Saturday, March 25, 2017

भारतीय अर्थव्यवस्था : लेख ४

भारतीय अर्थव्यवस्था कृषिप्रधान नसून उद्योगप्रधान होती हे पहिल्या भागात पहिले. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न मुघल राजवटीच्या अंतापर्यंत (GDP) जगाच्या उतपान्नाच्या ३०% होता हे आपण दुसऱ्या भागात आकडेवारीनिशी पहिले. पंचक्रोशीची रचना आणि त्यातील नगर-खेडी यांचे संबंध हे तिसऱ्या भागात पहिले. आता नगरांची रचना आणि त्यांचा अर्थव्यवस्थेत असलेला सहभाग यांचा विचार करुया.
भारत हे अनेक छोट्या नगरांचे बनलेले राष्ट्र होते. ही नगरे प्रामुख्याने नदी किनाऱ्यावर वसली होती. (गंगेच्या किनाऱ्यावर ब्रिटीश आले तेव्हा साडेतीनशे नगरे होती) त्यामुळे नगरात मुबलक पाणी होते. जी नगरे नदीकिनाऱ्यावर नव्हती तेथे भरपूर मोठी तळी होती. त्यामुळे भूगर्भात भरपूर पाणी होते. विहिरींद्वारे या पाण्याचा उपसा होत असे.
नगरांमध्ये आपसात व्यापार होता. हा प्रामुख्याने जलमार्गाने होत असे. यामुळे ही वाहतूक कमी खर्चाची होती. जेथे नगरे नदीकाठाशी नव्हती ती परस्परांशी रस्त्याने जोडलेली होती. हे रस्ते थेट बंदरापर्यंत जात होते. या बंदरांतून परदेशांशी व्यापार होत असे. त्यामुळे येथील बंदरे भरभराटीस आली होती. भिवंडी, चौल, सोपारा ही महाराष्ट्रातील प्रमुख बंदरे होती. घोडबंदर रोड येथे अरबी घोड्यांचा व्यापार चालत असे. येथील राजांना व्यापाराचे महत्व पटले होते. म्हणूनच बंदरापर्यंत जाणारे रस्ते सुस्थितीत असतील आणि दरोडेखोरांपासून सुरक्षित रहातील याची काळजी ते घेत असत. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला इंदोर-कल्याण रस्ता आजही राष्ट्रीय महामार्ग म्हणून वापरला जातो. नगरे अथवा बंदरांमधील वाहतुकीसाठी (रस्ते वाहतूक) अनेक बैलाच्या मोठ्या बैलगाड्या वापरल्या जात. ‘हिंदू’ कादंबरीमध्ये अशा बत्तीस बैलांच्या बैलगाड्यांचा उल्लेख आहे. या बैलगाड्या असलेल्या आणि आंतरराज्य वाहतुकीचा व्यवसाय असलेल्या जमाती येथे होत्या.
येथे खेड्यात कृषिमालाचे उत्पादन होत असे. शेतकरी आपल्या बैलगाडीतून हे उत्पादन जवळच्या नगरात देत असे. नगरात या मालावर प्रक्रिया होऊन त्यातील काही खेड्यात परत येत असे तर बहुतांश माल अन्य नगरात पुढील प्रक्रियेसाठी अथवा विकण्यासाठी जात असे. प्रक्रिया झालेला बराचसा माल परदेशात निर्यात होत असे. अशी ही निर्यातप्रधान अर्थव्यवस्था होती.
 पुढील भागात आपण या अर्थव्यवस्थेच्या काही विशेष अंगांकडे पाहू.

No comments:

Post a Comment