Friday, October 4, 2019

चीन-2

चीनी क्रांतीचा सत्तरावा वर्धापनदिन नुकताच पार पडला. त्या निमित्ताने मी काल  चिनी खाद्य संस्कृतीवर लिहिले होते. आता थोडे चिनी संस्कृतीवर.
चीनमध्ये अनेक प्रांत आहेत. प्रत्येक प्रांताची संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि भाषा वेगळी आहे. परंतु चिनी सरकारला ही 'विविधतेत एकता' मजूर नाही. त्यामुळे चीनने सर्व चीनवर 'मँडरिन' ही एकाच भाषा लादली आहे (जिला आपण चिनी भाषा म्हणून ओळखतो).  सर्व शिक्षण याच भाषेत असते. महाविद्यालयीन शिक्षणही याच भाषेत असते. सर्व सरकारी कागदपत्रेही याच भाषेत असतात. त्यामुळे नवी पिढी त्यांची मूळ भाषा विसरू लागली आहे.  १९९६ साली माझ्यासोबत काम करणारी माझी तरुण मित्रमंडळी त्यांची मूळ भाषा बोलू शकत नव्हती, पण समजू शकत होती. त्यांचे आजी-आजोबा ती  भाषा बोलत असल्याने त्यांना ती जेमतेम समजत होती.
चीनमध्ये ५७ 'नॅशनॅलिटीज ' आहेत. म्हणजेच ५७ भिन्न वांशिक समूहांचे लोक राहातात.  यात ९१. ५९% हे 'हान' समूहाचे आहेत तर ८.४१% हे बाकी ५६ वंशाचे आहेत.  त्यामुळे सर्व निर्णयांवर हान वंशाचा पगडा दिसतो.  अनेक अल्पसंख्य वांशिक समूहांवर 'हान' समूहाकडून अन्याय होत असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात.  उइगर वंशाच्या मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या सध्या येत आहेत. तिबेटी वांशिक नागरिकांवर अत्याचाराच्या बातम्या भारतीय वृत्तपत्रात येत असतात.
चिनी भाषेच्या दोन लिप्या आहेत. यात अक्षरे नसतात, तर ही चित्रलिपी आहे.  एक लिपी प्राचीन आहे. त्यात सुमारे तीन हजार चित्रे आहेत. सध्या बहुसंख्य ठिकाणी सोपी केलेली लिपी वापरली जाते. त्यात थोडीशी चित्रे आहेत. चित्र लिपी असल्याने आपले नाव वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येते. आपल्या नावाचे भाग करून उच्चारानुसार (तसा  उच्चार असलेल्या वस्तूंची चित्रे एकासमोर एक ठेऊन) आपले नाव लिहिले जाते. अक्षरांची सवय असलेल्या आपल्याला हे थोडे विचित्र वाटते.
चीन आणि त्याच्या पूर्व सीमेवर असलेला कोरिया यांच्यात पूर्वापार वैर आहे.  कोरियन लोकांनी चिनी सम्राटांना जेरीस आणले होते. म्हणून पूर्वीच्या कोरिया-चीन सीमेवर कोरियन लोकांपासून बचाव करण्यासाठी अजस्त्र चिनी भिंत बांधली होती. आजही कोरियन वंशाचे काही लोक चीनमध्ये राहतात. ५६ अल्पसंख्य वांशिक गटांपैकी कोरियन हे एक आहेत.
या विविध वांशिक गटांच्या संस्कृतीचे प्रदर्शन चीनने शेनझन या 'विशेष औद्योगिक क्षेत्रात' उभे केले आहे. शेनझन हे चीनच्या मुख्य भूमीत असलेले हाँग काँगचे जुळे शहर आहे. हाँग काँगला भेट देणाऱ्या पर्यटकांनी शेनझनला अवश्य भेट द्यावी. या प्रदर्शनात ता विविध वांशिक गटांच्या राहण्याच्या, खाण्याच्या आणि लग्नसमारंभ इत्यादींच्या पद्धती दाखविलेल्या आहेत. भारतातही अनेक जातिसमूहांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती आहेत. त्या कालौघात नष्ट होत आहेत. त्यांचे असेच एखादे कायमस्वरूपी प्रदर्शन का असू नये?
या प्रदर्शनात एका वांशिक समूहाने माझे लक्ष वेधून घेतले. या समूहाच्या विभागासमोर काहीजण सनई-चौघडा वाजवीत होते. हे वाद्य मंगलसमयी वापरतात असे तेथे लिहिले होते. तसेच या ठिकाणी एक जाते ठेवलेले होते. हे यंत्र पीठ करण्यासाठी वापरले जाते अशी माहिती होती. तसेच एका विहिरींची प्रतिकृती असून त्यावर रहाट होता. हा समूह निश्चितच भारतातून चीनमध्ये स्थलांतरित झालेला असावा. यावर कोणीतरी अधिक संशोधन करणे गरजेचे आहे. (या गोष्टीला आता वीस वर्षे झाली. मी त्या वांशिक समूहाचे नाव विसरलो).
