Tuesday, November 20, 2018

मांडुक्य उपनिषद ४

मागील लेखात आपण माणसाच्या चार अवस्था आहेत हे पहिले.
१> जागृतावस्था : यात आपले चैतन्य बाह्यमुखी असते. आपल्या शरीराबाहेरच्या गोष्टींचा अनुभव घेण्याचा ते प्रयत्न करीत असते. यासाठी त्याला आपली पंचेंद्रिये आणि मन यांचा उपयोग होतो.
२> स्वप्नावस्था: यात आपले चैतन्य अंतर्मुखी होते. मनाच्या साहाय्याने बाह्य जगतात असणाऱ्या गोष्टींचे प्रक्षेपण करून स्वप्नातील पंचेंद्रियांच्या साहाय्याने ते अनुभव घेते.
३> सुषुप्ती: यात आपण गाढ झोपेत असतो. येथेही चैतन्य असते, पण या चैतन्याला प्रकट होण्यासाठी कोठलेही साधन (Object) नसते. चैतन्य हे प्रकाश किरणांसारखे असते. अंतराळात सर्वत्र प्रकाश भरून राहिलेला असतो. पण एखादी वस्तू असेल तरच त्यावर परिवर्तित झालेल्या प्रकाशामुळे आपल्याला त्या प्रकाशाचे ज्ञान होते. अंधाऱ्या आकाशात प्रखर झोत टाकला तरी आपल्याला त्याचे ज्ञान होणार नाही. वाटेत धुळीचे कण असतील तरच त्याचे  ज्ञान होईल. (उदा. धूमकेतूच्या शेपटीतील धुळीमुळे अंतराळातील प्रकाशाचे ज्ञान होते) सुषुप्तीमध्ये चैतन्य प्रकट होत नाही. पण ते अस्तित्वात असल्यानेच झोपेतून उठल्यावर शांत झोप लागली होती याचे ज्ञान होते. सुषुप्ती ही आपली बीजावस्था आहे. कारण उठल्यावर आपल्याला परत या विश्वाचे भान येते. म्हणजेच हे भान सुषुप्तावस्थेत बीजावस्थेत असते.

Related image
या तीन अवस्थांचे प्रत्येकी तीन भाग करता येतील. पुरुष, अभिमानी आणि द्रष्टा. जनकराजाच्या गोष्टीत स्वप्नावस्थेमध्ये जनक राजा लढाई करत होता, रस्त्यावरून जात होता, आक्रोश करीत होता. हा स्वप्नपुरुष-स्वप्नातील पुरुष-होय. जागा झाल्यावर त्याच्या लक्षात आले की हे सर्व स्वप्न होते, हे त्याच्याच मनाने निर्माण केलेले जग होते. हे जाणणारा झाला स्वप्नअभिमानी, हे सर्व स्वप्न माझेच आहे असा अभिमान (ego) असणारा. हे सर्व स्वप्न आणि जाग आल्यावर आलेले भान आपल्या चैतन्यात घडले. हे चैतन्य धारण करणारा तो स्वप्न द्रष्टा.

असाच प्रकार जागृतावस्थेतही असतो. जागृतावस्थेत आपण म्हणजे जागृत पुरुष. पण जेव्हा आपण आपली स्वत:ची ओळख विशाल करतो तेव्हा जागृत अभिमानी दिसतो. उदाहरणार्थ आपण जेव्हा भारत-पाकिस्तानची क्रिकेटस्पर्धा पाहतो तेव्हा अंतरंगात आपण भारताच्या विशाल समुदायाचा भाग होतो. एखादा माणूस जातीसाठी-धर्मासाठी काही विचार करतो तेव्हा तो त्या विशाल समुदायाचा भाग होतो. अशाच प्रकारे जेव्हा तो सर्व मानवजातीचा भाग होतो तो जागृतअभिमानी होतो. ज्या चैतन्यात हे घडते ते जागृत द्रष्टा होय. सुषुप्तावस्थेत सुषुप्त  अभिमानी  आणि द्रष्टा असतो. मात्र सुषुप्त पुरुष नसतो कारण चेतना बाह्यजगात प्रक्षेपित होत नसते.
या सर्व अवस्थांत द्रष्टा हा एकच असतो. तोच तुर्य म्हणता येईल.

जागृत पुरुष हा व्यवहारासाठी उपयुक्त असतो तर जागृत अभिमानी हा आनंद उपभोगतो. जागृत द्रष्टा हा मोक्षप्राप्तीसाठी उपयुक्त ठरतो.

चौथी तुर्यावस्था म्हणजे आपण ब्रह्मस्वरूप असल्याची जाणीव,  आपण विशाल चैतन्यसागर असल्याची जाणीव.
 मागील लेखातील उदाहरणात सोने जसे पाटल्या, हार, अंगठी अशा अनेक रूपात प्रकट होते, परंतु अंतरंगी ते सोनेच असते तसेच आपली तुर्यावस्था अन्य तीन अवस्थांमध्ये प्रकट होते. आपल्याला आपल्याला पाटल्या पाहिल्यावर ते सोने आहे याची जाणीव झटकन होत नाही, तसेच जागृतावस्था, स्वप्नावस्था अथवा सुषुप्तीमध्ये आपल्या तुर्यावस्थेची जाणीव नसते. पण या अवस्थांच्या पाठीशी तुर्यावस्था ठामपणे उभी असते. जसे सोने काढून घेतले तर पाटल्यांचे अस्तित्व राहात नाही तसेच तुर्यावस्थेशिवाय अन्य अवस्थांचे अस्तित्व उरत नाही. सोनाराला जसे कोठल्याही दागिन्यात सोनेच दिसते तसेच ज्ञानी (आपण ब्रह्मस्वरूप असल्याची जाणीव झालेल्या) पुरुषास कोठल्याही अवस्थेत तुर्यावस्थेचेच दर्शन होते.

पुढील लेखात आपण या तुर्यावस्थेची अधिक माहिती घेऊ.


No comments:

Post a Comment