Saturday, March 25, 2017

भारतीय अर्थव्यवस्था : लेख ३

भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान कधीच नव्हती तर येथे कृषिप्रधान आणि उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेचा सुंदर मेळ साधला गेला होता हे आपण आपल्या पहिल्या भागात पहिले. यामुळे आपली अर्थव्यवस्था जगात अत्यंत भक्कम गणली जात होती. मोगल काळापर्यंत आपले सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) जगाच्या उत्पन्नाच्या तीस टक्के होते हे आपण दुसऱ्या भागात आकडेवारीनिशी पहिले. या अर्थव्यवस्थेची अशी कोणती वैशिष्ट्ये होती की ज्यामुळे आपण हे साध्य करू शकलो हे या भागात पाहू.
प्राचीन भारताची रचना ही एक नगर आणि त्या भोवती पंचक्रोशीत वसलेली गावे अशी होती. म्हणजेच ही व्यवस्था ग्रामप्रधान नव्हती तर नागरी व्यवस्था होती. (आपल्या जुन्या गोष्टींची सुरुवात 'एक आटपाट नगर होते' अशीच होत असे हे अनेकांना आठवत असेल).
ही पंचक्रोशीत वसलेली गावे नगरांशी रस्त्याने जोडलेली असत. हा ग्रामीण भाग ते नगर अशी वाहतूक प्रामुख्याने बैलगाड्यांच्या सहाय्याने होत असे. नगरांना लागणारे कृषी साहित्य आजूबाजूच्या गावांतून येत असे. नगरे या मालावर प्रक्रिया करून तो विक्रीयोग्य बनवीत असत. शेतकरी स्वत:च्या बैलगाडीतून ही वाहतूक करीत असत.
शहरात निर्माण होणारा कचरा पंचक्रोशीतील ग्रामीण भागासाठी खत म्हणून सहज वापरता येत असे. कृषी मालाचा कचरा बैलाना खाणे म्हणून तेथेच उपयोगात आणता येई. नगरे आणि खेडी जवळ असल्याने कृषीमालाची नासाडी होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. नगरात निर्माण होणारे सांडपाणी तेथेच जिरवून विहिरीद्वारे पुनर्वापर होत असे. म्हणजेच नागरी संस्कृती असूनही सांडपाण्याचा निचरा, कचऱ्याची विल्हेवाट हे आज भेडसावणारे प्रश्न नव्हते.
लग्ने बहुदा पंचक्रोशीतच होत असत. त्यामुळे पंचक्रोशी (ज्यात नगर आणि त्याभोवतालची खेडी आली) हे एक अत्यंत घट्ट धाग्यांनी बांधलेले एकक होते.
या नगरांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि त्यांचे अर्थव्यवस्थेत असलेले स्थान यांचा पुढील भागात उहापोह करू.

No comments:

Post a Comment