याच प्रदर्शनात विविध वांशिक गटांच्या खाद्यपदार्थांचा एक विभाग होता. तेथे मला 'Goat Meat Available' अशी पाटी  दिसली. चीनमध्ये बकऱ्याचे मांस मिळत नसल्याने मी लगेच तेथे धावलो. तेथील माणूस प्रथमतः: मला पाकिस्तानी समजला. मी भारतीय असल्याचे कळल्यावर त्याने माझ्याशी हिंदीत बोलणे चालू केले.  मी आश्चर्याने थक्क झालो. तो कस्तगरचा असल्याचे मला परत परत सांगत होता. मला हे कस्तगर कोठे आहे तेच माहित नव्हते. नंतर शोध घेता हे ठिकाण तिबेटजवळ सिल्क रूटवर असल्याचे आणि त्या प्रदेशाशी भारतीय व्यापाऱ्यांचे येणेजाणे चीन राज्यक्रांतीपर्यंत होते असे लक्षात आले. त्यामुळेच तेथील रहिवाशाना अजूनही हिंदी चांगले बोलता येते.
चीनमध्ये अनेक लोक बुद्धाला मानतात. बुद्धाला तेथे शुकमुनि या नावानेही ओळखतात. हे नाव शाक्यमुनी शब्दाचा अपभ्रंश असावा. बुद्ध शाक्यवंशीय होता.  चीनमध्ये धर्माचे पालन जाहीरपणे करता येत नसल्याने बौद्धमंदिरे नाहीत. परंतु हाँग काँग मध्ये आहेत. मी तेथील एका मंदिरात गेलो होतो. पूजाविधीची पद्धत आपल्याशी जुळणारी आहे. जाड अगरबत्त्या देवाला वाहण्याची प्रथा आहे.  देवळात चिठ्ठीच्या साहाय्याने तुमचे भविष्य सांगणारे बसलेले असतात. नुकतेच चिनी सरकारने कन्फ्यूशियम हा चीनचा अधिकृत धर्म म्हणून जाहीर करण्याचे ठरविले आहे.
चीनमध्ये कायदे पालनाची व्यवस्था अत्यंत चांगली आहे. एकदा एका टॅक्सीचालकाने माझ्याकडून जास्त पैसे घेतले.  तेथे टॅक्सी इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या आहेत.  आपल्या नियोजित स्थळी पोचताच छापील बिल येते. त्यावर बाकी सर्व त्यांच्या लिपीत असले तरी आकडे रोमन असतात. टॅक्सिवाल्याने बळजबरीने जास्त पैसे घेतले. माझ्या कार्यालयातील लोकांना हे समजताच त्यांनी पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. जर मी तक्रार केली असती तर त्या टॅक्सीवाल्याचा परवाना गेला असताच, पण परदेशी प्रवाशांना त्रास दिल्याबद्दल कडक शिक्षा झाली असती.  मला त्या टॅक्सीवाल्याची  दया आली आणि मी तक्रार केली नाही.
एकदा मी चीनमध्ये असताना चाच्यांनी पळवलेले  इंडोनेशियन जहाज चीनने नजीकच्या समुद्रात पकडले.  त्याची न्यायव्यवस्था एवढी जलद आहे की चार महिन्यात त्या सर्व चाच्यांना मृत्युदंड दिला जाऊन त्याची अंमलबजावणीही झाली.
जगातील अन्य राष्ट्रात मिळून दहा वर्षात जितक्या लोकांना मृत्युदंड दिला जात नाही एवढ्या लोकांना चीनमध्ये एका वर्षात दिला जातो.  चीनमधील प्रमुख सणांच्या काही दिवस आधी (वर्षातून चार वेळा) एकाच दिवशी सर्व मृत्युदंडाची शिक्षा झालेल्याना गोळी घालून मारले जाते. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्यांच्या शरीरावर त्यांच्या नातेवाईकांचा हक्क नसतो. या मारलेल्या कैद्यांच्या शरीरातील अवयव काढून ते इच्छुक रुग्णांना दिले जातात. यामुळे चीनमधील डॉक्टर्स हे अवयव प्रत्यारोपण करण्यात जगात सर्वात अनुभवी समजले जातात.
या प्रकारच्या कायद्याच्या अत्यंत कडक अंमलबजावणीमुळे चीनमध्ये रात्री-बेरात्री फिरतानाही सुरक्षित वाटते.  शेनझन शहरात आम्ही अनेक वेळा एकटेच चालत सबवे पार करून मध्यरात्री आमच्या कंपनीत जात असू. पण कोणालाच कधी भीती वाटली नाही. अगदी अमेरिकेतही आम्ही असे निर्धास्त फिरू शकलो नाही.
चिनी नागरिक या वातावरणात आनंदी आहेत. १९८९ साली लोकशाहीच्या मागणीसाठी चिनी विद्यार्थ्यांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला होता. तत्कालीन चिनी सरकारने रणगाडे विद्यार्थ्यांच्या अंगावर घालून तो उठाव मोडून काढला होता. पण त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे सध्याचा तरुणवर्ग त्यांच्या राजकीय पद्धतीबद्दल समाधानी दिसतो. १९८९ चा उठाव ही मोठी चूक होती असे बहुसंख्य लोकांचे मत दिसते.
पुढील लेखात चिनी कॅलेंडर आणि नववर्ष उत्सव या संदर्भात.


No comments:

Post a Comment