिरीजवळील पैठण होते हे लक्षात घेतले तर देवगिरी साम्राज्याच्या संपन्नतेचा उलगडा होतो.
म्हणजेच भारतात सोन्याचा धूर निघत होता ही कविकल्पना नाही.
भारतीय अर्थव्यवस्थेचा मागोवा घेताना भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे (GDP) आकडे हाती आले.
(Ref: http://cgijeddah.mkcl.org/Web…/History-of-Indian-Economy.pdf)
Years 1000AD 1500AD 1600AD 1700AD
India 33,750 60,500 74,250 90,750
China 26,550 61,800 96,000 82,800
West Europe 10,165 44,345 65,955 83,395
World Total 116,790 247,116 329,417 371,369
म्हणजेच भारताचा GDP मोगल काळापर्यंत जगाच्या ३०% होता. परंतु इंग्रजांनी येथे पाय रोवल्यावर भारताची अर्थव्यवस्था उध्वस्त केली. एवढेच नाही तर आपल्या आर्थिक इतिहासाबद्दल आपल्याला भ्रामक समजुती करून दिल्या, आपल्याला आपल्याबद्दल न्यूनत्वभावना (Inferiority Complex) निर्माण केला.
आता आपण आपल्या दैदिप्यमान आर्थिक कालखंडाचा आढावा घेऊन त्यातील वैशिष्ट्ये शोधली पाहिजेत आणि त्याचा उपयोग सध्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कसा होईल हे पहिले पाहिजे.
आपण पुढील लेखात याचा उहापोह करू.

No comments:

Post a Comment